Monday, February 25, 2013

आणखी एक पाटी

आज बऱ्याच दिवसांनी PMT ने प्रवास झाला. व्हायचा तो त्रास झालाच. पण त्या वेदनेच्या प्रवाहाच्या जोराने माझ्या लेखनप्रतिभेच्या मोरीताला बोळा निघाला जणू. गेले २-३ महिने ब्लॉग वर काहीच हालचाल नव्हती. मधल्या घटनांनी मन खचलय. २ जानेवारीला मॅनेजर ला म्हटलो की उद्या इंडिया गेटच्या मुलांनी बंद पुकारलाय. मी येत नाही. तर ते म्हणाले की अरे मग एक दिवस उपास कर, आपले रिलीज आहे परवा. नाही गेलो ऑफिसला. वीट आलाय गोष्टी टाळून. त्या इंडिया गेट च्या जिगरबाज पोरांचे कौतुक वाटते.
गेल्या शनिवारी रक्तदान करून आलो. माझी पहिलीच वेळ आणि ज्याला सोबत नेले होते तो माझा मित्र राहुल त्याची तब्बल १७ वी वेळ. राहुल आपला जणू काही पिक्चर पाहायला आलाय या थाटात आरामात सगळीकडे वावरत होता. पठ्ठ्याने फॉर्म भरणे, वजन करणे, हिमोग्लोबीन तपासणे, रक्तदान करून तिथे मिळत असलले उपमा चहा आणि बिस्किटे फस्त करेपर्यंत सगळे काही इतक्या सराईत पणे केले की मला त्याच्या या सतराव्या वेळेबाबत होती नव्हती शंका पण गेली. तो रक्त देत असताना तिथली सिस्टर माझी नस तपासत होती, तर हा तिला सल्ला देतोय कि सापडत नसेल तर उजवीकडची पहा म्हणून.

हिंजवडीतला पब्लिक ट्रांसपोर्ट
साला PMT चा मला इतका राग येतो ना. ती काय एकच वाईट गोष्ट आहेका. पण का काय माहिती, आजूबाजूच्या तमाम दुखांचा परिपाक आहे जणू. खराडी ते हिंजवडी असा प्रवास पुण्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट ने करायचा म्हणजे काय त्रास आहे हे एकदा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बघावे. वडलांनी मला पुणे स्टेशन ला सोडले. तिथून मी रक्षक चौकात उतरलो. तिथून सिक्स सीटर ने फेज वन ला निघालो. लोक या वाहनाला सिक्स सीटर सोडून टमटम, डुक्कर, फुलराणी(?) असे काहीपण म्हणतात. असे का? तर सिक्स सीटर हे नावच चुकीचे आहे. त्यात कधीही ८ पेक्षा जास्त लोक कोंबलेले असतात. गावातल्या आजीबाईपासून कानाला आयपॉड लावलेल्या नखरेल आयटी ललना शिव्या देत, नकोसे स्पर्श सोसत का होईना यात प्रवास करतात. देशात अब्जावधींचे परकीय चलन आणणारे आणि तेवढ्याच प्रमाणात कर भरणाऱ्या आणि तथाकथित छानछौकीत जगणाऱ्या आयटी पब्लिकला देशाच्या खऱ्या स्थितीचा विसर पडू नये म्हणून मुद्दामच हिंजवडी आणि परीसरामध्ये प्रवास करण्यासाठी अशी खास सोय करण्यात आलीये.

बास बास बास.. रडून रडून आता कसे बरं वाटतंय. मी काय नुसता रडत नै कै. मागल्या महिन्यात उटी ला जावून आलो. त्यात काय एवढे? कुणीतरी म्हटलेच असेल. असे कसे असे कसे.. अरे मी काय केले माहिती आहे का? ती २ दिवसांची सायकलिंग टूर होती. २६ जानेवारीच्या सकाळी ७ वाजता बंदीपूर नॅशनल पार्क मध्ये आम्हाला सायकलींसोबत सोडले आणि पुढचे उटी पर्यंतचे ८० किलोमीटर अंतर पेडलिंग करत पार केले. सोपे आहेका? नाही.. बिलकुल नाही..जर तुम्ही मागच्या सहा वर्षात सायकलला हात लावलेला नसेल तर नाहीच नाही. पण ते अंतर पार केल्यावर जी धुंदी आहेना.. १० फॉस्टर्स मध्ये नाही. दोन दिवसात माझी जी वाट लागली, अनुभूती आली, निलगिरीच्या वनामध्ये रमलेल्या मनाची कहाणी पुढच्या पोस्ट मध्ये टाकतो. फिलहाल ज्या ग्रुपसोबत मी गेलो होतो त्यांची ही साईट. या टूर बद्दल अगदीच हातघाईवर कुणाला माहिती हवी असेल तर मला डायरेक्ट बेधडक मेल करावा.
www.cylingandmore.com
Aroma of Nilgiris.

No comments:

Post a Comment

अभिप्रायासाठी अनेक आभार!