विमानाच्या प्रवासात तुम्हाला भेटलेली एखादी चांगली व्यक्ती कोणती? का?






सिटीझन केन नावाचा हॉलिवूड चा एक जुना माझ्या आवडीचा चित्रपट आहे. चित्रपट सुरु होतो तेच त्यातला अब्जाधीश वृद्ध नायकाच्या तोंडी शेवटचे शब्द असतात - 'रोझबड'. मृत्यूसमयी तो हे का म्हणाला आणि त्याचा अर्थ काय याविषयी माध्यमांत अंदाज आणि तर्क चालू होतात. नंतरचा संपूर्ण चित्रपट या नायकाची म्हणजे 'चार्ल्स केन' याची जीवनकहाणी आहे. रोझबड म्हणजे काय यासाठी जंग जंग पछाडणारे वार्ताहर नायकाच्या एका जवळच्या मित्राला त्याबद्दल विचारतात त्यावर त्यालाही काही माहित नसते. पण तो त्याचे अनुमान सांगतो की ती एखादी व्यक्ती असेल जी केन महाशयांच्या लक्षात राहिली. यावर त्या वार्ताहराचे समाधान न झाल्याने तो म्हातारा मित्र पुढील गोष्ट सांगतो. मिनिटभराचा हा संवाद हॉलिवूड च्या उत्कृष्ट संवादांपैकी एक आहे.

A fellow will remember a lot of things you wouldn't think he'd remember. You take me. One day, back in 1896, I was crossing over to Jersey on the ferry, and as we pulled out, there was another ferry pulling in, and on it, there was a girl waiting to get off. A white dress she had on. She was carrying a white parasol. I only saw her for one second. She didn't see me at all, but I'll bet a month hasn't gone by since that I haven't thought of that girl.


स्वैर भाषांतर :


माणूस बऱ्याच अशा गोष्टी लक्षात ठेवतो ज्या तुम्हाला अगदीच क्षुल्लक वाटू शकतात. माझेच बघा ना, साधारण १८९६ ची गोष्ट असेन, मी फेरीने जर्सीला जात होतो. बोट धक्क्याला लागत लागत असताना, दुसरी बोट तिथे आली. आणि त्या तिथे बोटीतून उतरायला आतुर एक सुंदर मुलगी उभी होती. तिने शुभ्र ड्रेस घातला होता आणि पांढरी शुभ्र छत्री हातात होती. मी तिला कदाचित सेकंदभर पहिले असेल. तिने माझ्याकडे बघितलेही नाही. पण तो क्षण आणि आताचा काळ यामध्ये मी त्या मुलीची आठवण काढली नसेल असा एक महिनाही गेला नाही.


हा प्रसंग मनाला भिडला कारण मलाही असे वाटते कि आयुष्यात असे काही सुंदर क्षण कधीही येऊ शकतात जे अगदी मृत्युशय्येवर पण लक्ख आठवावेत. त्यामुळे बहुधा प्रवासामध्ये मी सावधच असतो.



स्लोव्हाकियातल्या ब्रातिस्लाव्हा विमानतळावरून बेल्जीयमच्या ब्रसेल्सला जाणाऱ्या विमानासाठी बोर्डिंग सुरु केल्याची घोषणा झाली. आजूबाजूला पाहिले असता एक सुंदर मुलगी हातातली बॅग आणि वही सावरत गेटकडे जाताना दिसली. तिच्या रूपापेक्षा मला तिचे केसांतले रंगीबेरंगी मणी, तिचा बारीक फ्रेम चा मोठा चष्मा आठवतो. तिला बघून नकळत वाटले कि काय असेल हिची स्टोरी? काय विचार करत असेल ही?

विमानात माझ्या सीट वर बसल्यावर तीच मुलगी सीट शोधत माझ्या दिशेने येत होती. योगायोग पहा, तिला माझ्या शेजारची सीट मिळाली होती. काही सामान सरकवून तिला तिची बॅग ओव्हरहेड बिन मध्ये ठेवायला मी मदत केली. आणि थँक्स म्हणून ती शेजारी बसली.

