एका तेलियाने




मी मागच्याच आठवड्यात "एका तेलियाने" हे गिरीश कुबेरांचे पुस्तक वाचले. सौदी अरेबिया, व्हेनेझुएला, लिबिया, कुवेत, इराण इत्यादी तेलउत्पादक देशांचा २० व्या शतकातला संक्षिप्त इतिहास वाचायला आवडणार असेल तर तुमच्यासाठी हे चांगले पुस्तक आहे.


पश्चिम आशियातल्या मागास टोळीवाल्या देशांमध्ये विसाव्या शतकातच्या सुरुवातीला खनिज तेल मिळाल्यानंतर तिथले झालेले बदल; अमेरिका, ब्रिटन, फ्रांस, सोविएट रशिया या तात्कालीन बड्या राष्ट्रांमध्ये या नवीन संपत्तीवर वर्चस्व मिळवण्यासाठी चालू असलेली रस्सीखेच; इस्राएल, पॅलेस्टिन, इजिप्त, लिबिया, सीरिया यांचा या खेळामध्ये केला गेलेला वापर, युद्ध, तह, हेरगिरी; ते तेल विकून मिळालेल्या अमर्याद संपत्तीचा उपभोग घेणारे शेख यांच्या अजब कहाण्या या पुस्तकात आहेत.

पुस्तकाचा आवाका मोठा असला तरी त्यात क्लिष्टता नाही वाटली. आणि या पुस्तकाची सर्वात आवडलेली बाब म्हणजे या सर्व घटनांना एक हिरो देखील आहे. सौदी अरेबियाचा तेलमंत्री म्हणून कारकीर्द गाजवलेले झाकी यामानी हे या पुस्तकाचे नायक. अरब तेलावर पोसलेल्या पाश्चात्य विकसित देशांच्या तेल कंपन्यांना त्यांच्याच पद्धतीने वठणीवर आणणारे, काही काळासाठी OPEC चा चेहरा बनलेले यामानी त्यांना केंद्रस्थानी ठेवून हा घटनाक्रम समोर येतो. त्यामुळे पुस्तक एखाद्या डॉक्युमेंट्री सारखे न वाटता सिनेमासारखे वाटायला लागते.



मला खनिज तेलाबद्दल विशेष कुतूहल आहे. माझ्या करियरचा पहिला प्रोजेक्टच तेल विहिरींच्या व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेयर संदर्भात होता. त्यानंतर एक प्रकल्प तेल वाहतूक करणाऱ्या जहाजांचा, आणि अलीकडे अमेरिकेतल्या तेलविहिरी त्रिमितीय मॅपिंग दाखवण्याच्या सॉफ्टवेयर निर्मितीवर काम केले होते. त्यामुळे पुस्तक वाचताना विशेष गोडी वाटली.

जगाच्या राजकारणावर खनिज तेलाने केले तेवढे खोल परिणाम क्वचितच कुठल्या इतर वस्तूने केले असतील. अशा विषयावर असे सुरस पुस्तक लिहीणार्या गिरीश कुबेरांना धन्यवाद द्यावेसे वाटले.

विषयाचा आवाका लक्षात घेता काही ठिकाणी काळाचे संदर्भ मागे पुढे होतात. नक्की कुठल्या वर्षाबद्दल माहिती वाचतोय याचा संभ्रम होतो. एवढी एक त्रुटी सोडली तर पुस्तक खूप छान आहे. झाकी यामानी आणि सौदीचे राजे फैजल यांसारखे द्रष्टे संयमी नेतृत्व ज्या राष्ट्रांना लाभले नाही त्यांना खनिज तेलाची समृद्धी कशी चकवा देऊन गेली हे व्हेनेझुएला, इराक, लिबिया, सीरिया यांच्या उदाहरणावरून दिसते. आणि अमिराती, ओमान, सौदी सारख्या राष्ट्रांनी केलेली नेत्रदीपक प्रगती म्हणजे साधीसरळ गोष्ट नव्हती याची जाणीव देखील होते. १९७५ साली व्हिएन्ना मधला OPEC च्या तेलमंत्र्यांचे अपहरणाचा कट, ऑइल एम्बार्गो या घटनांची प्रकरणे विशेष रोमांचक झाली आहेत.

पुण्यातल्या फिरत्या वाचनालयाचे संचालक अभिजित निकम यांनी नेहमीप्रमाणेच हे अप्रतिम पुस्तक सुचवले. त्याबद्दल आणि अलीकडे वाचलेल्या आणि मला आवडलेल्या पुस्तकांबद्दल आधी इथे लिहिले आहे.


तुम्ही सध्या कोणते पुस्तक वाचत आहात?


सध्या कोणते पुस्तक वाचत आहात आणि ते कसे आहे?

_*_
कोरा वरचे उत्तर - https://qr.ae/prSFE2

टिप्पण्या

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

सर्वात आनंदी देश : फिनलंड.. पण खरचका?

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक