देअर गोज माय फॉर्चूनर
युरेका! युरेका! माझा देश ऑलिम्पिक मध्ये पदकं का मिळवत नाही, गेल्या शतकभरात आपल्याला हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच नोबेल का मिळाले? याचे उत्तर मला समजले. म्हणजे माहीत होते, पण आता अनुभवामुळे समजले. आज एकदम पिच्चर सोडून हा विषय का? का? मी काय फक्त ताडोबा, दांडेली, हम्पी अशा उनाडक्याच करत हिंडतो का? म्हणजे घरात काही लक्षच नाही माझे? मी काय जबाबदारी घेतच नाही का? म्हणजे असेलही खरे.. पण म्हणून सुरुवातच करायची नाही हे कुणी सांगितलंय. तर अशाच माझ्या उडाणटप्पू स्वातंत्र्यावर टपलेल्या कुटुंबियांच्या दबावापुढे झुकून मी म्हटले की आता आपण फमिली म्याटर्स मध्ये लक्ष घालायला हवे. आणि वॉर्म अप म्हणून डायरेक्ट कोर्ट कचेऱ्यांचा मार्ग निवडला. झाले असे की इतर तमाम मराठ्यांच्या घरामध्ये असतो तसा आमच्याकडे पण एक जमिनीचा वाद चालू आहे. त्यातल्या त्यात एक गोष्ट चांगली की माझे काका, वडील एकत्रपणे या गोष्टी बघत होते आणि वंशपरंपरेने तो आता आमच्या पिढीकडे सोपवण्यात आलाय. हा वाद कुठला, कोणाचा, त्यात चूक कोणाची हे सर्व सांगणे हे या पोस्टच्या आणि माझ्या कुवतीबाहेरचे काम आहे. तर, माझा मोठा चुलत भावाने जेव्हापासून ...