आता तर माझे रडार फुल्ल ऑन मोड मध्ये आले होते. हाच तो 'सिटीझन केन' क्षण असे मला वाटले. मी इकडे भविष्यातलया भूतकाळात काय काय आठवायचे याची उजळणी करत असताना बेल्जीयमचा शाल्वा (Charleroi) विमानतळ पुढच्या दीड तासात आलाही असता आणि तोंडातून दोन शब्दपण फुटले नसते. त्या मुलीने स्वतःहून संवादाला सुरुवात केली म्हणून बरे. मी तिला तिचे नाव विचारले नाही, सोयीसाठी तिला ऍलेक्स म्हणू.

तिने मला विचारले की मी ब्रसेल्सला कशासाठी चाललो आहे. मी म्हणालो की माझी तिथे अपॉइंटमेंट होती पण ती रद्द झाली, म्हणून मी आता फक्त फिरायला जात आहे. तिने विचारले कसली अपॉइंटमेंट आणि मी उत्तर दिले, आणि ती छान हसून म्हणाली.. ओह इंजीनियरिंग.

ऍलेक्स - तुम्हाला इंजीनियरिंग आवडतं का?

(मला हे असं कुणी विचारलं का उगीच अवघडल्यासारखं होतं. पुढचा काही थर्मोडायनॅमिक्सचे प्रश्न विचारणार कि काय असे वाटून जाते.)

मी - माझ्याकडे याचे सरधोपट उत्तर नाही. तू काय शिकते आहेस?

ऍलेक्स - बिझनेस मॅनेजमेंट. तुम्ही भारतातून आलाय का? त्यांच्यासारखे दिसता.

मी - हो.

ऍलेक्स - अरे मस्त, तुम्हा लोकांची कसली प्राचीन संस्कृती आहे. मला भारत आवडतो.

मी - तू भारतात गेली होतीस का?

ऍलेक्स - नाही, पण माझा भाऊ कामानिमित्त भारतात गेला होता. माझा एक मित्र भारतीय आहे. मला योग आणि चक्रांबद्दल माहिती आहे. जेव्हा कोणी चक्रांना जागृत करते तेव्हा कसे वाटते याच्याबद्दल मला सॉल्लिड कुतुहूल आहे? तुम्ही ध्यानकरता का?

मी - मला एवढेच माहित आहे की, चक्रांना जागृत करणे आणि प्रबुद्ध वगैरे असणे एक कठीण प्रक्रिया आहे ज्यासाठी वर्षानुवर्षे सराव करावा लागतो. आणि मी ध्यान करत नाही. आमच्याकडे बहुतेक जण करत नाहीत. पाश्चात्य लोकांमुळेच आता कुठे ध्यानधारणा, विपश्यना याबद्दल लोकांना जाणीव आहे. नाहीतर बहुतेक जण योग वगैरे जास्त फॉलो करत नाहीत.

ऍलेक्स - असं का? तुझा किंवा तुम्हा लोकांचा त्यावर विश्वास नाहीये का?

मी - माझा आहे, बऱ्याच जणांचा आहे. फक्त एवढेच आहे की आमच्यापैकी बहुतेकजण पैसे कमविण्यात आणि पश्चिमेचे अनुसरण करण्यात व्यस्त असतात आणि त्यामुळे आम्ही आमच्या स्वत: च्या संस्कृतीकडे दुर्लक्ष करतो. आम्हाला अमेरिकेसारखे विकसित राष्ट्र बनायचे आहे. (हसून)

अलेक्स - पण का? मला वाटते की पाश्चिमात्य देश पृथ्वीला प्रदूषित करत आहेत, जर प्रत्येक जण असेच करू लागला तर पृथ्वीवरचे जीवन संपून जाईन.

मी - मी आधी असा विचार करायचो, हळूहळू माझा समज बदलला. जगात आदर मिळवण्यासाठी राष्ट्र बलवान बनले पाहिजे. आम्ही आमच्या जंगलांचे त्यातल्या वाघांचे संरक्षण करतो म्हणून माझ्या देशाची स्तुती करणारे अजून कोणीही भेटले नाही. वनांचे आणि वन्यजीवांचे संरक्षण करणे हे सोपे काम नाही. तरीही, ते भारताला मागासलेला देश म्हणतात. आजकाल भारताला थोडा मान मिळतो कारण भारतात चीनप्रमाणेच औद्योगिक उत्पादन क्षमता विकसित होत आहे. आपल्या सीमांचा आदर आणि संरक्षण करण्यासाठी माझ्या देशाचे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण करावे लागेल. एखाद्या दुबळ्या देशावर आक्रमण झाले तर त्याची पर्वा कोणी करत नाही. आपण स्वतः खंबीर असले पाहिजे जेणेकरून जगाला भारताची काळजी वाटायला हवी. त्यांचे परस्पर हितसंबंध भारतात गुंतले तर त्यांना भारताचे सार्वभौमत्व टिकवण्यात रस असेल.

ऍलेक्स - भारतावर कशाला कोण आक्रमण करेल? हे राजकारणी लोक जनमानसात उगीच भीती पसरवतात कारण त्यांना आपल्यावर नियंत्रण ठेवायचे असते. ते आपल्या पिण्याच्या पाण्यात काय बरे ते.. हो.. फ्लोरिन, फ्लोरिन मिसळतात.. जेणेकरून आपली बुद्धिमत्ता कमी करू शकतील. आपण जितके अडाणी राहू, तितकेच आपण अधिक आज्ञाधारक होऊ असे त्यांना वाटते. केमट्रेल्स नाहीका आजकाल?

मी - ते काय असते?

ऍलेक्स - विमानांमागच्या पांढऱ्या रेषा?



मी - अच्छा, मग त्याचे काय?

ऍलेक्स - हल्ली तासन्तास टिकते. पूर्वी ते इतक्या लवकर विरून जायचे. फ्लोरिन पाण्यातून मिसळतात, तसाच प्रभाव पडावा म्हणून ते हवेमध्ये वरच्या बाजूला या रसायनांची फवारणी करत आहेत.

(याच्यावर खरेतर हसू येत होते पण तिला टर उडवल्यासारखे वाटू नये म्हणून प्रयत्नपूर्वक कंट्रोल केले)

मी - मला वाटते कि या उगीच उठवलेल्या वावड्या आहेत आणि कदाचित ते खर्या नसाव्यात.

ऍलेक्स - अरे, खरंय ते. ते इतक्या वेगाने पृथ्वीला प्रदूषित करत आहेत. हे सगळे आपल्याला कळू नये अशी त्यांची इच्छा आहे. पैसे कमवण्यासाठी नको तेवढा कार्बन डाय ऑक्साईड वातावरणात सोडत आहेत आणि आणखी कार्बन समुद्रातुन उपसतायेत. तुला माहीतच असेल महासागर कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात, परंतु आपण तो एवढ्या मोठ्या प्रमाणात तयार करीत आहोत की महासागरात तो परत शोषला जाईतोपर्यंत हजारो वर्ष लागतील.

मी - कार्बन डायऑक्साइडच्या वारेमाप उत्सर्जनाबद्दल च्या तुझ्याशी सहमत. हे चुकीचे आहे आहे आणि त्याबद्दल कोणीही फार काही करत नाही हेही. पण बाटलीतलं भूत बाहेर पडलं आहे. आपण विकसनशील राष्ट्रांना 'जरा दमानं घ्या, जास्त प्रगती करून नका' म्हणून सांगू शकत नाही. विशेषत: जेव्हा औद्योगिक राष्ट्रे जगावर वर्चस्व गाजवतात हे जगन्मान्य असताना. एक कमकुवत राष्ट्र बनण्याची आणि महासत्तेचा आश्रित होण्याची कोणाची इच्छा असेल? सगळी विकसित राष्ट्रे हवामान बदल परिषदांसाठी भेटतात आणि त्याबद्दल काहीही करत नाहीत. कार्बन क्रेडिट सिस्टिम चांगली होती. कार्बन उत्पादक राष्ट्रांना ज्यांच्याकडे जंगले आहेत त्यांना पैसे द्यावे लागायचे. पण त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना मला दिसत नाही. मग हे सगळे कसे थांबणार? बरं राष्ट्र सोड, तू मला सांग, आपण याबद्दल काय करतो? तू काय करतेस?

