Sunday, June 30, 2013

सुपरमॅन ला नोलन टच : मॅन ऑफ स्टील३० जून २०१३
सुपरमॅन च्या मला सगळ्या लीला आवडायच्या. स्वत: तर तो फिसिक्स चे सगळे नियम मोडायचाच पण त्याने मर्त्य मानवांबरोबर पण असे प्रकार केले की माझी चीडचीड व्हायची. उ. दा. लॉईस लेन ला त्याने कितीतरी वेळेला वादळी वेगाने येउन हवेतल्या हवेत उचलले होते. अशा वेगाने येवून एखाद्याला उचलून नेले तर विमानाला पक्षी धडकल्यावर पक्षाची जी अवस्था होते तशी लॉईस होणार नाही का?[१] एखादी गाडी उचलण्यापासून आक्क्खेचे आख्खे बेट उचलतानापण सुपरमॅन च्या चेहऱ्यावर सारख्याच वेदना आणि बाहुंमध्ये तेवढाच ताण. हा असेल पोलादी शरीराचा, पण याचे कपडे आग, वर्षा, चिखल, स्फोट अशा कुठल्याही आपत्तीनंतरही परीटघडीचे. हे सर्व पण ठीक. सर्वांवर कळस म्हणजे याने फक्त चष्मा लावला की लॉईस लेन सारखी पुलित्झर जिंकलेली पत्रकार माठ व्हायची आणि हाच तो आपल्याला वाचवणारा महापुरुष हे ओळखू शकत नव्हती. कैच्या कै. सुपरमॅन च्या या जगात त्याचे नियम मान्य करण्यावाचून पर्यायपण नसायचा.

पण सुपरमॅन समोर हार मानेल तो नोलन कसला. त्याची निर्मिती, कथा असलेला आणि झॅक स्नायडर दिग्दर्शित मॅन ऑफ स्टील पाहिला. मूळ कॉमिक्स ला धक्का न लावता त्यांनी सुपरमॅन च्या कमतरता दूर करण्याचा एक चांगला प्रयत्न केला आहे.

साधारण ४-५ वर्षापूर्वी येवून गेलेला सुपरमॅन रिटर्न्स या चित्रपटाला तिलांजली देवून सुपरमॅन फ्रॅन्चायझीचा पुनश्च हरीओम योजनेअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे अतिमानवीय सुपरहीरोचे इवोल्युषण नोलन स्टाईल ने बघण्याची पर्वणी लाभते.

कथा सुरु होते क्रिप्टॉन या सूर्यमालेपासून कैक प्रकाशवर्षे दूर असलेल्या ग्रहावर. मानवसदृश (humanoid) पण मानवांपेक्षा कितीतरी प्रगत अशी जमात या ग्रहावर राज्य करतीये. त्यांच्यापैकी जॉर-एल (रसेल क्रो) आणि त्याची पत्नी लारा (आयलेट झुरर) एका बाळाला जन्म देतात. बाहेर तुंबळ युद्ध चालुये. युद्ध का? ते आपल्याला जॉर-एल आणि ग्रहाचे प्रतिनिधी (त्यांची संसद म्हणा हवेतर) यांच्या संवादावरून कळते. जॉर-एल हा ग्रहाचा प्रमुख शास्त्रज्ञ असतो. आणि संसदेसमोर कळकळीने विनंती करत असतो की ग्रहाच्या गाभ्याचा उर्जानिर्मिती साठी वापर केल्यामुळे तो कोसळत आहे आणि लवकरच क्रिप्टॉन नष्ट होइल. हा अटळ संहारातून क्रिप्टॉन चे बीज वाचवण्यासाठी ग्रहाच्या जीवांच्या निर्मितीची कोडेक्स दूर अंतराळात पाठवून द्यावी. त्याच्या या प्रयत्नांना दाद मिळत नाहीये आणि तेवढ्यात संसदेविरुद्ध बंड पुकारलेला ग्रहाचा लष्करप्रमुख जनरल झॉड (मायकेल शेनोन) तिथे येतो आणि परिस्थितीचा ताबा घेतो. बंड याच कारणासाठी की मुर्ख संसदेने अविचारी निर्णयांनी ग्रहाची वाट लावलीये. (प्रगत झाले म्हणून काय झाले? लोकप्रतिनिधी सगळीकडे सारखेच) पण ग्रहाच्या समूळ नाशाची समीप आलेली वेळ त्यालाही मान्य नसते. अशात जॉर-एल कडे कोडेक्स चोरून नेण्याशिवाय पर्याय नसतो.

