द बिग बँग थियरी: शास्त्रज्ञांतल्या माणसांचे जग-१
प्रश्न: नाव बिग बँग चे आणि फ्रेंड्स चे पोस्टर काय करतेय?
उत्तर: आधी थोडा माहोल.. कॉलेजमध्ये असताना बऱ्याचदा मित्रांकडून 'फ्रेंड्स' बद्दल ऐकायचो. नुसताच ऐकायचो, कारण सिटकॉम हा काय प्रकार असतो हे आमच्या गावात पण नव्हते. स्टार प्लस वरचे 'स्मॉल वंडर्स' आवडीने बघायचो, पण फ्रेंड्स आणि स्मॉल वंडर्स याची जातकुळी लैच वेगळी हे फ्रेंड्स बघितल्यावर कळले. आता काही इनोदी हिंदी मालिका असायच्या पण त्यांना कॉमेडी म्हणणे जीवावर येते. त्यातल्या त्यात 'साराभाई वर्सेस साराभाई', 'श्रीमान श्रीमती' हे सन्माननीय अपवाद वगळता, पाट्या टाकण्याची परंपरा सर्व मालिकांमधून अजूनही दिसते. जाउदे, लिहिता लिहिता असे वाटतेय कि या भारतीय आणि त्या अमेरिकन मालिकांची तुलना करणेच चुकीचे आहे.
तर, फ्रेंड्स वर कॉलेज मध्ये चर्चा कधी माझ्याकडून झालीच नाही. आता नक्की आठवत नाही, पण तीन चार वर्षांपूर्वी मला फ्रेंड्स चे सगळे ऋतू ( आता आणखी काय म्हणू सिझन ला? :) ) मिळाले. आणि मग समजले कि पब्लिक याच्यामागे एवढी फिदा का..
मेहनत घेवून बनवलेली पात्रे, त्यांच्यात अक्षरश: जीव ओतणारे नट, विचारपूर्वक मांडणी केलेली कथा, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लॉजिक, जे आपल्या भारतीय मालिकांत अभावाने आढळते.
आता एक नवीनच जग समजले, काही लोकप्रिय मालिका पहिल्या नंतर, आणि बऱ्याच नाही पहिल्यात अजून हे पण माहितीये. पण पाहण्याचा धीर होत नाही, अशी नशा आहे या एकेक मालिकेत कि एकदा का मिळाली कि फडशा पाडलाच. यात तुमचा आठवडा, महिना गेला जा. गेला अशासाठी कि या मालिका इकडे प्रसारित नाही होत. पण यांचे ऋतूच्या ऋतू इंटरनेट वरून मिळून जातात. एकदा का बघायला घेतले कि व्यसन लागलेच समजा. बर, आमच्या रुटीन प्रमाणे रात्री जागवून मी पाहतो खरे, पण दिवसा कामाच्या वेळी पण त्यातले प्रसंग आठवून हसू फुटते. मागे म्यानेजर उभा आणि बापुड्याला वाटावे की अति-श्रमामुळे डोक्यावर परिणाम झाला कि काय? ऑफिसमधली एकुलती एक ललना समोरून जाताना आमच्या चेहऱ्यावरचे हे अनाठायी हसू पाहून 'हे आणखी एक ध्यान' समजावी. त्यामुळे जे पाहिले ते पाहिले जे पाहतोय ते पाहतोय पण नवीन आफत नको. कधी काळी सगळी फाईट मारून झालीये आणि सावज फक्त खात बसायाचेय, अशा वेळी.. साईनफेल्ड, एवरीबडी लव्स रेमंड, फॅमिली गाय, सिम्पसन्स,द फ्रेश प्रिन्स ऑफ बेल-एयर चा फडशा पाडू.
फिलहाल, पाहून झालेले - 'फ्रेंड्स', साठच्या दशकातले 'आय ड्रीम अबाउट जिनी', सत्तर च्या दशकातले 'माईंड युवर लँग्वेज', आणि सध्या सुरु असलेले टू ऍण्ड हाफ मेन, हाऊ आय मेट युवर मदर आणि द बिग बँग थियरी पुरेसे आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्रायासाठी अनेक आभार!