भांडवलवादाच्या आयचा घो? -१
इंजिनियरिंग च्या दुसऱ्या वर्षाला असताना मी यु./एम.पी.एस.सी. च्या साप्ताहिक क्लासला जायचो. अगदीच ठरवून नव्हता लावलेला क्लास. आमच्या एस.आर्.पी.एफ. चे तत्कालीन सहृदय आणि कर्तव्यदक्ष समादेशक व्ही. लक्ष्मीनारायण[१] यांनी राबवलेल्या अनेक समाजोपयोगी योजनांपैकी हा एक उपक्रम होता. इतिहास, समाजशास्त्र, भूगोल असल्या कुचकामी[२] विषयांची आवड भागवून घेत होतो. लक्ष्मीनारायण सरांनी कॅप्टन कोल्हटकर (यांची पुण्यात अकॅडमी आहे) त्यांची मनधरणी करून त्यांची आणि त्यांच्या शिष्यांची दर सप्ताहांताला येण्याजाण्याची व्यवस्था केली होती. ते आम्हाला स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन करायचे, अभ्यास घ्यायचे, मॉक टेस्ट असायच्या. वेळ अगदी मजेत जात असे. आमचा ७-८ जणांचा नियमित उपस्थिती असलेला ग्रुप होता. बऱ्याचदा कोल्हटकर सरांचे शिष्यच यायचे शिकवायला. पण स्वत: कोल्हटकर सर् आले की आणखी मजा. सत्तरीतले सर त्यांच्या तरूणपणाच्या गोष्टी उत्साहाने सांगायचे. शाळेत ते अभ्यासात मागे होते आणि वडलांनी अपमानित केल्यावर कसे पेटले आणि कुत्र्यासारखा अभ्यास करून एम.ए. झाले आणि आर्मीत जॉईन झाले, वगैरे वगैरे. (कुत्र्यासारखा अभ्यास कसा करतात देव जाणे, त्यांच्या तोंडून हे वाक्य किमान दहा वेळा ऐकले असेल, पण ती अभ्यासाची इंटेन्सिटी जाणवायची बाकी :))
कोल्हटकर सर मुद्दाम कधीतरी आम्हाला ऑफिसर्स मेस मध्ये घेवून गेले. ती ऑफिसर्स मेस आम्ही रोजच पहायचो पण आत काय असेल याची कुणालाच कल्पना नव्हती. एक दिवाणखाना, भिंतीला चितळाची शिंगे, चकाचक फर्निचर, ऑर्डरली इकडून तिकडे फिरतायेत आणि सर् त्यांना सगळ्यांसाठी चहा आणायला सांगतायेत. आम्ही जरा भेदरूनच बसलो होतो. त्यांना आम्हाला ऑफिसर्स चा थाट दाखवायचा होता. आर्मी मध्ये कसे ऑफिसर्स ची ठेप ठेवली जाते, दिमतीला ऑर्डरली असतात हे सांगायचे होते. ते म्हणाले कि तुम्ही खिशाला चाट पडली तरी महाग हॉटेल्स मध्ये जावून बघा. तिथलं वातावरण अनुभवा. तिथे गेल्यावर तुम्हाला ते आवडले तर तुम्ही ते मिळवण्यासठी प्रामाणिक प्रयत्न कराल. तिथले सोफिस्टीकेशन तुम्हाला हवेहवेसे वाटेल ते तुम्ही अंगी बाणवण्याची कास धराल. मला माहीत नाही त्यांच्या पध्दती किती बरोबर होत्या, पण मला ते खूप भावले.
एकदा समाजवाद विषयावर सरांची एक शिष्या अभ्यास घेत होती. त्यावेळी मी तिला विचारले कि समाजवाद(Socialism)आणि साम्यवाद (Communism) यात फरक आहे का? खरेतर त्यात फरक आहे हे मला थोडेफार माहिती होते, पण इम्प्रेस करायचा चान्स का सोडवा, म्हणून लगेहात विचारले तिला. मला या शब्दांचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. भांडवलवादाचे (Capitalism) जगात निर्विवाद प्राबल्य का? समाजवाद एवढा चांगला असताना घोड्यानं कुठं पेंड खाल्ली? सोविएट युनियन चे तुकडे का झाले? चीन खरच साम्यवादी आहे का? विचारवंताना अपेक्षित असलेला आदर्श समाज तिथे खरेच निर्माण झालाय का?
आज जगाची परिस्थिती पाहता, आपण नक्कीच आदर्श स्थितीत आहोत असे कुणाला वाटेल याची शंका वाटते. पण मनुष्यजातीने इतिहासात आदर्श समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी खरोखर महान प्रयत्न केले ही एक समाधानाची बाब म्हणता येईल. समाजवाद आणि साम्यवाद ही एक कृत्रिम व्यवस्था आहे. प्राण्यांची मूळ वृत्ती पाहता, आजचा भांडवलवाद हाच खरेतर नैसर्गिक वाटतो. स्पर्धा करणे, एकमेकांवर मात करण्यासाठी डावपेच लावणे, सत्ता गाजवणे, दुबळ्यांना गुलाम बनवणे हि मनुष्यप्राण्याची मूळ प्रवृत्ती. इतिहासात ती ठाई ठाई दिसते. पण विसावे शतक या मूळ प्रवृत्तीला मुसक्या बांधून माणसाने एक नवीन व्यवस्था निर्माण केली आणि जवळ जवळ शतक भर चालवली यासाठी नेहमीच वेगळे गणले जाईल.
-*-
१. व्ही. लक्ष्मीनारायण हे हिंदी सिनेमातल्या काल्पनिक नायकांपेक्षा हिरॉईक आणि तरीही वास्तविक पात्र आहे. सध्या कर्नाटक, आंध्रातल्या खाणमाफियांचे-राजकारण्यांचे नेटवर्क उद्धवस्त करतायेत.
मागच्या महिन्यात मध्य प्रदेशमध्ये एका आय.पी.एस. चा खाण माफियांनी घेतलेला बळी पाहून त्यांचे कार्य किती जोखमीचे आहे हे दिसते. त्यांच्याविषयी काही दिवसांपूर्वी सकाळ मध्ये आलेला हा लेख-
http://www.esakal.com/esakal/20120212/5409910696013669020.htm
आणि खाली माझी प्रतिक्रिया.
२. इंजिनियरिंग च्या सोडा, इतर कुणीही हे विषय अभ्यासणे म्हणजे वेळेचा अपव्यय. यु./एम.पी.एस.सी. ला हे विषय लागतात एवढेच यांचे शालेय जीवनात महत्व.
चित्र सकाळ मधून.
आज लक्ष्मीनारायण सर पुण्यात आले होते. कुंदेन सरांबरोबर त्यांचा फोटो पाहिला. आणि त्यांच्याबद्दल लिहिलेली ही कमेंट आठवली
उत्तर द्याहटवालक्ष्मीनारायण पुण्याच्या SRPF ग्रुप १ चे समादेशक होते तेव्हा मला त्यांचे कार्य जवळून बघण्याचे भाग्य लाभले. पोलिसांच्या मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अभ्यासिका सुरु केली आणि मागतील तेवढी पुस्तके उपलब्ध करून दिली. जुने ग्रंथालय परत सुरु केले आणि आणि प्रक्रिया खुप सुलभ केली. तरुणांसाठी MPSC, UPSC चे वर्ग, शिष्यवृत्ती चालू केली. ग्रुप भोवतीच्या टेकड्याभोवती वृक्षारोपण करून घेतले. मुलांमध्ये ते मिसळायचे. त्यांना पाहून वाटायचे की एक माणूस पूर्ण व्यवस्था नक्कीच बदलवू शकतो. cntnd ..
पोलिसांसाठी वसाहत प्रकल्प चालू केला. त्यांना मराठी उत्तम येते. आमच्यासाठी ते हिरोच होते. कारण त्यांच्या बदलीच्या कथा आम्ही ऐकल्या होत्या. राजकारण्यांचे त्यांनी कसे धाबे दणाणून सोडले होते हे ऐकून होतो. ते स्वत: फिट आहेत आणि सर्व स्टाफ तसाच असावा याच्याकडे कटाक्ष असायचा. त्यामुळे माझ्या वडिलांप्रमाणेच सगळ्यांना थोडा जाचच वाटायचा. पण मनोमन असा कर्तव्यदक्ष अधिकारी मिळाल्याचे सर्वांना कौतुकाच होते.त्यांच्या या सहवासाचा परिणाम कि काय आज पोलिसांची पोरं आम्ही बरेचसे इंजिनियर, डॉक्टर झालो.cntd ..
बरेच परदेशी स्थायिक झालेत. काही स्पर्धा परीक्षांत चमकले. त्यांचे आमच्यात असणेच लाख नीतिमत्तेच्या पुस्तकी शब्दांपेक्षा श्रेष्ठ होते. त्यांच्या कामाची यादी मोठी आहे. वडिलांच्या तोंडून त्यांच्याबद्दल नेहमी गौरावोद्गारच ऐकतो. आपल्या देशाची सद्यस्थिती ज्याला आपण सोयीसाठी सिस्टीम म्हणू, आणि अराजक यांच्यामध्ये अशा कर्तबगार अधिकाऱ्यांची फौज आहे.