Saturday, November 16, 2013

राम-लीला : नाय पाह्यला तर ताप आन बघून पश्चात्ताप.


जास्त गाजावाजा केलेले पिच्चर पहिल्याच दिवशी पाहायचे म्हणजे मोठी रिस्क असते. मी सहसा त्यांच्या वाट्याला जात नाही. पण लडिवाळ आग्रह मोडू नये असा एक नियम असल्याने.. (म्हणजे असे कितीसे प्रसंग येतात हो.. नाहीका?) मी घेतली रिस्क. आणि पाहिला "गोलीयोंकी रासलीला: राम-लीला" असे अवघडलेले नाव झालेला सिनेमा.

आता सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर-
रामलीला असे साधे सुंदर नाव बदलायला लागण्याएवढे काही या पिक्चर मध्ये काही वाईट आहेका? की हा उगीच आपल्या उपटसुंभ संस्कृतीरक्षकांचा निव्वळ उथळपणा?
काल हापिसात जेव्हा याच्यावर खलबत चालू झाले तेव्हा मी उसळून म्हणालो होतो की "कलाकृती कशी असावी आणि त्यात काय टाकावे याचे लायसेन्स देण्याएवढा हिंदू धर्म तालिबानी झालाय का?" (टाळ्या.. शिट्ट्या.. धन्यवाद!)

मी माफी मागतो त्या उपटसुंभ संस्कृतीरक्षकांची. बिचारे, त्यांनी हा पिच्चर रीलीस होऊ दिला यात उलट आपल्या हिंदूधर्मीयांची अफाट क्षमाशीलता दिसून येते. फक्त नावावर भागवले? वाह.. वाह..

पिच्चर च्या पहिल्या पंधरा मिनिटात हनुमान आणि कृष्णाच्या वेशभूषेतले एक्स्ट्राज् साउथ इंडियन स्टाईल राडा डांस हिरोच्या मागे करताना पाहूनच मला या गोष्टीचा उलगडा झाला. बरं हा रामाचा उल्लेख आणि त्याच्या प्रतिमेचा चित्रपटभर वापर, कथेची, कलाकृतीच्या सौंदर्याची गरज आहे का? मुळीच नाही. मग 'आ बैल मुझे मार' पद्धतीने आमच्या भावनेला दुखावण्याचे संजय लीला भन्साळी सारख्या तरल दिग्दर्शकाच्या मनात का आले असावे हे रामच जाणे. हाच तो "हम दिल दे चुके सनम" चा भन्साळी? हा प्रश्न आत्ता जसा हाच तो "सत्या"चा राम गोपाल वर्मा? अशा तीव्रतेने पडतो.

मी रोमीओ ज्युलिएट वाचले नाही, बघितले नाही, ऐकले नाही, त्याच्यावरून इन्स्पायर्ड झालेले पिक्चर ही पहिले नाहीत. त्यामुळे कथानकाची नाही म्हटले तरी उत्सुकता होती. पण चित्रपटाचे गणित एवढे चुकलय की फक्त पिक्चर कधी संपतो एवढीच उत्सुकता लागून राहिली होती मला थेटरात.

कथा: (spoiler)
गुजरातच्या कच्छ च्या रण मधल्या एका गावात शस्त्रास्त्र, मिरच्या, मीठ, आणखी काहीबाही किडूक मिडूक विकून धंदा करणारी दोन कुळे आहेत. इथे पुरुषांच्या काय मिरच्या निवडणाऱ्या बायका आणि लहान मुलांच्या कमरेला पिस्तूल. त्यांच्यात गेल्या पाचशे वर्षांची पुरानी दुश्मनी. एका कुळाचा दीपक 'राम' (रणवीर सिंग) आणि दुसऱ्या कुळाची कुलदीपिका पादुकोण - 'लीला'. असे असल्यावर दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडणार आणि चोरी छीपके मिलके एकमेकांच्या घरच्यांना वाकुल्या दाखवत निषिद्ध प्रेमाचा आस्वाद घेणार हे ओघाने आलेच.

असे सुरळीत असताना राम च्या भावाचा लीला च्या भावाकडून चुकून खून होतो. [1]
राम याचा बदला म्हणून लीलाच्या भावाला तिथेच मारतो. आता राम आणि लीला एकमेकांचे भाऊ चितेवर पोहोचतायेत तोवर "तुझ्या भावाने माझ्या भावाला मारले, अन मी तुझ्या भावाला मारले.. फिट्टमफाट!" म्हणून एकमेकांसोबत पळून जातात. लॉज वर राहतात, लग्न काय करतात..

इकडे लीला ची आई (सुप्रिया पाठक) आपल्या गुंडांना पाठवून लीलाला परत गावात आणते. राम ला त्याचे मित्र समजूत काढून गावात आणतात. आणि त्याचे आख्खे कूळ भावाचा बदला घेतल्याबद्दल (दुसऱ्या कुळाचा त्यांची अशा प्रकारे बदनामी करून) वरात काढतात. त्याचे वडील त्याला स्वताच्या जागी कुळाचा मुखिया बनवतात. पहिल्यापासूनच नाच गाणे, प्रेम, मित्र, पॉर्न (हो) अशा गोष्टीत असलेल्या रामाला [2] ही नसती आफत नकोच असते.
मग या राम-लीलेचा आकांत आणि घरच्यांचे डावपेच, एकमेकांच्या कुळातल्या माणसांची हत्या, त्यांच्यातल्या राजकारणाला प्रेमात घुसडणे, सत्ता मिळवण्यासाठी धडपडणारा एक खलनायक अशा नेहमीच्या मार्गाने पिक्चर प्रवास करतो.

आता हा पिक्चर का नाही आवडला -
१. संकलन.. काहीतरी गंडल्यासारखे वाटते. दोन कुळांची दुश्मनी विनोदी पद्धतीने दाखवायला सुरुवात केलीये. त्यानंतर त्यात गंभीरता घालायला दिग्दर्शकाला नाही नाही ती कसरत करावी लागते. अरे का? मग आधी
सुप्रिया पाठक
कशाला झक मारली विनोद करून?
हेच सुप्रिया पाठकच्या बाबतीत. 'खिचडी'च्या हंसाच्या बाजाने बोलणाऱ्या लीलाच्या आईला, सिरीयसली घेताच येत नाही. एका अनपेक्षित खतरनाक कृत्यामुळे (इंटरवल नंतरचा लीलाचे लग्न ठरवतानाचा सीन) कुठे आपल्याला तिच्यातल्या डॉनची थोडी भीती वाटायला लागते. पण तोपर्यंत तिचा अभिनय संकलनामुळे व्यर्थ गेला ना भौ.
सूडाग्नीत उध्वस्त झालेली कुटुंबे, कुळे आणि हा अनर्थ वेळीच रोखण्यासाठी मोठ्या लोकांच्या तडजोडीची आवश्यकता हा कथेचा पैलू फार उशिरा घुसल्यामुळे काहीच परिणाम करत नाही.

२. दीपिका पादुकोण
अरे ही भारी दिसते पण अशा इन्टेन्स कथेसाठी लागणारा सशक्त अभिनय नाहीये तिच्याकडे. पण त्यात तिचा काय दोष.. एकीकडे एखाद्या चित्रकाराला प्रेरणा देईल असं सौंदर्य दाखवायचंय आणि दुसरीकडे अल्लड, उतावीळ मुलगी ते कुटुंबाच्या भाईगिरीच्या धंद्यात डॉन.. असे अवघड प्रसंग दाखवायचे, यात दमछाक होत असेल बिचारीची. असूदे असूदे हो डीप्स.. तू छान दिसतेस हेच फार आहे. त्यामुळेच तर पिच्चर सुसह्य होतो. उगी अभिनय वगैरे च्या भानगडीत पडायची गरज नाही.

३. संजय लीला भन्साळीचा उडालेला गोंधळ.
पिच्चर बोल्ड करावा का साधा हा प्रश्न त्याला पिक्चर रीलीस झाला तरी सुटला नाहीये. काही डायलॉगस् भयानक बोल्ड आहेत..रणवीर ते आरामात म्हणतो आणि करतो पण. आपली डीप्स बिचारी गडबडते. कथेत दाखवलाय म्हणून बोल्ड झालेली लीला, म्हणू का नको, करू का नको, हात लावू का नको.. अशी वावरलिये पूर्ण सिनेमात. त्यापेक्षा तिची वाहिनी झालेली फुकरे मधली रिचा चढ्ढा या रोल ला जास्त अनुरूप होती. पण मग डीप्स् चे सोंदर्य कसे दाखवणार.. गोची इथे आहे.
फुकरे मधली रिचा चढ्ढा

४. कैच्या कै गाणी. 
कुठेपण. एक दोन गाणी दीपिका आणि रणवीर मुळे देखणी झालीयेत. सुश्राव्य वगैरे लांबच हं. ते प्रियांका चोप्राचे गाणे म्हणजे कहर आहे. भन्साळीला प्रियांकाचे फ्री कुपन्स मिळाले होते आणि त्याने ते बळच रिडीम केलेत अस्सं झालंय ते गाणं.

आता बघितला तरी चालेल.. असे का?
१. दीपिका पादुकोण
दीपिका चे निस्सीम भक्त असाल तर.
मस्त दिसलीये. भन्साळीच्या सेट्स वर संथ प्रकाशात क्यामेरा फक्त तिच्यासाठीच.

२. रणवीर सिंग.
मला लुटेरा मध्येही याचे काम आवडले होते. पठ्ठ्या प्रॉमिसिंग आहे. फसलेल्या पटकथेला सावरण्यासाठी कष्ट करतो बिचारा.

3. सिनेमटोग्राफी चांगलीये.
कच्छ मधले गाव, त्यातल्या गल्ल्या, नदीवरचे घाट चागले चित्रित केलंय. वेशभूषापण जमून आलीये. धोतरात कोणी भारी दिसू शकतो याच्यावर विश्वास बसतो.

४. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्युलिएट ची सज्जा (बाल्कनी). ज्याच्या खाली बसून रोमीओ तिच्यासाठी गातो. इकडे आपला रोमीओ गाण्याच्या भानगडीत न पडता डायरेक्ट बाल्कनीत. तर ही बाल्कनी दीपिका सारखीच फुरसतमे बनाई है. त्या बाल्कनी साठी बघावा च्यायला.[3]

असा हा पिक्चर नाही पहिला, तर दीपिकाचे नुसते पोस्टर बघून ताप येईल; आणि पाहिला तर कथेचा बोजवार्या बघून पश्चात्ताप होईल.

_*_

[1] हा खून एकदम हास्यास्पद आहे. मूळ रोमीओ ज्युलिएट मध्ये काहीतरी "duel" टाईप चे असावे. भारतात ही duel ची प्रथा नसल्याने दिग्दर्शकाने उगीच आपले बीयर च्या बाटल्या उडवताना हिरोच्या भावाला मारलाय.

[2] दुखावल्या का नाही भावना?.. मग..म्हणे उपटसुंभ.

[3]पूर्वीची थियेटर असती तर 'बाल्कनीसाठी बाल्कनीत जाऊन बघा' वगैरे असा पांचट जोक मारला असता. पण इथे आम्ही नवीनच चालू झालेल्या मगरपट्ट्याच्या सिनेपोलीस ला गेलो होतो. या मॉल ला १५ स्क्रीन आहेत. रस्ता ओलांडला की अमनोराच्या आयनॉक्स मध्ये ८ स्क्रीन. काय मस्तीये अंगात लोकांच्या! मगरपट्ट्याचा अभिमान नक्कीच आहे.. पण, १०० मीटरच्या परिघात २३ स्क्रीन्स? २३ सार्वजनिक टॉयलेट्स पण नसतील अख्ख्या हडपसर मध्ये.