Friday, September 14, 2012

म्हणे आम्ही बिझी झालो-१


आजकाल वेळ कुणाकडे आहे? सकाळी लवकर ऑफिसला जायचे, संध्याकाळी उशिरा यायचे. या महिन्यात दिवसातले तेरा तास मी घराबाहेर असतो आणि तरीही हा महिना त्यातल्या त्यात आराम होता.
अशा वेळी घरात बोलायला, सण समारंभ साजरे करायला काय जीव असणारे? आमची पिढी वाया गेली. थोरामोठ्यांचा आदर नाही, देवधर्म नाही, नातीगोती नकोत, भावना नकोत. मित्रांना थातुरमातुर भेटायचे, आठवडी बीयर मारायची, महिन्याभरातून कुठेतरी भटकून यायचे, घरकामाला हात नाही, कुटुंबासाठी चार क्षण नाहीत.
हड.. च्यायला वरच्या परिच्छेदातल्या गोष्टी १०० टक्के खऱ्या असतीलही पण तरीही एकांगी आहेत. म्हणे आम्हाला वेळ नाही. मी म्हणतो आमच्या कुटुंबाला आमच्यासाठी वेळ नाही.

साधारण १०-१२ वर्षापूर्वी भारतातल्या सुखी कुटुंबव्यवस्थेत एकता कपूर नावाच्या चेटकिणीचा प्रवेश झाला. तिच्यावरच गरळ का, तर तिने लावलेली विषवल्ली आज सर्वदिशा व्यापून उरलीये.
जिकडे तिकडे त्या डेली सोप मालिकांनी नुसता हैदोस घातलाय. माझ्या आईने त्या सुमारास "कहाणी घर घर की" बघायला सुरुवात केली. तेवढीच तिला करमणूक म्हणून मला आठवतंय त्याप्रमाणे मी, बाबा, अक्की पण तिच्यासोबत ते बघायचो. नंतर ती "क्यूंकी सास भी कभी बहु थी" बघायला लागली. त्यानंतर "कसौटी जिंदगी की", "कही किसी रोज". या मालिकांचा भुक्कडपणा ओळखून वेळीच बाकीच्यांनी अंग काढून घेतले. बहिण आपली ती "कही तो होगा" तेवढीच एक बघायची. पण माझी आई.. ती मात्र पूर्णपणे आहारी गेली या मालिकांच्या. तेव्हापासून आजतागायत माझ्यात आणि तिच्यात या मालीकांवरून शीतयुद्ध चालू झाले.

वर्ष २०११. धनंजय निफाडकर[१] जसा एक चहाची भुकटी ४ वेळा वापरायचा त्याहीपेक्षा भयानक पद्धतीने कथेचा चोथा करून अगदी त्याची माती होईपर्यंत कस काढल्यावर केकता कपूरच्या बऱ्याचशा मालिका बंद पडल्यात. त्याची जागा घेतली तथाकथित छोट्या शहराच्या मालिकांनी. मला लवकरच समजले की केकता कपूर ही कुणी व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे. आईने "प्रतिज्ञा", "गीत हुई सबसे पराई" आणि "बिदाई" बघणे चालू केले. बहिण लग्न होऊन नवीन कॅटेगरीच्या मालिका बघायला लागली. तिने ते नैतिक अक्षराचे "ये रिश्ता क्या केहेलाता है" बघायला सुरुवात केली. आता ती सासरी असली तरी कधी इकडे यायची तेव्हा मला दया दाखवून टीवी ची जी २०-२५ मिनिटे मिळण्याची त्याचापण हिशोब लागून जायचा.

भारताच्या या 'बौद्धिक दिवाळखोरी' कालखंडाचे दोन ठळक भाग पडतात. केकता आणि केकतौपरांत. या पोस्ट-केकता काळात ती महामाया बरी असे म्हणायची वेळ आली. लोकांना आज जसे इंग्रज बरे असे वाटते ना तसेच. या काळात नवीन घडामोडी या झाल्या की मराठी वाहिन्यांचे पेव फुटले. "चार दिवस सासूचे" हे असे काहीतरी चालू आहे हे मला माहिती होते. २०११ ला बऱ्याच मराठी डेली सोप चालू झाल्या. हिंदी, गुजरात्यांपेक्षा मराठीत सहन करूया या भावनेने जेवणाच्या वेळी टीवीत घुसलेल्या आईला मी "मराठी मालिका तरी बघ" अशा विनवण्या करायचो. रीमोटला हात लावून चॅनेल बदलायची माझी काय बिशाद? एरवी साधीसरळ असणारी माझी आई या मालिका बघताना भयानक हिंस्त्र होते. रिमोटला स्पर्श जरी केला तरी वरून फटका मारायची. वर मी कसे शाळेतून येवून घरातले पण पाहते, मला विरंगुळा नाही, नुसते माझा जीव खातात वगैरे वगैरे ऐकवणार. त्यामुळे टीवीवरून आईशी भांडणे व्यर्थ आहे हे खूप आधीच समजून माझ्यासाठी मी द्रुतगती इंटरनेट लावून घेतले होते.
तर एकेदिवशी अचानक आई मराठी मालिका बघतेय हे पाहून मला सुखद धक्का बसला. पण मुर्खपणा मग तो कुठल्याही भाषेत असला तरी त्याची तीव्रता कमी होत नाही.
भाग २
-*-

[१] लक्ष्मीकांत बेर्डेंचे एक पात्र. सिनेमा आठवत नाही. पण हे ध.नि. कॅरक्टर चांगलच लक्षात आहे.

2 comments:

  1. Well written Ashish...Humorous but factual depiction :-)
    या मालिकांचा भुक्कडपणा ओळखून वेळीच बाकीच्यांनी अंग काढून घेतले...important point aahe ha! welich sawrayla hawa swatahala. Ekda adaklo ki gelo...majhahi jhala hota asa...Pavitra Rishta madhe...pun sutla te wyasan, sadhya marathit adakloya...Tu tithe Me..ek do Offshore Onsite (B'lore) waarya jhalya ki he pun suten watatay...

    ReplyDelete
  2. तूला या टाईप मालिकांचे व्यसन लागू शकते? ही त्या मालिकेची थोरवी की लग्नाची? :D
    बाकी बँगलोर वाऱ्या सुरु झाल्या की सांग कसे वाटले बँगलोर ते.

    ReplyDelete

अभिप्रायासाठी अनेक आभार!