स्टॅचू ऑफ युनिटी - फसलेला प्रकल्प का फायद्याची गुंतवणूक?

Did the Statue of Unity in India fail?


मी २०१९ च्या फेब्रुवारी महिन्यात स्टॅचू ऑफ युनिटी ला भेट दिली. स्टॅचू ऑफ युनिटी बडोद्यापासून साधारण ८० किमी वर असलेल्या केवडीया या छोट्या गावाजवळ आहे. मी तिथे बडोद्यावरून साधारण ५ वाजता पोचलो. तिथे दोन प्रकारचे तिकीट मिळतात. पहिल्या प्रकारचे १२० रुपयांचे तिकीट घेऊन तुम्ही पुतळ्याच्या पायाजवळ जाऊ शकता. दुसऱ्या प्रकारचे तिकीट घेऊन तुम्हाला सरदार पुतळ्याच्या छातीपर्यंत असलेल्या निरीक्षण दालनापर्यंत जाता येते. हे तिकीट ३५० रुपयांना मिळते.


मला खरेतर उंचीवर असेलेल्या या निरीक्षण दालनापर्यंत (Observation Deck) जायचे होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही महाग तिकिटे संपली होती. तिकीट खिडकीवरच्या क्लर्क ने सांगितले की ही तिकिटे मर्यादित असतात आणि दिवसाला "फक्त" ७००० तिकिटेच दिली जातात. मी सप्ताहांतात आलो नव्हतो. तो शुक्रवार होता तरीही ही महाग तिकिटे चक्क संपली होती. थोडा हिरमोड झाला, पण माझ्याबरॊबर बरेच लोक होते ज्यांना ही तिकिटे मिळाली नव्हती. नाईलाजाने नॉर्मल तिकीट घेतले.


७००० तिकिटे दर दिवसाला आणि नॉर्मल तिकिटे कितीही. आता तुम्हीच अंदाज लावा. स्टॅचू ऑफ युनिटी हा एक अतिशय यशस्वी प्रकल्प आहे. काही लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये खुसपट शोधायची सवय असते. स्टॅचू ऑफ युनिटी ला विरोध करणारे त्याच प्रकारातले आहेत.


मी मध्ये ध्रु.राठी या माणसाचा युट्युब वर व्हिडीओ बघितला. याला प्रत्येक चांगल्या गोष्टींमध्ये समस्या शोधायची सवय. हे प्रकार करताना विशीतला हा तरुण कधी मोठा सायंटिस्ट, कधी समाजशास्त्रज्ञ, कधी शिक्षणतज्ञ असल्याच्या अविर्भावात मत ठोकत असतो. पु.लं. च्या शब्दात - "आपण कोण आपली लायकी काय हे विसरून ठोका मत" अशा पठडीतला हा मुलगा, निव्वळ एका पार्टीवर टीका करून करून युट्युब सम्राट बनून फिरत असतो. तर याने मध्ये स्टॅचू ऑफ युनिटी कसा एक तोट्यातला प्रकल्प आहे यावर व्हिडीओ बनवला. आता याचा तर्क पहा - हा म्हणे भारत सरकार आणि गुजरात सरकारने या पुतळ्यावर ३००० कोटी रुपये खर्च केले. आता या प्रकल्पातून सरकारला ८० कोटी वर्षाला मिळतात तर म्हणे ही गुंतवणूकीचे मुद्दल निघायलाच ४० वर्षे लागतील. म्हणे कि हेच पैसे जर फिक्स्ड डिपॉसिट मध्ये टाकले असते तर वर्षाचे २०० कोटी निव्वळ व्याज मिळाले असते. वा रे तर्क.
याच्या तर्कांनुसार भारत सरकारने सगळे प्रकल्प त्वरित बंद करून सगळा पैसा फिक्स्ड डिपॉसिट मध्ये ठेवून दिला पाहिजे. आता जगात अशी कोणती बँक जगात आहे ते ध्रु.राठी लाच माहिती.


स्टॅचू ऑफ युनिटी हा काही फक्त धातूचा गोळा नाही. या पुतळ्याबरोबर तिथे अद्ययावत पायाभूत सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पामुळे या पुतळ्याच्या १०० किलोमीटर त्रिज्येत हजारोच्या संख्येने रोजगार निर्माण झाले असतील. बस ड्रायव्हर्स, सुविधांची देखभाल करणारे कर्मचारी, हॉटेलवाले, इंजिनीयर्स ते प्रोजेक्ट मॅनेजर्स या सर्व प्रकारचे रोजगार स्थानिकांना उपलब्ध झाले असतील. तेथील सोयीसुविधा खरेच वाखाणण्याजोग्या होत्या. वर हा प्रकल्प काही वर्षे नाही तर काही शतके नफा मिळवत राहील. या काळात त्याच्या गुंतवणुकीच्या कितीतरी पट परतावा मिळवून देईल.


अरे हो, आणि तिथे आलेल्या माझा अनुभवाबद्दल तर सांगायचेच राहिले. कारण ध्रु.राठी सारख्या माणसांना त्याच्याशी तर काहीएक घेणेदेणे नाही. मला खूपच सुंदर अनुभव आला. मी जरी पुतळ्याच्या छातीपर्यंत जाऊ शकलो नाही तरी पायापर्यंत गेलो. तो चबुतरा देखील उंचच उंच आहे. तिथून त्या नर्मदेच्या खोर्याचे विहंगम दृश्य दिसते. पुतळ्याच्या खाली एक अद्ययावत संग्रहालय बनवले आहे. तिथे भारताच्या एकीकरणाचा इतिहास पाहता येतो. ५०० संस्थानामधून साम, दाम, दंड, भेद वापरून एक अखंड भारत घडवणाऱ्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक व्हायला होते. संध्याकाळी ७ वाजता होणार लेजर शो तर डोळ्याचे पारणे फेडतो. मी त्या ठिकाणी ३ तास होतो. आणि असा एकही क्षण नव्हता कि मला कंटाळा आला. स्टॅचू ऑफ युनिटी मी आतापर्यंत बघितलेल्या उल्लेखनीय गोष्टींपैकी नक्कीच एक आहे. त्याची भव्यता बघतच राहावी अशी आहे.


मी माझ्या एका मित्राच्या आमंत्रणावरून त्याच्या लग्नाला अहमदाबादला गेलो होतो. पण निमंत्रण स्वीकारण्याचे एक कारण हे होते कि मला स्टॅचू ऑफ युनिटी बघायचा होता. या निमित्ताने मी आमदाबादमधला साबरमती आश्रम, विंटेज कार म्युजियम, गांधीनगरचे स्वामीनारायण मंदिर, अदलज की वाव आणि बडोद्यातल्या गायकवाड राजघराण्याचा टोलेजंग राजवाडा - लक्ष्मीविलास पॅलेस बघितला. सांगायचा मुद्दा असा कि या पुतळ्याला बघायला देशभरातून नव्हे तर पूर्ण जगामधून लोक येणार तर ते पुतळा बघून घरी परत जाणार असे होणार नाही. ते या संपूर्ण राज्याच्या पर्यटन स्थळांना भेट दणार. त्यामुळे या भागाचा चांगला विकासच होईल. स्टॅचू ऑफ युनिटी अशा प्रकारे अप्रत्यक्षरीत्या सर्व गुजरातसाठीच लाभदायक असणार आहे. ध्रु.राठी आणि गॅंग च्या गणितात हे बसत नाही वा त्यांना मुद्दाम बसवायचे नाही.


तात्पर्य - स्टॅचू ऑफ युनिटी हा एक यशस्वी प्रकल्प आहे.


या भेटीची ही काही क्षणचित्रे -





असे असले तरी नुसते पुतळेच उभे करत बसा या मताचा मी नाही. एक कल्पना चालली म्हणून तीच परत रिपीट करत राहिल्याने कोणाचेही भले होणार नाही. प्रश्न शतकांचा आहे, त्यामुळे दूरदृष्टी ठेवूनच प्रकल्पांना हात घातले पाहिजेत. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी माझे काय मत आहे, हे मी इथे लिहिले आहे. काहींना ते आवडणार नाही, पण आपल्या राजाने जशी पिढ्यानपिढ्यांची दूरदृष्टी ठेवून निर्णय घेतले, याचा आदर्श नाही घेतला तर तुम्ही कितीही पुतळे बांधा त्याचा काय उपयोग?

_*_

हे उत्तर म्हणून मी इंग्रजी कोरा वर लिहिले होते. ते बरेच वायरल झाले. त्याची लिंक पोस्टच्या सुरवातीलाच दिलेली आहे. बऱ्याच जणांनी कमेंट्स मध्ये उत्तराला पाठिंबा दिला तर काही ध्रु.राठी चे फ्यान तिथेही त्यांचे तर्क घेऊन आले. एकूण बरीच इंटरेस्टिंग चर्चा आहे तिथे.

टिप्पण्या

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

सर्वात आनंदी देश : फिनलंड.. पण खरचका?

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक