आपल्या आयुष्यात कोणत्या 10 गोष्टी आपण थांबवल्या आहेत




आपल्या आयुष्यात कोणत्या 10 गोष्टी आपण थांबवल्या आहेत?

प्रश्न चांगला आहे. खरेतर १० पेक्षा जास्तच गोष्टी थांबवल्या असतील पण प्रश्नचा मान राखून १० गोष्टी आठवून लिहितो.

१. तुलना करणं
प्रत्येकाचा मार्ग वेगळा. आज कुणाकडे काय आहे कुणाकडे काय नाही, अमक्याचा पगार एवढा माझा केवढा या तुलना आता नको वाटतात. सगळे जण आपापल्या परीने आपापले जीवन सुंदर करत आहेत हेच खूप नाही का? अब्जाधीश गुंतवणूकदार आणि तत्वज्ञ नवल रविकांत म्हणतात की तुलना करून एखाद्याबद्दल असूया आपण त्याच्या आयुष्याचा एकांगी विचार करून करतो. एखाद्याचे आयुष्य तुमच्यापेक्षा चांगले आहे आणि तुम्हाला तसे पाहिजे असेल तर त्याच्यासारखे सरसकट आयुष्य मिळालेले चालेल का? उदाहरणादाखल आज जर कुणाला रतन टाटांची संपत्ती मिळाली तर त्यांचे वार्धक्य पण घेण्याची तयारी पाहिजे. "जावे त्यांच्या वंशा" लहानपणापासून ऐकतोय, आता अनुभूती घेतोय. असूया माणसाचा स्वभावदोषच आहे, तरीपण तुलना करायची असेल तर आज आपण जसे आहोत ते कालच्यापेक्षा चांगले आहोत का नाही याची करतो. म्हणजे स्वतःशीच.

२. न्यूज बघणं
आता मी भारतीय न्यूज चॅनेल बघणे सोडून दिले आहे. ९०% चॅनेल्स बातम्या कमी आणि सर्कस जास्त दाखवतात. रोज अर्धा तास वेळ काढून युट्युब वर "NBC नाइटली न्यूज विथ लेस्टर होल्ट" या अमेरिकन बातम्या बघतो. हा कार्यक्रम मला वर्षभरापूर्वी असाच फीड मध्ये सापडला. तेव्हापासून माझ्या भारतात शांतता नांदत आहे. काळजी वाटते ती अमेरिकेतली वादळं, वणवे, अध्यक्षीय निवडणूक, ब्लॅक लाइव्स मॅटर्स, आणि गन व्हायलंस या विषयांवर. 😃

३. सभेत घाबरुन गप्प राहणं
माझे मत वाजवी असेल तर फक्त भीती वाटते म्हणून सभेत, मिटींग्स मध्ये गप्प राहणे प्रयत्नपूर्वक बंद केले आहे. आपले मत व्यवस्थित मांडता यावे यासाठी ते चांगल्या प्रकारे व्यक्त करता येण्यासाठी (articulate) नेहमीच सराव आणि अभ्यास चालू असतो.

४. एलआयसी ला गुंतवणूक समजणं
करियर च्या सुरुवातीला एलआयसी आणि एफडी च्या पुढे काही माहित नव्हते. गेल्या काही वर्षांपासून पद्धतशीरपणे वैयक्तिक वित्त (pesonal finance) या विषयाचा अभ्यास चालू केला. चक्रवाढीचा महत्वाचा काळ परत मिळणार नाही, पण एसआयपीच्या माध्यमातून चुका सुधारण्यासाठी पाऊले उचलली आहेत. जितके लवकर अभ्यास आणि अनुभव चालू होईल तेवढे चांगले हे लक्षात आले.

५. नको तिथं स्पर्धा करणं
लहानपणापासून मला सगळं यायलाच पाहिजे, सगळं करून बघायला पाहिजे असे वाटायचे. त्यातून मग आपल्या क्षमतांचा विचार न करता जीव ओतून स्पर्धा करायची किंवा मग हताश व्हायचे असे चक्र चालू. आता बऱ्याचदा गोष्टी सोडून देतो. काही क्षमता स्वतःच्या स्वतः करायच्या भानगडीत न पडता सहकारातून साध्य करायच्या असतात हेही लक्षात आले आहे.

६. व्यायामाला टाळाटाळ करणं
वय आणि अनुभव जसा वाढत आहे तसे लक्षात आले आहे कि सरतेशेवटी आरोग्य असेल तरच बाकीच्या कुठल्याही गोष्टीला अर्थ आहे. त्यामुळे ट्रेकिंग, चालणे, पळणे हे गूगल फिट या ऍप चा वापर करून नियमित केले आहे, सरासरी दोन-तीन आठवड्यातून एक ट्रेक करतो. आठवड्यातून ३ दिवस ४-५ किलोमीटर चालणे-पळणे करतो. गूगल फिट वर नोटिफिकेशन येतात आणि टार्गेट अचिव्ह झाले कि बरे वाटते. आषाढीचे अक्षत VCO जेव्हापासून वापरू लागलो तेव्हापासून व्यायामासाठी ऊर्जा पण मिळते. आधी खूपच थकवा जाणवायचा त्यामुळे व्यायाम न करण्याची सतराशेसाठ कारणे असायची.

७. इंटरनेट वर राजकीय वादविवाद करणं
याचा काही उपयोग नाही हे लक्षात आले. बऱ्याच गोष्टींबद्दल प्रत्येकाची आधीच ठरलेली मते असतात. ती बदलण्याचा प्रयत्न करणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी हे खूप आधीच समजायला हवे होते. काही वेळेला दोष ना त्यांचा असतो ना आपला. रंगआंधळ्या व्यक्तीला जसे काही रंग दिसतात हे सिद्ध करून सांगणं हे जितकं अवघड आहे, तसेच एखाद्याची राजकीय मतं बदलणं देखील. त्यात साध्य काहीही होत नाही. मागे एका उत्तरात म्हंटल्याप्रमाणे "मी काय पुरावा दिला तर तुम्ही तुमचे मत बदलाल?" या प्रश्नाचे उत्तर मी आणि ज्याच्याशी वाद घालतोय ती व्यक्ती समंजसपणे देऊ शकत नसेल, तर तो वाद तार्किक नसून भावनिक आहे असे समजून तो राडा न घालणे उत्तम हे लक्षात आले आहे. इंटरनेटवर तर अशा वादात कीबोर्ड बडवण्यात काहीच अर्थ नाही.

८. राग आलेला असताना प्रतिसाद देणं
याच्यावर अजूनही काम चालू आहे. पण राग आलेला असताना आपल्या हातातले नियंत्रण गेलेले असते आणि त्यातून गोष्टी चिघळण्याची शक्यता असते हे लक्षात आले आहे. ऑफिसच्या मिटींग्स मध्ये तरी मी हे तत्व तंतोतंत पाळतो. एखाद्याने टीका केली तर त्यावर "तुम्हाला असे का वाटते?" हा प्रश्न विचारणे आणि "या विषयावर आपण नंतर चर्चा करू" असे सांगून सवडीने त्याचा विचार करणे कधीही एकदम प्रतिक्रिया (Knee-jerk response) देण्यापेक्षा चांगले असे मत बनले आहे. त्यामुळे कधीकधी माघार घेतल्यासारखे वाटते पण ठीक आहे, आपण स्वतः कुठे सद्गुणांचे पुतळे आहोत?

९. आपल्या निर्णयांची जबाबदारी आई वडिलांवर टाकणं
आपल्या कुठल्याही परिस्थितीला आईवडिलांना जबाबदार धरण्याच्या सवयीला एक एक्सपायरी डेट असते. त्यांनी आपल्याला स्वतंत्र करून त्यांच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडलेल्या आहेत आणि आता आपण स्वतः आपल्या निर्णयांची जबाबदारी उचलायला हवी याची समज जेव्हा आली तेव्हा तक्रार करण्यामुळे, भूतकाळात अडकल्यामुळे वाया जाणारी ऊर्जा वाचायला लागली आणि वागण्याबोलण्यात एक ठामपणा देखील जाणवला.

१०. गोष्टी दैवाच्या हवाली ठेवणं
टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, आपत्कालीन निधी च्या माध्यमातून काही गोष्टींची तजवीज करणे मानसिक स्वास्थ्यासाठी छान वाटते आहे. चांगले वागले म्हणजे देव सगळे चांगले करतो हा समज ठेऊन गोष्टी वाऱ्यावर सोडणे परवडणार नाही हे समजले. "भगवान के भरोसे मत बैठना, क्या पता भगवान आपके भरोसे बैठा हो" हे वाक्य काही प्रसंगातून मनाला पटले. देवाच्या कृपेने काही गोष्टी अनायासे झाल्या तर तो बोनस समजतो. त्यामुळे स्वतःची क्षमता वाढवणे, चांगल्या आणि उपयुक्त लोकांच्या सर्कल मध्ये राहणे, सहकार्य यांना महत्व द्यायला लागलो. मुळात अंतर्मुखी स्वभाव असूनही काही गोष्टी प्रयत्नपूर्वक करतो. आणि काही गोष्टी करण्यात कंटाळा जरी केला तरी त्याची जबाबदारी माझीच असणार आहे हे देखील समजून कंटाळा करतो. त्याने निदान अपेक्षाभंगाचे दुःख तरी होणार नाही असे वाटते.

"तुमसे नाराज नही जिंदगी, हैरान हूँ मैं" हे गाणे खरोखर सुंदर आहे. अजून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. गोष्टी समजणे वेगळे आणि आचरणात आणणे वेगळे. त्यामुळे अगदी सगळ्याच गोष्टी ठरवल्याप्रमाणे आचरणात आणल्या जातात असेही नाही. पण it's okay.. हळूहळू का होईना, मजल दरमजल चालू आहे. १० वर्षांपूर्वीचा मी आणि आताचा मी यात मला आताचा मी जास्त आवडतो. कदाचित आणखी १० वर्षांनंतर त्यावेळचा मी जास्त प्रगल्भ असेल अशा दृष्टीने प्रगती व्हावी अशीच इच्छा आणि प्रयत्न आहेत.

_*_


टिप्पण्या

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

सर्वात आनंदी देश : फिनलंड.. पण खरचका?

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक