Tuesday, April 24, 2012

इंटेलिजंट स्पर्म!

बॉस, काहीतरी भयानक जादू झालीये. हा एप्रिल चालुये आणि आतापर्यंत या वर्षात मी तीन हिंदी सिनेमे पाहिले. ते तीनही प्रस्थापित हिंदी सिनेमाच्या समजुतींच्या पार गेले आणि एक नवीनच शाळा (school of thought) भरवलीये. पानसिंग तोमर, कहाणी आणि विकी डोनर हे नितांत सुंदर पिच्चर पाहिले. हिंदी पिच्चर बेचव आणि बिनडोक अशा समजुती घेवून वर तोंड करून हिंडणाऱ्या लोकांना (म्हणजे आम्हालाच) भयानक धक्का होता हा. नशीब आमचे की हाउसफुल सारखे सिनेमे मधेमधे येवून तो समज अगदीच खोटा नाहीये अशी सांत्वना देतात.

वर नमूद केलेल्या तीनही सिनेमांचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यांच्यात कोणीही 'तुर्रम'खान नव्हता. तरीही पानसिंग आणि कहाणी तुफान चालले. आणि विकी डोनर मला एवढा आवडलाय की ज्या अर्थाने हे दोन चालले तो पण बॉक्स ऑफिस गाजवणार यात शंका वाटत नाही. पानसिंग ला काही मोठे बजेट नव्हते पण तरीही ४०-५० वर्षांचा काळ २-२.३० तासात दाखवण्यात लैच कमाल केली. कोलकात्याला ज्या प्रकारे कहाणी मधले एक महत्वाचे पात्र बनवलय त्याला तोड नाही. हे सिनेमे कुणी लिहिले, कुणी दिग्दर्शित केले हे इथे कशाला लिहू? विकी आहेच. पण या लोकांचे कौतुक करावे तेवढे थोडे.

विकी डोनर मी मागल्या रविवारी पाहिला. खरेतर 'मिरर मिरर' पाहायला जाणार होतो. पण सिनेमाला येणारं पब्लिक चेंज झालं आणि त्यांना हे परीकथांचं ज़ॉनरं कितपत आवडेल या शंकेमुळे मी दुसरा कुठला पाहायचा या शोधाला लागलो. जेम्स क्यामेरून त्याचे पिक्चर परत बळच रीलीस करून पैसे कमावतो, त्यामुळे टायटनिक ३डी चा गल्ला भरायचा नव्हता. हाउसफुल२ हा टूकार सिनेमा मी कुणी मला पैसे दिले तरी पाहणार नाही असे बरेच आधी ठरवले होते. त्यामुळे राहिला विकी डोनर. रेडीफ वर सुकन्या वर्मा[१] चा रिव्यू वाचला आणि चला म्हटले. बुक माय शो वाले साला २० रुपये जास्त घेतात तिकिटामागे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ई-स्क्वेयर ला लवकर जावून तिथेच बुक केली तिकिटे. आणि कधी कुठे यायचे हे पार्टीला एसएमसएस करून रानडेला गेलो. तिथे ६-७ रशियन चे विद्यार्थी आले होते. वयोगट २२ ते ५५. पेशा- आर्टिस्ट, डेवेलपर्डे, डॉक्टर ते शास्त्रज्ञ. आमच्यात एक समान दुवा आहे. सगळे ड्रॉपआउट्स. कुणी सर्टीफिकेटचा, कुणी डिप्लोमाची, अडवान्स डिप्लोमाचा असे. आपली ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय करायला हवे हे सोडून सगळ्या विषयांवर चर्चा झाली. जशी माझी वेळ झाली तसा ई-स्क्वेयर ला पोहोचलो. पार्टी आधीच हजर होती.

