पाश्चात्य मालिकांचे अनोखे विश्व - २
भाग १ लिहून काही वर्षे झाली. त्यानंतर पाहिलेल्या या मालिका. (प्रथम संस्करण १२-११-२०१७) वेस्टवर्ल्ड २०१६ मध्ये एचबीओ वर ही मालिका सुरु झाली. प्रत्येक सीझन मध्ये १० भाग असलेल्या या मालिकेचे आतापर्यंत २ सीझन झाले आहेत. तर काय आहे वेस्टवर्ल्ड? वेस्ट वर्ल्ड हे भविष्यातले एक थीम पार्क आहे. हजारो एकर मध्ये इथे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातली दक्षिण-पश्चिम अमेरिका उभी केलीये. या थीम पार्क मधली पात्रे खरी खुरी माणसे नसून अतिप्रगत रोबॉट्स आहेत. या यंत्रमानवांना असे काही बनवण्यात आलय की ते हुबेहूब माणसांसारखी झालीयेत. त्यांना वेदना होतात, आनंद होतो, झोप येते, ते स्वप्न पाहतात, त्यांना तहान भूक लागते, वार केला तर ते मरतात देखील. त्यात कुणी सैनिक आहेत, कुणी काऊबॉय, कुणी खुनी दरोडेखोर तर कुणी नगर रक्षक. कुणी वेश्या आहेत तर कुणी चांगल्या घरच्या सुसंस्कृत मुली. माणसे तर सोडाच साप, घोडे, कुत्रे हे प्राणी देखील यंत्रच. या सर्वांच्या अस्तित्वाचे एकच कारण - त्या पार्क मध्ये येणाऱ्या पर्यटकांचे मनोरंजन करणे. या यंत्रमानवांना स्वतः विचार करण्याची निर्णय घेण्याची मुभा आहे. पर्यटकांना जिवंत अनुभव ...