फिनलंड

मी गेले काही महिने फिनलंड च्या हेलसिंकी या राजधानी शहरात आहे. गेल्या ७ वर्षांपासून फिनलंडला सर्वात आनंदी राष्ट्र म्हणून घोषित करतायेत त्यामुळे इथे येण्यापूर्वीच उत्सुकता होती. भारताचा नंबर एवढा मागे का हे मलादेखील कोडेच आहे. मागे मागे तर मागे, रशिया, पॅलेस्टाईन, युक्रेन या युद्धाने गांजलेल्या देशांपेक्षा किमान या वर्षी तरी भारताचा वरचा नंबर असावा अशी अपेक्षा होती. असो, त्यामुळे हे Happiness Index वर किती भरोसा ठेवायचा हे समजून जाते.

पहिले तर आनंद म्हणजे काय याची व्याख्या बघायला हवी. कारण जे हा आनंद निर्देशांक बनवतात त्याच्या व्याख्येनुसार सर्वेक्षण करत असतील तरी बऱ्याच गोष्टी इकडे तिकडे होऊ शकतात.

मागे इंग्रजी कोरावरच एका आफ्रिकन नागरिकाचे उत्तर वाचण्यात आले होते. जगातल्या गरीब राष्ट्रांमध्ये त्याच्या देशाचा वरचा नंबर होता. पण त्याचे म्हणणे असे होते कि त्याने त्याच्या आजोबांना एवढ्या गरीब राष्ट्रामध्ये राहून देखील कधी दुःखी पाहिले नाही. त्यांनी कधी कर्ज घेतले नाही, कधी फार आजारी पडले नाहीत, स्वतःच्या शेतात पिकेल ते खाऊन अगदी ठणठणीत आयुष्य जगले. त्यांच्यासारखे असे बरेच जण त्याच्या आजूबाजूला होते. त्यामुळे पाश्चात्य जगाच्या व्याख्यांनुसार सगळ्या जगाचे मोजमाप नाही करता येणार.

पण तरीही, जरा एक वैचारिक प्रयोग म्हणून, एक आत्मपरीक्षण म्हणून आपण काही गोष्टींचे निरीक्षण तटस्थपणे करायला हवे.

तूर्तास या प्रश्नातल्या पहिल्या भागावर लक्ष देऊ. फिनलंड आणि भारताची एकाच वजनकाट्यात तुलना करणे खरेतर चुकीचे आहे, तरीही उत्तर अगदीच रुक्ष होऊ नये म्हणून औषधापुरती कुठेतरी तुलना केली तर हसून सोडून द्यावे.

फिनलंड सर्वात आनंदी देश का असावा हे उत्तर शोधताना मला खालील गोष्टी जाणवल्या.

१. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था

फिनलंडची लोकसंख्या आहे ५५ लाख. म्हणजे साधारण पुण्याएवढी. आणि हा देश आहे महाराष्ट्राएवढा. त्यातले १५ लाख लोक एकट्या हेलसिंकी शहरात राहतात. हेलसिंकी शहराला लागूनच एस्पू (ESPOO) आणि वांता (VANTAA) ही जोडून असेलेली शहरे आहेत. पुण्याला लागून जसे पिंपरी चिंचवड आहे तसे. या तीनही शहरांमधून अत्यंत छान अशी बस, ट्रॅम, रेल्वे आणि मेट्रो सेवा आहे. हेलसिंकीच्या बेटांना जोडणारी फेरी सेवा देखील आहे. मी प्रामुख्याने बस आणि ट्रॅम वापरतो.

अगदी काटेकोर वेळापत्रकाप्रमाणे धावणाऱ्या या सेवा एकाच तिकिटावर वापरता येतात. म्हणजे तुम्ही तिकीट काढले कि ते ८० मिनिट चालते आणि त्यात तुम्ही बस, ट्रॅम, रेल्वे, मेट्रो, बोटने प्रवास करू शकता. हेलसिंकी, एस्पू आणि वांता या शहरांचे A,B,C,D असे झोन केले आहेत. ही A,B,C,D अशी सुटसुटीत नावे पाहूनच पहिल्यांदा आनंद होतो. आपल्याकडे गेलाबाजार उड्डाणपुलांना देखील "अमुकतमुकसम्राट तात्याराव बहिरटराव तोरणमाळे" अशी कधीही न लक्षात राहणारी लांबलचक नावे देण्यामुळे कदाचित लोकांचा आनंद कमी होत असावा. ही पद्धत कशीकाय चालू झाले देव जाणे कारण तोरणा, राजगड, रायगड अशी नितान्तसुन्दर नावे देणारी हीच आपली संस्कृती. असो..

तिकिट AB, BC, ABC, ABCD, CD, BC, D अशा कॉम्बिनेशन मध्ये काढता येते. बस मध्ये कंडक्टर नसतो त्यामुळे ही तिकिटे एकतर मोबाईल ऍप किंवा व्हेंडिंग मशीन वरच काढता येतात. याने व्यवहार सुटसुटीत होतो. अधिकांश लोक रोजचा प्रवास ठरलेल्या झोन मधेच करतात त्यामुळे बाकीच्या झोन चे तिकीट काढायचा प्रसंग कधीतरीच येतो. उदाहरणार्थ मी AB झोनचे तिकीट काढतो. खरंतर महिन्याचे एकदाच काढतो. त्याला सिझन पास म्हणतात. तसे केल्याने तिकिटाचा खर्च निम्म्याहून कमी होतो. आणि ही ८० मिनिटाची मर्यादा देखील राहत नाही. कधीही, कितीही वेळ फिरा. अर्थात हेलसिंकी म्युनिसीपाल्टी ला आपल्या नागरिकांच्या रिकामटेकडेपणाविषयी खात्री असल्याशिवाय त्यांनी अशी व्यवस्था केली नसेल.

लहान मुलांना ७ वर्षापुढे हाफ तिकीट असते. एखादी महिला प्रॅम (बाबागाडी) घेऊन बाळासोबत बसमध्ये चढली तर तिला तिकीट नसते. सर्व बस लो फ्लोअर असतात. किमान दोन प्रॅम बसतील एवढी जागा आणि ज्येष्ठांसाठी ६-८ सीट राखीव असतात. ज्येष्ठ आणि मुलांसोबत असलेल्या आईला अगदी VIP सारखी वागणूक दिली जाते. ज्येष्ठ जागेवर बसल्याशिवाय बस हालत नाही. नागरिक देखील चढताना उतरताना बस चालकांना किटोस (Kiitos) म्हणून आदराने धन्यवाद देतात.

बस वेळेवर असतातच पण फ्रिक्वेन्सी देखील दणकट आहे. मला कधीही १० मिनिटांपेक्षा जास्त वाट पाहावी लागत नाही. बसचे रूट देखील संशोधन करून बनवलेत का अशी शक्यता वाटते. आणि या बसेस बऱ्यापैकी फ्रिक्वेन्सीने रात्रभर चालतात.

ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वसाहतीपर्यंत जायला सोपे पडावे म्हणून काही बसेस चे रूट हे त्या प्रकारे ठरवलेले आहेत. आणि काही स्पेशल वॅन- ज्यांना नेबरहुड बस म्हणतात, त्या देखील असतात. उदाहरणार्थ मला ७०,७१,७३,७४,७७ या बसेस चालतात. त्यातली ७१ मी टाळतो कारण ती फार फिरत जाते. तर तीन अंकी नंबर असलेल्या बसेस उदा. ७१५, ७२६ अशा सरळ महामार्गांवरून जातात. त्यामुळे ज्याला जेवढे पटकन जायचे आहे तो तशा बसेस पकडू शकतो. उपनगरांतील नागरिक मुख्य शहरात रेल्वे किंवा मेट्रोने बस पेक्षा लवकर पोहोचतात. आणि मेट्रो, रेल्वे थंडीच्या बर्फाळ काळात बससाठी चांगला पर्याय असतो.

२. मुलांचे शिक्षण

फिनलंड मध्ये उत्तम सरकारी शाळा आहेत आणि सर्व प्राथमिक शाळेपासून अगदी विद्यापीठातील पदवी पर्यंतचे शिक्षण मोफत आहे. विद्यार्थ्यांच्या राहण्याखाण्यापासून सर्व सोयींकडे अतिशय जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. त्यामुळे पालकांना मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाची चिंता नाही. पाळणाघरे देखील सरकारी आहेत आणि बाळाच्या आईला कामावर जाता यावे म्हणून दिवसभर चालू असतात. आणि आपल्यासारखे इथे अरेंज मॅरेज ची कल्पना फारशी प्रचलित नाही, त्यामुळे मुला मुलींच्या लग्नाच्या खर्चाची देखील पालक फारशी काळजी करत नाहीत. फिनलंड मध्ये २ अधिकृत भाषा आहेत फिनिश (सुओमी) आणि स्वीडिश. सगळे बोर्ड हे या दोन भाषांमध्ये आणि बऱ्याचदा इंग्रजीमध्ये देखील असतात. इंग्रजी येणाऱ्यांचे प्रमाण देखील इतर युरोपीय राष्ट्रांपेक्षा जास्त आहे. शहरातील वाचनालय हे वेगळे प्रकरण आहे. नागरिकांमध्ये वाचनसंस्कृती आहे. त्याबद्दल माझ्या चॅनल वर व्हिडीओ केला आहे.

३. कष्टकऱ्यांना मान

श्रीमंत गरीब दरी इथेही दिसते पण श्रीमंताना अतिव मान आणि गरीब कष्टकर्यांकडे दुर्लक्ष अशा गोष्टी इथे होत नाहीत. आधुनिक यंत्रसामग्री मुळे रस्ते स्वच्छ करणारे, बस, ट्राम ड्रायव्हर्स, पोलीस ते पोस्टमन पर्यंत सर्वजण आपापले काम सुरक्षितपणे करत असतात. बस, ट्राम, बुलडोझर महिला देखील चालवताना दिसतात. सरकारी कार्यालयांपासून ते सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत पुढारी, श्रीमंत यांचे अति कौतुक करण्याची इथे पद्धत नाही. निवडणुका आहेत असे सांगेपर्यंत कुणाला कळणार नाही अशा शांततेत सगळे कार्यक्रम होतात. पंतप्रधान लोकल कॅफे मध्ये किंवा रिसॉर्ट मध्ये कुटुंबासोबत दिसतात. टॅक्स जास्त आहे. पण या पैशातुन नव्या पालकांना पूर्ण पगारी रजा, नोकरी गेली तर बऱ्यापैकी भत्ता अशा सुविधा देखील आहेत.

४. मोफत वैद्यकीय सेवा

फिनलंड मधील नागरिकांना KELA कार्ड मिळते. हे वापरून कुठलीही वैद्यकीय सेवा, औषधे त्यांच्या मूळ किमतीच्या आंशिक किमतीला मिळतात. या वैद्यकीय सेवांसाठी नेहमीच मोठी वेटिंग लिस्ट असते पण तातडीच्या वेळी खाजगी हॉस्पिटल मध्ये इलाज घेतला तर ते पैसे KELA सेवेमधून पुरवले जातात.

हे सगळे असले तरी या देशात दुःखी राहण्यासाठी देखील बरीच कारणे आहेत. इथे दारूचे व्यसन असणाऱ्यांची टक्केवारी जास्त आहे, आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे, घटस्फोटांचे प्रमाण, तरुणांपेक्षा वृद्धांचे प्रमाण जास्त आहे. शिक्षक, नर्स या पेशांवर अतोनात ताण आहे. त्यामुळे आधीच कमतरता असेलल्या या क्षेत्रात मागणीपेक्षा पुरवठा खूप कमी आहे.

कुणावर अवलंबित्व नसल्याचा एक तोटा म्हणजे एकाकी पणाचे संकट आहे. नोव्हेंबर ते मार्च असे ५ महिने कमालीचा कडक हिवाळा असतो. हेलसिंकी मध्ये तापमान उणे २२ अंशापर्यंत खाली जाते. आणि आणखी उत्तरेकडे तर त्याहीपेक्षा कडक. दिवस ५-६ तासांचा होतो. सूर्य क्षितिजावरच फिरतो त्यामुळे ऊन नावालाच असते. सगळी झाडे बोडकी होतात आणि वातावरणात करडा रंग उरतो. रस्त्यावरून चालताना घसरून पडल्यामुळे इजा होण्याची बरीच जोखीम असते. मी स्वतः ५-६ वेळा आपटलो आहे. व्हिटॅमिनचे सप्लिमेंट घावेच लागतात. थंडीत वारा जर सुटला तर नको नको होते. वृद्धांची तर हिवाळ्यात वेगळीच व्यथा आहे. मला हेलसिंकीच्या विमानतळावर नाशिकचे एक जण - भाऊ पाटील भेटले. ते हेलसिंकी मध्ये शेफ म्हणून कामाला होते पण हिवाळा आला कि २-४ महिने भारतात परततात. असे का हे मला लवकरच कळले. त्यामुळे उन्हाळ्याची अगदी आतुरतेने वाट पाहिली जाते. उन्हाळ्यात सूर्यास्त व्हायला रात्रीचे दहा वाजतात.

इथे दैनंदिन किराणा जरी ठीकठाक असला तरी किंमती गेल्या काही वर्षांपासून भराभर वाढत आहेत. घरभाडे आणि घराच्या किमती देखील खूप महाग आहेत.

फिनलंड आणि शेजारी रशिया यांचे संबंध ऐतिहासिक दृष्ट्या फार चांगले नाहीत. फिनलंड हा स्वीडनच्या अधिपत्याखाली होता आणि नंतर रशियाच्या. १९१८ मध्ये रशियन राज्यक्रांतीनंतर फिनलंड स्वतंत्र झाला पण रशियाच्या विस्तारवादी धोरणांचे चटके या राष्ट्राला गेले शतकभर बसत राहिले. कधी फिनलंडच्या प्रदेशाचा लचका तोडला गेला तर कधी एक पिढी युद्धाची खंडणी भरता भरता संपली. इथल्या तरुणांना काही काळासाठी लष्करी सेवा (Conscription) बजावणे सक्तीचे आहे. कधीही युद्ध पुकारले गेले तर १८-६० वयामधील नागरिकांना सीमेवर जाणे बंधनकारक आहे. युक्रेनचे युद्ध सुरु झाल्यावर हेलसिंकीच्या सेंट्रल स्टेशन वर अजूनही फडकणारा युक्रेनचा ध्वज नागरिकांना या सत्याची आठवण करून देतो. त्यामुळे या लोकांमध्ये एक प्रकारची शिस्त दिसून येते.

माझ्या निरीक्षणातून दिसलेला असा हा फिनलंड - खरेतर हेलसिंकीच; कारण अजून बाकी ठिकाणी फिरणे झाले नाही. सर्व गोष्टी पूर्णपणे पडताळून पाहिल्या नाहीत त्यामुळे या लिखाणात काही चुका असू शकतात, चूक आढळली तर लक्षात आणून द्यावी.

आनंद हा बऱ्याचदा व्यक्तिसापेक्ष असतो. या माहितीतून फिनलंड सर्वात आंनदी का किंवा नाही याचा स्वतःहून अंदाज येईल. आपल्या भारताचा नंबर खाली असल्याचे खरेच काही कारण आहे कि गोर्यांचे संगनमत याच्यावरही थोडा विचार करायला हातभार लागेल हि आशा.

टिप्पण्या

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक