Monday, November 5, 2012

सारांश - अनुपम खेर पर्वाची सुरुवात.


आज बऱ्याच दिवसांनी रविवारी दुपारी टी.वी. मोकळा सापडला. बाहेर अशी टळटळीत दुपार असताना मी वेगळ्याच मोड मध्ये असतो. उगाच नोस्टॅल्जिक व्हायला होतं. आता तरुणपणी एकतर बालपण आठवत असणार नाहीतर पूर्वजन्म. काय सांगावं? या अशा मोड मध्ये मला सारांश दिसला. मी आधी बघितला नव्हता. फ़क़्त महेश भटचा आहे आणि काहीतरी भारी वगैरे होता एवढे ऐकून माहिती.
सुदैवाने नुकताच चालू झाला होता. जाहिरातींच्या जंजाळातून बऱ्यापैकी बघितला. जे ऐकले होते त्याहीपेक्षा भारी निघाला हा पिक्चर. अनुपम खेरने एका निवृत्त शिक्षकाची भूमिका केलीये. त्याला पाहून वाटले की आताही हा एवढा म्हातारा वाटत नाही म्हणजे या माणसाचं नक्की वय काय? पिच्चर पाहता पाहताच विकीला घेवून बसलो आणि काही रोचक गोष्टी सांगितल्या तिने.

सारांशची कथा-
प्रधान सर (अनुपम खेर) आणि त्यांची पत्नी पार्वती (रोहिणी हट्टंगडी) यांचा एकुलता एक मुलगा अजय, न्यूयॉर्क मध्ये भुरट्या चोरांकडून मारला जातो. आपल्या या मुलाच्या अकाली मृत्यूमुळे उद्ध्वस्त झालेल्या या भावविश्वात एकामागोमाग येणाऱ्या निराशाजनक प्रसंगांनी त्यांची जगायची इच्छाच कोलमडलेली असते. त्यात त्यांना थोडाफार आधार मिळतो तो सुजाता - (सोनी राझदान) या अजयच्या खोलीत राहणाऱ्या पेईंग गेस्ट कडून. सुजाताचा एक प्रियकर आहे विलास. विलासचे सुजातावर प्रेम आहे पण बाप राजकारणातले बडे धेंड - चित्रे (निळू फुले) असल्यामुळे त्याच्या धाकाने तो तिच्याशी लग्न करू शकत नाहीये.
इथे मुलाच्या मृत्यूने खचलेले प्रधान सर् बायकोसहित आत्महत्या करायला तयारी करत असताना सुजाता आणि विलास चे भांडण त्यांच्या कानावर पडते. सुजाता आई होणार असते आणि विलास तिला अबोर्शन करायला सांगत असतो. तो निघून गेल्यावर विषाचा प्याला बाजूला ठेवून बेभान झाल्यासारखे पार्वती प्रधान सरांना सांगते की अजयच्या खोलीत सुजाताच्या पोटात वाढणारे बाळ हा योगायोग नसून अजय परत जन्म घेतोय. ती त्यांना बजावते की आपण या बाळाला कुठल्याही परिस्थितीत जन्म घेउ दिला पाहिजे.
पण परिस्थिती खुपच प्रतिकूल असते. चित्रे सर्व प्रकारचे डावपेच लावून या म्हाताऱ्या जोडप्याला सतावतो, सुजाताला धमक्या देतो. पण प्रधानांना आता एक नवीन बळ चढते तिला वाचवण्याचे. त्यात विलास सुजाताच्या पाठीशी उभा राहतो. सर्व प्रकारे चित्रेचा त्रास सहन केल्यावर प्रधान सर् खुद्द मंत्रालयात जावून चित्रेला अटक करायला प्रशासनाला तयार करतात.
आता अजय परत जन्म घेणार म्हणून उत्सुक झालेली पार्वती सर्व काही सुरळीत होणार म्हणून आनंदी असते. पण तिचा हा वेडेपणा सुजाता-विलास च्या संसाराला घातक ठरेल म्हणून प्रधान सर् सुजाता आणि विलास ला निघून जायचा सल्ला देतात. अशा वेळी पार्वती आकांत करते पण तिची समजूत घालून प्रधान सर तिला जगण्यासाठी आधार देतात आणि पिक्चर संपतो.

महेश भट दिग्दर्शित १९८४ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट अनुपम खेरचा कारकिर्दीतला पहिला. तो त्यावेळी फक्त २९ वर्षाचा असूनही ६०-६२ वर्षाच्या म्हाताऱ्या शिक्षकाची भूमिका इतकी अप्रतिम केलीये की त्याला तोड नाही. त्याने आपल्या पहिल्याच पिच्चरला त्या वर्षीचे उत्कृष्ठ अभिनयाचे फिल्म फेयर मिळवले. सारांश १९८५ साठी भारताकडून ऑस्करसाठी पाठवला गेला.
सुजाता ची भूमिका करणारी सोनी राझदान, ही मागच्या आठवड्यात रीलीस झालेल्या 'स्टुडंट ऑफ द इयर' मधल्या आलिया भट ची आई. रोहिणी हट्टंगडी आणि अनुपम खेरचे प्रसंग इतके जमलेत की त्या म्हाताऱ्या जोडप्याचे दुःख अंगावर येते. त्यांचे राहते घर, आजूबाजूचा परिसर या गोष्टी कथानकाइतक्याच परिणामकारक आहेत. हा पिच्चर पहायचा चान्स मिळाला तर नक्की सोडू नका. हो, पण मूड जपून.

No comments:

Post a Comment

अभिप्रायासाठी अनेक आभार!