Monday, October 24, 2011

आली एकदाची..

काल बँगलोर च्या मेट्रो ने प्रवास केला. प्रवास केला म्हणजे, एका स्टेशन वरून चढलो, दोन स्टेशन सोडून उतरलो, आणि परत विरुद्ध बाजूने चढून प्रारंभीच्या स्टेशन वर आलो. थोडक्यात गाडी गाडी खेळलो. गेली पाच वर्षे जिची बंगळूरकर आतुरतेने वाट पाहत होते तिचा पहिला टप्पा सुरु झाला या आठवड्यात; आणि लोकांनी आपली लाडकी मेट्रो बघायला रजनीकांतच्या सिनेमाला होते तशी गर्दी केली. रविवार ची सुट्टी साधून काही मंडळी सहकुटुंब या चमत्काराला पाहायला आली होती. जशी स्टेशन वर एन्ट्री घ्यायची तशी आरोळ्या आणि शिट्ट्या मारून आनंद व्यक्त करत होते.
माझाही हा पहिलाच मेट्रो प्रवास होता. मी दिल्ली मेट्रो नाही अनुभवली त्यामुळे मलाहि तिचे अप्रूप होतेच.


या शहराने अक्षरश: हाल सहन केले आहेत हा दिवस पाहण्यासाठी. पूर्ण बँगलोर खोदलेले, अशक्य ट्रॅफिक, प्रत्येक रस्त्यावर मेट्रोचे खांब टाकायचे काम चालू, रस्ता धुळीने माखलेला अशी अवस्था प्रत्येक मुख्य मार्गांची. अजूनही कामे चालूच आहेत. मी स्वतः अनुभवलेली गोष्ट म्हणजे ८-१० किमी जायचे असेल तरी नको नको व्हायचे. बरं इथली ट्रॅफिकच वेगळी.. हे रुंद रोड पण एकदा अडकले तर ५-५, १०-१० मिनिटे गाडी हलवता पण येत नाही. बऱ्याच ठिकाणी गटारे उघडीच असल्याने असह्य वास. अशा परिस्थितीत जिच्यासाठी हे सर्व सहन केले ती रुळावर बघून जल्लोष होणार नाही तर काय?

महात्मा गांधी रोड वरच्या स्टेशन वर कौतुकाने फोटो काढून घेणारे काका काकू.

अभिमान वाटला हिला बघून. स्मरणिका म्हणून तिचे एक रिचार्जेबल तिकीट घेतले.

Saturday, October 22, 2011

जलते है जिसके लिये

आज सकाळी परोठे, दही आणि लोणी घेवून यज्ञकर्म चालू होते. सजित पेपर वाचता वाचता म्हणाला की की हा ब्रेस्ट कॅन्सर वरचा लेख पहिला का? तसा पेपर वाचनाची माझी आणि त्याची वेळ वेगवेगळी. दोघेही अगदी नित्यकर्म मानून पेपर वाचत नाही. पण रोज सकाळी तो टाईम्स ऑफ इंडिया चा पाटीभर जाहिरात कम बातमीपत्र वाला गठ्ठा दारासमोरून उचलून आणतो जरूर. त्या गठ्ठ्याचा उपयोग किचन मध्ये, जेवताना खाली अंथरायला आणि क्वचित कधीतरी वाचायला म्हणून होतो.

मी बऱ्याचदा बँगलोर टाईम्स वाचतो, न जाणो कुठून मी हि सवय लावून घेतली. टॉयलेट मध्ये उगीच जड विषय नको पेलायला म्हणून कदाचित मला या वाचनाची आवड लागली. पहिले पान कुठलीतरी नवीन इनमीन ३ सिनेमे केलेली बया सांगत असते की "माझं सर्व लक्ष फ़क़्त करीयर आहे आणि अमका तमका माझा फ़क़्त चांगला मित्र आहे". कुणी बॉलीवूड चा नट-नटी आयुष्यात पहिल्यांदाच बँगलोर ला आले असले तरी "ह्या शहराशी माझे कित्ती-कित्ती गहिरे नाते आहे" वगैरे भंपक टाकत असतो. कन्नड सिनेमांच्या नटांना उगीच कुठेतरी कोपर्यात परमनन्ट आरक्षण असते, न जाणो उद्या कनसे निघाली तर?
पान दोन पूर्ण जाहिरात, पान तीन कुठल्या तरी पार्टीचे फोटो आणि त्याच्या खाली विन्ग्रजीतले वापरून वापरून बोथट झालेले वाक्प्रचार, काय म्हणतात त्याला.. क्लिशे, ब्रोमाईड की काय ते. तथाकथित सोशलाईटस्. मला या लोकांचे फोटो काढून छापणाऱ्या आणि त्यावर निर्वाह चालवणाऱ्या वार्ताहराची आणि सिग्नल वरच्या पोराची सारख्याच प्रमाणात कीव येते. ह्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे साला.. अरे आज लवकर सुटला सिग्नल, की पळा, उद्या परत ते सिग्नल वर आणि हे नवीन फोटो घेवून हजर.
चौथे पान नवीन रिलीज होणाऱ्या पिच्चर्स चे. हे कामाचे असते, विकेंड जाळायचा प्ल्यान बनून जातो बसल्या बसल्या. पाचव्या पानावर हॉलीवूड चा माल, सहाव्यावर केविन अॅन्ड हॉब्स आणि इतर मंडळी. शेवटचे पान परत..अमका हिला सोडून तिच्याबरोबर पार्टीला गेला, अॅष्टन कुचर डेमी मूरला वैतागला, येडी गागानं आज हे घातलं किंवा ते काढलं, कर्दीशीयान काकू अरबस्थानात आणि तिथल्या लोकांनी कशी नाकं मुरडली, ब्र्याड दादा आणि अंजेलिना ताईंनी त्यांच्या इम्पोर्टेड पिल्लावळी सहित दर्शन दिलं, असल्या चविष्ट गोष्टी.
वाचता-करता वेळ कसा निघून जातो कळत नाही.

अरे कुठं गेलं ते.. हा ब्रेस्ट कॅन्सर.. मला वाटते की मला सुटसुटीत आणि मुद्देसूद नाही लिहिता येत, उगाच आपले कुठल्यातरी पॉईंटला भरकटायला सुरुवात होते आणि लिखाणाचे तारू दुसरीकडेच जाते. जाउदे म्हणा, तसे लिहिण्याची कुवत असती तर प्रकाशक[१] नसतो झालो का बाप्पा?

परत, आता लंगरच टाकतो साला.. ब्रेस्ट कॅन्सर.
तर सजित म्हणे की जर स्त्रीकडून स्तनपान नाही झाले तर हे होण्याची शक्यता वाढते.
लगेच, शेंडा न बुडखा माहीत पण माझ्यातला तत्ववेत्ता नंगी तलवार घेवून चालू. कसं ना कसं काही लोकं असतात अष्टपैलू किंवा अष्टफेकू म्हणा हवतर. त्याला म्हटले हे बरंये यार, म्हणजे एखादीला लग्न करायचं नसेल किंवा पोरगं नको असेल तर तिनं काय करावं. तर तो म्हणे 'आता काय करणार निसर्गानच असं बनवलय तर?'; सजीत कधीकधी सेन्सिबल बोलतो तसा. पण म्हणजे तिने त्यासाठी लग्न केलेच पाहिजे, किंवा मग स्पर्म बँक मधून आणून, किंवा येन केन प्रकारेण आई बनायलाच हवे. अवघड आहे. बरं आई बनायचं कधी..? तर वेळेत. आता हि वेळ ठरवायची कशी?

