Sunday, May 27, 2012

दिलमे मत रख यार, बोल डाल!


या विषयाला गंभीर करू की इनोदी करू हे सुचत नाहीये. त्यामुळे दोन्ही प्रकार एकमेकात घुसळून हा पोस्ट स्ट्रॉबेरी फ्लेवरच्या आईसक्रीमवर लिंबाच्या लोणच्याचा खार टाकला तर जी चव येईल तसा झाला तर क्षमा.

परवा पेट्रोल चे भाव पुन्हा चढवले या हरामखोरांनी. मला कार घेतल्यावर जेवढा आनंद झाला नाही तेवढा आनंद लोकांना मला "तुझी कार किती मायलेज देते?" हा प्रश्न विचारून होतोय. त्यांच्या चेहऱ्यावरचे छद्मी हास्य सहन करणे असह्य होते. कधीकधी बोलून जातो कि "बरे झाले दीड वर्षापूर्वी घेतली, नाहीतर आता घेण्याची हिम्मत आहे का कुणाची?" मग त्यांच्या आनंदात थोडे विरजण पडले कि कसे गार गार वाटते.

काल शनिवारी रात्री उशिरा ऑफिस वरून घरी निघालो. (ही शनिवार, ऑफिस, आणि उशीर ही वेगळी कहाणी.. फुटेज खाईल.. तेच ते). रविवारी सकाळीच आजीला घेवून गावाला जायचे होते म्हणून म्हटले लगेहात पेट्रोल भरून घेवू.
आमच्या कंपनीजवळच्या पेट्रोल पम्पावर घेतली आणि २००० चे टाकायला सांगितले. सवयीप्रमाणे की लोक करतात म्हणून, बाहेर येवून टँक पाशी उभा राहिलो. "झीरो बघा" इति पंप कामगार.( त्याला पेट्रोल वाढपी म्हटले तर कसे वाटेल?)
बघितला. पेट्रोल चे नोझल टाकीत आणि मी लक्षपूर्वक मीटर कडे पाहतोय. तोच मागून दुसरा आला आणि कार्ड घेवून गेला.
आता जसे मीटर १२०० ला लागले, दुसरा कार्ड घेवून हजर. त्याच्या पावतीवर सही करतोय तर तिकडे २००० झाले.
आता थोडे लवकर झाल्यासारखे वाटले, पण मीटर कशाला खोटे बोलेल अशा समजुतीवर कार्ड पाकिटात ठेवून निघालो पुढे. बघतोय तर गाडीचा फ्यूल गेज टाकी ३/४ भरलेली दाखवत होता. चायला गेम पडली.. हा पहिला विचार.
दर वेळी २००० चे भरले तर टाकी पूर्ण भरते, आणि आज ५०० चे पेट्रोल आधी असूनही टाकी ३/४?
दरवाढीने एवढा फरक?
तसाच पुढे आलो.. नाही यार मला झोप नाही येणार. मीटर मध्ये मारले कि काय? पण मी तर झीरो आणि २००० बघितले होते. मग लोचा झाला कसा? आणि झाला तर केला कसा? मागे जावून त्यांना विचारू? विसरून जाऊ?

अॅक्टीवा किंवा स्कूटी वाल्या पोरींना हे वाढपी गंडवतात हे माहितीये.
एकीकडे ती अवजड गाडी कोवळ्या हातांनी सांभाळायची दुसऱ्या हाताने सीट उघडून टाकीचे झाकण काढायचे. अशात समोर मीटर पहायचा. आणि वाढपी पट्टीचे असतील आणि अॅडीटीव घ्या म्हणून मागे लागेले वगैरे तर नको म्हणत कसेबसे देतील तेवढे पेट्रोल पदरात पाडायचे. असे दृश्य पहिले की "स्त्रीजन्मा तुझी कहाणी" वगैरे वगैरे डोळ्यासमोर येते.
एकदा दोनदा मला स्वताला असा अनुभव आला तेव्हा मला मीटर वरून डोळे न हलवण्याची सवय लागली. बहिणीला आणि मैत्रिणींना तर लय वेळा सांगितले कि, पेट्रोल भरताना गाडी स्टँड वर लावून निवांत होवून मीटर कडे पाहिल्याशिवाय भरू देवू नका. मागच्या लोकांनी हॉर्न मारला तर 'हाड' म्हणून स्थितप्रज्ञ राहा.
शेवटी आता या पोरींची दया त्या स्कूटर बनवणाऱ्यांना आली आणि त्यांनी त्या नवीन डिझाईन वाल्या गाड्या काढल्या. ज्याच्यात काही गाड्यांना पुढून पेट्रोल भरता येते तर काहींना सीट उचकण्याची गरज नाही.

हा तर, मनी निश्चय केला कि जावून जाब विचारायचा. केस काय मांडणार? मीटर तर मी स्वत: बघितला होता.. पण म्हटले गेले सगळे xxx. मी जाणार. मग गाडी वळवली आणि एकदम अँग्री यंग म्यान थाटात सरळ पंपावर घालून उतरलो आणि त्या वाढप्याला म्हणालो..
इथे शिवी वगैरे अपेक्षित आहे, माहितीये मला.. पण नाही, निघाली नाही.
त्याला म्हटलो.. "तुम्ही २००० चे पेट्रोल टाकले पण माझा गाडीचा फ्यूलगेज दाखवत नाहीये."
मग तो निमूटपणे माझ्या मागे आला. आणि फ्युल्गेज पाहिला.
वाढपी - "आहो पण सर् तुम्ही मीटर पहिला होता ना. मग कसे होईल असे?"
सर्? अच्छा माणूस जरा मवाळ दिसतोय.. च्यायला एक शिवी तर खपलीच असती.
मी- "ते मला माहीत नाही, माझा गेज काय चुकीचे रीडिंग दाखवतोय का? कुणी म्यानेजर आहे का?"
आता रात्री दहा साडेदहाला कसला म्यानेजर आन कसले काय? असा विचार करतोय तोच तो म्हटला कि तिकडे केबिन मध्ये आहेत.
म्यानेजर - "सर्, आमच्याकडे सगळे कम्प्युटराईस्ड आहे, कळेल आपल्याला"
हा दुसरा माणसातला माणूस?नशीब जोरात.

त्याने मला प्रत्येक नोझल मधून वाढलेले पेट्रोल, वेळ, किती लिटर, किती पैसे याचा हिशोब असलेली प्रणाली दाखवली. माझ्या क्रेडीट कार्ड च्या पावती वर असलेली वेळ आणि सिस्टम मधली वेळ पडताळून आम्ही पाहिले.
ज्या नोझल मधून मला पेट्रोल दिले होते तिथून २००० चे पेट्रोल पडलेच नव्हते. ते १७०० चे होते. मग त्या वाढप्याला जरा झापून मला ३०० चे पेट्रोल भरून दिले.

आता यात खालील शक्यता आहेत -
१. वाढप्याने पेट्रोल मारले.
२. पंप मशीन मध्ये दोष होता.
३. वाढपी आणि म्यानेजर ची मिलीभगत आहे. आणि जो ग्राहक राडा करील त्याला ते गप् परत भरून देतात.
४. माझ्या गाडीच्या गेज मध्ये दोष आहे.
५. दोष ना कुणाचा.. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.

आता ज्या प्रकारे त्या दोघांनी मला प्रामाणिकपणे सिस्टम दाखवली त्या अर्थी मला ५ वा पर्याय सोयीस्कर वाटतोय. काहीका होईना, माझे ३०० चे पेट्रोल वाचले.

काही धडे-
१. पेट्रोल पंपावर बिनधास्त भिडा.
२. आयला, पंपाच्या सिस्टम्स लैच भारी झाल्यात राव. त्यामुळे, शंका असेल तर जाणून घ्या.
३. पावती घ्या.
४. शिवी हासडण्यापूर्वी तपासा -
‍अ. तुमची शरीरयष्टी.
ब. तुमची बाजू.
क. समोरच्याची शरीरयष्टी.
ड. त्याची बाजू.
तपासणी क्रम चवीनुसार ठेवा.

आज रविवार, अंग आखड्लाय दिवसभर गाडी चालवून. पण कदाचित उद्या या गोष्टीचे इतके गांभीर्य नाही राहणार म्हणून मरमर करत आजच पोस्ट टाकतोय.
खूप मोकळं वाटतंय. मी जर मागे फिरून गेलो नसतो तर हा पोस्ट फक्त एक कडू कडू तक्रार राहिला असता. मनात उगाच घर करून राहिला असता. येत जाता त्या पेट्रोल पम्पाकडे बघून शिव्या घातल्या असत्या. पण अब सब ठीक है.
म्हणतात ना- दिलमे मत रख यार, बोल डाल!
-*-

9 comments:

 1. मस्त. मला आधी वाटलं पेट्रोल म्हणजे दरवाढीबद्दल आहे की काय.

