Saturday, December 17, 2011

टू अॅन्ड अ हाफ मेन-१इथे मला थोडं रडायचं आहे, त्यामुळे जर एखाद्याला डायरेक्ट टू अॅन्ड अ हाफ मेन वर उडी मारायची असेल तर भाग २ पाहावा.
विषयाला सोडून लिहिले म्हणून कोणी टांगणार आहे का? गेले एक महिना मला या विषयावर लिहायचे होते. लिही लिही असा आग्रह कितीदा झाला. म्हणजे आग्रह स्वतःचा स्वतःच केला, कारण आमचा ब्लॉग हा काही फार जणांच्या कौतुकाचा विषय नाही, त्यामुळे "लिही की, का न लिहिण्याएवढे तुझे आयुष्य तृप्त झालंय"[१] असहि कोणी विचारत नाही, कि "तुझ्या पुढल्या पोस्ट ची आतुरतेने वाट पाहतोय" अशी लडिवाळ कॉमेंट येत नाही. उलट "बरय बेणं गप् पडलय" असाच सूर जास्त.

बंगलोर ला महिन्यातून माझे ५ पिक्चर होत होते. काढली अॅक्टीवा कि निघालो पिक्चरला असे एकंदरीत चालले होते. या आठवड्यात एकही पिक्चर रिलीज नाही झाला म्हणून नुसतेच बर्गर खावून मॉल मधील माल [२] पाहून परत येण्याचे कठीण पण प्रसंग आले. सजितने आपण या मॉल चा मासिक पास काढू अशी आयडियाही दिली होती. रात्री पिच्चर बघून येणे आणि दिवसा सोयीप्रमाणे ऑफिस ला जाणे. पण जसे बंगलोर सोडून पुण्यात आलो, मेरे तो दिन हि बदल गये.

भल्यापहाटे ७.३५ वाजता उठावे लागते. नित्यकर्म आणि आंघोळ करतो. आंघोळ रात्री करून ठेवल्यामुळे फक्त दात घासणे आणि पाणी ओतणे एवढेच काम उरते. आजीने टेबलावर ठेवलेला दुधाचा ग्लास संपवतो आणि २ केळी आणि लाडू बॅगेत कोंबतो. की ७.५७ वाजता घराबाहेर. कंपनीची बस घरापासून जवळच येते, त्यामुळे ८ वाजता बसस्टॉपवर हजर होतो. बसमध्ये गेल्यावर निवांत केळी आणि लाडवावर रवंथ करत बसायचे. पुढला १.३० तास बोम्बलत काही काम नाही.

म्यानेजर ची बोलणी खाणे, दिलेल्या कामापेक्षा भलतेच काम करणे, दिवास्वप्न पाहणे, आणि कंपनी भोवतालचं कुंपण बघून "मला पण आयर्नमॅन सारखे पायात रॉकेट बुस्टर्स असते तर" या विषयावर मानसिक निबंध लिहिणे. या सगळ्यात वेळ कसा जातो समजत नाही. मग रात्री ८.२० च्या बसमध्ये बसायचे आणि परत १.३० तास बोम्बलत काही काम नाही.

१० वाजता घरी आले तर मूड असेल तसा व्यायाम करणे, टीवी वर एखाद पिच्चर मधूनच पाहणे आणि सोडून देणे, आणि मग निवांत अर्धा तास सकाळी राहिलेली अंघोळ करत बसायची.
रात्री एक दोन फोन होतात. मला जीवन विमा, वाहन विमा, क्रेडीट कार्ड, पोस्टपेड, बँक, टाटा स्काय वाल्यांना रात्री १२ नंतर फोन करून डिवचण्याची भारी खोड. त्यात जर कोणी मराठी हेल्पलाईन नसलेली सर्विस असेल तर मी त्यांचा अर्धा तास किस काढतो, असूनही जर कोणी हिंदीत बोलायचा आग्रह केला तर माझा जाळ होतो, क्रेडीट कार्डाची ड्यू डेट संपल्यावर पेमेंट केले म्हणून इंटरेस्ट तर आहेच पण दंड मारला की मग मी लई नडतो. भाजीवाल्याशी घासाघीस करता येत नाही त्याचा सगळा राग या पब्लिक वर काढतो. अगदी सौजन्याने हं, कस्टमर ने शिव्या देणे हि काय गोष्ट असते हे मला माहितीये, त्यामुळे मी तसली भाषा वापरत नाहि. पण यात वेळ चांगला जातो असे एकंदरीत निरीक्षण आहे. मला राज ठाकरेंचा आता भारी राग येतोय, कारण या कॉलसेंटर वाल्यांनी अचानक एके दिवशी सुरळीत मराठी सेवा चालू केली, आणि मग मला माझे मराठी प्रेम दाखवायला जास्त चान्स मिळत नाहीये.
आता मी रोज 'फक्त' कॉलसेंटर वाल्यांना फोन करतो आणि वेळ घालवतो हे सांगण्याएवढा मी काही चंट नाही कि समजणारे बावळट नाहीत. पण असो.

माझ्याकडे स्मार्टफोन नाही, म्हणजे आहे, पण त्याला २ वर्षापूर्वी लोकांनी स्मार्ट म्हणणे सोडून दिले. मी आपला 'आपला तो बाब्या' या न्यायाने त्याची अजूनही समजूत घालत असतो कि तू एवढाही 'ढ' नाहीस म्हणून. तर, त्यामुळे मला बसमधल्या दीड तासात बाकी काही बघता पण येत नाही. डोक्याला विचारांची जळमटं कमी, म्हणून या महिन्यात जी.एंची एकदम तीन पुस्तकं फ्लिपकार्ट[३] वरून मागवली. तर हे जी.ए, काय.. च्यामारी रक्त, मांस, हाडे, कवट्या याशिवाय एखादे रूपक नाही का? पण बीयर आणि रेहमान प्रमाणेच जी.ए. पण हळूहळू चढतायेत.

आता मग विकेंड ला काय झाले पिक्चर बघायला?
शंका रास्त आहे, पण कंपनी माझ्यासाठी चिंचोके मोजत असती तर हे केले असते. पण अपेक्षा भारी आणि आमचा दिनक्रम असा, त्यामुळे वीकेंडला ऑफिस मध्ये जावून येतो. पण सोमवारी परत लक्षात येते कि दिल्या कामापेक्षा भलतेच काम केले. म्हणून मग परत विकेंड ला यायचा प्लॅन करतो. त्यामुळे माझा क्रिटिक म्हणून जो मी राज्याभिषेक करून घेतलाय (लातूरकरांच्या भाषेत उदबत्त्या ओवाळल्यात) त्याला मला आता न्याव देता येत नाहीये.

मी 'रॉकस्टार' बघितला नाही, 'देऊळ' नाही, 'टीनटीन' नाही, 'डर्टी पिक्चर' नाही, आणि आता 'मिशन इम्पॉसिबल' पण पॉसिबल[२] वाटत नाही. त्यामुळे दुकानाची पाटी बदलावी की काय असा विचार पण मनाला शिवून गेला. पण एक बारीकसा आशेचा किरण आहे. गेल्या महिन्यात 'टू अॅन्ड अ हाफ मेन' चा पहिला सीझन पाहण्यात आला. म्हणजे आधी हि मालिका पाहत होतो पण तो पाचवा सहावा ऋतू असेल. पण पहिला म्हणजे 'क्या बात है' असा. त्यामुळे पिच्चर नाही तर मालिका सही असे म्हणून मी पाटी ठेवण्याचा हक्क तरी सहीसलामत ठेवला आहे.

-*-

[१] मला या वाक्याबद्दल आदर आहे, ज्यांनी ते लिहिले आणि ज्यांच्यासाठी लिहिले त्यांच्याबद्दल ही.
[२] अरेरे, कितीहे कल्पनेचे दारिद्र्य..आमची कल्पना कधी बी.एम.डब्ल्यू. मधून फिरणार, देव जाणे. या क्लिशेंमधून कधी बाहेर येणार तू कल्पना..?
[३] आपल्या देशात असली सेवा असू शकते, याच्यावर विश्वास बसण्यासाठी एकदा वापरून बघाच. मी आता चौथ्यांदा पुस्तके मागवली इथून, अगदी परफेक्ट आहेत हि लोकं. जी.एं. कुलकर्णींची 'सांजशकुन', 'पिंगळावेळ' आणि 'पारवा' ही पुस्तकं सवलतीसहित घरपोच मिळाली. पैकी 'सांजशकुन' हे वाचून होईल आता.