आपली पिढी साला वाया गेली. करीयरच्या दृष्टीने आपण पाळतो अमेरिकेच्या प्रथा. २२-२३ वर्षापर्यंत शिका, नंतर सेटल व्हा, जोडीदार शोध त्यात मुलांचे आणि मुलींचे अपेक्षा, नखरे, आणि तथाकथित बौद्धिक पातळी वाढलेली, आणि याच्यातून निभावलोच तर लग्न करा. तोपर्यंत आपल्या महान भारतीय संस्कृतीखातर (इथे अमेरिकन नाही हं) उपाशी रहा. मला तर वाटते सरळ एक त एक संकृती अनुसरली पाहिजे. हि सरमिसळ कुणाच्याच हिताची नाही. जुन्या काळी लहान वयातच लग्न लावून द्यायचे त्यामुळे हाफ इंडिअन अर्धे अमेरिकन असा जो घोळ होतोय आता तो तरी नव्हता. कदाचित पुढची पीढी सुधारेल, म्हणजे एकतर इतके दिवस उपाशी तरी राहणार नाही किंवा बालविवाह प्रथा परत सुरु होईल. उद्या समजा असे कुणी ऑनलाईन पोर्टल काढलं book-my-son-inlaw.com किंवा book-my-daughter-inlaw.com नावाचे तर नवल नाही वाटणार.

ही लग्नाची प्रथा पण मजेदार आहे. शिक्षण झाले, चांगले कमवायला लागले, पिक्चर बघून बोर झाले की काही नाही म्हणून चला लग्न करू. सद्यस्थितीत (मी याला "मानसिक टाईमस्टँप" ही संज्ञा काढली आहे, बारीक फॉन्ट मधला TM बघावा) मला तरी यात राम वाटत नाही. सद्यस्थितीत हं, निरीक्षकांनी उद्या परत टाईमस्टँप बदलला म्हणून जोडे मारू नयेत. विचार करता करता वाटले की माणसाचे वाढलेले आयुष्यमान आणि त्यात आलेले सातत्य[2] हे लग्नाला होणाऱ्या वाढत्या विरोधाचे कारण असावे. पूर्वी आयुष्य म्हणजे कधी काय होईल याचा भरवसा नाही, आज याला डायनोसॉरस ने खाल्ले उद्या त्याला म्यामथ ने तुडवले अशा पद्धतीचे. शिकार करा आणि खा. आज शिकार मिळाली तर दिवस कारणी, आज जंगलातून येवून जगलो वाचलो तर उद्याचे पाहू अशी जीवनशैली. त्यामुळे जोडीदार कसा मिळावा याच्या अपेक्षा जेमतेमच. कारण उद्या ती आहे की मी नाही कुणाला माहिती? आज म्हणजे लग्न केलं की पुढची ५० ६० वर्षे या व्यक्तीबरोबर काढायची म्हंटल्यावर तथाकथित वाढलेली बौद्धिकपातळी 'तिसरा म्याट्रीक्स' पाहताना जशी कावरीबावरी होते तशी होते. त्यामुळे जोडीदार मिळवणं (लग्नासाठी) हा अवघड आणि नावडता प्रकार आहे याबद्दल कुणाचे दुमत नसावे.

आता टायटल ना व्याव द्यावा म्हणून.. जलते है जिसके लिये.. खरच किस लिये?

माझे लिखाणाचे तारू लंगराला पण जुमानत नाही राव.

[१]- जे.के.रॉलिंग काकू नवीन पुस्तक लिहीतायेत म्हणे आणि स्वतःच प्रकाशक बनून इतर प्रकाशकांच्या पेकाटात लाथ मारली आहे असे ऐकून आहे.

[२]- अगदी अश्मयुगात जाण्याची गरज नाही, सर अर्नेस्ट शॅकलटन यांच्या अंटार्क्टिका मोहिमेवेळी त्यांनी हि जाहिरात दिली होती म्हणे.

"MEN WANTED FOR HAZARDOUS JOURNEY.
SMALL WAGES. BITTER COLD.
LONG MONTHS OF COMPLETE DARKNESS. CONSTANT DANGER.
SAFE RETURN DOUBTFUL.
HONOUR AND RECOGNITION IN CASE OF SUCCESS."


आता त्यांनी खरेच हि जाहिरात दिली होती का हा वादाचा विषय आहे, पण त्यांच्या मोहीमेची कथा या जाहिरातितल्या वर्णनाला खुजी करील अशी आहे. अशा मोहिमा आज होतात?
त्यांच्या या मोहिमेविषयी.

