लिहिणाऱ्याने लिहीत जावे..

माझ्या ब्लॉगवर स्वागत आहे -
या ब्लॉगवर मी मराठी आणि इंग्रजीमध्ये लेखन करतो.

मी का लिहितो
आपल्याला डायरी लिहिण्याचा सल्ला दिला जातो. ही चांगली सवय आहे. कारण जेव्हा आपण आपल्या चांगल्या वाईट अनुभवांबद्दल लिहितो तेव्हा आपण मोकळे होत असतो.
उदाहरण द्यायचे झाले तर कधी हे अनुभवले आहे का -
एखाद्याने तुमची घोर निराशा केली, अपमान केला, कशात तरी तुम्हाला अपयश आले. अशावेळेस या घटनेचा भुंगा आपल्या डोक्यात राहतो. वारंवार आपण घटनांची उजळणी करत राहतो कारण आपण स्वतः कसे एक चांगले व्यक्ती आहोत आणि बाकीचे लबाड आपल्या चांगल्या वर्तनाचा फायदा घेऊन गेले याचा खटलाच आपण चालवत असतो डोक्यामध्ये.

अशा या विचारांची आवर्तने चालू झाली की नकारात्मकता तयार होऊन त्याचा शरीर मनावर परिणाम चालू होतो.
याला उपाय म्हणजे लिहा. कडू, गोड, तक्रार, सरकारविषयी राग, समाजाविषयी राग व्यक्त करा. डोक्याला एकदा खात्री झाली की एका निष्णात वकीलाप्रमाणे जी केस तुम्ही रोज लढवत आहात त्याचे सगळे मुद्दे तुम्ही लिहिले आहेत आणि आता ते परत विसरण्याचा धोका नाही, तेव्हा तो शांत होईल. तुमचे डोके नवीन दृष्टीकोन समजून घेण्याकरता ग्रहणक्षम होईल. अहो शेतातून माजलेले तण काढले नाही तर नवीन पीक घेता येईल का?


या नकारात्मक विचारांबरोबर चांगले अनुभव ही लिहिले की परत कधीतरी वाचताना मनाला आधार देतात आणि हुरूप वाढवतात. असे अनुभव सामायिक करायला सोपे असतात आणि बाकीच्या लोकांना त्यातून आनंद मिळू शकतो.
माझ्यासाठी माझा ब्लॉग हे काम करतो. डायरीसारखी जपून ठेवायची, हरवायची चिंता नाही. सगळं ऑनलाइन सुरक्षित आहे. कुठंही कधीही लिहू शकतो.
काही पोस्ट मी सामायिक केल्या आहेत काही फक्त वैयक्तिक आहेत. माझा तरी अनुभव असाच आहे की गोष्टी लिहून काढल्यामुळे मन कमी अस्वस्थ असते. काही गोष्टी लोकोपयोगी असतात आणि त्यातून कोणी प्रशंसा केली तर सगळ्यांप्रमाणे मलाही आनंद होतो.

सुरुवात आणि सद्यस्थिती
आता प्रवास म्हणाल तर मी ब्लॉग चालू केला होता 2008 मध्ये. सुरुवातीला कसा उपयोग करायचा याबद्दल साशंक होतो. सिनेमाचे परीक्षण वगैरे लिहीत होतो. आत्ता वाचून वाटते की ठीक होते पण त्यावेळी मला भलतेच भारी वाटायचे. उत्तरोत्तर मला प्रवासातून आलेल्या अनुभवांबद्दल लिहिले. त्या गोष्टी छान आहेत. जर लिहिल्या नसत्या तर बरेचसे बारकावे स्मृतिआड गेले असते.

माझी सर्वात जास्त बघितली गेलेली आणि प्रतिक्रिया आलेली पोस्ट इंग्रजीमधून लिहिली आहे. माझ्या आजीच्या अर्धांगवायूवर केलेल्या उपचाराबद्दल त्या भावनांबद्दल लिहिलेल्या पोस्टवर खूप लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आणि अजूनही आठवड्याला एकतरी फोन येतो. माझ्यापरीने मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतो. माझ्या अनुभवापलीकडे मात्र काही सल्ले देत नाही.
Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli
जास्त फॉलोअर्स नाही मिळाले ही खंत आहे. परंतु त्या कारणासाठी लिहिले असते तर फार आधीच ब्लॉग वैराण झाला असता. चांगले लिखाण झाले तर आपोआप वाढतील फॉलोअर्स. गुणवत्तेसाठी तो एक बरा मापदंड आहे. लिहितो म्हणून लोकांनी फॉलो केले असते तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन आणखी चांगले लिहिण्यासाठी ऊर्जा नसती मिळाली. सुरुवातीला मित्र मैत्रिणींनी प्रतिसाद देऊन लिहिण्यापूरता उत्साह दिला.

वेळ कसा मिळतो
सॉफ्टवेअर व्यवसायामध्ये असल्यामुळे शनिवार रविवार वेळ असतो. सतत संगणक समोर असतो त्यामुळे ब्लॉग लिहिताना फार काही वेगळ्या वातावरणात जावं लागत नाही. गूगल ट्रान्सलीटरेशन मला खूप आधीपासूनच माहिती होते. त्यामुळे मराठी टाईप करायला काहीच अडचण नव्हती. सुरुवातीला एक एक पोस्ट साठी पूर्ण दिवस लागायचा. नंतर हे प्रमाण कमी होत गेलं.

मी बऱ्याचदा डोक्यातले मुद्दे एखाद्या कागदावर किंवा व्हाट्सएपच्या ग्रुप वर (जिथे मी एकटाच सदस्य आहे) टिपून ठेवतो. नंतर पोस्ट लिहिताना त्याचा उपयोग करतो. तरीही ब्लॉगपोस्ट लिहिताना बराच वेळ खर्च होतो. घरी कुटुंबातील लोकांना माझ्या या छंदाबद्दल माहिती आहे त्यामुळे त्यांनाही आता सवय झाली आहे.
माझ्या ब्लॉगपोस्ट वर कीवर्ड्स किंवा पुनर्वापर होणारे विषय यांची नोंद आहे आणि त्याचा गोषवारा एका रकान्यात आहे. तिथून पोस्ट सापडणे सोईचे होते. मी वेळोवेळी आधीच्या पोस्टचे संपादन करतो त्यामुळे व्याकरणाच्या चूका कमी असतात. पण अगदी पोस्ट चा पूर्ण गाभा बदलत नाही. अगदी आता विरुद्ध मत असेल तरीही. कारण मला त्या वेळी काय वाटत होते याची नोंद महत्वाची.

कोरा आल्यापासून मी तिथेही लिखाण चालू केले आणि कधीकधी जमून आलेली उत्तरे, प्रतिक्रिया मी जशाच्या तशा ब्लॉगवर देखील टाकतो. अशाप्रकारे कोरा आणि ब्लॉग एकमेकांना पूरक आहेत असे मला वाटते.
खरे सांगायचे तर ब्लॉग लिहायला लागल्यापासून चांगले लिहिण्याजोगे अनुभव यावेत अशी सुप्त इच्छा असते. त्यातूनच प्रवासासाठी आणि नवीन, अगम्य गोष्टींचा अनुभव घेण्याची ओढ येते.

मराठी मध्ये कमी ब्लॉगर्स आहेत. काही वर्षांपूर्वी उलट जास्त होते. हे ब्लॉगर्स एकमेकांना सूचना आणि प्रोत्साहन देऊन किल्ला लढवत होते. कदाचित प्रतिसादाअभावी वा आणखी काही कारणांमुळे बरेच ब्लॉगर्स थंड झाले. असो.. मुद्दा हा आहे की मराठी ब्लॉग मोनेटाईज करणे अवघड आहे, परंतु त्यामागे न पडता लिहीत राहावे, मोकळे व्हावे आणि जाण वाढवावी हाच उद्देश आहे.

_*_

कोरा वर
एक ब्लॉगर असण्याचा तुमचा प्रवास सामायिक कराल काय? या प्रश्नाचे दिलेले उत्तर 

टिप्पण्या

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक