Tuesday, May 31, 2016

पुतीनच्या वाट्याची सफरचंदे

दुपारी होस्टेल वर आल्याआल्या समोर सफरचंदाची पेटी दिसली. कदाचित कुणीतरी ठेवली असतील घेवून जायला. पण एवढी पेटीभर सफरचंदे कोण ठेवेल उगाच असे वाटून मी घेतली नाहीत. वर आल्यावर रेक्टर काकूंनी विचारले.. ल्युबिश याब्लक? उम्म.. ताक.  दोन सेकंद तर्क लावला..चल्ला फुकटची सफरचंदे.

रूम वर आल्यावर पिओतेक ला विचारले. काकूंचा वाढदिवस वगैरे आहेका फुकटची सफरचंदे वाटायला? त्याने मोठ्या प्रयासाने शब्दाला शब्द जोडून सांगितले -
रशिया ने युक्रेन वर २०१४ मध्ये हल्ला करून क्रीमिया विलीन करून घेतले. त्याचा निषेध म्हणून पाश्चात्य जगाने, म्हणजे अमेरिका व नेटो देशांनी रशियावर व्यापारी बंधने लादली. आता असल्या बंधनांना मानेल तो पुतीन कसला. रशियाने पण आपली चाल म्हणून युरोप कडून आयात होणार्या बहुसंख्य अन्न पदार्थावर बंदी घातली. त्यात पोलंड च्या सफरचंदांची लागली. रशिया पोलंडच्या ५० टक्क्याहून जास्त सफरचंदांची आयात करतो. पोलंड ला या व्यापारातून ५०० मिलियन युरो मिळतात. आता जर रशिया घेत नाही, तर एवढ्या सफरचंदांचं करायचे काय? म्हणून पोलंड च्या उत्पादकांनी ही जास्तीची सफरचंदे सरळ सरळ फुकट वाटायला चालू केलीयेत. गावागावांमधून ट्रक फिरून सफरचंदांचे क्रेट गोळा करतात आणि होस्टेल्स, संस्था, संकुलांमध्ये नेऊन ठेवतात.


त्यातलीच एक पेटी आमच्या होस्टेलमध्ये आली.इतकी वर्षे झाली, पण रशिया, युद्ध वगैरे शब्द कानावर आले की उत्सुकता लपवता येत नाही. नेटावरून खालील माहिती समजली.

पोलंडला रशियाचा राग आहे ही काय नवीन गोष्ट नाही. मग "सफरचंदे खा आणि पुतीनला वाकुल्या दाखवा" असले कार्यक्रम लोकप्रिय होतील असा शेतकऱ्यांचा अंदाज होता. ही जास्तीची सफरचंदे या प्रकारे खपवण्याचा उद्देश होता. पण या प्रचाराला फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. शेतकऱ्यांचे आणि इतर उत्पादकांचे नुकसान नको म्हणून पोलंड ने कर सवलती दिल्यात. आणि युरोपियन युनियन कडून मदतीची अपेक्षा आहे. इ.यु. ने १२५ मिलियन युरो द्यायचे ठरवले ही आहे, पण ही रक्कम ५०० मिलियन युरोंच्या पुढे तोकडी आहे. ई.यु. च्या राजकारणात सामान्य शेतकर्याचे नुकसान. पण त्यांना नुकसान भरपाई मिळेल. युरोपचे शेतकरी आत्महत्या करायच्या आधी ज्यांच्या मुळे ही वेळ आली त्यांची हत्या करतील.

आपल्या कडे शेतकऱ्यांची कर्जमाफी करतात तर उपकार केल्याप्रमाणे. शेतकरी संघटना नेत्यांचे पाय धुण्यात मग्न आणि त्यातलेच तात्या नाना भाई तरूण नेतृत्व उद्याचे निर्लज्ज आमदार आणि खासदार.
-*-

http://sputniknews.com/europe/20160404/1037459842/poland-apples-ban.html
http://www.economist.com/blogs/easternapproaches/2014/08/poland-and-russia

No comments:

Post a Comment

अभिप्रायासाठी अनेक आभार!