Sunday, October 16, 2011

द बिग बँग थियरी: शास्त्रज्ञांतल्या माणसांचे जग-२

आमचे परममित्र हेमचंद्ररावजी साहेब, हे दोन वर्षांपूर्वी अमेरिकेला गेले खरे, पण जेव्हा परत आले तेव्हा कंपनीने त्यांना (एकटेच) हनिमूनला पाठवले होते की काय, असा प्रश्न पडला. दोन महिन्यात पश्चिम अमेरीकेतली बरीचशी लोकप्रिय पर्यटन स्थळे फिरले आणि तिथे त्यांचे ढीगभर ट्रेडमार्क पोझ मधले फोटो काढून आणले. येताना मित्रांसाठी चॉकलेटं आणि तिथल्या द्रुतगती इंटरनेटचा वापर करून संग्रहित केलेले पिक्चर आणि मालिकांचे ऋतूचे ऋतू घेवून आले. हेमंत.. जाहीर आभार.
या संग्रहामध्ये हा फोल्डर होता The Big Bang Theory नावाचा. म्हटले असेल नॅट जिओ, नाहीतर डिस्कवरी ची डॉक्युमेंटरी. एक दिवस असाच माझ्यातला स्युडो-सायंटीस्ट जागा झाला आणि म्हटले बघूया तरी, कळले तर कळले नाहीतर उद्या उठून कोड-फोड आहेच. आणि अशी सापडली माझी सर्वात आवडती सिटकॉम.
शेल्डन कूपर हे मालिकेचे मध्यवर्ती पात्र. हा शेल्डन आहे दैवी प्रतिभा लाभलेला सैद्धांतिक भौतिक शास्त्रज्ञ. त्याच्या जगात आहे त्याचा रूम-पार्टनर लेनर्ड हॉफस्टेडर आणि त्याचे आणि नाईलाजाने शेल्डन चे झालेले मित्र हॉवर्ड वोलोवित्झ आणि राज कुथ्रपल्ली. लेनर्ड हा प्रायोगिक भौतिक शास्त्रज्ञ तर राज खगोलशास्त्रज्ञ, आणि हॉवर्ड हा एम.आय.टी. मधून पदवी मिळवलेला 'फक्त' अभियंता. हॉवर्ड जगातल्या सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या विद्यापीठातून जरी शिकला असला तरी पीएचडी धारक नसल्याने शेल्डन चा राखीव मित्र आहे. हे सारे कॅलटेक मध्ये संशोधन आणि कधीतरी व्याख्याता म्हणून काम करतायेत. या सर्वांचे जगच वेगळे. त्यांच्या या ग्रुपमध्ये पेनी आहे. २२-२४ वर्षांची कधी व्यवहारी कधी स्वप्नाळू मुलगी. शेल्डन हा म्याटर असेल तर हि अॅन्टीम्याटर.

शेल्डन ने वयाच्या सोळाव्या वर्षी त्याच्या दोन पीएचडयांपैकी पहिली पीएचडी मिळवली. आय.क्यू. १८७. लहानपणी बहिणीची मांजर घरी बनवलेल्या CAT स्कॅनर मध्ये जाळली, तर घरी अणुभट्टी बनवण्यासाठी संपृक्त युरेनियम इंटरनेट वर शोधत होता म्हणून पोलीसांनी एकदा पकडलेले. त्याच्या चारचौघींसारख्या धार्मिक आईचा, 'आपल्या मुलाच्या बुद्धिमत्तेचा आपल्या घराशी काही संबध नाही.. आणि ती चक्क जिझस कडून त्याला मिळालीये', असा प्रामाणिक समज आहे. शेल्डनला बाकीची पोरं किती मूर्ख आहेत हे बघून रडू यायचे. असा स्वभाव असलेल्या मुलाला शेजारची टगी पोरं बदडून काढणार हे आलेच. त्यामुळे आपण या युगात चुकून जन्माला आलो आणि आपल्याएवढीच प्रगत जमात भविष्यातून येवून आपल्याला घेवून जाईन, अशी त्याला आशा होती. त्याचा आदर्श, स्टार ट्रेकचा 'स्पॉक' त्याला भविष्यात घेवून जाण्यासाठी आलाय अशी एकपात्री नाटुकली करायचा, पण नाटकात देखील आईला सोडून जाण्याची वेळ येई तेव्हा तो अजुनही लहान मुलासारखा रडतो. त्याला जेर्मोफोबिया आहे, एखादी खूप साधी गोष्ट अती विश्लेषण केल्यामुळे किचकट करतो, आणि ३० वर्षांचा असूनही सायंस सोडून कुठेही लहान मुलासारखा वागतो म्हणून त्याला लोकांना सांगावे लागते "I am not crazy, my mother had me tested".


लेनर्ड, त्या मानाने खूपच माणसात आहे. उच्च शिक्षित आईवडिलांचे तिसरे अपत्य. लेनर्ड ची आई मानसशात्रज्ञ आहे. आणि वडील पण वैद्यक शास्त्रज्ञ. घरी नेहमीच अभ्यासू वातावरण, ख्रिसमस ला शास्त्रीय लेखांचे वाचन, वाढदिवस साजरा करणे म्हणजे वेळेचा अपव्यय आणि नेहमी भावंडांशी स्पर्धा अशा वातावरणात बालपणी प्रेम नाही मिळाले. लेनर्ड ने त्याला कवेत घेवून थोपटणारा रोबॉट बनवला होता. त्याच्या आठवणीनुसार त्याचे बाबा या रोबॉटला कधीकधी त्याच्याकडून उधार घ्यायचे. लेनर्ड चा ओढा हा प्रेम आणि तद्वत भावनांकडे आहे, ज्या शेल्डन च्या दृष्टीने टाकाऊ आहेत. शेल्डन च्या उपदेश देण्याच्या स्वभावामुळे या दोघामध्ये नेहमी या कारणावरून लढाई जुंपत असते.


हॉवर्ड हा बेताची उंची आणि शरीरयष्टी असलेला. नासाच्या ISS, आणि इतर खगोलीय मिशन्स साठी उपकरणे बनवणे हे त्याचे काम. पोरींच्याबाबतीत जरा जास्तच लाळघोटेपणा. त्याला पाच भाषा बोलता येतात. साईन लँगवेज हि येते. या ज्ञानाचा वापर पोरींवर इम्प्रेशन मारण्यापलीकडे करत नाही. आईसोबत राहणारा, स्वतंत्र राहायची नुसतीच स्वप्ने बघणारा. तिसऱ्या सिझनमध्ये कायमस्वरूपी मैत्रीण - बर्नाडेट मिळेपर्यंत या इम्प्रेशन पाई त्याने मार्स-रोवर एका मुलीला चालवायला दिले आणि मंगळावरच्या एका खड्ड्यात पाडले. नंतर त्याच खड्ड्यात नासाला पाणी मिळते, म्हणून स्वारी वाचून जाते.राज.. हा दिल्लीचा. गर्भश्रीमंत, वडील गायनॅक. राज वर्कविसा वर अमेरिकेत आहे. भारतात फार गर्दी आहे आणि हॅम्बर्गर मिळत नाही या कारणासाठी त्याला अमेरिका सोडायची नाही. कुठल्याशा ट्रांस-नेप्चुनिअन लघुग्रहाचा शोध लावला, आणि त्याच पुण्याईवर आणखी सहा महिने फ़क़्त विकी वाचणे आणि फेसबुक स्टेटस अपडेट करणे यात टाईमपास केला. हॉवर्ड चा हा परम मित्र. हॉवर्डच्या सल्ल्यानुसार वागून कधी कधी संकट ओढवून घेतो. याची सर्वात विनोदी वृत्ती म्हणजे त्याला मुलींशी बोलता येत नाही. बोलता येत नाही म्हणजे वाचाच जाते. जर मुलीसमोर काही बोलायचे असेल तर हॉवर्ड च्या कानात कुजबुजतो. जर दारूच्या अंमलाखाली असेल तर मात्र कॅसानोवा होतो याचा. हॉवर्ड ला त्याचा या बाबतीत हेवा वाटतो.

पेनी राहते शेल्डन-लेनर्ड च्या समोरच्या फ्लॅट मध्ये. नेब्रास्कामधून एका रांगड्या परिवारातून आलेली पेनी अभिनेत्री होण्याची स्वप्ने पाहते. ऑडिशन देणे आणि निर्वाहासाठी चिस-केक फॅक्टरी या रेस्तरां मध्ये काम करणे, याशिवाय शेल्डन ची जिरवणे हा तिचा मुख्य उद्योग. पहिले तीन सिझन लेनर्ड तिच्या प्रेमात पडतो. तसे लेनर्ड ला कोणतीही मुलगी दिसली कि प्रेमात पडण्याची सवय. या ग्रुपला ताळ्यावर आणण्याचे काम बऱ्याचदा करते. तसे तिलाही तिच्या अडचणी आहेतच. बॉयफ्रेंड ने दगा दिला, सिनेमात नाही तर एखाद्या जाहिरातीत तरी काम मिळावे, भाडे देण्यासाठी पैसे नाहीत असे. शेल्डन-लेनर्ड पण मदत करतात तिची.

शेल्डन, राज, लेनर्ड आणि हॉवर्ड मध्ये काही समान दुवे आहेत. हे सगळे कॉमिक्स चे कट्टर फॅन. मार्वल कॉमिक्सचा स्टॅन ली हे त्यांचे दैवत. सगळे गेमाडपंथी.. निंटेन्डो पासून पीएस३ पर्यंत कन्सोल संग्रहात आणि सुपर-मरिओ पासून क्वेक,वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्ट पर्यंत सगळे गेम वार लावून खेळणे, खेळणी बनवणे, इंटरनेटवर बसून चाळे करणे, इंडियाना जोन्स, स्टार ट्रेक, स्टार वॉर्स, सगळे सुपरहिरोंचे सिनेमे एका बैठकीत पाहणे. कुठल्याही फुटकळ गोष्टींवर पैजा लावणे हे त्यांचे वेळ घालवण्याचे उद्योग.

बिग बँग एका बाबतीत भलतीच वेगळी आहे ती म्हणजे सायंस चा विनोदनिर्मिती साठी केलेला वापर. श्रोडिंगर चे मांजर, मादाम क्युरींचा रेडीयम चा शोध आणि त्याच्यामुळे झालेला मृत्यू, स्ट्रिंग थियरी मध्ये आलेली कोंडी, सापेक्षता, कालप्रवास असे सर्वसाधारण परिचयाचे आणि बरेच किचकट विषय सुद्धा खुपदा विनोदासाठी वापरलेत. या मालिकेचे शास्त्रीय संवाद खऱ्याखुऱ्या शास्त्रज्ञांकडून आधी तपासून घेतात म्हणे. नेपथ्यात वापरलेले व्हाईट बोर्ड दर वेळी नवीन लिहून घेतले जातात आणि त्यावर खरेखुरी समीकरणे पेरली जातात. शेल्डन च्या संवादामध्ये बऱ्याचदा फिसिक्स बरोबर इतिहास, संस्कृती, भाषा, सिनेमा यांचे संदर्भ येतात. बहुतेक वेळा एपिसोड संपला कि विकी मारावी लागते. चवथ्या सीझन मध्ये शेल्डनला मिळालेली मैत्रीण एमी हि न्युरोसायन्स मधून पीएचडी आहे.. खऱ्या आयुष्यातही.

अशा मालिकेची भुरळ शात्रज्ञांना पण पडली यात नवल काय? नोबेल मिळालेले भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज स्मूट हे स्वत:हून एका भागात पाहुणे म्हणून आले. आणि बऱ्याच भागांत अजूनही काही शास्त्रज्ञ येवून गेलेत.

एकूणच धमाल उडवून दिलीये काही अतिशय मेहनती नाही म्हणणार.. पॅशनेट आणि हुषार लोकांनी मिळून, असेल वेळ तर पाहायला करा सुरुवात. :)

द बिग बँग थियरी: शास्त्रज्ञांतल्या माणसांचे जग-१