सर्वात आनंदी देश : फिनलंड.. पण खरचका?
मी गेले काही महिने फिनलंड च्या हेलसिंकी या राजधानी शहरात आहे. गेल्या ७ वर्षांपासून फिनलंडला सर्वात आनंदी राष्ट्र म्हणून घोषित करतायेत त्यामुळे इथे येण्यापूर्वीच उत्सुकता होती. भारताचा नंबर एवढा मागे का हे मलादेखील कोडेच आहे. मागे मागे तर मागे, रशिया, पॅलेस्टाईन, युक्रेन या युद्धाने गांजलेल्या देशांपेक्षा किमान या वर्षी तरी भारताचा वरचा नंबर असावा अशी अपेक्षा होती. त्यामुळे या Happiness Index भानगडीवर किती भरोसा ठेवायचा हे समजून जाते. पहिले तर आनंद म्हणजे काय याची व्याख्या बघायला हवी. कारण जे हा आनंद निर्देशांक बनवतात, ते स्वतःच्या व्याख्येनुसार सर्वेक्षण करत असतील, तर बऱ्याच गोष्टी इकडे तिकडे होऊ शकतात. मागे इंग्रजी कोरावरच एका आफ्रिकन नागरिकाचे उत्तर वाचण्यात आले होते. जगातल्या गरीब राष्ट्रांमध्ये त्याच्या देशाचा वरचा नंबर होता. पण त्याचे म्हणणे असे होते कि त्याने त्याच्या आजोबांना एवढ्या गरीब राष्ट्रामध्ये राहून देखील कधी दुःखी पाहिले नाही. त्यांनी कधी कर्ज घेतले नाही, कधी फार आजारी पडले नाहीत, स्वतःच्या शेतात पिकेल ते खाऊन अगदी ठणठणीत आयुष्य जगले. त्यांच्यासारखे असे बरेच जण त्याच्या...