श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव..
लहानपणी, म्हणजे साधारण सातवी आठवीत असताना रविवार सकाळी हि धून ऐकून जाग यायची. जुन्या लोकांसाठी बी आर चोप्रांचे "महाभारत" आणि रामानंद सागर यांचे "श्रीकृष्ण" याच्यात कोण भारी याच्यावर चर्चा, आणि माझ्यासारख्या पिटुकल्यांना स्पेशल इफेक्ट युक्त छान छान गोष्टी. हे श्रीकृष्ण तसे चांगलेच होते, पण मध्ये मध्ये रामानंद सागर येवून नुसतेच बोलायचे, कधी कधी अर्धा तास बोलायचे, लय बोर व्हायचे मग. याची आठवण का यावी मधेच.. तर झाले असे कि मागे काही दिवसांपूर्वी कुठल्यातरी वाहिनीवर परत हि धून ऐकली आणि म्हटले पाहू तरी आता कसे वाटते श्रीकृष्ण बघून. अवतार आणि मेट्रिक्स सारखे सिनेमे बघायची सवय झालेल्या डोळ्यांना त्या लो बजेट स्पेशल इफेक्ट ची मजा काय कळणार आता? तरीही कुठल्या तरी गोष्टीनी खिळवून ठेवले. अर्धा तास अगदी ब्रेक सकट तो भाग पाहिला. तो भाग होता कालयवन वधाचा. अगदी वरवर गोष्टच सांगायची म्हटली तर.. जरासंध कृष्णाच्या हात धुवून मागे लागलेला. तशात तो कालयवन नावाच्या दुष्ट राजाची मदत घेतो. हा कालयवन महापराक्रमी, साक्षात कृष्णाला पण सळो कि पळो करून सोडतो. कृष्ण पण हुशार माणूस, तो त्याला ...