मै और मेरी तन्हाई
हा लेख मराठी Quora.Com वर खालील प्रश्नाच्या उत्तरादाखल लिहिला होता. जमून आल्यामुळे इथे ब्लॉग वर सुद्धा पोस्ट करत आहे. तुम्हाला जेव्हा एकट एकट वाटते तेव्हा तुम्ही काय करता? या प्रश्नावर बाकीची उत्तरे बघितली पण तितकीशी पटली नाहीत. "एकटे असणे" आणि "एकटे वाटणे" यात गफलत झालेली दिसते. काही लोकांना एकांत आवडतो आणि काहींना माणसांची वर्दळ. पण दोन्ही प्रकारच्या लोकांना माणसांचा सहवास लागतोच. एकटे असणे म्हणजे आजूबाजूला सहवासासाठी कोणीच नसणे. पण अगदी माणसांच्या गर्दीत देखील एकटे "वाटू" शकते. ही भावना खरेच वेदनादायी असते. आपल्यासाठी कोणाकडे वेळ नाही, आपल्याला कोणीही समजून घेत नाही अथवा घेऊ शकत नाही ही भावना कधीही निर्माण होऊ शकते. माझ्या अनुभवाप्रमाणे अशी भावना निर्माण होते त्यावेळी दोन शक्यता असू शकतात. एक म्हणजे खरोखर तुम्ही एकटे पडला आहात. म्हणजे नातेवाईक, मित्र यांच्यापासून दुरावा निर्माण झाला आहे. दुसरी शक्यता म्हणजे ही मनाची एक तात्पुरती अवस्था आहे. लहान असताना या तात्पुरत्या अवस्थेचा खूप त्रास व्हायचा. मित्र, भावंडं, कुटुंबीय सर्व जण असूनही मल...