  >>ही शनिवार, ऑफिस, आणि उशीर ही वेगळी कहाणी.. फुटेज खाईल..>>
  येऊ द्यात. :)

  ReplyDelete
 2. बास बास पाटील पुढच्यावेळेस पेट्रोल भरताना तुम्हालाच बोलावतो

  ReplyDelete
 3. Post is informative/interesting and writing is funny.
  But this has got me worried.

  I am not sure if I understand correctly..But do u mean to convey that..
  you have checked the figure 2000 on meter and still there is some goof -up...bcaz I do always cross-check the amt i ordered on the meter..but I have no way to check whether meter is fraudulent(as u know fuel indicators of 2 wheelers..may be there is bigger loby at wrk that we cant think of)...

  So if meter is deliberately calibered to mal-function then its very hard to detect..Until now, I blissfully ignored this possibility

  Damn U!

  ReplyDelete
 4. एक नंबर मित्रा... भिडलास... तू चक्क ३०० रुपयांचे पेट्रोल भरून घेतलंस परत जाऊन ? फार भारी... फारच भारी !!

  ReplyDelete
 5. राज,
  प्रतिक्रियेबद्दल खूप आभार.

  हेमचंद्र,
  आखतात टँकर भरायला जायचंय का? मला सुट्टी काढावी लागेल. :)

  निखिल,
  उगी प्रसंग डोक्यात घोळवण्यापेक्षा भिडायचं ठरवलंय. गाडी नुसती "त्याच" फ्रंट वर नाही काढली मी. :)

  मुस्तफा,
  तू म्हणतोस तशी लॉबी असण्याची शक्यता आहे. पण आपले आपण सतर्क राहावे.
  ज्याच्यामुळे wistleblower act निघाला, त्या निडर षण्मुगम मंजुनाथ ची ही विकी.
  http://en.wikipedia.org/wiki/Shanmughan_Manjunath
  आणि हा प्रकार तथाकथित पुढारलेल्या महाराष्ट्रात पण झालाय. उपजिल्हाधिकारी, IAS, रँक च्या अधिकाऱ्यांची अशी वाईट अवस्था तिथे आपण डेवेलपर्डे म्हणजे झुरळं.
  त्यामुळे केली ती हिरोगिरी पुरे.

  ReplyDelete
 6. Ash, may be there is more u can do @ this..just suggestions..
  - Cross check with the same petrol pump(u might need to put on mask), and still there is fraud, then we can social media to blacklist such stations
  - Do try and check out as many pumps as possible and prepare list of honest ones. Social media can be used constructively here as well.

  and chq out this new trick
  http://www.mohanbn.com/great-indian-petrol-pump-fraud/

  may be u can submit ur complain here
  http://www.consumercourt.in/other-product-services/75254-petrol-pump-doing-fraud.html

  ReplyDelete
 7. http://www.misalpav.com/node/21796
  पाटील हे पण बघा

  ReplyDelete
 8. hmm.....
  mulini kay karayacha
  mi tar khup vela bhandayache......
  saral gadi thambun zero pahun... magach paise dyayache
  pan tarihi asa hota.....
  kay karnar.......
  sagali milibhagat ahe........

  ReplyDelete
 9. अशीच घटना काल घडली. Watsapp वर मित्रांना लगेच मेसेज टाकला.

  "मित्रांनो हां प्रकार आज परत घडला बरका.
  आज 390 रुपयांचे पेट्रोल परत भरून घेतले मी. Don't trust anyone but your fuelgauge.
  Indian oil petrol pump again.

  390.. अरे मजल बघ त्यांची.
  आजकाल पेट्रोल च्या बाबतीत सावध असतो. दूध का जला.. त्या टाइप मधे.
  सेम प्रकार, म्यानेजर ला जाउन झापला तेव्हा कळलं की गेम केली होती.
  Generally liters madhe bhar. Mhanje 20,25 etc.
  Paise odd figure jhali tar run time madhe nearest round figure paryant ne mhanayache.
  "Additive ghya, card var sahi kara, mi 200 aikle 2000 aivaji"
  Yapaiki ekahi distraction kele tya petrol valyane ki samjaaayche locha jhala/honaare."

  ReplyDelete

अभिप्रायासाठी अनेक आभार!