गाभार्यातला देव आणि वाट पाहणारा कोहली.
आपला देश हा विविधतेनेने नटलेला आहे वगैरे वगैरे.. सर्व जातीधर्माचे, विचारसरणीचे , बहुभाषिक लोक गुण्यागोविंदाने राहतात वगैरे वगैरे.. हे असली वाक्य शाळेच्या पुस्तकांमध्ये आणि भाषणांमध्ये कितीदा ऐकली असतील? थोडीफार अक्कल आल्यापासून आपल्या शहरातून (म्हणजे बेडकाच्या विहिरीतून म्हणा हवेतर) बाहेर फिरताना लक्षात आले की भारत देश हे खतरनाक वेगळे रसायन आहे. खरच आपल्या प्रांतामध्ये कमालीचे वेगळेपण आहे. लोक बोलतात वेगळे, चालीरीती वेगळ्या, भाषा चित्र-विचित्र.. तरी हा देश एकत्र राहिला किंवा ठेवला कसा? युरोप मध्ये गेल्यावर पहिल्यांदा त्या "वाह काय शिस्त आहे, काय स्वच्छता आहे.." टिपिकल मुक्तपीठ शॉक मधून बाहेर पडल्यावर तिथल्या शहरांची आणि लोकांचा एक ठराविक साचा लक्षात आला. मला असे म्हणायचे नाही की युरोप विविध नाही. अतिशय सुंदर आणि निरनिराळ्या रंगांनी रंगलेला आहे. भाषा आणि चालीरीती खूप वेगवेगळ्या आहेत. पण म्हणूनच तो तितक्याच प्रकारच्या स्वतंत्र देशांनी बनलेला आहे. पण या देशांचा धर्म एकसारखा, मूळ स्वभाव वैशिष्ट्य सारखीच. उदा. जर्मनी ऑस्ट्रिया मध्ये अभिवादन करताना "गुटेन मोर्गेन, ...