गुणांचे बलाबल की दैवाची सूत्र : DNA
चित्रपटाची कथा सुरू होते यतीन आणि कांचन या दाम्पत्याच्या घरी. दोघेही हार्वर्ड मधून उच्चविद्याविभूषित. दोघांचेही घराणे असेच विद्वत्तेच्या बाबतीत तोलामोलाचे असे त्यांच्या संवादातून आणि काही सूचक प्रसंगातून समजते. हे या दोघांचे असे असामान्य असणे हा चित्रपटाचा एक धागा आहे. अमेरिकेत मोठ्या घरात सुखवस्तू जीवन जगताना त्यांना अनिल आणि मेधा या जोडप्याची मित्र म्हणून साथ आहे.
या "दृष्ट लागण्या जोगे सारे" संसाराला दुःखाची किनार येतेच. कांचनच्या दुसऱ्या गर्भपातानंतर डॉक्टरांना समजते की काही जनुकीय आजारामुळे तिला आई होता येणे कठीण आहे. या घटनेमुळे कांचन पुरती हबकली आहे. आजपर्यंत प्रयत्नांती काहीही मिळवू शकेन या तिच्या दुर्दम्य महत्त्वाकांक्षेला या एका गोष्टीने पार पराभूत केले आहे. तिला आई बनायचे आहे आणि तेही स्वतःच्या बाळाची. तिच्या आणि यतीनचा स्मार्ट डीएनए घेऊन तिला बहुधा त्या दोघांसारखी किंबहुना त्यांच्या एकत्रित क्षमतेएवढी संतती हवी आहे. कदाचित त्यामुळेच बाळ दत्तक घायचे नाही यावर दोघांचे एकमत आहे.
खूप प्रयत्न करून सुद्धा मार्ग न दिसल्यामुळे दोघेही थोडे हिरमुसले आहेत. त्यात त्यांना ब्रिटन मधले एक डॉक्टर भेटतात. हे डॉक्टर एक नवीन जनन पध्द्तीचे प्रयोग करत आहेत. यात कांचन च्या बीजातला सदोष मायटोकाँड्रीया काढून दुसऱ्या एखाद्या बाईचा रोपण करून तिला आई होणं शक्य असते. अशा पद्धतीच्या जनुकीय हस्तक्षेप करणाऱ्या प्रयोगांना अमेरिकेमध्ये बंदी असल्याकारणाने हे डॉक्टर महाशय यतीन आणि कांचन ला ब्रिटन ला काही वर्षे स्थायिक व्हायचा सल्ला देतात.
निर्णय मोठा असतो, पण बाळासाठी आतुर झालेले हे जोडपे त्यासाठी पण तयार असते.
हा आनंद फार काळ टिकत नाही कारण ही तिसरी स्त्री कोण हे यतीन आणि कांचन च्या हातात नाही असे ब्रिटिश डॉक्टर सांगतात. आणि होणाऱ्या बाळाची वाढ 10 वर्षांपर्यंत ते एखाद्या प्रयोगातल्या गिनीपिगाप्रमाणे निरीक्षण करणार असतात. असे का, तर ज्या दात्या स्त्रीचा मायटोकाँड्रीया कांचन च्या बीजात रोपण होणार असतो तिची गुणसूत्र देखील बाळामध्ये उतरणार असतात. आणि याचा परिणाम काय होणार हाच तर प्रयोग असतो.
असे समजल्यावर यतीन या प्रयोगातून माघार घायचे ठरवतो. परंतु कांचन आपल्या स्वतःच्या बाळाच्या आशेपायी मनातल्या मनात निश्चय करून बसलेली असते.
या गोष्टींवरून दोघांमध्ये वाद होतात. "माझ्या वंशामध्ये मला भेसळ चालणार नाही आणि या सगळ्यात माझा दोष नाही" या यतीनच्या वाक्याने आणि यतीनने फक्त त्याची एकट्याच्या गुणसूत्रांचा वापर करण्याचा पर्याय सुचवल्याने कांचन दुखावली जाऊन त्यांच्या नात्याचा कडेलोट होतो. आणि ती निर्णय घेते.
आता हा निर्णय कोणता आणि यानंतर काय होते हे सिनेमा मध्ये बघा. मध्यंतरापर्यंत उत्कंठावर्धक या कथेत अनपेक्षितपणे एक जबरदस्त भावनिक ट्वीस्ट येतो. तो अनुभवाच.
या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे हा अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी जनांची निर्मिती आहे. सर्व छायाचित्र अमेरिकेत (माझ्या अंदाजाने न्यू जर्सी असावे) सर्व कलाकार देखील तिथे कामानिमित्त स्थायिक झालेले मराठी आणि स्थानिक अमेरिकन आहेत. तिथल्या जीवनशैलीचे बारकावे चांगले टिपले आहेत. कर्तबगार, महत्वाकांक्षी आणि गुणी ही पिढी. या पिढीची दुसरी बाजू देखील नाट्यमय आहे. कुटुंबाला भारतात सोडल्यानंतर मित्र मैत्रिणीत भावनिक आधार शोधणारे, वेदनेमध्ये सप्ताहांतात सहल करून लेप करणारे, तुटक व्हिडीओ कॉल मध्ये आई वडिलांच्या तब्येतीची चौकशी करणारे, ग्रीनकार्डच्या जंजालामध्ये हरवलेले हे एक वेगळे भावविश्व उभे केले आहे.
स्त्रीपुरुष समानतेच्या भाषणबाजीला बगल देऊन देखील तो विषय ताकतीने मांडला आहे. आणि शेवटी तर हे सगळे बाजूला जाऊन तो वेगळ्याच दुनियेत नेऊन सोडतो.
दिग्दर्शक आशय दिलीप जावडेकरांचे कौतुक केल्याशिवाय राहवत नाही. सर्व कलाकार हौशी असले तरीही अभिनयात उजवे आहेत. अभिनयात सोडा छ्याचित्रणात देखील कुठेही नवखेपणा जाणवत नाही. काही इफेक्ट्स तर अप्रतिम जमून आलेत.
हा सिनेमा मला मनापासून आवडला. युट्युब वर त्याचा हा ट्रेलर[1] . आणि ऍमेझॉन प्राईम वरची सिनेमाची ही लिंक[2] .
तळटीपा
_*_
माझे कोरावरचे मूळ उत्तर.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्रायासाठी अनेक आभार!