केल्याने भाषांतर - १
भाषेचा मला आहे लळा. नाही म्हणजे १ वर्ष जर्मन, १ वर्ष रशियन, ६ महिने पोलिश, साधारण इयत्ता पाचवीपासून इंग्रजीवर वर्चस्वासाठी चाललेली झुंज, श्लोक स्पष्टपणे वाचता येती एवढे संकृत असा सगळा एकूण चिवडा झाला आहे. हिंदी वाल्यांना त्यांच्यात भाषेत गप्प करण्याएवढी हिंदी बरी आहे. एक तरी परकी भाषा अस्खलित बोलता यावी हे अजूनही ध्येय आहेच.
बर्याचदा हॉलीवूड पिच्चर मध्ये कुणी जर्मन, रशियन किंवा पोलिश बोलले आणि त्यातले २-३ शब्द जरी कळले तर काय जाम भारी वाटते. किंवा घरामध्ये पूजा असताना संस्कृत श्लोक न अडखळता वाचल्यावर घरातले कौतुकाने बघतात तेव्हा जरा हुरूप येतो. संस्कृत आणि रशियन, पोलिश, जर्मन यांच्यातल्या साम्याविषयी ऐकून होतो. पण त्याची स्वतः प्रचीती जेव्हा घेतली तेव्हा जो आश्चर्यमिश्रीत आनंद झाला त्याला तोड नाही.
ज्ञान पण चक्रवाढ व्याजाप्रमाणे असते म्हणे. म्हणजे अज्ञानही तसेच असणार. मग नक्की माझे ज्ञान वाढतंय की अज्ञान? असो..
मराठी माझी चांगली आहे. पण आता इंग्लिश चा एवढा शिरकाव झालाय की शुद्ध मराठी बोलले की लोक भुवया वर करतात. काहींना तर हसू आवरत नाही. लहानपणी माझी फार गोची व्हायची. शाळा भावे स्कूल, सदाशिव पेठ आणि राहायला पोलीस कोलोनी, वानवडी. तिथे शेजारी आख्या महाराष्ट्रातली अठरापगड कुटुंबे. त्यांची भाषा आणि माझ्या बोलीभाषेत कमालीचा फरक पडायचा. मग शाळेत माझी भाषा त्यांना बहुजनांची वाटायची आणि घरी-शेजारी मी ब्राह्मणाची भाषा बोलतो म्हणून हसू व्हायचे. Not feeling home anywhere ची भावना तिथून चालू झाली असावी.
तर प्रयोग म्हणजे बालाजी च्या मला आवडलेल्या एका उत्तराचे भाषांतर करून बघितले. राम आणि हनुमानाच्या नात्यावर केलेल्या भाष्याचे इंग्लिश मधून केलेले मराठी भाषांतर. पण इंग्लिश चा महिमा की माझ्या मराठी च्या ज्ञानाच्या मर्यादा.. भाषांतरित लेखाला मूळ लेखाची सर नाही. मराठीचा पूर्ण आदर राखून मला असे वाटते की इंग्लिश मराठीपेक्षा खूप सूचक (expressive) आहे. हे भाषांतर आणि मूळ लेखाचा दुवा दुसर्या भागात.
केल्याने भाषांतर - २
_*_
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्रायासाठी अनेक आभार!