Sunday, July 3, 2011

विसा, मुंबई आणि आय ट्वेन्टी

मुंबईतली रम्य सकाळ, काही अत्यानंदाने फुललले चेहरे आणि काही निराश. मागील दीड तासांपासून हाच खेळ पाहतोय. मनात शंकाचे मोहोळ उठलेले. तसा मी एकटाच नाहीये, माझ्यासारखी बरीच मंडळी तरुण, म्हातारी त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभी काही तशीच फुटपाथ वर बसलेली. कचरा उचलणाऱ्या गाडीचा खेळ पाहून झाला, जॉगिंग करणारे पब्लिक पाहून झालं, समोरची उंचच उंच इमारत पाहून झाली, आणि कॉन्सुलेट च्या लायनितली पाखरं पण टिपून झाली. पण ममी पपांचा तपास नाही.

आता मी आणि आमच्या शेटे कुटुंबातली तमाम भावंडं -अमित, अर्चना, अभिजीत, अमृता आणि अनुपम आपापल्या आई बाबांना ममी पपा म्हणतात यात आमची काही चूक नाहीये. मला याचे काही एक वाटत पण नाही. पण असावा भावे स्कूल चा परिणाम की लिहिताना चुकल्या चुकल्यासारखे वाटते.

तर रम्य अशासाठी की मुंबईतली म्हणजे एकदम कोअर मुंबई गावात जाण्याची माझी पहिलीच वेळ होती, आणि तसा मी कट्टर पुणेकर वं मुंबई द्वेष्टा असलो तरी मला त्या दिवशी मुंबई वेगळीच भासली.

विसा - कोणाचा?
मी मुंबईत कसा- त्याचे झाले असे की मोठ्या प्रयत्नानंतर माझ्या आई वडिलांना पासपोर्ट मिळाला एकदाचा. (या पासपोर्ट ची कहाणी लै मोठी आहे.. उगाच फुटेज खाईल या पोस्ट मध्ये म्हणून नंतर कधीतरी) आणि येन केन प्रकारेण त्यांना जावयाघरी अमेरिकेच्या न्यू जर्सी नामक शहरामध्ये जाण्याचे निमंत्रण आले. मंगळवार सकाळी ९.३० ची विसा इंटरव्यू ची वेळ मिळाली, उगाच उशीर व्हायला नको म्हणून आक्काच्या सासरी
सोमवार रात्री आलो. आणि सकाळी पहाटे पहाटे भावजींचे वडिल- पानसरे काकांसोबत गोवंडी हून कॉन्सुलेट कडे निघालो. (काका- हा पण भावे स्कूल चा परिणाम, एरव्ही मी त्यांना मामा म्हणायला हवे खरेतर) पहिले बसने दादर स्टेशन आणि तिथून महालक्ष्मी स्टेशन वर उतरलो. कॉन्सुलेट हा एवढा एकच शब्द ऐकल्याबरोबर टॅक्सी वाल्याने मीटर डाऊन केला, टॅक्सीचे दर उघडताना आणि लावताना तोच परिचयाचा अगदी पिक्चरमध्ये येतो तसा अगदी कडक लॉकचा आवाज आला. त्याने बिनचूक भुलाभाई देसाई रोड, अमेरिकन कॉन्सुलेट च्या दाराशी आणून सोडले. "वो वहापे लाईन दिख रही है ना, वहापे खडे हो जाना, नंबर आयेगा तो अंदर बुला लेंगे" आपल्या सात पिढ्या हेच काम करत होत्या अशा थाटात आणि "गावाकडचं पब्लिक आलं विसा काढायला" अशा तुच्छतेने त्याने न विचारलेली माहिती दिली.

त्या दुतावासाच्या मुख्य इमारतीपासून दूरवर पर्यंत लाईन आली होती. मला बऱ्याचदा बसची, रेल्वे ची गर्दी पाहून वाटते की पब्लिक कुठे जातं एवढं रोज तिच्यायला. तेवढीच गर्दी अमेरिकेला जाण्यासाठी पण आतूर.
असो, तर रांगेतल्या शेवटच्या सहृदय मुलीने सांगितले की फॅमिली असेल तर वेगळी लाईन आहे.. आणि मग डायरेक्ट मुख्य दुतावासापाशी आलो. मागे मम्मी, पपा आणि पानसरे काका. काही विचारायच्या आतच त्यांनी सांगितले की निमंत्रण पत्र, आणि बँकेची स्लीप वर ठेवा बाकी सारी कागदपत्र प्लास्टिक च्या पिशवीत टाका आणि घड्याळ, मोबाईल, आणि अनावश्यक वस्तू बाहेर ठेवा. पटापट ममी ची पर्स घेतली आणि सगळ्या वस्तू गोळा केल्या. त्यांची फायनल उजळणी घेईपर्यंत ते गायब.. जवळपास तासभर आधी आत गेले ते. काहीतरी गोची झाली की काय असा विचार येतो तो लगेच तिथल्या गार्ड्स ने हाकलले.. "चला लांब.." लांब म्हंजे कुठे ते दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या गर्दीला पाहिल्यावर समजले. आता म्हटले गेलेच आहे आत तर राम भरोसे.. भावजींनी पाठवलेले कागद, गुंतवणूक- मालमत्तेचे कागद, मम्मीचे शाळेचे कागद या सर्वात त्या
कॉन्सुलेट च्या ऑफिसर ने मागितलेले कागद मिळवले म्हंजे झाले. आणि एवढी उजळणी करून परीक्षेला जाताना नेमका महत्वाचा प्रश्न तर नाहीना राहिला ही भीती.. 'कुठे जाणार, काय करणार, काय पाहणार, मुलगी काय करते, जावई काय करतो, परत कधी येणार, मुलीला कधी भेटले होते शेवटचे, मुलगा काय करतो, कुठे करतो..' असे आणि आणखी डझनभर प्रश्नांच्या तयारीचा उपयोग होणार का? मग तो टेन्साळलेला दीड तास..

आय ट्वेन्टी
या मुलाखतीच्या निमित्ताने ममी पपा सोबत जाण्यासाठी दोन दिवस रजा काढून पुण्यात शनिवारीच आलो. त्यांना मदत होईल या भावनेपेक्षा आमची आय ट्वेन्टी भरधाव एक्सप्रेस हायवे वर चालवायला मिळणार याची उत्कंठा जास्त. नाहीतरी आमची मम्मी म्हंजे मदत वगरे शब्द ऐकला तरी कडेलोट करून देते. घंटा मदत वगेरे कधी करत नाही मी. तर, कधी कधी तुम्ही एक स्वप्न पाहता नकळत एखाद्या गोष्टीला पाहून. मी पाहिले होते, लोहगड ट्रेक च्या वेळी.. अकरावीत असेल मी तेव्हा..मळवली पुलावरून द्रुतगती मार्ग पहिला तेव्हा. तो ओला चिंब सहापदरी रस्ता आणि त्यावरून सुसाट सुटलेल्या गाड्या. कितीतरी वेळ नुसता बघत होतो.
त्या दिवशी माझे एक स्वप्न संपले. १ तासाहून जास्त वेळ हडपसर ते वाकड फाट्यापर्यंत लागल्यानंतर यशवंतराव चव्हाण पुणे मुंबई द्रुतगती मार्गाकडे निघालो. मनात थोडी धास्ती होतीच, म्हणून टायर प्रेशर चेक करून घेतला. आणि जेव्हा एक्सप्रेस वे वर गाडी सोडली.. अहाहा.. बाहेरचा रिमझिम पाउस.. आणि मनातही, काव्य स्फुरावे अशी स्थिती.. ८०.. मग आणखी थोडा वेग वाढवला.. १००.. १२०.. बस.. यापुढे मला माहित नाही, या गूढ वेगाचा कधी शोध घेतला नाही.
पपा शेजारीच होते, पण काही एक सूचना नाहीत.. कमाल आहे.. मग आणखी थोडा वाढवू.. करत करत १४० ला काट्याने स्पर्श करताच क्षितिजावर आतषबाजी होतीये का काय असे वाटले.. पण मग एक दोन सफारी, इनोवा ला ओवरटेक केल्यावर आता खरेच लै माज झाला म्हणून गप् १००-११० वर चाललो. खंडाळ्याचा घाट आणखी एक अनुभव. थोडी अवघड वळणे होती, पण अगदी रक्तात ड्रायविंग असल्याप्रमाणे चालवली. याच घाटावर मुंबई हून येतान मात्र माझा नवखेपणा दाखवलाच मी. चढ सुरु झाला तो गाडीला कळला पण माझ्या डोळ्यांना नाही कळला. गियर न बदलल्यामुळे एकदम वेग कमी झाला, आणि मी पंक्चर झाली, पंक्चर झाली म्हणून कडेला घेतली. मग आणखी काय होणार.. पपांनी ट्रेडमार्क हेटाळणी केलीच.

मुंबई
मुंबईचा मला लै तिटकारा वाटतो. ती गर्दी आणि लोकलच्या वेळापत्रकावर चाललेले आयुष्य. पण हे सगळी पिक्चर बघून बनवलेली मतं. त्या दिवशी पहिल्यांदा लोकल मध्ये प्रवास केला. गर्दी तर होतीच, पण अंदाधुंद नव्हती. या गर्दीमधेपण आम्ही पुण्याहून आलोय हे शेंबड्या पोरानेही ओळखले असते. मी आणि मम्मी तर पुरते भांबावलो होतो.. पानसरे काका मात्र कौशल्याने आम्हाला सूचना देत वर लोकल ची माहिती - दक्षिण उत्तर मार्ग, हार्बर लाईन.. ही लाईन ती लाईन हे सांगत प्रवास घडवत होते. कॉन्सुलेट चे काम झाल्यावर पाउस सुरु झाला आणि लोकल गर्दीतही सुसह्य का हे पण समजले. च्यामारी एवढे मोठे शहर, आणि फुल्ल लोकांनी भरलेले पण एका टोकाहून दुसऱ्या टोकापर्यंत सुसाट जाता येते. आमचे पुणे नाहीतर.. पब्लिक ट्रांसपोर्ट नावाला. पुण्यात तुमच्याकडे दुचाकी नसेल तर तुम्ही उर्मट कंडक्टर आणि लुटारू रिक्षावाले यांच्या दयेवर आहात. आणखी काही पुणेरी बसच्या प्रवासाचे 'फायदे' मी इतरत्र सांगितलेच आहेत. दादर स्टेशन वर मी पहिल्यांदा ती फेमस बंबैय्या गर्दी- जी दशकानुदशके बॉलीवूड च्या सिनेमात दाखवली जाते; ती बघितली. डोकीच डोकी.. कोण आहेत हे? मी कोण आहे? - असे प्रश्न पडेपर्यंत ही गर्दी त्या लांब लोकल मध्ये गुडूप होते आणि शहराच्या दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचते पण.
तर असा होता माझा हा प्रवास.. गाडी एकदम ढ़िंक्च्याक चालवतो बरका आपण. नवी मुंबई आणि पुण्यातल्या गर्दीत अगदी व्यवस्थित चालवल्यामुळे पपांचेही प्रशस्तीपत्रक मिळाले. वख वख कमी झाली जीवाची साला..

हा.. तर ममी पपांना कॉन्सुलेट ऑफिसर ने अपेक्षेपेक्षा जास्तच प्रश्न विचारले. जावयाचा पगार, कंपनी, मागची कंपनी का सोडली? आता या लोकांना माझा पगार नीट माहित नाही तिकडे जावयाचा कोण विचारणार? पपा पण हुषार, हातावर माहिती लिहून गेले होते. कधी तुमच्या पोरानेतरी आयुष्यात कॉपी केली होती का? बाकी नाव काढले हो घराण्याचे.. एवढे ग्रील्लिंग होऊनपण विसा मिळाला दोघांना.. अभिनंदन. त्याच्या पुढच्याच आठवड्यात पानसरे काका काकूंना पण मिळाला.. चला..
या सर्व विसा प्रकरणामध्ये मदत केलेले पानसरे काका, प्रियमित्र अमोल, गीता वहिनी आणि वारूणकर काका या सर्वांना लै लै थँक्स.

Expressway image courtesy:

2 comments:

अभिप्रायासाठी अनेक आभार!