क्रिप्टॉन च्या इतिहासात कितीतरी वर्षांनी नैसर्गिकरीत्या जन्मलेल्या आपल्या बाळाच्या शरीरात हे कोडेक्स सामावून देवून त्याला जॉर-एल आणि लारा दूर पृथ्वीकडे पाठवतात. आपल्या बाळाला पृथ्वीवासी बहिष्कृत करतील किंवा मारून टाकतील या आईच्या भीतीला जॉर-एल असे सांगून शमवतो की पृथ्वीवर हे बाळ देवाप्रमाणे वागवले जाईल. त्यांनी जड अंतकरणाने यानाला निरोप दिल्या दिल्या झॉड तिथे पोहोचतो. आपल्या एके काळाच्या मित्राला जॉर-एलला क्रिप्टॉनची सर्वात महत्वाची वस्तू गमावल्याबद्दल देहदंड देतो. तेवढ्यात संसद बंडखोरांना पकडते आणि झॉडसहित त्यांना अंतराळातल्या तुरुंगात (फ्यान्टम सेल) मध्ये पाठवतात. अतिथंड करून दिर्घनिद्रेत (Cryogenic freeze hibernation)[२] गेलेले हे योद्धे जॉर-एल च्या भाकिताप्रमाणे क्रिप्टॉन चा सर्वनाश होतो त्यावेळी अंतराळात कैद असल्यामुळे वाचतात आणि मुक्त होतात.

इकडे हे गुणी बाळ पृथ्वीवर आदळते आणि मार्था व जोनाथन केंट यांच्या शेतात त्यांना सापडते. स्वत: निपुत्रिक असलेले हे जोडपे या बाळाचे क्लार्क हे नामकरण करून आपल्या मुलाप्रमाणे वाढवते. इथे क्लार्क ते सुपरमॅन हा प्रवास सलग न दाखवता तरूण झालेल्या आणि स्वत:चे अस्तित्व शोधणाऱ्या ३३ वर्षाच्या क्लार्कच्या विचारांमधून उलगडण्यात आलाय. क्लार्क ओळख बदलून अलास्का मध्ये भटकतोय. लोकांना आपल्या असीम शक्तीचे दर्शन चुकून घडले की तिथून पळ काढायचा हा त्याच्या नित्य उद्योग. आपल्या पृथ्वीवरच्या बापाला वचन दिल्याप्रमाणे तो उपरा आहे हे त्याला कोणालाही कळून द्यायचे नाही. त्याच्या या शोधादरम्यान त्याला आर्क्टिक प्रदेशात अमेरिकन सेनेची मोहीम सापडते. नासाला तिथे एक पाणबुडीसदृश वस्तू बर्फाच्या थराखाली सापडलीये. ही घटना टिपायला पुलित्झर विजेती पत्रकार लॉईस लेन (एमी अॅडम्स) आली आहे. ही बर्फातली वस्तू एखादी शीतयुद्धादरम्यान वाट चुकलेली सोविएट पाणबुडी असावी अशी सुरवातीला शास्त्रज्ञांना शंका असते. अधिक विश्लेषणानंतर असे लक्षात येते की तिच्याभोवातालाचा बर्फ २० हजार वर्षांपेक्षा जुना आहे. तिथेच या वस्तूचे गूढ वाढते. क्लार्क रात्री या वस्तूकडे निघतो. डोळ्यातले लेसर वापरून हा आदिम बर्फ फोडून तो तिच्यापर्यंत पोहोचतो.

