Friday, September 14, 2012

म्हणे आम्ही बिझी झालो-२

भाग १ पासून पुढे.

मराठी मालिकांनी कहर केलाय. त्याच टिपिकल सास बहु टाईप कथा. पण त्या कमी म्हणून आता बऱ्याच मालिकांत भुताटकी, चेटूक वगैरे वगैरे दाखवायला लागलेत. विरोधाभास बघा- माझे वडील वेळ घालवायला पुस्तके शोधून काढतायेत आजकाल. त्यांना मला कधीकाळी ६वी - ७वीत असताना बक्षीस मिळालेले नरेंद्र दाभोळकरांचे 'श्रद्धा-अंधश्रद्धा' हे पुस्तक मिळाले. ते हातात घेवून ते ती भुक्कड अंगात आलेली "सुवासिनी" बघतात. आता तर कहर झालाय. एकापाठोपाठ "देवयानी", "सुवासिनी", "स्वप्नांच्या पलीकडले" असा रतीब चालुये. तरी बरं माझ्या काका-काकूंकडे फेमस असलेले "पुढचं पाउल" ने इकडे घरात अजूनतरी पाउल ठेवलं नाहीये.

या मालिकांमुळे माझे टीवी बघणे महिन्याच्या ३-४ तासांवर आले आहे (अतिशयोक्ती नाही). डिस्कवरी पूर्णपणे गायब झालीये. नॅट-जिओ चा आवाज क्षीण होत गेला. या डेली सोप मालिका जरी महिन्याभरानंतर पाहिल्यातरी तसूभर हललेल्या नसतात. पण आईला म्हटले की हा एवढा पिच्चर बघुदे तर ती म्हणते की "काय तेच तेच पाहतो रे? मला एवढे बघुदे, आज अमकी तमकीला सासुसमोर मारणारे" हे असे ऐकल्यावर मग मी विचारात पडतो, आता या वाक्यावर आणखी काय बोलणार?

विषाद या गोष्टीचा वाटतो की माझी बुद्धिवंत आई असल्या मालिका बघू कशी शकते? मी २ तास विचार करून सोडवलेला तर्काधारित प्रश्न तिने तोंडी सोडवला होता. लहान असताना चंद्रग्रहणाच्या दिवशी मी सुर्याला पाहण्यासाठी काच काळी करत होतो म्हणून धोपटले होते. मग या बिनडोक मालिका बघून तिला राग का येत नाही?
एक असाच "कासौतीई जीन्दागीई काय" (Kasautii Zindagii Kay हे असले येडचाप स्पेलिंग) प्रसंग. गुंडांनी प्रेरणा-अनुरागच्या लेकराला पळवले. आणि खंडणी मागतायेत ३०० कोटी (?).
बरे मागितले तर मागितले. ते पण कॅश. आता हे पैसे प्रेरणा घेवून आली. कसे? २ फारीनला जाताना घेतात ना तसल्या बॅगांमध्ये. नोटा जरी हजार हजार च्या असल्या तरी ३०० कोटी म्हन्जे १००० च्या १०००x१०० = १ लाख x १०० = १ कोटी x ३०० = ३०००० गड्ड्या. या हिशोबाने ३०० कोटी कॅश प्रेरणाने ट्रॅक्टर ट्रॉलीत आणायला हवेत. अरे काय? पाट्या टाकायच्या पण एवढा आळशीपणा?

वडिलांशी आईच्या या व्यसनाची खुपदा चर्चा झाली. या भाकड मालिकांनी समाजाची कशी वाट लावलीये हे पण आले. त्यात पापांनी एक जमेचा मुद्दा सांगितला. ते म्हणाले की गल्लीतल्या बायकांना आता एकमेकांची उखळीपाखाळी, चहाड्या काढायला वेळ नसतो. चर्चा करतात ते या काल्पनिक सासू-सुनांची, त्यांच्या घरातले प्रोब्लेम चवीने चघळतात मग दुसऱ्याच्या घरात नाक खुपसायला आपसूक वेळ कमी पडतो. मुद्दा बरोबर आहे तसा.

तुम्ही म्हणाल मी एवढा वैतागलोय या मालिकांना तर मला एवढी माहिती कुठून?
१. माहिती अर्धवट आहे. तुमच्या कल्पनेत नसतील एवढ्या डेली सोप चालू आहेत सध्या. सगळ्या माहिती असणे एका पुरुषमाणसाला तरी शक्य नाही.
२. जेवणाच्या वेळी लावल्यावर बघण्याशिवाय पर्याय नसायचा. आणि काही मालिका सुरुवातीचे एपिसोड चांगल्या असायच्या. आणखी म्हणजे नवीन नवीन पाखरं यायची पहिल्या प्रथम एपिसोड्स मध्ये.
त्यातली अक्षरा(ये रिश्ता क्या केहेलाता है), टोस्टी(सास बिना ससुराल), सावी(सुवासिनी), प्रतिज्ञा, रुपाली (हो..तीच ती पुढचं पाउल मधली वॅम्प) ही क्रमानुसार माझी फेवरेट पाखरं आहेत.

-*-

म्हणे आम्ही बिझी झालो-१


आजकाल वेळ कुणाकडे आहे? सकाळी लवकर ऑफिसला जायचे, संध्याकाळी उशिरा यायचे. या महिन्यात दिवसातले तेरा तास मी घराबाहेर असतो आणि तरीही हा महिना त्यातल्या त्यात आराम होता.
अशा वेळी घरात बोलायला, सण समारंभ साजरे करायला काय जीव असणारे? आमची पिढी वाया गेली. थोरामोठ्यांचा आदर नाही, देवधर्म नाही, नातीगोती नकोत, भावना नकोत. मित्रांना थातुरमातुर भेटायचे, आठवडी बीयर मारायची, महिन्याभरातून कुठेतरी भटकून यायचे, घरकामाला हात नाही, कुटुंबासाठी चार क्षण नाहीत.
हड.. च्यायला वरच्या परिच्छेदातल्या गोष्टी १०० टक्के खऱ्या असतीलही पण तरीही एकांगी आहेत. म्हणे आम्हाला वेळ नाही. मी म्हणतो आमच्या कुटुंबाला आमच्यासाठी वेळ नाही.

साधारण १०-१२ वर्षापूर्वी भारतातल्या सुखी कुटुंबव्यवस्थेत एकता कपूर नावाच्या चेटकिणीचा प्रवेश झाला. तिच्यावरच गरळ का, तर तिने लावलेली विषवल्ली आज सर्वदिशा व्यापून उरलीये.
जिकडे तिकडे त्या डेली सोप मालिकांनी नुसता हैदोस घातलाय. माझ्या आईने त्या सुमारास "कहाणी घर घर की" बघायला सुरुवात केली. तेवढीच तिला करमणूक म्हणून मला आठवतंय त्याप्रमाणे मी, बाबा, अक्की पण तिच्यासोबत ते बघायचो. नंतर ती "क्यूंकी सास भी कभी बहु थी" बघायला लागली. त्यानंतर "कसौटी जिंदगी की", "कही किसी रोज". या मालिकांचा भुक्कडपणा ओळखून वेळीच बाकीच्यांनी अंग काढून घेतले. बहिण आपली ती "कही तो होगा" तेवढीच एक बघायची. पण माझी आई.. ती मात्र पूर्णपणे आहारी गेली या मालिकांच्या. तेव्हापासून आजतागायत माझ्यात आणि तिच्यात या मालीकांवरून शीतयुद्ध चालू झाले.

वर्ष २०११. धनंजय निफाडकर[१] जसा एक चहाची भुकटी ४ वेळा वापरायचा त्याहीपेक्षा भयानक पद्धतीने कथेचा चोथा करून अगदी त्याची माती होईपर्यंत कस काढल्यावर केकता कपूरच्या बऱ्याचशा मालिका बंद पडल्यात. त्याची जागा घेतली तथाकथित छोट्या शहराच्या मालिकांनी. मला लवकरच समजले की केकता कपूर ही कुणी व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे. आईने "प्रतिज्ञा", "गीत हुई सबसे पराई" आणि "बिदाई" बघणे चालू केले. बहिण लग्न होऊन नवीन कॅटेगरीच्या मालिका बघायला लागली. तिने ते नैतिक अक्षराचे "ये रिश्ता क्या केहेलाता है" बघायला सुरुवात केली. आता ती सासरी असली तरी कधी इकडे यायची तेव्हा मला दया दाखवून टीवी ची जी २०-२५ मिनिटे मिळण्याची त्याचापण हिशोब लागून जायचा.

भारताच्या या 'बौद्धिक दिवाळखोरी' कालखंडाचे दोन ठळक भाग पडतात. केकता आणि केकतौपरांत. या पोस्ट-केकता काळात ती महामाया बरी असे म्हणायची वेळ आली. लोकांना आज जसे इंग्रज बरे असे वाटते ना तसेच. या काळात नवीन घडामोडी या झाल्या की मराठी वाहिन्यांचे पेव फुटले. "चार दिवस सासूचे" हे असे काहीतरी चालू आहे हे मला माहिती होते. २०११ ला बऱ्याच मराठी डेली सोप चालू झाल्या. हिंदी, गुजरात्यांपेक्षा मराठीत सहन करूया या भावनेने जेवणाच्या वेळी टीवीत घुसलेल्या आईला मी "मराठी मालिका तरी बघ" अशा विनवण्या करायचो. रीमोटला हात लावून चॅनेल बदलायची माझी काय बिशाद? एरवी साधीसरळ असणारी माझी आई या मालिका बघताना भयानक हिंस्त्र होते. रिमोटला स्पर्श जरी केला तरी वरून फटका मारायची. वर मी कसे शाळेतून येवून घरातले पण पाहते, मला विरंगुळा नाही, नुसते माझा जीव खातात वगैरे वगैरे ऐकवणार. त्यामुळे टीवीवरून आईशी भांडणे व्यर्थ आहे हे खूप आधीच समजून माझ्यासाठी मी द्रुतगती इंटरनेट लावून घेतले होते.
तर एकेदिवशी अचानक आई मराठी मालिका बघतेय हे पाहून मला सुखद धक्का बसला. पण मुर्खपणा मग तो कुठल्याही भाषेत असला तरी त्याची तीव्रता कमी होत नाही.
भाग २
-*-

[१] लक्ष्मीकांत बेर्डेंचे एक पात्र. सिनेमा आठवत नाही. पण हे ध.नि. कॅरक्टर चांगलच लक्षात आहे.