Saturday, November 24, 2012

जब तक है जान-समीक्षेचे समीक्षण

मायबोली वरचे रसप यांचे जब तक है जान चे परीक्षण नेटावरती जोमाने फिरत आहे. अतिशय सणसणीत शैलीत शेरूक (हा शब्द तिथेच पहिल्यांदा वाचला आणि जाम हसलो) चा समाचार घेतलाय तिथे. पण त्याने शेरूक् आणि कंपनी - म्हणजे कारण जोहर, फराह खान यांना वाईट वाटायचे काम नाही. कारण हे समीक्षण वाचल्यावर हा पिच्चर चुकूनपण न पाहणारा मी, सहकुटुंब तो बघायला गेलो. आणि या समीक्षेने कुतूहल चाळवलय असे म्हणणारे पण भेटले.
रसप ने म्हटल्याप्रमाणे छायाचित्रण नेत्रसुखद आहे. या एका गोष्टीचं भांडवल करून मी माझ्या मनाला समजावलं आणि निघालो. खरंतर अनुष्का शर्माला पोस्टरवर बघूनच मी मनाच्या मागे लागलो होतो.. अरे प्लीज मला बघुदेरे हा पिच्चर!
समीक्षेचे समीक्षण म्हणजे भिक्षुकाच्या घरी माधुकरी मागण्यासारखे. पण असो.. फर्स्ट हँड काय सेकंड हँड काय भीक ती भीक.

खराडी मध्ये ढीग मॉल चालू झालेत आणि मल्टिप्लेक्स पण. त्यात ते नवीन बॉलीवूड मल्टीप्लेक्स शोधण्यात उशीर झाला. तोवर तो अनुष्काचा बिकिनी सीन होवून गेलेला, फ्लॅशबॅक चालू झालेला, शेरूक लंडन च्या रस्त्यावर गाणं म्हणत होता. हळहळत आई आणि मावशीला सीट शोधून दिल्या. त्यांना चित्रपटाची जुजबी माहिती दिली. पुढे ज्याचं त्याचं नशीब.

सर्वात जास्त उत्कंठा होती ती "भाजी निवडल्यासारखा तारा वेचून, तोडून, उपटून बॉम्ब निकामी करतो" या दृश्याची. पण सवयीमुळे पहिले २० मिनिटं गेली आणि पुढची भाजी इंटरवल नंतरच दिसली. आता रसपंनी वाईट गोष्टी सांगितल्याच आहेत त्यामुळे त्या सोडून मी काही जमेच्या बाजू सांगतो. नाही शाहरुक प्रेमी नाही. पण मला त्याचा तिरस्कारही नाही.

ज्या प्रकारे मीरा (कतरीना) च्या भाबड्या शपथांची खिल्ली उडवण्यात आलीये, पिक्चर बघितल्यावर तरी त्यामागचे तर्क एवेढे टाकाऊ वाटत नाहीत. असतात काही लोक श्रद्धाळू. आपल्याकडे 'नवस बोलणे' हा खूप कॉमन प्रकार आहे. साधं बघा.. भारत मॅच हरेल म्हणून टीवीवर  मॅच टाळणारे लोक आहेत. आपल्या लाडक्या मंगेशकर आजी तर तेंडूलकर शतकावर असताना बघत नाहीत. त्यांचे देव गमबूट आणि रेनकोट घालूनच बसलेले असतात.. न जाणो आजी कधी पाण्यात ठेवतील. त्यामुळे हा भाग पचायला कठीण का जावा हे कळत नाही.
मी तर म्हणतो की मध्यांतरापूर्वीचा लंडन मधला भाग हा नावं ठेवावी असा नाही. समर (शारुख) आणि मीरा(कतरीना) चे फुलत जाणारे प्रेम, तिची 'प्यार आणि फर्ज' मधली कोंडी, तिची नवस बोलण्याची सवय, त्यामागचा तिचा तर्क, शाहरुख चे तिला समजून घेणे, नीतू सिंग आणि  कतरीना चा संवाद (जो खुद खुश न हो, वोह दुसरोको खुशी नही दे सकता वगैरे), जमून आलेत. च्यायला त्या टनेल च्या सीन मध्ये कॅट काय भन्नाट नाचलिये.. मिनिटभर मी अनुष्काला पाहायला आलोय हे विसरलो. सर्वात प्रगल्भ प्रकार म्हणजे, मीरा जेव्हा समरला तिच्या नवसापायी लंडन सोडायला सांगते, तेव्हा इमोश्णल होऊन तो तिची मनधरणी करत बसत नाही. कारण तिचा या गोष्टीवर विश्वास असेपर्यंत ती जरी त्याची झाली तरी प्रत्येक क्षण भीत भीत जगेन अशी समरची आणि आपली तोपर्यंत खात्री झालेली असते. कुडोज.

इथपर्यंत सर्वकाही ठीक. जसा हा आर्मीमेध्ये येतो.. तसा पिक्चर घसरतो. पिच्चरमध्ये कॉमेडी नाही त्याची कसर त्यांनी आर्मीच्या दृश्यांची बालिश हाताळणी करून काढलीये. बॉलीवूड चे सिनेमे रिसर्च मध्ये कमी पडतात. थोडा आळशीपणा कमी करून चांगला अभ्यास करून दृश्ये तयार केली तर बिघडते कुठे? पण त्यातही बॉलीवूडकरांचा किती दोष आहे माहीत नाही. आपल्याला साध्या चिम्पांट आय.टी. पार्क मध्ये फोटो काढून देत नाहीत, तर आर्मी यांच्यासाठी त्यांचे लोखंडी  दार किलीकिले करेल का हा प्रश्नच आहे. त्यामुळे यांना हवी ती माहिती होणार तरी कुठून? खरेतर सशस्त्र सेनांनी अशा सिनेमांकडे एक संधी म्हणून पाहिले पाहिजे. आधीच ऑफिसर्स ची कमी असताना शेरूकला त्या तगड्या हँड्सम युनिफॉर्म मध्ये बघून मुला-मुलींना सेनेची आवड निर्माण होऊ शकते. ऋत्विक चा 'लक्ष्य' बघून प्रेरित झालेल्या अमोलचा भावाने पहिल्याच प्रयत्नात ओ.टी.ए.त झेंडा रोवला. इन्स्पायर तर मी पण झालो होतो हो.. पण नाही झालो ऑफिसर. हे आर्मीचे सुदैव की माझे दुर्दैव.. तुका म्हणे असो.

बॉम्ब निकामी करण्याची काही दृश्ये तर जेरेमी रेनर च्या 'हर्ट लॉकर' जशीच्या तशी उचललीयेत. यश चोप्रांकडून तरी अशी अपेक्षा नव्हती. लडाख मध्ये एवढे बॉम्ब पेरत नसावेत. त्याऐवजी हिरोला भारतीय शान्तिसेनेत ठेवून एखाद्या आफ्रिकन देशात पाठवले असते तर जास्त वास्तविक वाटले असते. पण एवढा रिसर्च कोण करणार? शिवाय अनुष्काला हाफ च्या हाफ चड्डीवर काश्मिरात नाचवायचे हा दिग्दर्शकाचा प्लॅन हिरोला आर्मीत घालायचे याच्या आधी ठरला असेल.

गाणी आणि पार्श्वसंगीत-
रसपंशी ११० टक्के सहमत. बराच बोलबाला केलेले  छल्ला गाणे म्हणजे छळ आहे. "जिया रे" या गाण्यामुळे हा रेहमान असावा अशी पुसटशी शंका येते. बाकी गाणी कुणा हव्श्या नवश्या ने संगीतबद्ध(?) केलीयेत असे वाटते. गुलझार मला समजत नाही. ते आणि रेहमान हे कॉम्बिनेशन माझ्यातरी बुद्धीपलीकडे आहे, त्यामुळे न बोलणे श्रेष्ठ.
पार्श्वसंगीत चांगले आहे.

मावशीने तब्बल ३२ वर्षानंतर एखादा सिनेमा थियेटर मध्ये पहिला हे ऐकून कसेतरीच वाटले. मी तिला फार आधीच न्यायला हवे होते.
ममीला अनुष्का शर्मा माहीत नाही. पण ती म्हणे कि "मला फक्त त्या रिपोर्टर (अनुष्का) चे काम आवडले. छानच अभिनय केलाय तिने." हे ऐकून माझा उर का भरून यावा हे एक कोडेच. असो.

तर  अगदीच कट्टर शाहरुख तिरस्कर्ते असाल तर नका बघू मग काय. पण इतर तमाम बिनडोक बॉलीवूड पटांच्या तराजूत या सिनेमाला तोलणे म्हणजे यश चोप्रांवर अन्याय करण्यासारखे. म्हणून सरसकट उडवण्यापूर्वी जराSS सांभाळून घ्या. :)


Monday, November 5, 2012

सारांश - अनुपम खेर पर्वाची सुरुवात.


आज बऱ्याच दिवसांनी रविवारी दुपारी टी.वी. मोकळा सापडला. बाहेर अशी टळटळीत दुपार असताना मी वेगळ्याच मोड मध्ये असतो. उगाच नोस्टॅल्जिक व्हायला होतं. आता तरुणपणी एकतर बालपण आठवत असणार नाहीतर पूर्वजन्म. काय सांगावं? या अशा मोड मध्ये मला सारांश दिसला. मी आधी बघितला नव्हता. फ़क़्त महेश भटचा आहे आणि काहीतरी भारी वगैरे होता एवढे ऐकून माहिती.
सुदैवाने नुकताच चालू झाला होता. जाहिरातींच्या जंजाळातून बऱ्यापैकी बघितला. जे ऐकले होते त्याहीपेक्षा भारी निघाला हा पिक्चर. अनुपम खेरने एका निवृत्त शिक्षकाची भूमिका केलीये. त्याला पाहून वाटले की आताही हा एवढा म्हातारा वाटत नाही म्हणजे या माणसाचं नक्की वय काय? पिच्चर पाहता पाहताच विकीला घेवून बसलो आणि काही रोचक गोष्टी सांगितल्या तिने.

सारांशची कथा-
प्रधान सर (अनुपम खेर) आणि त्यांची पत्नी पार्वती (रोहिणी हट्टंगडी) यांचा एकुलता एक मुलगा अजय, न्यूयॉर्क मध्ये भुरट्या चोरांकडून मारला जातो. आपल्या या मुलाच्या अकाली मृत्यूमुळे उद्ध्वस्त झालेल्या या भावविश्वात एकामागोमाग येणाऱ्या निराशाजनक प्रसंगांनी त्यांची जगायची इच्छाच कोलमडलेली असते. त्यात त्यांना थोडाफार आधार मिळतो तो सुजाता - (सोनी राझदान) या अजयच्या खोलीत राहणाऱ्या पेईंग गेस्ट कडून. सुजाताचा एक प्रियकर आहे विलास. विलासचे सुजातावर प्रेम आहे पण बाप राजकारणातले बडे धेंड - चित्रे (निळू फुले) असल्यामुळे त्याच्या धाकाने तो तिच्याशी लग्न करू शकत नाहीये.
इथे मुलाच्या मृत्यूने खचलेले प्रधान सर् बायकोसहित आत्महत्या करायला तयारी करत असताना सुजाता आणि विलास चे भांडण त्यांच्या कानावर पडते. सुजाता आई होणार असते आणि विलास तिला अबोर्शन करायला सांगत असतो. तो निघून गेल्यावर विषाचा प्याला बाजूला ठेवून बेभान झाल्यासारखे पार्वती प्रधान सरांना सांगते की अजयच्या खोलीत सुजाताच्या पोटात वाढणारे बाळ हा योगायोग नसून अजय परत जन्म घेतोय. ती त्यांना बजावते की आपण या बाळाला कुठल्याही परिस्थितीत जन्म घेउ दिला पाहिजे.
पण परिस्थिती खुपच प्रतिकूल असते. चित्रे सर्व प्रकारचे डावपेच लावून या म्हाताऱ्या जोडप्याला सतावतो, सुजाताला धमक्या देतो. पण प्रधानांना आता एक नवीन बळ चढते तिला वाचवण्याचे. त्यात विलास सुजाताच्या पाठीशी उभा राहतो. सर्व प्रकारे चित्रेचा त्रास सहन केल्यावर प्रधान सर् खुद्द मंत्रालयात जावून चित्रेला अटक करायला प्रशासनाला तयार करतात.
आता अजय परत जन्म घेणार म्हणून उत्सुक झालेली पार्वती सर्व काही सुरळीत होणार म्हणून आनंदी असते. पण तिचा हा वेडेपणा सुजाता-विलास च्या संसाराला घातक ठरेल म्हणून प्रधान सर् सुजाता आणि विलास ला निघून जायचा सल्ला देतात. अशा वेळी पार्वती आकांत करते पण तिची समजूत घालून प्रधान सर तिला जगण्यासाठी आधार देतात आणि पिक्चर संपतो.

महेश भट दिग्दर्शित १९८४ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट अनुपम खेरचा कारकिर्दीतला पहिला. तो त्यावेळी फक्त २९ वर्षाचा असूनही ६०-६२ वर्षाच्या म्हाताऱ्या शिक्षकाची भूमिका इतकी अप्रतिम केलीये की त्याला तोड नाही. त्याने आपल्या पहिल्याच पिच्चरला त्या वर्षीचे उत्कृष्ठ अभिनयाचे फिल्म फेयर मिळवले. सारांश १९८५ साठी भारताकडून ऑस्करसाठी पाठवला गेला.
सुजाता ची भूमिका करणारी सोनी राझदान, ही मागच्या आठवड्यात रीलीस झालेल्या 'स्टुडंट ऑफ द इयर' मधल्या आलिया भट ची आई. रोहिणी हट्टंगडी आणि अनुपम खेरचे प्रसंग इतके जमलेत की त्या म्हाताऱ्या जोडप्याचे दुःख अंगावर येते. त्यांचे राहते घर, आजूबाजूचा परिसर या गोष्टी कथानकाइतक्याच परिणामकारक आहेत. हा पिच्चर पहायचा चान्स मिळाला तर नक्की सोडू नका. हो, पण मूड जपून.

Dandeli To Goa Via Doodhsagar

(I am noticing a sudden surge in the number of blog visits particularly for this post. I would be very happy if you can leave your feedback preferably as a comment. Whatever it is.. good, bad, ugly.. it will help me improve my writing. Thank you! 14th Sept 2014 23:12 IST)

Click to maximize
As Sheldon explained this to Raj, some things are only valuable to a possessor because others don't have it[1]. The reason I recalled this dialogue is - only a month after my visit to Tadoba Tiger Reserve, Supreme court of India came up with a verdict by which tourist activities in the core zone of tiger reserves would be ceased completely.[2] That means whatever we saw and experienced inside the Tadoba core zone is now more important to us than ever before. Because we have it and others probably won't see it again.

Our modes of transport in Goa
Well, maybe I am being mean. But honestly, that was the first thought that came in my mind when I heard the news. As I thought deeper, I realized that my friends and family whom with I was planning to go again to see the heavenly creatures, won't be able to experience it either. I might not be able to visit other reserves again. This was a very disheartening thought. I am not sure if this law is good or bad for tigers. I could see that those animals need a peaceful environment around and tourists are big reason of disturbance for them. However, frequent tourist activities inside the jungle may be helpful in preventing poaching of tigers and other animals. In my opinion, instead of completely banning the access, they should keep limit on number of persons in the core zone in a day.

Back To The Jungle
Tadoba was a dream trip for all of us. So, we (I, Hrishikesh and Mustafa) teamed up again two and half months later to visit another jungle. This time The Dandeli Wildlife Sanctuary.
Mustafa came up with idea of creating a amateur documentary on the tribes of Dandeli. He had heard about them when he visited Dandeli for the first time some 5 years ago. As per the information he got, these tribal are deliberately keeping themselves away from the civilized world because they don't want to get civilized (or corrupted?). Skeptical whether they would like someone from outside world to film them, I said yes to the plan hesitantly and Hrishikesh joined in. We knew that Dandeli was also home of many animals including Tigers and a dense forest. It is famous for it's river Kali and rafting in her turbulent flow. So, if no tribes, we still had lots of things to do at Dandeli.

We would start our journey from Pune towards Dharwad on 17 August Friday night. Mustafa already had booked tickets of NWKSRTC A/C sleeper bus. I came directly from office with all my luggage to Swargate where Hrishikesh and a friend of his - Rohit met us. Rohit was native of Dharwad and he was also interested to see Dandeli with us. After spending time asking about the bus at extremely chaotic Swargate bus stand, we came to know that KSRTC buses don't enter the bus stand and we should wait at the Satara road end of the bus stand. The bus came on time at 10 PM. It was cozy and clean. The bus conductor was well behaving and knew both Marathi and Kannada very well.
After about 30 minutes it left Pune. We slept after chit-chatting to wake up at Dharwad early in the next morning.

Rohit knew the place inside out. After we left the bus at around 6.30AM, he led us to bus stand where we waited for about 20 mins before we got a state transport bus to Dandeli. We used the time in between to go to toilet which I found okay but much better than the the one at Swargate. Rohit left for his home to meet his parents, he would join us again after a while.

In Dandeli
It took around 2-3 hours from Dharwad to reach Dandeli. We asked rates for a room in State Lodge in front of the bus stand. Mustafa already had queried about the fares and booked us a room while we were still in Pune. But the trick was not to disclose his identity till we see the room and match rent for one night in person. So, it matched and the room was also clean with three beds.. perfect. In Rs. 500 per night, we got 3 clean beds, two towels, a bottle of water, TV, attached bathroom with solar heated water. So, you see there are certain advantages of visiting a place in off-season.

We checked for the activities available like jungle hike and water sports around. To our disappointment we came to know that because it's rainy season, Jungle hike and water rafting was not available. The best season for that was October-January. We decided to book a jeep from a forest activity organizer Mr. Rathod which would take us on Jungle ride and also to a resort where we can do kayaking. The ride costed us Rs.1400. When we mentioned to Mr.Rathod that we were from Pune, he suggested that the best river rafting we could get was near Pune in Tamhini ghat.
Kayaking is not as easy as it seems.
 He got us a commander jeep. We went to Bison River Resort where there was nice river bed for kayaking. Rs. 250 wasn't  a bad deal for kayaking for about 30 minutes. It's not that easy to pedal the kayak as it seems. In 30 minutes of pedaling one could drain all of the energy. We saw backwaters of ### Dam. We took meal at a place suggested by our driver. And walked for a while in the Jungle. Dandeli was the most dense vegetation I had ever seen. The driver also took us to a tribe village which was Gavali (Milkman) tribe. He informed that it was true that these people were living secluded life close to the nature but over last few years they were getting into normal world. As he had mentioned we saw that the cottages of these villages didn't have doors. It was evident from their appearance that they were entering the mainstream. The driver told us that there are few tribes still prefer to live the old way but they are in dense parts of forest where we couldn't go.

Mustafa was saying there were also other kind of tribes which were the black slaves brought from Africa by the Goan Portuguese sailors. Somehow they escaped from their captivity and chose to live their natural way in the forest. Fascinating. Well, there was no way we could ever spot someone from that clan wondering around the forest.

You know the stories in which they say that the forest was so dense that not even a single ray of sunlight could touch the ground? Dandeli is that forest for sure. We left the hope of spotting any animal in such a dense jungle . Guessing that there is not much to do in next two days in Dandeli we started planning for another adventure- The Doodhsagar falls.

Planning For The Unthinkable.
We stopped to have tea at a teashop near a village where the shop owner and his wife was kind enough to ask about us. They informed us that we could use our rest of two days to visit Doodhsagar. They gave us directions how to go there. I could not thank them enough for their precise information. From the below description you can imagine how lucky we were that things happened exactly as we had expected.
They suggested to start early in the next morning and follow the plan-

1. We would go to Londha train junction which was about 2 hours of journey from Dandeli by boarding the 6.45AM state transport bus from Dandeli bus stand.
2. From Londha we should board train towards Goa.
3. The train should drop us to Castle Rock station.
4. We should take a goods train (by requesting the driver) which would drop us to Doodhsagar.
5. From Doodhsagar at around 3 pm we should board another goods train to go to Culem (A station near Goa-Karnataka border) where we could get either a bus or passenger train for Vasco (Goa).
Boarding a goods train by request? The planned seemed impossible.

We came back to Dandeli after almost 5 hours. I was so tired that the hotel bed felt like heaven. Later after dinner we strolled near in the city bus stand. Also got information from the bus stand for our next destination. We Slept late though we knew that we had to get up early.

Leaving from the Castle Rock Station
Train In Heaven
Early in the morning we paid our bill and caught the 6.45 bus. Reached Londha as per plan, got the Goa train as per plan. The only change was, we didn't leave the train at Castle Rock. The same train took us to Doodhsagar. There were many tourists just like us in the train. Though there was no station near Doodhsagar, the train stopped and they let the tourists get off the train.

Londha to Doodhsagar was a scenic journey with a dense jungle and hills at one side and valley at the other. There were at least 20 tunnels of 200-300 meters of length. Doodhsagar was awesome. I could capture the iconic train in heaven pictures.
The bridge of Doodhsagar is a not less than a miracle. You cannot help but to bow to the engineers and architects who dreamed and completed the project. The bridge is fantastically built at the edge of cliff and designed so firm to hold the weight of trains carrying tonnes of weight when water is pouring from all the sides. I don't know exactly when it was built but it seems from the structure that it must have been built in the British-raj era.

We had tea and muffins there at the local stall and started our journey towards Salem which we thought would take 1-2 hours of walk. That was my idea to walk towards the station instead of sitting duck waiting for the next goods train. After we walked for about more than 1 hour along the railway track towards Goa, we reached at the Sonolium station at around 2.30 PM. We were tired and was running low on drinking water. I found a small waterfall and filled one of the bottle just in case we couldn't get any clean drinking water in rest of the journey. It proved a sensible thing as after some time we did have to drink that seemingly clean  water which might have contained numerous bacterium. But as they tell on Discovery channel, it's better to drink the dirty water than to take chance with dehydration.

The Goods Train
The goods train which took us from Sonolium to Culem
Mustafa and I lied on the railway sleepers which were piled on next to track while Hrishikesh was busy capturing photos for us. At 3.30 the good train arrived on the station but to our dismay it didn't stop there. It was our only hope to reach to Goa. As the train were passing slowly Mustafa decided that we should grab ladder of each bogey and go along. I tried first but quickly realized that it was too risky to hang on. I shouted that no one should try it and jumped back on the ground. We let the train pass completely and saw that the last bogey was pulling a trolley where there were people on it. We ran after the train like those fugitives in movies and hopped on the trolly one by one. A sigh of relief. Finally we were going to make it to Goa that day.

Towards The Land Of Sun and Sand
View from Agvada fort.
We reached Culem - a station 6 Kms from the point we boarded the goods train. Some good men told us that we should get a passenger train to Vasco if we are going towards Panaji. We waited till 6 got the passenger train which was almost empty as if it was there only for us. We came to Madgaon and decided to go to Colangute beach- North Goa.

It wasn't easy to get rooms on the long weekend in Colangute. We managed to get a room which was not better than the one at Dandeli but was twice as costly as it. At the dinner we had chicken curry and some fenny with it. The aroma of fenny was incredible. It was all over the place as the waiter brought it to our table. We reviewed our day and planned for the next. I called that we would get up early in the morning so that we can play/swim in the tides and could return back early to check out. This would give us entire day to see the north Goa without paying extra room charges for the day.

I woke up early and asked the boys to get ready. We went to beach and played a lot. It was my second time in two years to swim into the sea. I was relaxed without the fear of water and went far deep. There was also lifeguards around which made it easy for us to enjoy carelessly. Mustafa was bit hesitant to enter the deep water against the high tides. But seeing Hrishikesh and me fooling around comfortably, he gradually joined us.
After spending more than 2 hours in the water, we came to our room and prepared ourselves for the next part. Mustafa called a cab so that we can see most of the places around. We spent our day traveling around beaches of north Goa. In the evening, before taking ST bus back home we went for the famous Panjim cruise safari. It was a nice experience.[3]
_*_
1. The exact dialogue-
Sheldon: Actually, he might have to. There’s an economic concept known as a positional good in which an object is only valued by the possessor because it’s not possessed by others. The term was coined in 1976 by economist Fred Hirsch to replace the more colloquial, but less precise neener-neener.
courtesy -http://bigbangtrans.wordpress.com/series-3-episode-15-the-large-hadron-collision/
2. By the time I finished this post, the order has been revoked and reserves are open again for tourists.
3. This part may sound boring and this post has been holding up my next ones. So, wrapping it up.


Friday, September 14, 2012

म्हणे आम्ही बिझी झालो-२

भाग १ पासून पुढे.

मराठी मालिकांनी कहर केलाय. त्याच टिपिकल सास बहु टाईप कथा. पण त्या कमी म्हणून आता बऱ्याच मालिकांत भुताटकी, चेटूक वगैरे वगैरे दाखवायला लागलेत. विरोधाभास बघा- माझे वडील वेळ घालवायला पुस्तके शोधून काढतायेत आजकाल. त्यांना मला कधीकाळी ६वी - ७वीत असताना बक्षीस मिळालेले नरेंद्र दाभोळकरांचे 'श्रद्धा-अंधश्रद्धा' हे पुस्तक मिळाले. ते हातात घेवून ते ती भुक्कड अंगात आलेली "सुवासिनी" बघतात. आता तर कहर झालाय. एकापाठोपाठ "देवयानी", "सुवासिनी", "स्वप्नांच्या पलीकडले" असा रतीब चालुये. तरी बरं माझ्या काका-काकूंकडे फेमस असलेले "पुढचं पाउल" ने इकडे घरात अजूनतरी पाउल ठेवलं नाहीये.

या मालिकांमुळे माझे टीवी बघणे महिन्याच्या ३-४ तासांवर आले आहे (अतिशयोक्ती नाही). डिस्कवरी पूर्णपणे गायब झालीये. नॅट-जिओ चा आवाज क्षीण होत गेला. या डेली सोप मालिका जरी महिन्याभरानंतर पाहिल्यातरी तसूभर हललेल्या नसतात. पण आईला म्हटले की हा एवढा पिच्चर बघुदे तर ती म्हणते की "काय तेच तेच पाहतो रे? मला एवढे बघुदे, आज अमकी तमकीला सासुसमोर मारणारे" हे असे ऐकल्यावर मग मी विचारात पडतो, आता या वाक्यावर आणखी काय बोलणार?

विषाद या गोष्टीचा वाटतो की माझी बुद्धिवंत आई असल्या मालिका बघू कशी शकते? मी २ तास विचार करून सोडवलेला तर्काधारित प्रश्न तिने तोंडी सोडवला होता. लहान असताना चंद्रग्रहणाच्या दिवशी मी सुर्याला पाहण्यासाठी काच काळी करत होतो म्हणून धोपटले होते. मग या बिनडोक मालिका बघून तिला राग का येत नाही?
एक असाच "कासौतीई जीन्दागीई काय" (Kasautii Zindagii Kay हे असले येडचाप स्पेलिंग) प्रसंग. गुंडांनी प्रेरणा-अनुरागच्या लेकराला पळवले. आणि खंडणी मागतायेत ३०० कोटी (?).
बरे मागितले तर मागितले. ते पण कॅश. आता हे पैसे प्रेरणा घेवून आली. कसे? २ फारीनला जाताना घेतात ना तसल्या बॅगांमध्ये. नोटा जरी हजार हजार च्या असल्या तरी ३०० कोटी म्हन्जे १००० च्या १०००x१०० = १ लाख x १०० = १ कोटी x ३०० = ३०००० गड्ड्या. या हिशोबाने ३०० कोटी कॅश प्रेरणाने ट्रॅक्टर ट्रॉलीत आणायला हवेत. अरे काय? पाट्या टाकायच्या पण एवढा आळशीपणा?

वडिलांशी आईच्या या व्यसनाची खुपदा चर्चा झाली. या भाकड मालिकांनी समाजाची कशी वाट लावलीये हे पण आले. त्यात पापांनी एक जमेचा मुद्दा सांगितला. ते म्हणाले की गल्लीतल्या बायकांना आता एकमेकांची उखळीपाखाळी, चहाड्या काढायला वेळ नसतो. चर्चा करतात ते या काल्पनिक सासू-सुनांची, त्यांच्या घरातले प्रोब्लेम चवीने चघळतात मग दुसऱ्याच्या घरात नाक खुपसायला आपसूक वेळ कमी पडतो. मुद्दा बरोबर आहे तसा.

तुम्ही म्हणाल मी एवढा वैतागलोय या मालिकांना तर मला एवढी माहिती कुठून?
१. माहिती अर्धवट आहे. तुमच्या कल्पनेत नसतील एवढ्या डेली सोप चालू आहेत सध्या. सगळ्या माहिती असणे एका पुरुषमाणसाला तरी शक्य नाही.
२. जेवणाच्या वेळी लावल्यावर बघण्याशिवाय पर्याय नसायचा. आणि काही मालिका सुरुवातीचे एपिसोड चांगल्या असायच्या. आणखी म्हणजे नवीन नवीन पाखरं यायची पहिल्या प्रथम एपिसोड्स मध्ये.
त्यातली अक्षरा(ये रिश्ता क्या केहेलाता है), टोस्टी(सास बिना ससुराल), सावी(सुवासिनी), प्रतिज्ञा, रुपाली (हो..तीच ती पुढचं पाउल मधली वॅम्प) ही क्रमानुसार माझी फेवरेट पाखरं आहेत.

-*-

म्हणे आम्ही बिझी झालो-१


आजकाल वेळ कुणाकडे आहे? सकाळी लवकर ऑफिसला जायचे, संध्याकाळी उशिरा यायचे. या महिन्यात दिवसातले तेरा तास मी घराबाहेर असतो आणि तरीही हा महिना त्यातल्या त्यात आराम होता.
अशा वेळी घरात बोलायला, सण समारंभ साजरे करायला काय जीव असणारे? आमची पिढी वाया गेली. थोरामोठ्यांचा आदर नाही, देवधर्म नाही, नातीगोती नकोत, भावना नकोत. मित्रांना थातुरमातुर भेटायचे, आठवडी बीयर मारायची, महिन्याभरातून कुठेतरी भटकून यायचे, घरकामाला हात नाही, कुटुंबासाठी चार क्षण नाहीत.
हड.. च्यायला वरच्या परिच्छेदातल्या गोष्टी १०० टक्के खऱ्या असतीलही पण तरीही एकांगी आहेत. म्हणे आम्हाला वेळ नाही. मी म्हणतो आमच्या कुटुंबाला आमच्यासाठी वेळ नाही.

साधारण १०-१२ वर्षापूर्वी भारतातल्या सुखी कुटुंबव्यवस्थेत एकता कपूर नावाच्या चेटकिणीचा प्रवेश झाला. तिच्यावरच गरळ का, तर तिने लावलेली विषवल्ली आज सर्वदिशा व्यापून उरलीये.
जिकडे तिकडे त्या डेली सोप मालिकांनी नुसता हैदोस घातलाय. माझ्या आईने त्या सुमारास "कहाणी घर घर की" बघायला सुरुवात केली. तेवढीच तिला करमणूक म्हणून मला आठवतंय त्याप्रमाणे मी, बाबा, अक्की पण तिच्यासोबत ते बघायचो. नंतर ती "क्यूंकी सास भी कभी बहु थी" बघायला लागली. त्यानंतर "कसौटी जिंदगी की", "कही किसी रोज". या मालिकांचा भुक्कडपणा ओळखून वेळीच बाकीच्यांनी अंग काढून घेतले. बहिण आपली ती "कही तो होगा" तेवढीच एक बघायची. पण माझी आई.. ती मात्र पूर्णपणे आहारी गेली या मालिकांच्या. तेव्हापासून आजतागायत माझ्यात आणि तिच्यात या मालीकांवरून शीतयुद्ध चालू झाले.

वर्ष २०११. धनंजय निफाडकर[१] जसा एक चहाची भुकटी ४ वेळा वापरायचा त्याहीपेक्षा भयानक पद्धतीने कथेचा चोथा करून अगदी त्याची माती होईपर्यंत कस काढल्यावर केकता कपूरच्या बऱ्याचशा मालिका बंद पडल्यात. त्याची जागा घेतली तथाकथित छोट्या शहराच्या मालिकांनी. मला लवकरच समजले की केकता कपूर ही कुणी व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे. आईने "प्रतिज्ञा", "गीत हुई सबसे पराई" आणि "बिदाई" बघणे चालू केले. बहिण लग्न होऊन नवीन कॅटेगरीच्या मालिका बघायला लागली. तिने ते नैतिक अक्षराचे "ये रिश्ता क्या केहेलाता है" बघायला सुरुवात केली. आता ती सासरी असली तरी कधी इकडे यायची तेव्हा मला दया दाखवून टीवी ची जी २०-२५ मिनिटे मिळण्याची त्याचापण हिशोब लागून जायचा.

भारताच्या या 'बौद्धिक दिवाळखोरी' कालखंडाचे दोन ठळक भाग पडतात. केकता आणि केकतौपरांत. या पोस्ट-केकता काळात ती महामाया बरी असे म्हणायची वेळ आली. लोकांना आज जसे इंग्रज बरे असे वाटते ना तसेच. या काळात नवीन घडामोडी या झाल्या की मराठी वाहिन्यांचे पेव फुटले. "चार दिवस सासूचे" हे असे काहीतरी चालू आहे हे मला माहिती होते. २०११ ला बऱ्याच मराठी डेली सोप चालू झाल्या. हिंदी, गुजरात्यांपेक्षा मराठीत सहन करूया या भावनेने जेवणाच्या वेळी टीवीत घुसलेल्या आईला मी "मराठी मालिका तरी बघ" अशा विनवण्या करायचो. रीमोटला हात लावून चॅनेल बदलायची माझी काय बिशाद? एरवी साधीसरळ असणारी माझी आई या मालिका बघताना भयानक हिंस्त्र होते. रिमोटला स्पर्श जरी केला तरी वरून फटका मारायची. वर मी कसे शाळेतून येवून घरातले पण पाहते, मला विरंगुळा नाही, नुसते माझा जीव खातात वगैरे वगैरे ऐकवणार. त्यामुळे टीवीवरून आईशी भांडणे व्यर्थ आहे हे खूप आधीच समजून माझ्यासाठी मी द्रुतगती इंटरनेट लावून घेतले होते.
तर एकेदिवशी अचानक आई मराठी मालिका बघतेय हे पाहून मला सुखद धक्का बसला. पण मुर्खपणा मग तो कुठल्याही भाषेत असला तरी त्याची तीव्रता कमी होत नाही.
भाग २
-*-

[१] लक्ष्मीकांत बेर्डेंचे एक पात्र. सिनेमा आठवत नाही. पण हे ध.नि. कॅरक्टर चांगलच लक्षात आहे.