ही वस्तू खरेतर क्रिप्टॉन कडून आलेले एक यान आहे. हजारो वर्षापूर्वी त्यांच्यासारखी सजीव सृष्टी शोधार्थ पाठवलेल्या मोहिमांपैकी एक. आत प्रवेश केल्यावर क्लार्क आपल्या वडिलांनी त्याच्या यानात ठेवलेली वस्तू वापरून यानात चेतना निर्माण करतो. इथे त्याला आपल्या खऱ्या पित्याचे - जॉर-एल चे प्रतिबिंब दिसते. मरताना जॉर-एलने आपले विचार, चेतना या यांनांमध्ये अपलोड केलेल्या असतात. तो क्लार्कला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. क्रिप्टॉन चा हजारो वर्षांचा इतिहास त्याच्यासमोर उलगडतो. क्रिप्टॉनचे बीज वाचवण्यासाठी क्लार्कचीच निवड का केली या त्याच्या प्रश्नावर जॉर-एल सांगतो की क्रिप्टॉन वर जीवांचा जन्म हा विधिलिखित नसून कृत्रिम केला गेला होता. कोण डॉक्टर कोण इंजिनियर, कोण पुढारी आणि कोण सैनिक हे आधीच ठरवले जात होते. त्यामुळे त्यांच्या संस्कृतीत दैवाचा भाग न उरून प्रगतीही ठराविक पद्धतीने होत गेली. जीवांची विचारप्रक्रिया पण बांधली गेली. जॉर-एल आणि लारा चा मुलगा काल-एल/क्लार्क हा शतकानुशतके चाललेल्या प्रथेला न जुमानता नैसर्गिक पद्धतीने जन्मला होता. स्वतंत्र विचार आणि तर्क अधिक भावनाधारीत सारासार बुद्धी हे त्याच्याच ठायी असणार होते. या विधानाची प्रचीती आपल्याला नंतर झॉड आणि क्लार्क च्या संवादातून येते. झॉड हा हाडाचा सैनिक असतो क्रिप्टॉन चे रक्षण आणि निर्माण करण्यासाठी बनवलेल्या त्याला, त्याच्या कर्तव्यापुढे कुठलीही गोष्ट नसते. मग ती मानवांचा संपूर्ण संहार का असेना.

क्लार्क यानात जाताना त्याच्यामागोमाग आलेली लॉईस यानाच्या यांत्रिक रक्षकाकडून जखमी होते. क्लार्क तिला वाचवतो, सुरक्षित ठिकाणी पोहचोवतो आणि यान तिथून अज्ञात ठिकाणी नेवून पार्क करतो. आपली ही नवीन ओळख घेवून तो कान्सास मधल्या घरी- आई मार्था कडे परत येतो. इकडे आर्क्टिक मधल्या घटनेवर पेंटॅगॉन नेहमीप्रमाणे पांघरून घालते. पण लॉईस या अनुभवला विसरायला तयार नसते. आणि तिच्या वृत्तपत्राचा संपादक तिच्या या परग्रहजीवाच्या कथेला छापायला तयार नसतो. ती स्वत: क्लार्क चा माग काढत काढत त्याच्या आई पर्यंत पोहोचते जिथे तिला क्लार्कविषयी सत्य कळते. क्लार्क ने आपली ओळख जगापासून लपवावी म्हणून त्याच्या मानव वडीलांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिलेली असते. हे समजल्यावर लॉईस क्लार्कविषयी संपूर्ण मौन बाळगण्याचे ठरवते. आणि आपल्या मित्राकरवी इंटरनेट वर मुद्दामहून प्रसिद्ध केलेल्या परग्रहजीवांच्या बातमीला नाकारते.

या घटनेनंतर काही काळातच झॉड आणि त्याचे सैनिक पृथ्वीकडे प्रयाण करतात. क्लार्क ने सुरु केलेल्या यानातून त्यांच्याकडे सिग्नल्स गेलेले असतात. क्लार्कच्या शरीरातले कोडेक्स वापरून पृथ्वीवर क्रिप्टॉन चे निर्माण करायचे आणि मानवजातीला साफ करून फक्त क्रिप्टॉनियंस पैदा करायचे हा त्याचा हेतू असतो. पृथ्वीच्या सूर्याच्या किरणांनी क्लार्क एवढंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त बळ आलेले झॉड चे सैनिक, पृथ्वीची आर्मी (म्हणजे अमेरिकेची आर्मी) आणि सुपरमॅन यांच्यात संघर्ष होतो. पृथ्वीमाईचा विध्वंस टाळण्यासाठी क्लार्कला आपल्या उरल्यासुरल्या बांधवांची आहुती द्यावी लागते. आपल्या पित्याला अपेक्षित असलेली निर्णयक्षमता तो तिथे दाखवतो.