हा पिच्चर का पाहावा -
१. यातला एकही जोक ओढूनताधून आणलेला नाही.
२. वन्ध्यत्व आणि शुक्राणू दान[२] हे विषय सिनेमाभर असूनही एकदाही पातळी सोडलेला विनोद नाही. आता तोल जाईल मग जाईल असे करता करता सिनेमा संपतो आणि उरतं फक्त कौतुक.
३. आयुष्मान - याचा पहिला पिच्चर आहे हा. प्रस्थापितांनी क्लास लावा याच्याकडे.
४. अन्नू कपूर - एक सुपीक आणि कसदार जीन मिळवण्यासाठी अगतिक झालेला डॉक्टर यांनी इतका अप्रतिम साकारलाय. याच्या डॉक्टर चढ्ढा आणि त्यांच्या तथास्तु ला पैकीच्या पैकी.
५. पिच्चर मधल्या विकीच्या आई आणि आजी. हा निव्वळ धिंगाणा प्रकार आहे.
६. दोन पोरी आहेत खतरनाक दिसणाऱ्या. (आता उड्या पडतील :) )

२०१२ हे बहुदा हिंदी सिमेमाला नवीन अर्थ देणारं वर्ष ठरावं. पुढील सिनेमांसाठी शुभेच्छा!
-*-

[१] - सुकन्या वर्मा आणि राजा सेन हे रेडीफ चे दोन समीक्षक. यांच्या सामिक्षांचा एक खास वाचक वर्ग आहे. लेख वाचायचा आणि खाली कमेंट्स मध्ये यांचा उद्धार करायचा हा बऱ्याच लोकांचा टाईमपास आहे.
यांचे रिव्यू म्हणजे वोकॅब्लरी चे दुकान असते. वाक्य भयानक शब्द वापरून किती दुर्बोध करता येतील याची स्पर्धा असते दोघांमध्ये. आपले इंग्लिश लय भारी हा माज ज्याला उतरवयाचा असेल तर त्याने यांचा लेख वाचावा. आणि काम फत्ते झाले कि खाली त्यांना शिव्या घालाव्यात.
त्यांच्या लेखाचा हा नमुना.. खालच्या टिपिकल कमेंट पहा.

[२] - माय मराठीची सेवा..:) infertility & sperm donation असे वाचावे.

Sunday, April 1, 2012

भांडवलवादाच्या आयचा घो? -१


इंजिनियरिंग च्या दुसऱ्या वर्षाला असताना मी यु./एम.पी.एस.सी. च्या साप्ताहिक क्लासला जायचो. अगदीच ठरवून नव्हता लावलेला क्लास. आमच्या एस.आर्.पी.एफ. चे तत्कालीन सहृदय आणि कर्तव्यदक्ष समादेशक व्ही. लक्ष्मीनारायण[१] यांनी राबवलेल्या अनेक समाजोपयोगी योजनांपैकी हा एक उपक्रम होता. इतिहास, समाजशास्त्र, भूगोल असल्या कुचकामी[२] विषयांची आवड भागवून घेत होतो. लक्ष्मीनारायण सरांनी कॅप्टन कोल्हटकर (यांची पुण्यात अकॅडमी आहे) त्यांची मनधरणी करून त्यांची आणि त्यांच्या शिष्यांची दर सप्ताहांताला येण्याजाण्याची व्यवस्था केली होती. ते आम्हाला स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन करायचे, अभ्यास घ्यायचे, मॉक टेस्ट असायच्या. वेळ अगदी मजेत जात असे. आमचा ७-८ जणांचा नियमित उपस्थिती असलेला ग्रुप होता. बऱ्याचदा कोल्हटकर सरांचे शिष्यच यायचे शिकवायला. पण स्वत: कोल्हटकर सर् आले की आणखी मजा. सत्तरीतले सर त्यांच्या तरूणपणाच्या गोष्टी उत्साहाने सांगायचे. शाळेत ते अभ्यासात मागे होते आणि वडलांनी अपमानित केल्यावर कसे पेटले आणि कुत्र्यासारखा अभ्यास करून एम.ए. झाले आणि आर्मीत जॉईन झाले, वगैरे वगैरे. (कुत्र्यासारखा अभ्यास कसा करतात देव जाणे, त्यांच्या तोंडून हे वाक्य किमान दहा वेळा ऐकले असेल, पण ती अभ्यासाची इंटेन्सिटी जाणवायची बाकी :))

कोल्हटकर सर मुद्दाम कधीतरी आम्हाला ऑफिसर्स मेस मध्ये घेवून गेले. ती ऑफिसर्स मेस आम्ही रोजच पहायचो पण आत काय असेल याची कुणालाच कल्पना नव्हती. एक दिवाणखाना, भिंतीला चितळाची शिंगे, चकाचक फर्निचर, ऑर्डरली इकडून तिकडे फिरतायेत आणि सर् त्यांना सगळ्यांसाठी चहा आणायला सांगतायेत. आम्ही जरा भेदरूनच बसलो होतो. त्यांना आम्हाला ऑफिसर्स चा थाट दाखवायचा होता. आर्मी मध्ये कसे ऑफिसर्स ची ठेप ठेवली जाते, दिमतीला ऑर्डरली असतात हे सांगायचे होते. ते म्हणाले कि तुम्ही खिशाला चाट पडली तरी महाग हॉटेल्स मध्ये जावून बघा. तिथलं वातावरण अनुभवा. तिथे गेल्यावर तुम्हाला ते आवडले तर तुम्ही ते मिळवण्यासठी प्रामाणिक प्रयत्न कराल. तिथले सोफिस्टीकेशन तुम्हाला हवेहवेसे वाटेल ते तुम्ही अंगी बाणवण्याची कास धराल. मला माहीत नाही त्यांच्या पध्दती किती बरोबर होत्या, पण मला ते खूप भावले.

एकदा समाजवाद विषयावर सरांची एक शिष्या अभ्यास घेत होती. त्यावेळी मी तिला विचारले कि समाजवाद(Socialism)आणि साम्यवाद (Communism) यात फरक आहे का? खरेतर त्यात फरक आहे हे मला थोडेफार माहिती होते, पण इम्प्रेस करायचा चान्स का सोडवा, म्हणून लगेहात विचारले तिला. मला या शब्दांचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. भांडवलवादाचे (Capitalism) जगात निर्विवाद प्राबल्य का? समाजवाद एवढा चांगला असताना घोड्यानं कुठं पेंड खाल्ली? सोविएट युनियन चे तुकडे का झाले? चीन खरच साम्यवादी आहे का? विचारवंताना अपेक्षित असलेला आदर्श समाज तिथे खरेच निर्माण झालाय का?

आज जगाची परिस्थिती पाहता, आपण नक्कीच आदर्श स्थितीत आहोत असे कुणाला वाटेल याची शंका वाटते. पण मनुष्यजातीने इतिहासात आदर्श समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी खरोखर महान प्रयत्न केले ही एक समाधानाची बाब म्हणता येईल. समाजवाद आणि साम्यवाद ही एक कृत्रिम व्यवस्था आहे. प्राण्यांची मूळ वृत्ती पाहता, आजचा भांडवलवाद हाच खरेतर नैसर्गिक वाटतो. स्पर्धा करणे, एकमेकांवर मात करण्यासाठी डावपेच लावणे, सत्ता गाजवणे, दुबळ्यांना गुलाम बनवणे हि मनुष्यप्राण्याची मूळ प्रवृत्ती. इतिहासात ती ठाई ठाई दिसते. पण विसावे शतक या मूळ प्रवृत्तीला मुसक्या बांधून माणसाने एक नवीन व्यवस्था निर्माण केली आणि जवळ जवळ शतक भर चालवली यासाठी नेहमीच वेगळे गणले जाईल.
-*-

१. व्ही. लक्ष्मीनारायण हे हिंदी सिनेमातल्या काल्पनिक नायकांपेक्षा हिरॉईक आणि तरीही वास्तविक पात्र आहे. सध्या कर्नाटक, आंध्रातल्या खाणमाफियांचे-राजकारण्यांचे नेटवर्क उद्धवस्त करतायेत.
मागच्या महिन्यात मध्य प्रदेशमध्ये एका आय.पी.एस. चा खाण माफियांनी घेतलेला बळी पाहून त्यांचे कार्य किती जोखमीचे आहे हे दिसते. त्यांच्याविषयी काही दिवसांपूर्वी सकाळ मध्ये आलेला हा लेख-
http://www.esakal.com/esakal/20120212/5409910696013669020.htm
आणि खाली माझी प्रतिक्रिया.
२. इंजिनियरिंग च्या सोडा, इतर कुणीही हे विषय अभ्यासणे म्हणजे वेळेचा अपव्यय. यु./एम.पी.एस.सी. ला हे विषय लागतात एवढेच यांचे शालेय जीवनात महत्व.

चित्र सकाळ मधून.