Sunday, August 5, 2012

पुण्याला शाप-PMPML

पुणे शहराची वाट लागली आहे हे सांगण्यासाठी आता अगदी मकेंझी लावण्याची गरज नाही. जमिनीच्या किमती अवाच्या सवा वाढायला लागल्यावर पुणे मागे पडायला सुरुवात झाली. मागे यासाठी की ज्या पद्धतीने पुण्याचा विस्तार होतोय आणि पायाभूत सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष झालंय ते पाहता पुणे आता आपली गमावलेली पत मिळवणार नाही. मला हा साक्षात्कार एकदम का झाला असा प्रश्न पडू शकतो. नाही, मी सिंगापूर, शांघाय किंवा कुठल्याही पाश्चात्य देशात जावून आलो नाही. मी जवळ जवळ गेले वर्षभर बँगलोर ला होतो. असे म्हणतात की बँगलोर बरेच पुण्यासारखे आहे. मलापण हे साम्य जाणवले. त्याच शासकीय संस्था, कॅन्टोनमेंट चे प्रभाग, मोठ्या शिक्षण संस्था, नवी जन्मलेली आयटी पिढी. पण बँगलोर वाढले. नुसतेच वाढले नाहीये, तर सजग पणे वाढले.
तिथे आजिबात ट्राफिक जाम नाही? आहे. पण लवकरच ते सुरळीत होईल. तिथे मोठाले शंभर फुटी रोड आहेत. जागोजागी फ्लायओवर बांधले जातायेत. मेट्रो पूर्णपणे कार्यान्वित होईल तेव्हा बंगलोरची वाहतूक ही भारतातल्या इतर शहरांना आदर्श ठरणार यात मला मुळीच शंका नाही.
कुठल्याही शहराची वाहतूक व्यवस्था हा त्या शहराचा कणा असतो. माझे बँगलोचे याविषयी निरीक्षण हे आहे.

१. बस व्यवस्था.

बँगलोर मध्ये महापालिकेच्या बसेस शिवाय खाजगी बसही चालू असतात. महापालिकेच्या BMTC बसेसच्या दर्जा नुसार भाडेआकारणी केलेली आहे. वोल्वो बसेस ढीगाने आहेत. त्यांचे तिकीट इतर बसच्या मानाने दुपटीहून जास्त आहे.
त्यामुळे साहजिकच या बसेसला गर्दी कमी असते. आणि ज्याला थोडे पैसे जास्त खर्च करून आरामदायक प्रवास हवा त्याने या बसची वारी करावी. बसेस आतून बाहेरून स्वच्छ आहेत. ए.सी. काम करतात. सुरक्षा कॅमेर्यांचा उपयोग होतो. वोल्वोच्या कंडक्टर-ड्रायवर चा पांढरा शुभ्र युनिफॉर्म असतो आणि आणि त्यांना थोडेफार इंग्रजी येते. एयरपोर्ट शटल च्या वोल्वोचे कंडक्टर-ड्रायवर चक्क 'सर' वगैरे म्हणून उगीच अवघडून टाकतात. प्रत्येक बसचे बोर्ड कन्नड मध्ये असले तरी आकडे इंग्रजीमध्ये असतात आणि कुणालाही व्यवस्थित दिसावेत असे लावलेले असतात.
मॅजेस्टिक किंवा केम्पेगौडा हे BMTC चे मध्यवर्ती स्थानक. इथे बसेस आपापल्या रेल्वेसारख्या प्लॅटफॉर्म वरच येतात. सगळ्या बसेस चे प्लॅटफॉर्म ठरवून दिलेले आहेत. प्रवाशांना रस्त्यावरून इकडे तिकडे जाऊ लागू नये आणि त्यामुळे बसेस च्या आवागमनात खंड पडू नये म्हणून स्थानकावरून चालण्यासाठी स्कायवॉक बांधलेले आहेत. एक उपयोगी माहिती कक्ष आहे. (हो मी स्वतः उपयोग करून पाहिला होता, अगदी तिकिटाच्या मागे बस नंबर वगैरे लिहून दिला होता)
बरीचशी स्थानके मोठाल्या कॉम्प्लेक्स च्या खाली आहेत. त्याने जागाही वाचली आहे आणि महापालिकेला उत्पन्नाचा स्रोत पण मिळालाय असे वाटते. सर्व स्थानके स्वच्छ आहेत आणि जागोजागी कचऱ्याच्या पेट्यांची सोय केलीये.

२. एयरपोर्ट
मागील २.५-३ वर्षापूर्वी बँगलोरच्या मधोमध असलेला विमानतळ नागरी उड्डाणांसाठी बंद करून तिथून जवळपास ४० किलोमीटर उत्तरेकडे हलवण्यात आला. पुण्याप्रमाणे बँगलोरही एयरफोर्स/HAL चे विमानतळ उधारीने वापरत होते. पण त्यांचा आता स्वतःचा मोठा आंतराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ शहरापासून दूर असला तरी तो तयार होतानाच शहराला व्यवस्थित जोडण्यासाठी ६ लेनचा अद्ययावत मार्ग बांधण्यात आलाय.

३. एयरपोर्ट शटल सर्विस.
मला याचे अतिशय कौतुक वाटते. शहराच्या प्रत्येक भागातून अर्ध्या अर्ध्या तासाला वोल्वो बसेस उपलब्ध आहेत. सामानासाठी मोठा रॅक, स्वच्छ बसेस, नम्र स्टाफ, बसमध्ये वर्तमानपत्र अश्या सोयी असतात. भाडे साधारण रु.१५० ते २००. थोडे जास्त वाटत असले तरी रिक्षावाल्यांच्या जाचापुढे काहीच नाही. तसेही ४० ते ६० कि.मी. च्या प्रवासासाठी योग्यच आहे. पुणे ते बँगलोर विमानाने साधारण १.३० तास लागतो. आणि विमानतळ ते मुख्य शहरापर्यंत जाण्यासाठी मला २ तास लागायचे. पण बरीचशी ट्राफिक शहरात आल्यावर असायची.

४. शहरांतर्गत प्रवास - मेरू टॅक्सी सर्विस.
ही खाजगी सेवा उत्कृष्ट आहे. तुम्ही ऑनलाईन बुकिंग केली किंवा फोन केला कि तुमच्या दारात अर्ध्या तासात येते. भाडे आधीच ठरलेले असते. आणि रीतसर पावती दिली जाते. कॅब पुरेपूर मोठ्या आहेत.

५. मेट्रो.
मी ऑक्टोबर २०११ मध्ये परत पुण्याला येईपर्यंत नम्मा मेट्रो (आपली मेट्रो) चा एक टप्पा सुरु झाला होता. आणि लवकरच तिचे बाकीचे मार्ग सुरु होतील. मेट्रो प्रोजेक्ट हा वाटतो त्यापेक्षाही भयानक कठीण आहे.
आपल्यासारख्या "लोकशाही" देशामध्ये असले प्रकल्प चालू होतीलही पण कधी संपतील याचा नेम नाही. तरीही बँगलोकरांनी सहनशक्ती दाखवून ही आपल्या पदरात पाडून घेतली आणि आता तिची मधुर फळे त्यांना चाखता येतीलच.

आता पुण्याची गत.

पुणेकर असलो तरीही मला जर कोणी या ठिकाणाहून तिकडे जायचे कसे विचारले तरीपण अमकी तमकी बस घ्या हे सांगताना काटा येतो. रिक्षावाले पाहुण्याला फाडून तर खाणार नाहीत ना अशी भीती. बरं चार पैसे ज्यादा गेले तरी ठीक, पण टॅक्सीच नाही. अशा वेळी पाहुण्याला घरी आणायचे म्हणजे आपण स्वत: आपल्या वाहनाने आणणे हा एकाच पर्याय.
१. बस व्यवस्था.
दोन शब्द- तीन तेरा. पुण्याच्या बस म्हणजे बाहेरून गलिच्छ आणि आतून भरलेल्या. बी आर टी या गोंडस नावाखाली ५-६ वर्षापूर्वी पुणेकरांचे विशेषतः हडपसर-स्वारगेट-कात्रज च्या रहिवाशांचे जे काही हाल झालेत ते अक्षम्य आहेत. कंडक्टर-ड्रायवर इतके उर्मट की त्यांच्यासाठी प्रवासी म्हणजे महापालीकेनी पकडलेली कुत्री. बस स्थानके म्हणजे निव्वळ कचराकुंड्या. प्रवाशांची सोय ही दुय्यम गोष्ट. वोल्वो बसेस बारा महिने चिखलाने माखलेल्या. काचा फुटलेल्या. त्याच्यावर एखाद्या रोग्याने लावावेत तसे चिकटपट्ट्या लावलेल्या. मागे हडपसर ते स्वारगेट एका वोल्वोत बसलो होतो. सीट इतके मळकट होते की बसायला लाज वाटावी. अरे किमान त्या बसच्या (वोल्वो) नावासाठी तरी तिचे एवढी दुरवस्था करू नका असे म्हणावे वाटत होते.
पुणे महानगरपालिका वाल्यांना समाजवादाचा खूप पुळका आहे वाटते कारण बँगलोर सारखे बसचा वेगवेगळे दर्जा आणि त्यानुसार भाडेआकारणी त्यांना मान्य नाहीत. मग नगरसेवक फोर्चुनर मधून, आणि अधिकारी अलिशान कॅम्री मधून फिरतात पण बिचाऱ्या मध्यमवर्गाने गरीबासारखे सर्वसमावेशक बस मध्येच गेले पाहिजे. असला दुटप्पीपणा जमतो कसा आणि जनता सहन तरी का करते हा प्रश्न सुटत नाही.
पुणे वाढले तरी त्याप्रमाणात रस्त्याची रुंदी काही वाढली नाही. रस्त्याचे खड्डे म्हणजे पुण्याला झालेला कुष्ठरोग.

२. एयरपोर्ट.

पुण्याचा एयरपोर्ट म्हणजे एक विनोद आहे. हवाईदलाने उस दिला तर मुळापासून खाणार का? एका शहरात जिथे आंतराष्ट्रीय कंपन्याची ऑफिसेस, प्लांट्स आहेत त्या शहरला स्वतःचा स्वतंत्र विमानतळ नसावा?
हवाई दलाने सरळ ही भीक देणे बंद केले पाहिजे. नव्या विमानतळाचे घोंगडे कितीतरी दिवस भिजत पडलय. मैसूरचा स्टेट ट्रान्सपोर्ट बस स्टँडला पाहून माझी पाहिली प्रतिक्रिया होती की "अरे हा तर पुण्याच्या विमानतळापेक्षा स्वच्छ आहे".

३. एयरपोर्ट शटल सर्विस.
कुठाय? बाहेर आल्याआल्या रिक्षावाले धावून येतात. पण सामान असेल तर त्यांचे मागेल त्या भाड्यात जाणे भाग पडते. किंवा आपापले नातेवाईक त्यांची गाडी घेवून हजर हवेत.

४. शहरांतर्गत प्रवास - मेरू टॅक्सी सर्विस.
कुठाय? काही ऑनलाईन कॅब सर्विस चालू झाल्यात पण हातावर मोजण्याइतपत पण नसतील. स्वत:चे वाहन नसेल तर पुण्यात प्रवास म्हणजे एकतर तुमचा आत्मसम्मान घरी ठेवून या किंवा मग दिसेल त्या उर्मट कंडक्टर-रिक्षावाल्याशी दोन हात करायची तयारी ठेवा. पण त्यांच्यासारख्या प्रवाशांच्या संघटना नाही ना. मुंबईमध्ये कॅब्स असताना पुण्यामध्ये का नाहीत?

५. मेट्रो.
कुठाय? पुण्याचा प्रस्थावित मेट्रो प्रकल्प अजूनही संमत होत नाही. यात कुणाचा हात आहे? काहींच्या मते पुण्याला दुचाकी पुरवरणाऱ्या कंपन्या यामागे आहेत.
काहीका असेना, जरी मेट्रो आता तयार करायला घेतली तर पुणेकरांनो लक्षात घ्या आपले हाल कुत्रे खाणार नाही. बी. आर. टी. सारख्या पुचाट प्रकल्पासाठी जिथे ३-४ वर्षे लावली आणि ट्राफिकचे अशक्य हाल केले, तिथे मेट्रो म्हणजे पुढची १० वर्षे धरा. आणि या मुर्ख लोकांना बाजूला सारून अगदी आंतराष्ट्रीय कंपनीने जरी प्रकल्प चालू केला तरी कमीत कमी ६ वर्षे.

ही पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यवस्थेएवढी तर पुण्यात कुठली वाईट गोष्ट नसेल. कचऱ्याची समस्या गंभीर आहे, पण आम्ही हडपसरला राहत असल्याने आणि हडपसरला पुण्याची कचराकुंडी केल्यामुळे तसे वाटत असावे.
जेव्हा आपण पुणे म्हणतो तेव्हा बऱ्याचदा त्यात पिंपरी-चिंचवड पण येते. त्यातल्या त्यात त्यांनी पद्धतशीर वाढ घडवून थोडीफार आशा ठेवलीये.

राग या गोष्टीचा येतो की पुणे-बँगलोर दोन्ही भारतातली शहरे, ज्या अडथळ्यांचा पुण्यात बाऊ केला जातो ते अडथळे बँगलोरने कसे पार केले याचा सारासार विचार का होत नाही? सरसकट राजकारण्याच्या नावे खडे फोडण्यापेक्षा याला खरे जबाबदार हे शासकीय अधिकारी, पुण्याचे आयुक्त, पी.एम.टी. चे कार्यकारी अधिकारी ही मंडळी आहेत. हातात पॉवर असताना हे काय झोपा काढतायेत का?
मागे एका पोस्ट मध्ये लक्ष्मीनारायण सरांचा उल्लेख केलाय. तो माणूस मूर्तिमंत उदाहरण आहे की जेव्हा एक प्रशासकीय अधिकारी मनावर घेतो तेव्हा त्याच्या हातातून काय घडू शकते.
मेट्रो, विमानतळ हे मोठे प्रकल्प मान्य करवून घेणे हे राजकारण्यांचे काम आहे हे मान्य केले तरी शहराची बस व्यवस्था सुधारणे हे नक्कीच प्रशासनाचे काम आहे. हे सगळे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो आणि याच्यावर झापडे लावल्यासारखे आपापले दुचाकी घेउन उन्हापावासाचे मरमर करत हिंडतो.
या पळवाटा सोडून आता या प्रश्नावर रान उठवण्याची वेळ आलीच आहे.
_*_
चित्रे आंतरजालावरून साभार.

आईस एज : मैत्र जीवांचे - २

आईस एज - हिमयुग ही भौगोलिक अवस्था आहे, ज्यामध्ये पृथ्वीच्या तापमानात लक्षणीय रित्या घट होऊन हिमनद्या आणि धृवीय बर्फाचा विस्तार वाढतो. सिद्धांतानुसार पृथ्वीमाईच्या आतापर्यंतच्या आयुष्यात अशी अनेक हिमयुगे होऊन गेलीयेत. ही तापमानाची घट मनुष्याच्या आयुष्यात जाणवेल एवढ्या वेगाने होत नाही. आणि जर झाली, अगदी २-३ दिवसात झाली, तर काय होईल हे पाहायचे असेल तर "डे आफ्टर टूमॉरो" सारखा सिनेमा बघा.

"आईस एज" या सिनेमानेही ही 'तापमानाची त्वरित होणारी घट' संकल्पना त्याच्या पटकथेत वापरलेली आहे. कथा घडते ती हजारो वर्षांपूर्वी. मॅनी हा थोडासा एकलकोंडा आणि विरक्त मॅमथ प्राण्यांच्या लोंढ्यातून वाट काढत चाललेला आहे. हे प्राणी आहेत हिमयुग येणार म्हणून भीतीपोटी स्थलांतर करणारे प्रागैतिहासिक काळातले. एका कड्याजवळ उभा असताना, त्याच्या पायाला सिद येवून धडकतो. हा सिद आहे एक स्लॉथ, ज्याला सोडून त्याच्या कुटुंबाने पलायन केलंय. का? ते आपल्याला लगेच कळतं. सिदला माकडचाळे करून संकटात पडून घ्यायची खोड असते. अस्सं हे अतिशहाणं बाळ आपल्याला त्रास करू नये म्हणून त्याच्या आईवडील, भावंडं, काका, आजी त्याला दरवर्षी स्थलांतर करताना मागे सोडून जात असतात हे त्याच्या बोलण्यावरून कळतं. आताही तो जेव्हा मॅनीच्या पायाला धडकतो तेव्हा दोन गेंड्यांच्या जेवणाचे तीन तेरा करून त्यांचा पाठलाग चुकवण्यासाठी.
मॅनी त्याला गेंड्यापासून वाचवतो पण लवकरच त्याच्या खोडकर आणि बोलघेवड्या स्वभावाला ओळखून त्याला त्याच्यापासून दूर जायला सांगतो. पण ऐकेल तो सिद कसला. त्याच्या मागोमाग स्वारी निघते.

इकडे एक सेबरटूथ (नष्ट झालेली मार्जारकुळातली जात) कळप मनुष्यांच्या मुलाला उचलून आणण्याचा बेत तयार करतो आणि त्यांच्या तांड्यावर हल्ला करतो. त्यात त्या छोट्या लहान बाळाची आई स्वतः जीवाचा त्याग करून बाळाला वाचवते आणि हे बाळ आता सिद-मॅनीला सोपवते. जवळपास मनुष्यांची वस्ती असेल आणि हे बाळ आपण तिथे देवू अशा समजुतीने सिद आणि नंतर नाखुशीने मॅनी तो तांडा शोधायला निघतात.
तिकडे दिएगो नावाचा सेबरटूथ त्या बाळाच्या मागावर असतो. तो या दोघांना भेटतो आणि त्या बाळाला मनुष्यांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन देतो. पण त्याच्या वाणीवर अजिबात विश्वास नसल्यामुळे सिद आणि मॅनी त्याला नकार देतात. पण माणसांचा माग काढायला उपयोग होईल म्हणून हे दोघे दिएगोला त्यांच्या या टीम मध्ये सामील करतात. दिएगो जरी त्यांना मदत करायला तयार झाला, तरी अंतरीचा हेतू मात्र मॅनीसारख्या अजस्र देहाच्या प्राण्याला मारायला चांगली जागा शोधणे हाच असतो.

त्यांच्या या प्रवासात सिदमुळे अनेक गमतीजमती घडतात. त्यात सिद बाळाचा उपयोग माद्यांना पटवायला करतो, बाळाला भूक लागल्यावर डोडो पक्षांच्या थव्याकडून कलिंगड हिसकावणे, ज्वालामुखी फुटत असताना तिघांची त्रेधातिरपीट, भूमिगत हिमनदीच्या गुहेमधून भरकटणे हे प्रसंग खूप हसवतात. गुहेच्या प्रसंगात भित्तीचित्रातून मॅनीचा भूतकाळ समजतो. त्याच्या छोट्याशा कुटुंबाची मनुष्यांकरवी हत्या झालेली असते. त्यामुळे व्यथित होऊन तो असा एकटा जगत असतो. एका प्रसंगात तो दिएगोचे प्राण वाचवतो त्यामुळे दिएगोला या नवीन दोस्तांबद्दल जिव्हाळा निर्माण होतो. आता दिएगो त्याच्या कळपापासून मॅनीला आणि बाळाला कसे वाचवतो? हे तिघे बाळाला माणसांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होतात का? निसर्गाप्रती कृतघ्न माणसे त्यांचे काय करतात? हे सर्व तुम्ही सिनेमातच पहा. कारण हा भाग अतिशय भावपूर्ण आहे.

माझ्या एका मित्राची भावना ही होती- तो म्हणे की मी कुठलाच सिनेमा बघून एवढा भावविवश झालो नव्हतो आणि एका अॅनिमेशनपटामुळे डोळ्यात पाणी येईल असे कधी वाटलेही नव्हते.

या सिनेमामध्ये सिद-मॅनी-दिएगो यांच्याशिवाय आणखी एक पात्र आहे. ते म्हणजे स्क्रॅट. हा खार आणि उंदीर याच्यासारखा प्राणी सिनेमाभर त्याच्या अेकॉर्न[१] मागे धावत असतो. त्याचे त्या फळासाठीचे अतिशयोक्तीपूर्ण प्रेम पाहून हसून हसून पुरेवाट होते.

या सिनेमाबद्दल लिहिण्याचे कारण म्हणजे सिद-मॅनी-दिएगो तिकडीचा चौथा सिनेमा या आठवड्यात रीलीस झाला. काल पाहिला. त्रिमिती परिणाम उच्च असले तरी पटकथेत आणि संवादात तो पहिल्या दोन भागांच्या जवळपासही फिरकत नाही. त्याविषयी परत लिहीन.
_*_

[१] डिसेंबर २००८ मध्ये YHAI च्या बरोबर हिमाचल प्रदेशातल्या डलहौसी ला ५ दिवस ट्रेकसाठी गेलो होतो. त्यावेळी डलहौसी कडून चंबाला जाण्यासाठी पीरपंजाल रांगेमधली जंगले तुडवली. तेव्हा ओक वृक्षांचे अेकोर्न आणि पाईनकोन कसे असतात ते कळले. स्क्रॅटचा जीव असलेला हा प्रकार पाहून आईस एज चि आठवण नसती आली तर नवल.

आईस एज : मैत्र जीवांचे - १

तुला कार्टून्स आवडतात का? हा कुणाशीही संवाद साधताना माझा पेटंट प्रश्न झालाय. त्यात जर पोरी-बाळींशी बोलत असेल तर या प्रश्नाला जोडून "प्लीज टॉम अॅन्ड जेरी नको म्हणू हं" अशी काहीशी खवचट पुस्ती जोडतो. माझ्या संवादाचे पण असे ठराविक पॅटर्न तयार झालेत?
माझ्या पिढीच्या अनेकांसारखा कार्टून्स शी माझा परिचय मोगली, टॉम अॅन्ड जेरी, अलादिन या दूरदर्शन वर प्रसारित होणाऱ्या मालीकांपसूनच झाला. नंतर जशी २००० च्या आसपास घरी केबल आली तसे मग कार्टून नेटवर्क वरच्या मालिकांचा मी भक्त झालो. मला तद्दन लहान मुलांचे डेक्स्टर्स लबोरेटरी, पॉवर पफ गर्ल्स, स्कूबी डू, करेज द कॉवर्डी डॉग, ट्वीटी अॅन्ड सिल्वेस्टर मिस्टरीस, रोड रनर-कायोटी, द फ्लिनस्टोन्स हे शोस आवडायचे पण टीनटीन, जस्टीस लीग, जॉनी क्वेस्ट, स्वाट कॅट्स, जी आय जो हे माझे प्रेरणास्थान होते. आताचे आणि तेव्हाचे कार्टून नेटवर्क मध्ये जमीन अस्मानाचा फरक पडलाय. कार्टूनच्या दुनियेला त्या जपानी अॅनिमे, पोकिमॉन वाल्यांनी पूर्ण कीड लावली. आजकाल जिकडे तिकडे ही कार्टून्स बघून एखाद्या सैगलच्या चाहत्याला कुमार सानुची गाणी ऐकून केवढे दु:ख झाले असेल ते कळते.

या कार्टून शोस च्या दुनियेपलीकडेही अॅनिमेशन पट माझ्या मनावर राज्य करतात. बरेच जण अॅनिमेशन पट म्हणजे लहान मुलांचे पिक्चर अशा समजुतीचे असतात. तुम्ही जर त्यातलेच असाल तर जीवनातल्या एका महान कलाकृतींना मुकताय हे लक्षात घ्या.

डिस्ने-पिक्सार, ड्रीमवर्क्स, ब्लू स्काय स्टुडीओस् या निर्मात्यांचे पिक्चर हे आशयघन असतातच, पण तंत्रज्ञान, कला यांचा सुंदर संगम आहेत. हॉलीवूड च्या तुफान चालणाऱ्या सिनेमांमध्ये कितीतरी अॅनिमेशनपटांचा नंबर वरच्या स्थानावर लागतो. अब्जावधींचा व्यवसाय करणारे सिनेमे बनवणे हा नक्कीच 'पोर'खेळ नाही. वर उल्लेख केलेले स्टुडीओ आणि आणखी बरेच या मोठ्या कंपन्या आहेत. ३ डी मोडेलिंग आणि फोटोरिअलीस्टिक रेंडरींग[१] साठीचे सॉफ्टवेयर, ग्राफिक्स प्रोसेसर्स अधिकाधिक उन्नत करण्यासाठी बहुतेकांकडे स्वतःची तंत्रज्ञांची फौज असते.

