टाईम डायलेशन
खालील लेख Quora.com वरच्या या प्रश्नाचे उत्तरादाखल लिहिला होता.
करोना वायरसच्या परिणामामुळे घरातच आहे. त्यामुळे "द फॉल्ट इज इन अवर स्टार्स" हा तद्दन रोमँटिक रडवेला पिच्चर पाहण्यात आला. मला रडू वगैरे आलं नाही. कारण चित्रपटातल्या प्रेमी युगलाला कँसर असला तरी एक सुखवस्तू कुटुंबात त्यांचा हा प्रेमाचा प्रवास दाखवलाय. वेदना असली तरी दुःख अगदी पराकोटीचे नव्हते.
नॉर्वे, स्वीडन किंवा अमेरिकेतल्या तरुणीला कदाचित हुंदके आवरणार नाहीत. पण मला? छे. म्हणजे आपल्यासारख्या देशात जिथे कँसर बरोबर गरिबी असलेली कुटुंबे जेव्हा आपण पाहतो तेव्हा या स्टोरीमधल्या प्रेमी जोडप्याचे बरे चालले आहे अशीच भावना होते. आता दुःख ते दुःख तुमचे काय आणि माझे काय श्रीमंतांचे काय आणि गरिबांचे काय, हा तर्क योग्य वाटत नाही, नाहीका?
याच सिनेमामध्ये प्रेमाबद्दल एक सुंदर तर्क सांगितला आहे. किती काळ एकामेकांसोबत घालवला तर ते प्रेम अर्थपूर्ण असते? एक जन्म? वीस वर्षे? एक वर्ष? एक तास? काही क्षण?
अनंत
समजा तुम्हाला विचारले की एक ते शंभर मध्ये किती संख्या आहेत तर? बसलो मोजायला. १.१,१.२ नाही हो.. १.००००००००.....१, १.००००००००.....२, अगणित. अनंत.
आता शून्य आणि एक च्या मध्ये किती संख्या आहेत? उत्तर .. अगणित.. अनंत.
अरेच्चा, एक ते शंभर मध्ये पण अनंत, आणि शून्य ते एक मध्ये पण अनंत? म्हणजे एक अनंत दुसऱ्या अनंतापेक्षा मोठा आहे की काय? असं कसं असू शकेल? अनंताची व्याख्या एकच आहे. तुम्ही कसे मोजताय याच्यावर दोन संख्यामध्ये किती संख्या बसणार हे ठरणार. याचा अर्थ प्रेमासाठी एक जन्म, १ वर्ष, काही तास किंवा काही क्षण पुरेसे आहेत की नाही हे व्यक्तिसापेक्ष आहे.
कल्पना करा कि तुम्ही एका अतिशय वेगवान ट्रेन मध्ये बसलाय. वेग म्हणजे काय म्हणावा.. २०० किलोमीटर प्रति तास. यापेक्षा वेगवान वाहन तुम्ही कधी पाहिलेच नाही. तिकडे अमेरिकेत हायपरलूप निघाले. वेग १००० किलोमीटर प्रति तास. जोपर्यंत तुम्ही स्वतः अमेरिकेत जाऊन त्यात बसत नाही, तोपर्यंत ती तुमच्यासाठी एक कल्पनाच. आणि काही लोकांच्या कल्पनेत देखील ते या वाहनाला पाहू शकत नाही. मग तुमची २०० किमी/तास वाली ट्रेन खरी वेगवान कि हायपरलूप वेगवान? उत्तर व्यक्तिसापेक्ष.
मेफ्लाय (Mayfly) नावाची माशी चे आयुष्यमान २४ तासाचे असते. म्हणजे या चोवीस तासात माशी जन्म घेते, वाढते, प्रजनन करते, आणि मरून जाते. आपले सरासरी आयुष्यमान ८० वर्षाचे धरले, तर या काळात आपण या माशीच्या आपण २९,२०० पीढ्यांचे साक्षीदार होऊ शकतो. एवढे रिकामटेकडे कोण असेल, काय माहिती. आणि ती माशी आपल्याला पाहत असेल तर तिच्या दृष्टीने आपली वाढ झालेली तिला कळणार देखील नाही. याचा अर्थ माशीच्या दृष्टीने आपले अस्तित्व अनंत आहे. आता या माशीच्या एखाद्या पिढीने नोंद घ्यायला चालू केली आणि ती नोंद पुढच्या पिढीकडे सुपूर्द केली तर २९,२०१ व्या पिढीला आपण मृत होतो आणि त्यानंतर कोणीतरी दुसरा माणूस त्यांना दिसतो या घटनेचे साक्षीदार होता येईल.
गुरुत्व जास्त आहे, किंवा प्रकाशाच्या गतीच्या जवळपास प्रवास करणारे यान अशा ठिकाणी जिथे काळ प्रसरण पावला आहे, अशा ठिकाणी आपल्याला नेले तर आयुष्य तेवढेच राहील. तुम्ही कोणाशी तुलना करताय आणि कोणाचे निरीक्षण करताय याच्यावर तुमचे आयुष्य वेगवान आहे कि सावकाश चालले आहे हे अवलंबून राहील. काळ प्रसरण पावला म्हणजे आजूबाजूचे अवकाश आणि सर्व क्रिया कलाप देखील तेवढ्याच प्रमाणात प्रसरण पावल्या. तुलनाच करायला कोणी नसेल तर पृथ्वीवर तुमच्या कुळाच्या १०० पिढ्या निघून जातील पण तुमच्यासाठी अजून दुपारच्या जेवणाची वेळ झाली नसेल.
पुराणांमध्ये टाईम डायलेशन बद्दल उल्लेख आहे. आधुनिक वैज्ञानिकांनी टाईम डायलेशन वगैरे काही असते हे सांगितले नसते, तर आपल्यासाठी ही कथा म्हणजे येडछापपणा च वाटली असती.
फार फार पूर्वी कुकुदमी राजाची रेवती ही अतिशय सुंदर, हुशार आणि गुणवान मुलगी होती. ती जेव्हा लग्नाची झाली तेव्हा कुकुदमी ला वाटले की हिचा पती होण्याची क्षमता असलेला कोणी भूतलावर नाही. त्यामुळे प्रत्यक्ष परमपीता ब्रह्मदेवाकडेच जाऊन काही स्थळ मिळते का बघावे अशा विचाराने तो ब्रह्मलोकात रेवतीला घेऊन गेला.
कुकुदमी ब्रह्मदेवाकडे आला तेव्हा तिथे गंधर्वांचे गायन चालू होते. उगाच कशाला डिस्टर्ब करा म्हणून तो तिथे गाणे संपेपर्यंत थांबला. झाली असतील १० - १५ मिनिटे फार फार तर. गायन संपताच ब्रह्मदेवाच्या समोर आपल्या गुणसंपन्न कन्येला उभे करून त्याने देवाला तिच्यासाठी पृथ्वीवर काही गुणी स्थळांपैकी एखादे स्थळ सुचवण्यास विनंती केली.
ब्रह्मदेव पहिल्यांदा तर मोठ्याने हसले. म्हणाले त्यासाठी तू इथे आलास? अरे तू ज्या स्थळांची माहिती घेऊन माझा सल्ला घ्यायला इथे आलास, ती माणसे, इतकेच काय त्यांच्या कित्येक पिढ्या पृथ्वीवर होऊन गेल्या. तू इथे आल्यापासून पृथ्वीवर २७ चतुरयुगे (१०८ युगे ) होऊन गेली आहेत. (१ युग = ८ लाख चौसष्ठ हजार वर्षे. म्हणजे एकूण ९ कोटी ३३ लाख १२ हजार वर्षे)
ब्रह्मदेव म्हणतो की तुझी बायकपोरे, तुझी संपत्ती, तुझे नाव हे सगळे या कालौघात नष्ट झाले आहे. आता एक काम कर, येत्या काही काळात प्रत्यक्ष श्रीविष्णू कृष्णाच्या अवतारात पृथ्वीवर जन्म घेणार आहेत आणि बलरामच्या स्वरूपात श्रीशेषनाग त्यासोबत असणार आहेत. रेवतीसाठी बलराम हा योग्य मुलगा आहे. आणखी काही मिनिटे इथे राहिला तर हेही स्थळ हातातून निघून जाईल.
असे समजल्यावर कुकुदमी लगोलग तिथून निघाला आणि बलराम विवाहयोग्य वयात असताना पृथ्वीवर येऊन त्याने रेवती बरोबर बलरामाचा विवाह लावून दिला.
तसे पाहिले तर रेवती पृथ्वीच्या काळामध्ये मोजले तर बलरामाच्या खापर पणतीपेक्षा कैक लाख पटीने वयस्कर होती. पण जैविकदृष्ट्या ती बलरामाला सुयोग्य होती.
या कथेत तुमचे उत्तर दडले आहे.
भौतिकशास्त्रानुसार वेळ किती प्रसरण पावू शकतो हे खालील आलेखावरून दिसेल.
याचा दुसरा अर्थ की एखाद्या जागेवरचा एक क्षण म्हणजे पृथ्वीसापेक्ष अनंत वर्षे देखील असू शकतात. म्हणजे ब्रह्मदेवाची जी कालगणना आहे, ती काही अगदीच अशक्य नाही. आता हा ब्रह्मलोक खरेच आहेका, किंवा ही कथा फक्त टाईम डायलेशन समजवण्यासाठी केलेली एक मनोरंजक योजना आहे हे पुराण लिहिणाऱ्यालाच माहिती. त्यात मी जात नाही. उगाच कोणीतरी टिप्पण्यामध्ये भक्त भक्त म्हणून चालू व्हायचे.
इंटरस्टेलर या ख्रिस्तोफर नोलन च्या नितांतसुंदर सिनेमात देखील या काळ प्रसरणाच्या कल्पनेचे सादरीकरण आहे. काही तास उच्च गुरुत्व असलेल्या ग्रहावर व्यतीत करून परतलेले अंतराळवीर आपल्या तिथून दूर कक्षेमध्ये असलेल्या यानातील सहकार्याला जेव्हा भेटतात तेव्हा त्यांच्यासाठीच्या त्या काही तासात तो सहकारी २३ वर्षांनी मोठा झालेला असतो.
उमगायला थोडे कठीण आहे, पण ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे मनुष्याची युगानुयुगे जरी असली तरी ब्रह्मदेवाला "इट्स जस्ट अ वेन्सडे". त्यामुळे जसे आपण त्या मेफ्लाय माशीचे आयुष्य निरखून पाहत नाही तसे ब्रह्मदेव पण करत नसेल तर त्याच्यासाठी देखील तुमचे जेवढे आयुष्य आहे तेवढेच त्यांचेही आहे.
वेळ सापेक्ष आहे हे समजण्यासाठी अगदी दुसर्या दीर्घिकेत जायची गरज नाही. एखाद्या पक्क्या मुंबईकराला पुण्याच्या आडबाजूच्या खेड्यात महिनाभर नेऊन सोडले तर सगळे कसे स्लो मोशन मध्ये चालले आहे अशी भावना होईल पण खरेच काही स्लो मोशन मध्ये चाललेले नाही. गावच्या दृष्टीने इट्स जस्ट अ वेन्सडे. शेवटी कशाशी तुलना होत आहे याच्यावर आपल्या जाणीवा अवलंबून असतात नाही?
_*_
लेख गंमत म्हणून घ्यावा. यातल्या कोणत्याही वाक्याची वैज्ञानिक वैधतेचा मी दावा करत नाही. इंटरनेट वर अजून खूप माहिती मिळेल, जिज्ञासूंनी आपापला अभ्यास करावा.
_*_
संदर्भ दुवे-
https://blogs.scientificamerican...
Hindu units of time - Wikipedia
Kakudmi - Wikipedia
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्रायासाठी अनेक आभार!