ऍलेक्स - मी काय करते? मी चंगळवादाला विरोध करते. आधीच खूप काही उपलब्ध आहे, आपण ते अधिक बनवण्याऐवजी त्याचा पुनर्वापर करू शकतो. उदाहरणार्थ, मी सेकंड हँड कपडे विकत घेते. ब्रसेल्समध्ये एक दुकान आहे जिथेआपण वापरलेले कपडे खरेदी करू शकतो. मला नवीन परवडत नाही असे नाही. पण जर आपण सर्वांनी वापरलेल्या वस्तू खरेदी केल्या तर आपण उत्पादन कमी करू शकतो. जेवढी मागणी कमी असेल, तेवढे संसाधनांचे आणि अविकसित देशांतील लोकांचे शोषण कमी होईल. आणखी सांगायचे तर एका विमानामुळे भारंभार कार्बन डायऑक्साईड तयार होतो. त्यामुळे मला विमानाने प्रवास करणं पसंत नाही. मी सहसा रस्त्याने लिफ्ट मागता मागता प्रवास करते.

मी - भारीच रे. तुझे विचार चांगले आहेत. मला यावर असे वाटते की, जेव्हा लोक अविकसित देशांमध्ये बनविलेले कपडे खरेदी करतात, तेव्हा ते त्यांच्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारे पाठिंबा देत असतात. शोषणाबद्दल मलाही कळवळ आहे, पण उपाशी राहण्यापेक्षा काहीतरी पदरी पडणे चांगले, असे मला वाटते. पोटापाण्याचा प्रश्न सुटला तर हळूहळू हे लोक गरिबीतून वर जातील.
आणि हिच-हायकिंग..? तुझ्यासारख्या मुलीसाठी प्रवास करणं सोपं आहे.. :) परदेशातल्या आमच्यासारख्या मुलांचं काय? आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे, चेन रिऍक्शन सुरू झाली आहे. जर याचा सगळ्याचा शेवट प्रलयात असेल, तर ते होईल. मला वाटत नाही की कोणीही हे थांबवू शकेल.

ऍलेक्स - आम्ही थांबवू. बघत राहा.. दिसेल तुम्हाला. (हसून) सध्या तरी मी माझ्या उद्याच्या फ्रेंचच्या पेपरचा अभ्यास करते.

आणि मग तिच्या नोट्स वाचायला तिने वहीत डोके घातले. मी तिचे विस्कटलेले केस, त्यातले दागिने, ते रंगीबेरंगी मणी निरखून पाहिले. मनात विचार आला कि स्वतःहून जग बदलण्याबद्दल ही जितकी आशावादी आहे तितकीच आशावादी कॉलेजनंतर राहील की तिचा भ्रमनिरास होईल? ही मुलगी म्हणजे माझ्या आधीच्या विचारांची झलक असल्यासारखं होतं. माझ्यातही होता आदर्शवादी हिप्पी, आता आम्ही रहाटगाड्याचे चाक. कदाचित वय वाढते तसे ऍलेक्सच्या फ्लोरिनचा माणसाच्या बुद्धीवर जास्त परिणाम होत असावा.

विमानतळाबाहेर एकमेकांना बाय करून आम्ही आपापला मार्ग धरला. एक खूप छान संवाद झाल्याचे समाधान होते. हिप्पी नावाचा प्राणी जवळून पाहिल्याचेही. आणि हा एक शेवटपर्यंत आठवणीत राहणारा प्रसंग आहे याची जाणीव देखील.



इंग्रजी कोरावरचे माझे उत्तर.

रोझबड म्हणजे काय हे सांगून मी तुमची मजा घालवत नाही. तुम्ही सिटीझन केन पाहिला नसेल तर नक्की पहा. रोझबडचा अर्थ कळल्यावर डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत.

टिप्पण्या

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

सर्वात आनंदी देश : फिनलंड.. पण खरचका?

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक