कर्म आणि दैव
मला पूजा करत बसणे, देव देव करत बसणे जास्त आवडत नाही "कर्म चांगले तर सर्व चांगले" असं माझं मत आहे. खरा देव काय हे या पूजा करणाऱ्यांना कळत नाही पण हे सांगायला गेलं की लोक मला वेड्यात काढतात. मी काय केले पाहिजे सर्व नमुने लोक भरलेत माझ्या अवती भोवती? 🙄
https://qr.ae/prGZjm
एका व्याख्यानात[1] खालील कथा ऐकली होती. या विषयाला अनुसरून आहे म्हणून सांगतो.
एकदा एक प्रख्यात डॉक्टर एका वेड्यांच्या हॉस्पिटल मध्ये जातात. हॉस्पिटल मधले सर्वात 'शहाणे' वेडे म्हणून तीन वेड्यांना त्यांच्यासमोर उभे केले जाते. या तिघांना डॉक्टर साहेब सांगतात "माझ्या प्रश्नाचे तुमच्यापैकी जो कोणी बरोबर उत्तर देईल त्याला हा आता बरा झाला आहे या सर्टिफिकेट सहित या हॉस्पिटल मधून आम्ही घरी सोडू". तिघेही वेडे कान टवकारतात.
डॉक्टर प्रश्न विचारतात - ३ गुणिले ३ किती?
पहिला वेडा - सोप्पंये ३ गुणिले ३ डाळिंब.
या तिघांना 'शहाणे' म्हणून डॉक्टरांसमोर आणणाऱ्या जुनियर डॉक्टर कडे मोठे डॉक्टर रागाने बघतात.
दुसरा वेडा - ३ गुणिले ३ बरोबर मंगळवार.
आता मात्र तिथले जुनियर डॉक्टर आणि वॉर्डबॉय दोघांच्या कपाळावर घाम जमा होतो. आता तिसरा वेडा तरी नोकरी वाचवतो का नाही या काळजीत असतानांच
तिसरा वेडा आत्मविश्वासाने हसत ९ हे उत्तर देतो.
सगळेच जरा रिलॅक्स होतात. मोठे डॉक्टर देखील खुश होतात. हारतुरे देऊन तिसऱ्या वेड्याला, नव्हे, आता शहाणा झालेल्याला हॉस्पिटल मधून घरी सोडण्यासाठी गेट वर येतात. तेव्हा मोठे डॉक्टर त्याला विचारतात, तू बरा होऊन घरी चालला याचा आनंद आहे, पण बाकीचे एवढी चुकीची उत्तरे देत असताना आत्मविश्वासाने तू बरोबर उत्तर कसेकाय दिले?
तर आनंदाने नाचत तो 'शहाणा' म्हणतो - सोप्पं होतं डॉक्टर. एकाचे उत्तर डाळिंब होतं , आणि दुसऱ्याचे मंगळवार. दोन्ही उत्तरांचा भागाकार करून मी ९ उत्तर सांगितले.
बहुतांश लोक आपापल्या आयुष्यात मार्गक्रमण करत असताना आपल्या सद्यःस्थिती पर्यंत आपण कसे पोहोचलो याची त्या ३ गुणिले ३ प्रश्नाच्या उत्तरासारखी उत्तरे तयार करतात. त्या ९ असे बरोबर उत्तर देणाऱ्या शहाण्यासारखी उत्तरे देणारे देखील असतात. त्यांना बाकीच्यांपेक्षा जास्त मान मिळतो. पण बऱ्याचदा त्यांनाही कळत असते की त्या उत्तरामागचे लॉजिक काही बिनचूक नाही. वेड्यांना आणि शहाण्यांना वेगळे करते ही जाणीव
बहुतांश जणांना प्रत्येक वेळी त्यांच्या लॉजिक नुसार अचूक उत्तर मिळेल याची खात्री नसते. मग त्या लॉजिकमधला जो अज्ञात घटक आहे, त्याला देवाच्या कृपा, किंवा अमक्या तमक्याचा आशीर्वाद अशी विशेषणे लावून काम भागवले जाते. मग आयुष्याच्या या खेळात प्रत्येक वेळी डाळिंब भागिले मंगळवारला या अज्ञाताने गुणणे आले. त्यासाठी मग देव देव करणे आले.
बरेच जण अनुभवावरून इतपत निष्कर्षापर्यंत पोचतात की काहीतरी अज्ञात घटक आहे खरा. कधी मोटारसायकल वरून जाताना नको तेवढ्या जवळून बस जाताना काळजाचा ठोका चुकलाय? मुलांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायची वेळ आलीये? ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर फ्लाईट सुटणार वाटत असताना विमानच उशिरा येणार असा मेसेज आलाय? नेहमीच्या लॉजिकनुसार आता काही खरे नाही वाटत असताना अनपेक्षित पणे घटना घडून दिलासा मिळालाय? मला वाटते तोच हा अज्ञात घटक. तिसऱ्या वेड्यासारखे आपल्या लॉजिक वर भारी आत्मविश्वास असणारे सुदैवाने कमीच असतात. हा आत्मविश्वास नसणारे त्या अज्ञात घटकाने नेहमी त्यांच्या समीकरणात एंट्री मारावी म्हणून देव देव करत बसतात असे माझे मत आहे. आणि इट्स ओके. काही जणांना जसे पाण्याची जास्तच भीती वाटते आणि काही जण मस्तपैकी डुंबतात तसेच या अज्ञाताची देखील व्यक्तिपरत्वे कमी जास्त भीती वाटते.
तुमच्या लॉजिक नुसार चांगले कर्म केले तर चांगले होते. पण हा नियम निसर्गनियम आहेका? नाही म्हणजे याच्यावर काहीतरी स्टॅटिस्टिकल डेटा असेलच ना? "खरा देव काय हे या पूजा करणाऱ्यांना कळत नाही" तुम्हाला कळलंय.. अभिनंदन. खरंच.
आणि देव देव करणाऱ्यांचा दुसऱ्याला त्रास होत नाही तोपर्यंत इट्स ओके.
इथपर्यंत उत्तर संपले. पुढचा बोनस.
मर्फीज लॉ आहे - "Anything that can go wrong will go wrong." म्हणजे "एखादी वाईट गोष्ट घडण्याची शक्यता असल्यास ती घडणार" थोडे निराशावादी वाटू शकते, पण नाहीये. याचा सरळ अर्थ असा आहे की, ज्या ज्या गोष्टीत गडबड होऊ शकते, त्या त्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहीजे. उदाहरणार्थ - मोटारसायकल वर प्रवास करायचा आहे का? बाईकची सर्व्हिसिंग नियमित करा. नेहमी हेल्मेट आणि गार्ड घाला. वाहतुकीचे नियम पाळा. टर्म इन्शुरन्स काढा. हेल्थ इन्शुरन्स काढा. जवळच्या व्यक्तीला कुठे, कशासाठी चाललोय याची कल्पना द्या.
याने काय होईल? तुमच्या प्रवासात गडबड होण्याची शक्यता कमी होईल. आणि गडबड झालीच तर त्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी तुमची आधीच तयारी असेल. काही गोष्टी नक्कीच तुमच्या हातात नाहीत, उदाहरणार्थ तुम्ही चाललेत त्या ठिकाणची रस्त्याची स्थिती, इतर वाहनचालकांचे कौशल्य. चांगली तयारी असेल त्यावेळी देवदेव करण्यासाठी तुमच्याकडे कमी कारणे असतील. पण असतीलच नाहीका?
मागे जेम्स वेब टेलिस्कोप च्या लाँच वेळी त्या प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. जॉन माथेर यांची माझ्या आवडत्या युट्युब चॅनेल वर मुलाखत [2]पाहण्यात आली. डेस्टीन ने त्यांना विचारले - "जवळ जवळ २० अब्ज डॉलर लावून तयार केलेल्या या दुर्बिणीला रॉकेट ने अवकाशात नेताना तुम्हाला भीती चिंता वाटेलच ना?" त्यावर डॉ. माथेर चक्क नाही म्हणाले. ते म्हणाले ज्या गोष्टींची चिंता वाटते त्या गोष्टींची काळजी आधीच घ्यायला पाहिजे आणि आमच्या सर्वशक्तीनिशी आम्ही ती घेतो. परत परत डिझाईन चेक करतो, सगळ्या प्रकारच्या धोके लक्षात घेऊन टेस्टिंग करतो. एवढे केल्यावरही ज्या गोष्टी आमच्या हाताबाहेर आहेत, त्याची चिंता करूनही काय उपयोग? त्याचा स्वीकार करतो.
मला हा तर्क फार आवडला. पण याचीही जाणीव आहे की आयुष्यात प्रत्येक वेळेला ' संपूर्ण तयारी ' या मृगजळामागे धावण्याची खोड वाईट. बऱ्याचदा काही गोष्टी परिपूर्ण नसताना ' घ्या देवाचे नाव ' म्हणून पुढे जावे लागते. अशावेळी देव आठवतोच. मग देवदेव करणाऱ्यामध्ये आणि माझ्यामध्ये कशाला भेदभाव?
नास्तिक आणि अज्ञेयवादी यांच्यामध्ये काय फरक आहे? चे आशिष शेटे यांनी दिलेले उत्तर
चित्र AI टूल[3] वापरून निर्माण केलेले आहे. हा काय प्रकार आहे वाचायचे असल्यास -
जगातील कोणत्या तंत्रज्ञानाचं तुम्हाला खूप आश्चर्य वाटतं? चे आशिष शेटे यांनी दिलेले उत्तर
तळटीपा
[1] https://www.youtube.com/watch?v=9jv4hIsNR1k
[2] https://youtu.be/4P8fKd0IVOs?t=1525
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्रायासाठी अनेक आभार!