आली एकदाची..
काल बँगलोर च्या मेट्रो ने प्रवास केला. प्रवास केला म्हणजे, एका स्टेशन वरून चढलो, दोन स्टेशन सोडून उतरलो, आणि परत विरुद्ध बाजूने चढून प्रारंभीच्या स्टेशन वर आलो. थोडक्यात गाडी गाडी खेळलो. गेली पाच वर्षे जिची बंगळूरकर आतुरतेने वाट पाहत होते तिचा पहिला टप्पा सुरु झाला या आठवड्यात; आणि लोकांनी आपली लाडकी मेट्रो बघायला रजनीकांतच्या सिनेमाला होते तशी गर्दी केली. रविवार ची सुट्टी साधून काही मंडळी सहकुटुंब या चमत्काराला पाहायला आली होती. जशी स्टेशन वर एन्ट्री घ्यायची तशी आरोळ्या आणि शिट्ट्या मारून आनंद व्यक्त करत होते. माझाही हा पहिलाच मेट्रो प्रवास होता. मी दिल्ली मेट्रो नाही अनुभवली त्यामुळे मलाहि तिचे अप्रूप होतेच. या शहराने अक्षरश: हाल सहन केले आहेत हा दिवस पाहण्यासाठी. पूर्ण बँगलोर खोदलेले, अशक्य ट्रॅफिक, प्रत्येक रस्त्यावर मेट्रोचे खांब टाकायचे काम चालू, रस्ता धुळीने माखलेला अशी अवस्था प्रत्येक मुख्य मार्गांची. अजूनही कामे चालूच आहेत. मी स्वतः अनुभवलेली गोष्ट म्हणजे ८-१० किमी जायचे असेल तरी नको नको व्हायचे. बरं इथली ट्रॅफिकच वेगळी.. हे रुंद रोड पण एकदा अडकले तर ५-५, १०-१० मिनिटे ...