लोक उदरनिर्वाहासाठी व्हिडिओ गेम खेळून पैसे कसे कमवतात?
लोक उदरनिर्वाहासाठी व्हिडिओ गेम खेळून पैसे कसे कमवतात?
प्रत्येक क्षेत्रामध्ये गुणवत्तेची, कौशल्याची आणि त्यातून होणाऱ्या अर्थार्जनाची उतरंड असते. ज्यांचे कौशल्य जास्त, संधी जास्त, नशीब बलवत्तर असे लोक या पिरॅमिड च्या वरच्या भागात असतात आणि ज्यांच्याकडे या गोष्टी कमी प्रमाणात असतात तसे तसे हे लोक या पिरॅमिड च्या खालच्या भागात असतात जिथे कौशल्य, संधी, नशीबाची साथ यापैकी काहीतरी कमतरता असते आणि त्यामुळे पैसे देखील कमी असतात.
क्रिकेटचे उदाहरण घेतले तर काही शे आयपीएल लेवल चे क्रिकेटर सोडले तर क्रिकेट खेळून उदरनिर्वाह चालवतोय असे आपल्या आजूबाजूला कमीच लोक दिसतील. तसेच गेमिंग चे देखील आहे. आधुनिक युगात व्यावसायिक गेमर बनून पैसे कमावणे अगदीच अशक्य नाही. तरी ते एक करियर ऑप्शन होऊ शकते का याबाबत मलातरी शंकाच आहेत.
मला वाटते अगदी कुमार वयात करियर निवडताना आवडी बरॊबरच आपण त्या क्षेत्रातील हजारावी, दहा हजारावी, एक लाखावी, दहा लाखावी कुशल व्यक्ती जर झालो तर आपल्याला त्यातून किती अर्थार्जन करता येईल याचा विचार व्हावा.
उदाहरणार्थ कुणी अभिनय हा करियर पर्याय म्हणून विचार करत असेल तर पहिल्या दहा अभिनेत्यामध्ये नंबर लावला तर प्रसिद्धी आणि पैसे मुबलक असतील. पण हेच पैसा आणि प्रसिद्धीचे प्रमाण पहिल्या १००-२०० अभिनेत्यांनंतर अगदीच नगण्य व्हायला लागेल. या उतरंडीत १ लाख किंवा दहा लाखावे असाल तर गल्ली बोळात जादूचे प्रयोग करून जेमतेम हातातोंडाची गाठ पडू शकते.
पण हेच जर तुम्ही दुकानदार, सॉफ्टवेयर इंजिनीयर अशा प्रकारचे करियर निवडले तर पहिले दहा जगातील प्रसिद्ध आणि श्रीमंत तर असतीलच पण ते नाही झाले आणि दहा लाखवे जरी असाल तरी महिन्याकाठी लाखभर रुपये कमावणारे कोडर किंवा गल्लीत दुकानदार तरी असाल. वर वीकेंड ला हौशी रंगभूमीवर अभिनयाची हौस पण भागवत असणार.
तर अशा प्रकारे क्रिकेट, गेम, अभिनय अशा वलयांकित करीयरच्या पूर्ण वेळ मागे लागण्यापूर्वी पोटापाण्याची कला शिकून त्यातून अर्थार्जन करायला शिकावे असे माझे मत आहे.
तरी आता थोडा दुसऱ्या बाजूने विचार.
नवीन तंत्रज्ञानामुळे गेमिंग हा बऱ्याच असंबधित क्षेत्रांना जोडणारा दुआ ठरू शकतो. उदाहरणार्थ एखाद्या कामाचे प्रशिक्षण देणारे सिम्युलेटर्स, फ्लाईट कंट्रोलर्स, ड्रोन ऑपरेटर्स इत्यादी. यासंबंधित खालील लेख जरूर वाचावा. घटना अमेरिकेतली असली तरी तो ट्रेंड भारतात यायला जास्त वेळ नाही लागणार. https://www.westernjag.com/2023/06/GamersToControlPlanes.html
----
चित्र: pixabay.com वरून साभार.
मूळ कोरा उत्तर - https://qr.ae/pyMK1Q
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्रायासाठी अनेक आभार!