द ब्रीज ऑन द रिवर क्वाय: आत्मघातकी वेडाची कथा
' कर्नल बोगी मार्च ' ही शीळ न ऐकलेला विरळाच असेल. आता नावाने कदाचित लक्षात नाही येणार, पण ऐकले तर मी कशाबद्दल बोलतोय हे लगेच समजेल. लष्कर आणि परेड यांचा अविभाज्य भाग बनलेली ही शीळ आहे याच सिनेमातली [३]. ह्या पिक्चर बद्दल लिहिणे हि मोठीच जबाबदारी आहे, मोठे समीक्षकच करू जाणे. पण आधीच कुठेतरी म्हटल्याप्रमाणे, "दिवसा प्रचंड सूर्य तळपतोय म्हणून काजव्याने आपली चमकवणे सोडून द्यावे का?"असो.. या पिच्चर चे सिनेमाच्या इतिहासात एक स्वतंत्र स्थान आहे. निर्मितीमूल्य, मनोहारी छायाचित्रण, बांधून ठेवणारी कथा, विषयाची तटस्थ आणि सगळे पैलू तितक्याच ताकदीने मांडणारी हाताळणी, तर्क आणि अभिनय या सगळ्या आघाड्यांवर हा सिनेमा मापदंड ठरलाय. आमच्या बँगलोर [१] मध्ये मी राहायचो तिथे, इंटरनेट वाल्याने पिक्चर, सिरीज, गेम्स, सोफ्टवेअर आणि बरेच 'किडूक मिडूक' याचा खंडीभर मोठा संचय करून ठेवला होता. त्याच्यात नाही नाही ते सिनेमे मिळायचे. असेच एका आळसावलेल्या सप्ताहांतात खिडकीतून बाहेरच्या टळटळीत दुपारीकडे बघत असता मला या सिनेमाची आठवण झाली. लागलीच या संचयातून तो काढला आणि बघितला. ...