माणुसकी मोजताना


खालील लेख Quora.com वरच्या या प्रश्नाचे उत्तरादाखल लिहिला होता.

____

सध्या म्हणजे नक्की कोणत्या काळाशी तुलना करत आहात?

मला वाटते की जसे जसे समृद्धी येत आहे तसे तसे समाजात इतरांना मदत करण्याची भावना उलट वाढत आहे. याचे कारण म्हणजे अगदी कासेची लंगोटी देण्याची वेळ येत नाही. स्वार्थ राखून परमार्थ करणे बऱ्यापैकी शक्य झाले आहे.

मागच्या पिढीपर्यंत लोक मनाने श्रीमंत असतीलही पण जवळजवळ सगळेच गरीब असल्याकारणाने इतरांची करून करून काय मदत करणार?

आता संपूर्ण जगच समृद्ध होत आहे. गेल्या दशकभरात जगाची गरीबी निम्म्याहून कमी झाली आहे आणि झपाट्याने कमी होत आहे.[1]बिल गेट्स, वॉरन बफे, जेफ बेझोस सारख्या व्यक्ती आहेत ज्या आपल्या देशाच्या सीमेपलिकडे जाऊन संपूर्ण विश्वाची सेवा करायला निघाले आहेत. डॉ प्रकाश आणि मंदाकिनी आमटेंसारखे सेवाव्रती हातांना तरुणांच्या संघटनांनी आणखी बळ दिले आहे. माणुसकी वाढत आहे.

कोरा, युट्युब, यूडमी, कोर्सेरा, खान अकॅडमी यासारख्या व्यासपीठावरून जगभरातल्या उत्कृष्ठ विद्यापीठांचे ज्ञान याच माणुसकीवाल्या लोकांनी सर्वांसाठी खुले करून ठेवले आहे. हे ज्ञान घेऊन कित्येक तळागाळातील बालके पुढे जाऊन स्वतःची आणि समाजाची स्थिती आणखी सुधारणार आहेत.

माणसांची काळजी आहे म्हणूनच ओला, उबर सारख्या सेवा सक्षमपणे आणि सुरक्षितपणे आपल्या कुटुंबियांचा प्रवास सुसह्य करीत आहेत.

ही सगळी प्रगती मागच्या काही दशकांत झाली आहे. तंत्रज्ञान समान धागा आहे.

वाईट मानू नका पण जर तुम्हाला माणुसकी कमी होत आहे असे वाटत असेल तर मानवजातीची सेवा करणाऱ्या संघटनेशी संलग्न व्हा. काही लोक समाजामध्ये प्रचंड परिश्रम करत आहेत आणि बरेच तरुण, निवृत्त त्यांच्या पाठीशी अर्थ आणि श्रमदानाच्या स्वरूपात खंबीर उभे आहेत. भिक्षेकर्यांचे डॉक्टर अभिजित सोनवणे हे त्यातलेच एक नाव.[2]

माणुसकीचा एक छोटासा प्रसंग सांगतो -

फेब्रुवारीच्या दुसऱ्या सप्ताहांतात राजगडावर जाण्याचा योग आला. माझा भाऊ, वहिनी दोन पुतणे आण आमचा बालपणीचा मित्र (ज्याला आम्ही अप्पा म्हणतो) असे आम्ही सगळे सकाळी सव्वासात वाजता पायथ्यापासून वर जाऊ लागलो. सूर्य अजून डोंगरामागेच होता, मळभ आले होते आणि हवेत विलक्षण गारवा होता. साधारण दीड दोन किलोमीटर चढाई केल्यावर सरबत विकणाऱ्या आजीबाई वाटेवर डोळे लावून बसलेल्या दिसल्या. डोळ्यात फुलं पडलेली, 80-85 वय. राजगडावर येणे जाणे असणाऱ्या ट्रेकर्स ला या आज्जी नवीन नसतील. पण सकाळी 8 वाजता मला अपेक्षा नव्हती.

आज्जींनी लगेच विनवणी वजा आवाजात सरबत घ्या ताक घ्या चालू केले. पदर डोक्यावर सावरत थरथरत्या हातांनी पेला समोर धरत होत्या. आम्ही तिथे थांबलो एक पेला सरबत घेऊन १० रुपये आज्जीकडे दिले. तेवढयात त्यांनी आमच्याकडे काडेपेटी आहेका विचारले. त्यांना शेकोटी पेटवायची होती कारण थंडीने काकडल्या होत्या अक्षरशः. "काय सांगू बाळा, आज लई थंडी पडलिया, वाईच शेक करायचंय" असे पुटपुटत होत्या. पण आमच्यातले कुणीच फुंके नसल्यामुळे कोणाकडेही काडेपेटी नव्हती. भाऊ थोडं पुढे जाऊन आम्हाला बोलवत होता, म्हणे चला पुढे म्हातारी इथलीच आहे, आपल्यापेक्षा कडक आहे काही होत नाही.

मी आणि अप्पा मात्र तिच्याकडेच बघत होतो. अप्पाने माझ्याकडे पाहिले आणि काहीतरी विचार करून बॅगेतला स्वेटशर्ट काढला आणि आज्जीच्या हातात दिला. हे काय म्हणून आज्जी उलगडून खाली वर बघायला लागली. हात थंडीने आखडल्यामुळे तिला शर्ट घालायला देखील आमची मदत लागली. "बरं बाबा, आणि तुलारं?" म्हणत होती. आप्पा म्हणाला ठेव तुला गड उतरताना घेऊन जातो परत.

हा प्रकार पाहून अप्पाचा एवढा अभिमान वाटला. गडावरून परत येताना संध्याकाळी सहा वाजता आज्जी तिथेच. अप्पाने परत चौकशी केली. आज्जीने स्वेटशर्ट देऊन "बरं झालं बाबा तू स्वेटर दिलं" म्हंटली. आणि स्वेटशर्ट परत दिले. गमतीची गोष्ट म्हणजे मला आणि वहिनींना तिनं ओळखलं नाही. परत सरबत घ्या म्हणून मागं लागली. आम्ही नको नको म्हणत पुढे निघून आलो तर "मरा तिकडं" पुटपुटली. आम्ही ही वातड आज्जी बघून हसू आवरले. तिच्या हातात उरलेले खजूर दिले. भावाने "मी सांगत होतो" चे अविर्भाव दाखवले. अप्पावर मात्र आज्जी प्रसन्न होती.
----
माणुसकी आहे हो..अशा अप्पासारख्या माणसांच्या आसपास राहायला हवे, आणि कधीकधी आपण स्वतःच स्वतःसाठी माणुसकीचे उदाहरण व्हावे. एक छोटासा दिवा काळोखाला पुरेसा नसेल, पण कुणी धडपडणार नाही इतपत प्रकाशाची व्यवस्था करूच शकतो.
तळटीपा

टिप्पण्या

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

सर्वात आनंदी देश : फिनलंड.. पण खरचका?

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक