Sunday, August 4, 2013

पाश्चात्य मालिकांचे अनोखे विश्व

माझी ५०० जीबी पोर्टेबल हार्डडिस्क भरून गेली. ६०-७० पिक्चर, ढीगाने काढलेले फोटो, कधीतरी अभ्यास करू म्हणून टाकलेले ऑनलाईन ट्युटोरीयल्स, विडीयो लेक्चर्स, ई-बुक्स, मित्रांकडून जमवलेलं किडूकमिडूक, आणि माझ्या आवडत्या मालिकांचे ऋतू यांनी सगळी जागा सामावली. नवीन काही टाकायचे तर काय उडवू असा प्रश्न पडतो बऱ्याचदा. एकाच विषयावरची सतराशेसाठ ई-बुक्स ठेवून खरेतर मला कधीच उपयोग झाला नाही. सरळ सरळ कुणीतरी एक पुस्तक सुचवावे आणि आपण ते वाचावे हे तसे पाहता फार व्यवहार्य आहे. नाहीतर एकही वाचून होत नाही. पण ठरवून देखील आता डीलीट करत नाहीये. एखाद्या जुन्या घरात जसे मागल्या पिढ्यांचे कधीही न वापरात येणारे सामान उगीच पडून असते, तशी झालीये माझी हार्डडिस्क.

तर अशी ही हार्डडिस्क मी बिनधास्त मित्रांना मागातील तशी देतो. ते बापुडे ४जीबी चा पेन ड्राईव्ह पुढे करून एखादी मालिका मागतात. एक-एक ऋतू ६-७ जीबी चा असताना ती त्यांची कसरत पाहून मला कीव येते. आणि मग मी त्यांना हार्डडिस्क देण्याचे कबूल केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपून बरे वाटते. मग काही जण खूश होऊन स्वत:हून नवीन मालिकांचे काही एपिसोड्स त्यांच्या पेन ड्राईव्ह मध्ये आणतात. काही वेळेला मला ते भन्नाट आवडतात आणि मग पूर्ण ऋतूंचा फडशा पाडला जातो. हे असे गेली २-३ वर्षे अविरत चालू आहे. नव्यानव्या मालिकांची भर पडली. त्यातून मग ही जमा झालेल्या मालिकांची जातकुळी-जॉनर वेगवेगळं. अशात प्रत्येकाला कुठली काय मालिका आणि त्याला/तिला का आवडेल हे सांगत बसावे लागते. मला ते आवडते पण. म्हटले चला, याचे वर्गीकरण करून टाकू एकदाचे.

सुरुवात - अलीकडे पाहिलेल्या मालिकांपासून.

गेम ऑफ थ्रोन्स

२०११ मध्ये सुरु झालेली HBO वरची ही प्रत्येक ऋतूत १० एपिसोड असलेली मालिका. प्रत्येक भाग १ तासाचा. सध्या तिचा तिसरा ऋतू संपला. जॉर्ज आर आर मार्टीन यांच्या "सॉन्ग्स ऑफ आईस अॅन्ड फायर" या दीर्घ कादंबरीवर आधारलेली ही मालिका आहे.
ज्यांना लॉर्ड ऑफ द रिंग्स सिनेमे आवडले त्यांना ही नक्की आवडणार.
'लॉर्ड ऑफ द रिंग्स' ही जर ८०% फ्यांटसी आणि २०% काल्पनिक-ऐतिहासिक मानली, तर 'गेम ऑफ थ्रोन्स' ही ६०% काल्पनिक-ऐतिहासिक आणि ४०% फ्यांटसी असेल.


प्रागैतिहासिक काळात एका युरोप सदृश काल्पनिक खंडात 'वेस्टेरॉस ची ७ राज्ये' (Seven Kingdoms Of Westeros) आहेत. त्यातले "किंग्स लॅन्डिंग" हे प्रमुख ठिकाण. जिथला राजा हा या सात राज्यांचा राजा आणि बाकी राज्ये ही त्याचे सार्वभौमत्व मान्य केलेली. या बाकीच्या ७ राज्यांचे स्वामी म्हणजे मुख्य राजाचे सरदारच.

त्यातल्या उत्तरेकडील 'विंटरफेल" इथला सरदार नेड श्टार्क आणि त्याचे कुटुंब हे पहिल्या तीन ऋतूत तरी मध्यवर्ती आहे. नेड श्टार्क ला "किंग्स लॅन्डिंग" मध्ये रॉबर्ट बरॅथीयन आपला प्रधान करतो आणि तिथल्या राजकारणात त्याचा बळी जातो. तिथून 'विंटरफेल" मधल्या त्याच्या कुटुंबाची फरफट चालू होते. "कासेर्ली रॉक" मध्ये असलेले लॅनीस्टर्स कुटुंब आणि त्यांची सिंहासनावर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी चाललेली अविरत धडपड, त्यातून उद्भवणारी कट-कारस्थानं, हेवेदावे, खून, वध, तह, फितुरी, भागीदारी अशांचे रोचक मिश्रण असलेली ही मालिका आहे. त्यात सिंहासनावर हक्क सांगणारी 'ड्रॅगन्स ची आई' डेनेरीस टार्ग्यारियन तिचा मंगोल टोळ्याप्रमाणे धाड टाकणाऱ्या डोथ्रोकी टोळीचा प्रमुख द्रोगो याच्याशी विवाह, त्याच्या मृत्युनंतर स्वत:चे सैन्य जमवण्यासाठी सुरु असलेली कसरत हा पण या मालिकेचा मुख्य धागा आहे.

महाभारताप्रमाणे हे एक महाकाव्यच आहे. हा कथेचा पसारा झेपण्यासाठी पहिले ५ एपिसोड्स मन लावून पहावे लागतात. जर तुमच्याकडे अनसेन्सर्ड वर्जन असेल तर "मन लावून पाहणे" फार अवघड नाहीये. एकतर सर्व कलाकारांचा अभिनय म्हणजे पर्वणी आहे. त्यात मध्ययुगासारखा कालखंड जिवंत उभा केलाय. छायाचित्रण अतिशय सुंदर आहे. आणि लोकांनी तेवढा संयम ठेवून ते सारे विश्व पहावे म्हणून कथेची गरज म्हणून वेळोवेळी पराकोटीची नग्नता, हिंसा, रक्तपात आहे. त्यात उत्तरेकडील बर्फाळ प्रदेशातले रहस्यमय 'व्हाईटवॉकर्स' ही झाँबी सदृश भुते आहेत.

बी आर चोप्राचे महाभारत म्हणजे एखाद्या नाटकाचा सेट असावा असे वाटायचे. स्त्रिया काय राजपुरुष देखील सोन्याने मढवलेले. युद्ध म्हणजे तर हसूच यायचे. 'गेम ऑफ थ्रोन्स' मध्ये अगदी राजापण चामड्याची वस्त्रे घालतो. अगदी उच्च वर्गाकडेच रेशमी वस्त्रे, धातूचा वापर त्या काळाला साजेसा, कमीत कमी मेकअप, अभिनेत्यांच्या हालचाली नैसर्गिक (बी आर चोप्राचे महाभारतासारख्या अवघडलेल्या नाहीत) अशा गोष्टीमुळे ही एक सुंदर मालिका झालीये.

या मालिकेतली हिंसा आणि नग्नता पाहून भारतीय सेन्सॉर बोर्डाच्या बरेचशा सदस्यांना झीट येइन. त्यामुळे भारतात टी.वी. वर ती पाहिली तर २०-३० टक्के भाग गाळलेला असेल त्यामुळे कथासूत्राचा बोजवारा उडून डोके मात्र दुखेल. त्यामुळे टी.वी. वर पाहण्याच्या भानगडीत न पडलेले बरे.

डेक्स्टर

या मालीकेचा मी फक्त एकच ऋतू पाहिलाय. ही मालिका आठव्या ऋतूपर्यंत आलीये.
डेक्स्टर मॉर्गन या पेशाने न्यायवैद्यक विश्लेषक (forensic expert) असलेल्या पात्राभोवती या मालिकेची कथा फिरते.

डेक्स्टर दोन आयुष्य जगतोय. तो एक सिरीयल किलर पण आहे. वाहत्या रक्ताला बघायची, त्याच्या सावजांना तडफडवून मारायची प्रवृत्ती त्याच्या ठायी आहे. त्याची ही प्रवृत्ती त्याला दत्तक घेतलेले वडील त्याच्या लहानपणीच ओळखतात. हे आपले मानसिक आजाराने ग्रस्त पिल्लू समाजात मिसळणार नाही आणि लवकरच त्याच्या या प्रवृत्तीपायी त्याला मारून टाकण्यात येईल हे ओळखून त्याला ते संयम शिकवतात. माणसांमध्ये कसे मिसळावे आणि आपल्या मनाचा थांगपत्ता ण लागू देता आपले उद्योग कसे करावेत याचे शिक्षण देतात. त्याच्या हा विकृतीला जाणीवपूर्वक बंध घालून देतात. त्याच्या वडलांच्या शिकवणुकीप्रमाणे डेक्स्टर निष्पाप लोकांना सोडून फक्त गुन्हेगारांची शिकार अमानुष रित्या करतोय. त्याच्या पेशामुळे तो कुठलाही पुरावा मागे न ठेवण्यात हुशार आहे. आणि डेब्रा या त्याच्या स्वत:च्या पोलीस बहिणीलाही त्याच्या या कृत्यांचा गंध नाहीये.

आपल्या बापाच्या शिकवणुकीप्रमाणे एखादे सावज नक्की करण्यासाठी आणि त्याचा गुन्हा पडताळण्यासाठी डेक्स्टरला बऱ्याचदा सखोल अभ्यास आणि तपास करावा लागतो. त्यातून त्याचे शत्रूपण आहेत. आपल्या लाडक्या बहिणीला जपणे, स्वताच्या अक्कल हुशारीचा वापर करून तिला तिच्या केसेस मध्ये मदत करणे आणि तिचे संकटापासून रक्षण करणे हेपण कथेचे रोचक भाग आहेत. अतीव हिंसा आणि रक्तपात इथेही आहे. पण ती 'गेम ऑफ थ्रोंस' सारखी भयानक ग्राफिक नाहीये. यातला विनोद बहुतांश डार्क प्रकारचा आहे. डेब्रा बरोबरचे संवाद, फ्लॅशबॅक मध्ये दिसणारी त्याच्या वडीलांची शिकवण, त्याला कृत्रिमरित्या समाजामध्ये मिसळण्यासाठी करावी लागणारी धडपड यातून ही विनोदनिर्मिती होते. ही मालिका जगात सर्वात जास्त बघितल्या जाणाऱ्या मालिकांपैकी आहे.

थ्रू द वर्महोल

डिस्कवरी चॅनेल साठी तयार केलेल्या या मालिकेचा पहिला ऋतू पाहिलाय. दर एपिसोड एक तासाचा आणि असे १० भागांचा एक ऋतू अशी रचना आहे.

विश्वरचनाशास्त्र हा बोजड विषय मालिकेचा गाभा असला तरी तो सर्वसामान्य भाषेत समजावण्याचा प्रयत्न केलाय. अतिशय रोचक असे ग्राफिक्स, मॉर्गन फ्रीमन चे सुत्रसंचालन, प्रसिद्ध शास्त्रज्ञांची उपस्थिती, मत मतांतरे, विनोदी कार्टून्सव्दारे विषय समजावण्याचे प्रयत्न यामुळे ही मालिका अतिशय प्रेक्षणीय झालीये. त्यातला हिग्स बोसॉन, सेती प्रकल्प, डार्क म्याटर, केपलर प्रकल्प, लार्ज हेड्रोन कोलायडर विषयीचा भाग खुपच अप्रतीम जमलाय. विश्वातले सर्वात मुलभूत कण - क़्वार्क हे वजनरहित का?आणि या कणांना वजन देणारे कोण असे क्वांटम फिसिक्स चे प्रश्न पाहिले की मती गुंग होते. अशा आणि अनेक प्रश्नांची मजेदार सफर घडवून आणणारी ही मालिका आहे.

सध्या तिचे ४ ऋतू झालेत.

बँड ऑफ ब्रदर्स

HBO वरची ही १० एपिसोड असलेली मालिका. "सेविंग प्रायवेट रायन" ज्यांनी पाहिलाय त्यांनी चुकवू नये अशी. या पिच्चर मध्ये कॅप्टन जॉन एच मिलर ची अविस्मरणीय भूमिका केलेल्या टॉम हँक्स ने याच पिच्चरचा डायरेक्टर स्टीवन स्पीलबर्ग बरोबर या मालिकेची निर्मिती २००१ मध्ये केली. "सेविंग प्रायवेट रायन" ही दुसऱ्या महायुद्धात झालेल्या घटनांवर आधारित एक काल्पनिक कथा होती. त्यातली पात्रेही काल्पनिक होती. पण 'बँड ऑफ ब्रदर्स' ही खऱ्याखुऱ्या सैनिकांची खरी कथा आहे. हा, नाट्यनिर्मिती साठी कुठे कुठे कलात्मक स्वातंत्र्य घेतले असेल. ऐतिहासिक महत्व असलेल्या १०१ एयरबोर्न डिविजन च्या ५०६ पराशूट रेजिमेंट च्या ई कंपनीची कथा सुरु होते १९४३ साली.


युरोपमध्ये युद्ध शिगेला पोहोचलेले असताना अमेरिकेच्या टकोआ, जॉर्जिया येथे कुराही टेकड्यांच्या परिसरात ई-इझी-कंपनी चे नवे रिक्रूट जोरदार ट्रेनिंग करत असतात. त्यांचा ट्रेनर कॅप्टन सोबल (फ्रेंड्स मधला रॉस - डेविड श्विमर) या नवीन पोरांचा जीव काढत असतो. त्याचा त्यामागचा उद्देश जरी त्यांना कुठल्याही परिस्थितीला सामोरे जायला तयार करणे हा असला तरी या नवीन सैनिकांना मात्र तो भलताच कडक वाटतोय. बरेचसे शिपाई पगार भत्ता इतरांपेक्षा चांगला म्हणून एयरबोर्न डिविजनला जॉईन झालेत. सेकंड लेफ्टनंट रिचर्ड विंटर्स याला या सैनिकाबद्दल सहानुभूतीही आहे आणि अनेक सैनिक सोबेल पेक्षा त्याला वरचढ मानतात. पहिले १-२ एपिसोड या ट्रेनिंग मधल्या गमती जमती आणि सोबेल - विंटर्स मधल्या कुरबुरी तसेच युद्धाची परिस्थिती पात्रपरिचय, डी डे ची तयारी दाखवतात.

फ्रान्सच्या नॉर्मंडी मध्ये सेकंड लेफ्टनंट रिचर्ड(डिक) विंटर्स च्या नेतृत्वाखाली ६ जून १९४४ ला इझी कंपनीच्या सैनिकांना एयरड्रॉप केले जाते. वेगवेगळया ठिकाणी पडलेल्या या सैनिकांना एकत्र करून वाटेत जर्मन ठाणी काबीज करत या कंपनीची वाटचाल दाखवण्यात आलीये. त्यात अनेक सैनिकांच्या स्वभावाचे कंगोरे, त्यांना येणारे चांगले वाईट अनुभव, होणाऱ्या चुका, विंटर्स चे नेतृत्वगुण, त्याच्या बढत्या, वाढलेली कामे, त्याचे पेपरवर्क पेक्षा युद्धात उतरून लढण्याला प्राधान्य, विंटर्स चा सोबती कॅप्टन लुई निक्सन बरोबरची त्याची मैत्री, आघाड्यांवर होणारे डावपेच, अतिशय कठीण परिस्थितीत लढाया, फ्रांस ते हॉलंड, ते बर्लिन आणि ऑस्ट्रिया, युद्धसमाप्ती पर्यंत इझी कंपनीची वाटचाल हे सर्व या मालिकेचे कथासूत्र. मालिकेला सर्वत्र 'सेविंग प्रायवेट रायन' सारखा लूक आहे. खर्च अफाट केलेला आहे. आणि अभिनय लाजवाब. कुराही, बॅस्टोन, इगल्स नेस्ट हे एपिसोड्स अप्रतिम जमलेत.

दुसऱ्या महायुद्धाच्या रणभूमीचा अनुभव पहायचा असेल तर ही मालिका बेस्टच.
या मालिकेचा पुढचा भाग जपान फ्रंट वरचा "द पसिफिक" अजून पहिला नाही. तो पण मिळवायचा आहे.

द आयटी क्राउड

मी पाहिलेल्या इतर तमाम सिटकॉम्स पेक्षा ही वेगळी. कारण ही ब्रिटीश मालिका आहे. बहुतांश सिटकॉम्स सारखी २५-३० मिनिटांची. २००६ साली चालू झालेल्या या मालिकेचे एव्हाना ४ ऋतू झालेत. बऱ्याचशा ब्रिटीश मालीकांसारखे एक ऋतू ६-७ एपिसोड्स चा आहे.

कुठल्याशा एका मोठ्या कंपनीमध्ये बेसमेंट ला आय.टी. डीपार्टमेंट आहे. त्यात रॉय आणि मॉस हे दोघेच जण काम करतात. दिवसभर गेम खेळणे, इंटरनेट वर टाईमपास करणे याशिवाय कधीतरी एखाद्या कर्मचाऱ्याचा कम्प्युटर चालत नाही असा फोन आला की "रिस्टार्ट करून पहा" किंवा "इलेक्ट्रिक कनेक्शन तपासा" ही ठरलेली उत्तरे देणे हा त्यांचा उद्योग. त्यांच्या संवादावरून "७ व्या मजल्यावर भारी पोरी आहेत" हे समजते. तिथून फोन आला रे आला कि रॉय लगबगीनं तिकडे जाणार. पण सोशल स्किल्स नसल्यानं त्याला तिथं कुणी विचारत नाही. मॉस तर त्याच्यापेक्षा भयानक केस. झुबकेदार वेशभूषा, शाळेत असल्यासारखे कपडे, विसरभोळेपणा, तंतोतंत् बोलणे असा मॉस.

तर अशा या दोघांना मॅनेजर म्हणून नेमली जाते जेन. जेन ला या कंपनीचा मालक बहुदा तिचा चेहरा पाहून घेतो. जेन ला आय.टी. चा फुलफॉर्मपण माहीत नाही. तिचा कम्प्युटर्स मधल्या अज्ञानाचा अवाका लक्षात आल्यावर रॉय आणि मॉस तिला यथेच्छ त्रास देतात. पण तिच्या बोलक्या स्वभावामुळे ती "७ व्या" मजल्यावर कनेक्शन करायला उपयोगी पडेल म्हणून हळूहळू मॉस आणि रॉय तिला स्वीकारतात.

या तिघांची कथा असलेले हे आय.टी. क्राउड. मॉस हे या मालिकेतले सर्वात मिश्कील पात्र आहे.

माईंड युअर लँग्वेज

सत्तरच्या दशकातले 'माईंड युअर लँग्वेज' ही पण ब्रिटीश सिटकॉम. कथासूत्र अतिशय साधे आहे. मिस कोर्टनी या बाईसाहेब एका भाषेच्या शाळेत हेडमास्तर असतात. तिथे जेरेमी ब्राऊन हा तरूण नोकरी मागायला येतो आणि त्याला तिथे इंग्लिश शिकवण्याची नोकरी विनासायास मिळतेपण. कारणही तसेच असते. त्या इंग्रजी वर्गातले विद्यार्थी मास्तरला पार वेडं करून टाकत असतात. इंग्रजी शिकतानाच काही वाक्प्रचारांचे शब्दश: अर्थ लावणे, अजाणतेपणे किंवा मुद्दामहून मास्तरच्या फिरक्या घेण असे उद्योग चालू असतात. ब्राऊन सर् या विद्यार्थ्यांना शिकवण्याचे आव्हान स्वीकारतात पण त्यांचीही तारांबळ उडतेच.

या विद्यार्थ्यांत पाकिस्तानचा अली, भारताचे रणजीत आणि जमीला, जपानचा तोरो, जर्मनीची अॅना, स्पेनचा जुआन ही पात्रे खुपच विनोदी आहेत.

अलीचे "स्क्वीझ मी प्लीज" (म्हणजे एक्सक्युज मी प्लीज), जिथे तिथे "ओह ब्लायमी", रणजीत चे "थाउसंड अपोलोजीस", तोरोचे "आर्सो", जुआनचे "पर्फावोर" हे टिपिकल शब्द मजा आणतात.

या विद्यार्थ्यांचे खाजगी आयुष्य, त्यांचे एकमेकांचे वैर किंवा मैत्री, चुकीचे इंग्रजी बोलल्यामुळे होणारे घोळ आणि मी.ब्राऊनचे त्यांना नेहमी वाचवणे हे प्रेक्षणीय. ही मालिका सध्या कॉमेडी सेंट्रल वर पुन:प्रक्षेपित केली जातीये.

आय ड्रीम ऑफ जिनी

साठच्या दशकातले आय ड्रीम ऑफ जिनी हे बऱ्याच जणांनी पाहिलेले असेल. दूरदर्शन वर म्हणे ते ९० ते ९५ दरम्यान कधीतरी प्रक्षेपित होत होते. प्रसिध्द लेखक सिडनी शेल्डन हा या मालिकेचा निर्माता. याचा प्रत्येक एपिसोड २३-२५ मिनिटांचा आणि एका सीझन मध्ये २२-२३ भाग असे ५ ऋतू पाहिले मी.
मेजर अॅन्थनी नेल्सन हा अमेरिकन एयरफोर्स मध्ये असलेला टेस्ट पायलट. तो नासा च्या मिशन्स, नवीन विमाने आणि याने यांच्यावर काम करतोय. त्याचा बोलघेवडा पण वेन्धळा मित्र मेजर हिली हा पण एक टेस्ट पायलट. एका मिशन दरम्यान अॅन्थनीला एका बेटावर एक रिकामी बाटली सापडते. हाताळल्यावर त्यातून एक सुंदर जिनी प्रकट होते आणि लगेचच अॅन्थनीच्या प्रेमात पडते. अॅन्थनी तिला घेवून कोकोआ बीच या आपल्या शहरात आणतो. पण जिनी त्याच्यासाठी जगातली सर्व सुखं आणू शकते हे माहित असूनही स्वबळावर स्वत:चे नॉर्मल आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे जिनी मात्र आपल्या मालकाला जगातली सगळी दौलत, ऐशोआराम द्यायला बघत असते. पण अॅन्थनी च्या अशा आदर्शवादापुढे तिचे काही चालत नाही. पण मनातूनमात्र तिला या नवीन मालकाचे कौतुकाच असते. एकतर अॅन्थनीने तिला शेकडो वर्षांतून मुक्त केलेले असते. आणि तिच्या २००० वर्षाच्या आयष्यात त्याच्यासारखा मालक तिला कधीच मिळालेला नाही हे नेहमी नेहमी तीच सांगत असते.

अॅन्थनीचेही तिच्यावर प्रेम जडते. पण तिला जगापासून लपवताना त्या दोघांची जाम तारांबळ उडते. त्यात जीनीला मेजर हिली पाहतो, नंतर त्यांचा सिनियर कर्नल डॉ. आल्फ्रेड बेलोज आणि त्याची बायको अमांडा पण पाहते. पण नानाविध क्लुप्या लढवून ते दोघे जीनीच्या अमानवी शक्तिंविषयी कुणालाही कळू देत नाहीत. यथावकाश मेजर हिलीला जिनी खरी कोण हे कळते मग तो पण मित्रापायी ते रहस्य लपवण्याच्या कसरतीत सामील होतो.

जीनीच्या आपल्या लाडक्या मालकाला मदत करण्याच्या सवयीपायी ती बऱ्याचदा अॅन्थनीला गोत्यात आणते. कधी कधी तर तिच्या पॉवर वापरण्याशिवाय त्याला गत्यंतरच नसते. चौथ्या ऋतूपर्यंत हे दाम्पत्य लग्न करायचा निर्णय घेतं तेव्हा तर जीनीच्या माहेरचे एकाहून एक चमत्कारिक पब्लिक अॅन्थनीच्या आयुष्यात अधिकाधिक गमतीशीर प्रसंग निर्माण करतात. या सर्वाचा सर्वात जास्त परिणाम डॉ.बेलोज दांपत्यावर होतो. जिनी खरी कोण हे माहित नसल्यामुळे अनेकदा काहीतरी चमत्कारिक पाहूनही त्यांना त्याचे आकलन न झाल्यामुळे गप्प बसावे लागते.

या मालिकेच्या काळाच्या दृष्टीने, त्यांनी दाखवले स्पेशल इफेक्ट परिपूर्ण आहेत. त्या वेळच्या टेक्निकल गोष्टी जसे विमाने, याने, अवकाश प्रवास, त्या वेळेचे भलेमोठे कम्प्युटर्स हे सर्व बघताना मजा येते. जिनी झालेली बार्बरा इडन मस्त दिसते, लॅरी हँगमन या देखण्या अभिनेत्याने अॅन्थनी साकारलाय, मेजर हिली आणि डॉ.बेलोज ही पात्रं खरच गंमतशीर आहेत.

हाऊ आय मेट युअर मदर

"लेजेन.. वेट फॉर इट.. डरी.. लेजेंडरी" बार्नी स्टीन्सन ची ही आरोळी म्हणजे या मालिकेचा युएसपी म्हटला पाहिजे.
२००५ साली सुरु झालेल्या या मालिकेचे आतापर्यंत ८ ऋतू झालेत. पैकी मी ५-६ पहिले असतील.

२०३० मध्ये एक बाप आपल्या दोन पोरांना तो त्यांच्या आईला कसा भेटला हे सांगतोय असे हे कथासूत्र. त्यामुळे नरेशन हे सगळे भूतकाळात म्हणजे आताच्या वर्तमानात आहे.
हा बाप आहे टेड मोस्बी. पेशाने वास्तुरचनाकार असलेला टेड आपल्या मार्शल या जिवलग दोस्तासोबत न्यू-योर्क मध्ये राहतोय. त्याच्यात आपल्या भावी जोडीदाराबद्दल मुळातच एक रोमॅन्टिसिझम भरलाय. ती अशी असावी, तशी असावी, अमुक यावं, तमुक सिनेमा, पुस्तक तिला आवडावंच वगैरे वगैरे. त्यामुळे त्याचा शोध हा अनंत कालपर्यंत असाच चालू राहणार का असा प्रश्न न पडावा म्हणून ही फ्लॅशबॅक टाईप व्यवस्था केलीये.

त्याचा मित्र मार्शल मात्र कॉलेज पासून लिलीच्या प्रेमात आकंठ बुडालेला. लिली ही व्यावसायिक चित्रकार बनू पाहणारी मुलगी. नंतर बरेसचे जण करतात तशी स्वप्नांना बाजूला ठेवून लहान मुलांची शिक्षिका बनते. मार्शल आणि लिली एखाद्याला बघून वीट येईन इथपर्यंत एकमेकांत गुंतलेले. आणि टेड मात्र सदैव इकडे तिकडे प्रेमाचा शोध घेणारा. अशा तिघांना एक दिवस बार्नी भेटतो. कुठल्याशा बँकेत कुठलेसे काम करून बक्कळ पैंसा मिळवणे, पोरींना पटवणे आणि लगेच सोडून देणे, निर-निराळे फंडे टेड ला पाजणे, विचित्र पैजा लावणे, महागडे सुटस शिवणे हे बार्नीचे छंद. कधीतरी प्रेमभंग झालेला बार्नी सगळ्या स्त्री-जातीवरच जणू सूड उगवतोय. तसा तो सहृदयी आहे हे त्याचा बऱ्याचशा लीलांवरून समजत जाते. त्याचे संवाद म्हणजे हसून हसून पुरेवाट.

याच ग्रुपमध्ये रॉबिन आहे. मुळची कॅनडाची रॉबिन, अमेरीकेत मोठी रिपोर्टर बनण्यासाठी आलीये. पण एका फारशा महत्वाच्या नसलेल्या न्यूज चॅनेल मध्ये तिला काम करावे लागतेय. टेड चे तिच्यावर प्रेम बसते आणि ती या गटाची सदस्य होते. सुरुवातीला सुंदर नाजूक वाटणारी रॉबिन नंतर नंतर खऱ्या रांगड्या स्वभावात दिसते. हा ग्रुप चर्चा आणि मस्ती करण्यासाठी बार मध्ये बसतो. (फ्रेंड्स मध्ये जसे कॉफीशॉप मध्ये बसायचे तसे).

टेड, रॉबिन, लिली, मार्शल यांची त्यांचे आयुष्य मार्गावर नेण्यासाठी सततची धडपड चालू आहे. त्यात त्यांना मस्ती पण करायचीये, आवडत्या क्षेत्रात करीयर पण करायचंय, आणि मिडीयोकर नोकरीतनं येणार शाश्वत उत्पन्न ही सोडवत नाहीये, आपले मित्र पण सांभाळायचेत आणि जसे जसे मोठे होतायेत तसे कुटुंब पण बनवायचंय. थोड्याफार फरकाने मेट्रोमध्ये राहणाऱ्या तरुणांची तारांबळ गंमतशीर पद्धतीने दाखवण्यात आलीये.

वेगळा आहे बार्नी. त्याचे विचार क्लीयर आहेत. मजा, मजा आणि फक्त मजा. एका एपिसोडमध्ये टेड त्याला सांगतो की म्हातारपण आल्यावर त्याला हे सगळं थांबवावंच लागेल. त्यावेळी बार्नी पैज लावतो आणि ८० वर्षाच्या म्हाताऱ्याचा मेकअप करून त्याही अवस्थेत पोरगी पटवतो. पण ती ३२ वर्षाची आहे समजल्यावर आणखी कोवळी मिळवण्यासाठी पठ्ठ्याची परत धडपड सुरु होते. असे आणि अनेक धिंगाणे बार्नी घालतो. नील पॅट्रीक हॅरीस या गुणी अभिनेत्याने हा बार्नी साकारलाय.

५-६ सीझन नंतर मला मालिकेत तोच तोच पणा जाणवायला लागला. शिवाय फ्रेंड्स मध्ये जसे कुणीही कुणाशी लग्न करते, परत हि त्याच्याबरोबर तो पाहिलीबरोबर असे प्रकार चालू झाले आणि माझा इंटरेस्ट संपला.

टू अॅन्ड हाफ मेन

चार्ली शीन हा त्याच्या हॉटशॉटस् या विडंबन चित्रपटांच्या मालिकेमुळे बऱ्याच जणांना माहिती असेल. त्याला मध्यवर्ती पात्राच्या भूमिकेत घेऊन ही मालिका तयार करण्यात आली. २००३ साली सुरु झालेली ही मालिका अजूनही चालू आहे.

चार्ली हार्पर (शीन) हा जाहिरांतीचा जिंगल लिहिणारा तसा यशस्वी माणूस. मलिबु या उच्चभ्रूंच्या वस्तीत त्याचे स्वत:चे बीच हाऊस आहे. एक थोडी फटकळ मोलकरीण आहे. लग्नाला आणि बंधनाला घाबरणारा चार्ली या घरात एकटाच राहतो. नव-नवीन मुलींशी सख्य जोडायचे आणि नंतर हळूच अंग काढून घायचे अशात त्याचे व्यवस्थित चालू आहे.

अशा त्याच्या सुखासुखी घरात त्याचा भाऊ अॅलन राहायला येतो. अॅलनचा घटस्फोट झालेला असतो आणि बायकोने जवळजवळ पूर्ण संपत्ती हडप केल्याने तो वाऱ्यावर येतो.

चार्ली त्याला तात्पुरता निवारा देतो खरा, पण स्वारी नंतर वर्षानुवर्षे तिथून हलत नाही. त्यात अॅलनचा मुलगा जेक तिथे राहायला असतो. आणि मग या तिघांचे आयुष्य एकमेकांशी गुंतत जाते. म्हणून हे दोघे मोठे आणि तो लहानगा असे 'टू अॅन्ड हाफ मेन'.

या दोघांची आई एवलीन हार्पर ही तशी स्वतंत्र आणि कर्तृत्ववान बाई. पण अॅलन आणि चार्ली चा पक्का समज आहे की आज त्यांच्या स्वभावातले दोष हे त्यांच्या आईच्या वर्चस्व गाजवणाऱ्या स्वभावामुळे निर्माण झालेत. फरक हाच की चार्ली लग्न न करून सुखी आहे पण अॅलनला मात्र भावाकडे बांडगुळासारखे राहावे लागते. त्याच्या या अवलम्बत्वाची यथेच्छ खिल्ली उडवण्यात आलीये. या दोन भावांमधले संबध, चार्लीचे खुमासदार संवाद, छोट्या जेकचे निरागस प्रश्न आणि चार्लीचे त्याच्यावर भलते संस्कार हे विनोद निर्मिती करतात.

काही वर्षे ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर होती आणि निर्माता चक लॉर हा त्याच्या आणखी एक यशस्वी मालिकेमुळे (बिग बँग थियरी) चर्चेत आले. चार्ली शीन ला तर एका २२ मिनिटाच्या एपिसोड साठी १.८ मिलिअन डॉलर्स (जवळपास ९ कोटी रुपये) मिळत होते. याची हवा त्याच्या डोक्यात गेली नसती तरच नवल. त्याचे आणि चाक लॉर चे वाजले आणि चार्ली शीन नवव्या ऋतूतून बाहेर पडला. त्यामुळे नवव्या सीझन मध्ये चक्क कथाबदल करून अॅष्टन कुचर या देखण्या हॉलीवूड हिरोला नवीन रोलमध्ये 'वॉल्डन श्मिट' म्हणून आणले गेले.

वॉल्डन हा कम्प्युटर इंजिनियर त्याच्या इन्फोटेक कंपनीमुळे अब्जाधीश झालाय पण व्यवहारी नसल्यामुळे बायकोने सोडले म्हणून जीव द्यायाला निघतो आणि अॅलन त्याला वाचवतो. आपल्या मृत भावाची (चार्लीची) इस्टेट त्याच्यावरच्या कर्जासहित वॉल्डन ला विकून परत त्याच घरात वॉल्डन बरोबर राहायला लागतो. वॉल्डनही त्याला त्याचा जीव वाचवण्याच्या बदल्यात तात्पुरता आश्रय देतो. पण त्या घरातली नोकर बर्टा जसे म्हणते तसे, "तो एकदा घुसला की निघत नाही" याच्याकडे वॉल्डन दुर्लक्ष करतो. आता या दोघांची परत जुगलबंदी चालुये. आणि विशेष म्हणजे मालिकेत एवढा मोठा बदल करूनही त्यांचे नंबर एक चे स्थान घसरले नाही.

खरेतर मला पहिलाच सीझन जास्त आवडला. नंतर प्रमाण कमी झाले आणि शेवटी तर मधले ६-७ सीझन गाळून मी डायरेक्ट नवव्याचे (अॅष्टन कुचर आल्यावर) काही भाग पाहिले. या मालिकेतही नीतीमत्ता औषधाला सापडत नाही. स्वैराचार ३-४ सीझन नंतर अतीच झाला. त्यामुळे इंटरेस्ट आपोआप कमी झाला.
आतातर म्हणे जेकचे पात्र साकारणाऱ्या अँगस टी जोन्स नेच या मालिकेची "घाण (filth)" म्हणून संभावना केलीये.

द बिग बँग थियरी

ही माझी सर्वात आवडती सीटकॉम. ४ शास्त्रज्ञ मित्र शेल्डन, लेनर्ड, राज,हॉवर्ड आणि त्यांची मैत्रीण पेनी याच्याभोवती गुंफलेली कथा विज्ञान आणि विनोद याचे सुरेख मिश्रण आहे. याच्याबद्दल स्वतंत्र पोस्ट याआधीच टाकलाय.

या सर्व मालिका आदर्श आहेत असे मी मानत नाही. तसेच काही यांच्यापेक्षाही लोकप्रिय मालिकांचे उल्लेख केले नसतील. कारण - मी त्या पाहिलेल्या नाहीत. फ्रेंड्स चा उल्लेख केला नाही. ती सुपरिचित आहे. या मालिका बघण्यामागची कारणे आणि काही आणखी मालिकांचा उल्लेख या पोस्टवर आधीच केलाय. द बिग बँग थियरी: शास्त्रज्ञांतल्या माणसांचे जग-१.

सर्व चित्रे आंतरजालावरून साभार.