दो लफ्जों की है ये कहानी




लहानपणी हे गाणे कधीतरी रंगोली मध्ये पहिल्यांदा पाहिले. विचित्र आकाराच्या होडीचा नावाडी उभ्याउभ्या गाणे म्हणतोय, झीनत त्याचा अर्थ सांगतीये आणि अमिताभ तिला "गाके सुनाओ" असं म्हणतो आणि ती जास्त आळोखेपिळोखे न घेता डायरेक्ट गायला चालू करते हे मला कैच्या कै वाटल्यामुळे मी कधी या सुमधुर गाण्याचा परिपूर्ण आस्वाद घेतलाच नाही. पण आता दिवसातून ४ वेळा हे गाणे तरी पाहतोय, ऐकतोय. याचे कारण म्हणजे व्हेनिस याची देही याची डोळा पाहिले आणि ने राहवून या शहराचे पहिले स्वप्न दाखवणार्या या गाण्याची आठवण आली.


पोलंडमधून इकडे ऑस्ट्रियामध्ये काप्फेनबेर्ग ला आल्यापासून इटली चे वेध लागले होते. इतिहासाच्या पानापानातून पाहिलेल्या रोमन साम्राज्याची, रेनेसांस च्या धुरंधरांची कर्मभूमी, जगप्रवासाचा पुस्तकातून मानाने डोलणारा पिसाचा मनोरा आणि कितीतरी सिनेमांमधून चित्रित झालेले व्हेनिस. इटली म्हणजे वर्तमानात जगणारा इतिहास आहे. याची प्रचीती घ्यायची सुवर्णसंधी आली या महिन्यात.

मागल्या कंपनीत सोबत असलेल्या वज्रदेहीचा (आव्वाज आहेका याच्या नावासमोर कुणाचा) मेसेज नोव्हेंबर च्या सुरवातीला व्हॉट्सअॅप वर धडकला. वज्रा फ्लोरेंस ला आला होता आणि चक्क मला रोम च्या ट्रीपसाठी बोलवत होता. आपण लगेच तयार. फ्लोरेंस, रोम मध्ये गायडेड टूर[१] घेतली. अच्युत गोडबोलेंच्या "अर्थात" मध्ये वाचलेल्या मेडीची कुटुंबाचे फ्लोरेंस, दोन हजार वर्षापूर्वीच्या वास्तू गल्ली बोळात वागवणारे रोम आणि हा अजून पडला का नाही असा प्रश्न येवून कितीही वेळ निरखावे असा मनोरा असलेले पिसा बघितले. ३ दिवस इतिहास जगला. वज्रा.. आमंत्रण आतिथ्याबद्दल खूप खूप आभार.


फ्लोरेंस वरून व्हेनिस ला जायला तीन ऑप्शन होते. पहिला ट्रेनचा (महाग), दुसरा बसचा (स्वस्त पण वेळखाऊ) तिसरा ब्लाब्लाकार (स्वस्त). नशिबाने ब्लाब्लाकार[२] वर क्लोदिओ नामक व्यक्ती व्हेनिस ला निघाला होता. त्याला संपर्क केला आणि दुसर्या दिवशी तो आणि आणखी एक सहप्रवासी - सारा यांच्याबरोबर फ्लोरेंस ते व्हेनिस असा ३ तासांचा प्रवास झाला. क्लोदिओ फारच इंटरेस्टिंग माणूस निघाला. सारा आणि त्याच्याशी खूप गप्पा मारता आल्या. गाडी पण ढिंकच्याक ऑडी एसयुवी होती.


व्हेनिस च्या सांता लुचिया (St. Lucia) ट्रेन स्टेशन मधून निघतानाच आपण कुठल्यातरी वेगळ्या जगात आलोय याची खात्री पटते. पूर्ण शहरभर कालवे आहेत.. बस काय कार पण नाहीयेत इथे. छोट्या बोटी वापरतात लोक. त्याला गोंडोला म्हणतात. वॉटरबसेस पण आहेत. त्याला वेपोरेत्तो म्हणतात. पीएमटी सारखी गर्दी असते वेपरेत्तो ला. इथल्या लोकांना त्याचे आजीबात कौतुक नाही. ऍम्ब्युलन्स पण होडीच आणि पोलीस पण होडीच वापरतात. व्हेनिस इतर शहरांपेक्षा जरा महागच आहे. 'जनरेटर' नावच्या युथ होस्टेल वर एक रात्र राहिलो मी इथे. सर्वात स्वस्त पण चांगले होते. १४ युरो. HostelWorld.Com [३] वरून आधीच शोधून ठेवले होते. ते होस्टेल शोधताना काढलेला हा विडीओ. पिवळ्या रंगाचे वेपरेत्तो चे स्टॉप दिसतायेत मागे.


इथे फिरायचे असेल तर वेपोरेत्तो शिवाय पर्याय नाही त्यामुळे त्याच्या पास काढला आणि मनासोक्त फिरलो तिथल्या ग्रँड कॅनल मधून. मुरानो बेटावर पण गेलो होतो. तिथल्या प्रसिध्द काच कारागिरांचे कसब प्रत्यक्ष पाहायचे होते. पण नाही झाले. नेक्स्ट टाईम व्हेनिस.. नेक्स्ट टाईम.



व्हेनिसमधले महाल, पूल, चर्च, चौक कालौघात जसे नि:श्चल थांबले आहेत. मोटाराईज्ड बोटींची काय ती भर पडली असेल नाहीतर आजच्या आणि पाचशे वर्षापूर्वीच्या व्हेनिस मध्ये काहीच फरक नसेल. उलट त्यावेळी ते अधिक वैभवशाली होते. यूट्यूबवर रिक स्टीव्सचे हे विडीओ व्हेनिसचे सौंदर्य अचूक टिपतात.


तिथेले हे पाण्यातले जग पाहून साहजिकच प्रश्न पडतो की या पाण्याचा कुबट वास का येत नाही आणि व्हेनेशियंस इथे शतकानुशतके कसे राहातायेत? एके काळचे जगातले सर्वात श्रीमंत शहर उदयास का आले आणि टिकले कसे? या संदर्भातला हा एक नितांतसुंदर विडीओ आहे. नक्की पहा.



_*_

[१] युरोपच्या बऱ्याचशा शहरांमध्ये काही हौशी मंडळी फ्रीवॉकिंगटूर्स चालवतात. हे गाईड २-३ तासात शहराच्या मध्यवर्ती भागातून चालवून शहराची माहिती सांगतात. त्यांचे काम पर्यटकांनी दिलेल्या टिप्स वर चालते. मी या टूर्स आवर्जून करतो. आतापर्यंत खूप छान अनुभव आला आहे या टूर्सचा. कधीही शहराला भेट देण्यापूर्वी त्या शहरातल्या फ्रीवॉकिंगटूर्स बद्दल माहिती करून घ्या. ऊ.दा. प्राग साठी गुगल मध्ये "FreeWalkingTours Prague" टाकले असता बरेच ऑप्शन मिळतील. त्यात Sandeman's Europe नावाची संस्थाच आहे. त्यांच्या प्राग, अॅमस्टरडम च्या फ्रीवॉकिंगटूर्स बेष्ट आहेत. ते नसले तरी कोणीतरी दुसरे असतातच.

[२] युरोपमध्ये ब्लाब्लाकार ने जाणे लई परवडते बर्याचदा. ब्लाब्लाकार भारतात पण आहे. याची कन्सेप्ट खूप मस्त आहे. समजा मला पुण्याहून मुंबईला जायचय. आणि मी कारने एकटाच चाललोय. पेट्रोल आणि टोल चे धरून मला २००० रुपयांच्या वर खर्च आहे. मी blablacar.com वर माझी हि नियोजित ट्रीप पोस्ट केली तर पुण्याहून मुंबईला त्याच वेळी जाण्यास इच्छुक असलेल्या लोकांना त्याची माहिती मिळते. त्यातले २-३ मला संपर्क करतील. आणि मी ठरवलेल्याप्रमाणे मला प्रवासाचे पैसे मिळतील आणि या लोकांची कंपनीपण मिळेल.
यात तुम्हाला तुम्ही प्रवास केलेल्या लोकांना रेटिंग पण देता येते. मी फ्लोरेंस वरून व्हेनिस ला ज्या क्लौदिओ बरोबर गेलो त्याची रेटिंग खूप चांगली होती.

[३] होस्टेलवर्ल्ड ही आणखी एक साईट खूप उपयुक्त आहे. शहराचे नाव आणि नियोजित दिवस टाकले असता संपूर्ण हॉटेल्स आणि होस्टेल्स ची लिस्ट मिळते. त्यातून शहरामधले स्थान आणि किंमत यानुसार फिल्टर्स लावता येतात. ब्लाब्लाकार सारखेच होस्टेल्स चे युसर रेटिंग असतात. त्यातून दर्जाविषयी खात्रीलायक माहिती मिळते.

टिप्पण्या

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक

Dandeli To Goa Via Doodhsagar