एखाद्या साय-फाय पहिल्यांदा पाहणाऱ्या पोर्यालाच या भागातला विध्वंस आवडेल. आम्ही तर बाबा गाड्यांचे पिचकणे, गगनचुंबी इमारतींचे पडणे, A10, C17, F35, ड्रोन्स चे कोसळणे हे लई वेळा बघितले असल्यामुळे त्यात काही नाविन्य नाही.

जनरल झॉड चे संवाद, लॉईस चे बोलणे आहाहा.. मस्त. क्लार्क ची क्रिप्टॉनियन आई झालेली आयलेट झुरर ही इस्रायली अभिनेत्री भन्नाट दिसलीये. सुपरमॅन/ क्लार्क झालेला हेन्री कॅवील ची शरीरयष्टी खतरनाक जमून आलीये. अवघ्या जगातल्या मुलींचा सुस्कारा निघेल आणि सगळ्या पोरांना जेल्युसील घ्यावी लागेल अशी. पण मागल्या सुपरमॅन सारखाच तो अभिनेत्यापेक्षा मॉडेल म्हणून चांगला असे वाटते. (जेल्युसील इफेक्ट). या सर्व अभिनेत्यांना चांगले दाखवण्यात वेशभूषाकारांचे कसब. विझ्युअल इफेक्ट्स बरोबर वेशभूषेचे पण नॉमिनेशन तरी फ़िक्स आहे. हांस झिमर चे पार्श्वसंगीत अनुरूप. पण इंसेप्शन, डार्क नाईट सारखी मजा नाही. छायाचित्रण अप्रतिम आहे. 3D जमून आलंय. पण 3D नसता तरी काही फरक पडला नसता. लॉईस च्या डेली प्लॅनेट या पेपर मध्ये क्लार्क चित्रपटाच्या अगदी शेवटच्या मिनिटात जॉईन होतो. त्याला चश्म्यामध्येही लॉईस ओळखते हे पाहून माझ्या खांद्यावरचे एक ओझे उतरले.

चित्रपट चालू होण्यापूर्वी ग्रॅविटी आणि पॅसिफिक रिम या हॉलीवूडच्या आगामी पिक्चर चे ट्रेलर पाहिले. पैकी जॉर्ज क्लूनी आणि सँड्रा बुलक चा ग्रॅविटी नक्की पाहावा असा आहे. पैसे वसूल थ्रीडी तर तिथेच होते.

मॅन ऑफ स्टील ची विशेष गोष्ट म्हणजे पूर्ण पिक्चर मध्ये हिरोचा उल्लेख सुपरमॅन म्हणून फक्त दोनदा आणि मॅन ऑफ स्टील म्हणून तर एकदाही येत नाही. नोलनच तो..तुका म्हणे.

त्याच्या चाहत्यांसाठी न चुकवावा असा हा सिनेमा आहे.

_*_

[१]
इथे शेल्डन चे विश्लेषण वाचाच.

Leonard: Uhmm.. If you don’t have any other plans, do you want to join us for Thai food and a Superman movie marathon?

Penny: A marathon? Wow. How many Superman movies are there?

Sheldon: You’re kidding, right?

Penny:Well. I do like the one where Lois Lane falls from the helicopter and Superman swooshes down and catches her. Which one was that?

Sheldon, Leonard and Howard:One.

Sheldon:You realize that scene was rife with scientific inaccuracy.

Penny:Yes. I know. Men can’t fly.

Sheldon:No, no. Let’s assume that they can. Lois Lane is falling, accelerating at an initial rate of 32 feet per second per second. Superman swoops down to save her by reaching out two arms of steel. Miss Lane, who is now traveling at approximately 120 miles per hour, hits them, and is immediately sliced into three equal pieces.

Leonard:Unless, Superman matches her speed and decelerates.

Sheldon: In what space sir? In what space? She’s two feet above the ground. Frankly, if he really loved her, he’d let her hit the pavement. It would be a more merciful death.


[२]
च्यायला, मराठीमध्ये प्रतिशब्द काढणे किती अवघड आहे. खरेतर ज्या भाषेत ज्या शब्दांचे संशोधन झाले आहे, ते तसेच्या तसे वापरायला पाहिजेत. पण मग हा पोस्ट इंग्रजीतच टाकावा लागेल. मी माझ्या माहितीप्रमाणे प्रयत्न केला आहे. जाणकारांनी (ही पोस्ट वाचली तर) सुधारणा करावी.

No comments:

Post a Comment

अभिप्रायासाठी अनेक आभार!