अशा या जगाची ओळख मला "आईस एज" या सिनेमापासून झाली. २००२ साली आलेला हा सिनेमा नितांत सुंदर आहे. त्यातली ह्रिदयस्पर्शी कथा, गमतीदार संवाद, पार्श्वसंगीत यामुळे हा माझा सर्वात आवडता अॅनिमेशनपट आहे यात शंका नाही.
_*_

[१] संगणकावर त्रिमिती आकृत्या तयार केल्यानंतर त्यांना रंग आणि विभासी प्रकाशयोजना देवून त्याच्या फ्रेम्स तयार करतात. ही चित्रे किती जिवंत वाटणार हे वापरलेल्या अल्गोरिदम्स वर असते. प्रकाशाची किरणे वस्तूवर पडून त्याला दृश्यता देतात. पण प्रकाश हा नेहमी एका स्रोताकडूनच आलेला नसतो. तसेच वस्तूवर प्रकाश पडून आपल्या डोळ्यात येईपर्यंत त्याचे अनेकदा परावर्तन होऊ शकते, विखरून येवू शकतो. (Reflection, Refraction, Diffusion) अशा सर्व परिणामांचे गणित मांडून ही शेवटची फ्रेम तयार होते. गणित जितके किचकट तितके अल्गोरिदम वेळखाऊ. शेवटी सृष्टीचे चमत्कार संगणकात आणण्यासाठी तेवढे खपावे लागणारच.

Thursday, July 26, 2012

डार्क नाईट राईजेस


मागच्या शानिवारी 'डार्क नाईट राईजेस' बघितला. नोलन च्या सिनेमांकडून जी अपेक्षा असते ती खचितच पूर्ण झाली.
आपलासिनेमास्कोप वर याचे गणेश मतकरींचे सुंदर परीक्षण आहे.
त्यावर ही माझी प्रतिक्रिया इथे परत टाकतोय..
------------------------------------------

सही परीक्षण.

>>"सुपरहिरोपट हे पहिल्या चित्रपटात हिरोच्या ओरिजिन विषयी सांगतात पण त्यानंतरचा भाग केवळ एकामागून एक येणा-या साहसांना दिलेला असतो."

उलट मला वाटते की पहिला भाग रोचक करणे दुसऱ्या व तिसऱ्या भागाच्या मानाने सोपे असते. हिरोचे इवोल्युषण दाखवण्याचे ठराविक पॅटर्न दिसतात. या पॅटर्नशी प्रामाणिक राहिले तर हमखास यश.
दुसरा, तिसरा भाग म्हणजे खूप विचार करून बनवलेली कथा असते. दुसरा भाग सरस असतो याच्याशी पूर्ण सहमत.

नोलन चा बॅटमॅन पण त्यातलाच. त्याला वेगळे करतात ते त्याचे विलन आणि त्याचे मर्त्य असणे, त्याच्या मानवी चुका आणि त्यातून घडत जाणे. सुपरहिरोंचे सिनेमे पाहून 'मलाही अशा पॉवर्स असत्या तर' हा फील नोलन चा बॅटमॅनला पाहून कधी येत नाही. आणि या सिनेमात तर चक्क अंगावर काटा येण्याइतपत मारलंय हिरोला.

नोलन चे आणखी एका बाबतीत कौतुक वाटते की कथा वास्तववादी असूनही, मूळ बॅटमॅन कॉमिक्स मधल्या पात्रांशी त्याने इमान ठेवलय. बेन, तालीया, रा'झ अल घुल[१] यांचे संदर्भ जुळवलेत.

>>"आणि जोधपूरमधली विहीर गॉथमजवळ नक्की कुठे असावी हा दुय्यम प्रश्न, ज्याचं उत्तर मी काही देऊ शकणार नाही"

ही विहीर गॉथमजवळ नसून मध्यपूर्वेत अपेक्षित आहे. रा'झ अल घुल हा स्वतः एक भाडोत्री सैनिक (mercenary) म्हणून तिथल्या देशात असतो असा उल्लेख आहे.[१]
कॉमिक्स मध्ये बेन कॅरीबियंस मध्ये कारावासात असतो.[१] त्यामुळे मध्यपूर्व किंवा कॅरीबियंस असा निष्कर्ष काढू शकतो.
या चित्रपटाची सर्वात बळकट बाजू म्हणजे हा विहीरवजा कारावास. त्याबद्दल थोडे लिहायला हवे होते. कदाचित त्याबद्दल लिहिले तर तो स्वतःच एक मोठा पोस्ट होईल.

आणखी एक निरीक्षण-
निम्म्याच्या वर इंसेप्षण - डार्क नाईट कास्ट कॉमन आहे.
टॉम हार्डी - इम्स - बेन.
जोसेफ गॉर्डन लेवीट - आर्थर - जॉन ब्लेक (रॉबिन).
मावियोन कोटीया - माल - मिरांडा टेट (तालीया झ अल घुल)
मायकेल केन - स्टीफन माईल्स - आल्फ्रेड पेनीवर्थ
सिलीयन मर्फी - रॉबर्ट फिशर - जोनाथन क्रेन (स्केअरक्रो)

कॅटवूमन - अॅन हॅथवे नसती तरी चालले असते. कदाचित कॉमिक्समधली जास्तीत जास्त पात्र यावीत असा विचार असावा.
तिचे आणि ब्रूस वेनचे संवाद वीट आणतात.

[१]संदर्भ-विकी.

Saturday, July 14, 2012

संस्मरणीय जून - २

संस्मरणीय जून - १ वरून पुढे.
माथेरान

अगदी अवचीत जूनच्या दुसऱ्या आठवड्यात गेलो इथे शनिवारी. सोबत ३ उझबेक, एक इरिट्रिया (पूर्व आफ्रिका, इथिओपिया च्या जवळ) ची मुलगी, आणि प्रवीण.
आम्हाला वासरात लंगडी गाय रशियन माहित असल्याने त्यांच्या सोबत एका कार्यक्रमाचे आमंत्रण होते तिथल्या एका शाळेत. यांचे अनुभव ऐकणे, हास्यविनोद, घोड्यावरची रपेट, माथेरानचा धो धो पाउस यात हा प्रवास मस्त झाला.

भुसावळ
हेमचंद्रांचे लग्न होते इथे जूनच्या तिसऱ्या आठवड्यात. पुणे भुसावळ हा जवळपास ५०० किमी चा प्रवास आम्ही (सुमित, निखिल, मुस्तफा, कुणाल) स्लीपर बसने केला. येता-जाता दोन्ही वेळी रात्रीचा प्रवास, मोठी बेड आणि बसही आरामदायक असल्याने गप्पाष्टकांना उधान. बेन्डीचे लग्न पण सुंदर झाले. लग्नावारून येवून लगेच माझ्या क्यामेर्यातल्या फोटो आणि विडीओचे संकलन करून मी एक छानशी क्लिप बनवून सगळ्या मित्रांना शेयर केली.
लग्नात बेन्डीला नाव घ्यायला सांगितले तर गडी लगेच तयार झाला. म्हंजे नक्कीच तयारी करून आला असेल या समजुतीने आम्ही कान टवकारले तर बेंडीने हे नाव घेतले-

"वाटीत वाटी स्टील ची वाटी
वाटीत वाटी स्टील ची वाटी,
अर्चनाचे नाव घेतो धरून तिची अंगठी"

जमलं नाही जमलं नाही म्हणून लगेच लोकांनी वहिनीकडे मोर्चा वळवला.

वहिनी-
"हळद लावते किंचित, कुंकू लावते ठसठशीत,
हेमंतराव माझे पूर्वसंचित"

"याला म्हणतात नाव, नाहीतर आपले बघा भांड्यांचे दुकान! म्हणे स्टीलची वाटी." - इति सुमित.
सगळीकडे हशा पिकला.

बदगी
आजीला परत घ्यायला गेलो (मागच्या पेट्रोलच्या पोस्ट मध्ये दुसऱ्या दिवशी सोडायला गेलो होतो). जूनचा चवथा आठवडा. बदगी हे पिंपरी पेंढार पासून साधारण १५ कि.मी. वर आळेफाटापासून २५ कि.मी. वर असलेले दुर्गम खेडे. तिथे पाळीव कुत्र्यांच्या गळ्यात काटेदार लोखंडी पट्टा घालतात. कारण-वाघाने धरू नये म्हणून.
माझी मावशी राहते तिथे. आणि आजीचे माहेरही हेच. तिथे मुक्कामी एस. टी. जाते. १-२ वर्षापूर्वी एकपदरी डांबरी मार्ग बांधला तिकडे जाणारा.मस्तच जागा आहे.. गावाला शहराची अवकळा नाही आली अजून.

मला इथे गाडी चालवायला लय म्हंजे लय आवडते. वळणावळणाचे रस्ते आणि सभोवताली शेते आणि डोंगर. सोबत आजी असली तर "ते आम्ही तिथे घळीत पाणी प्यायला जायचो, तिथे मला वाघ दिसला होता, कोण कुठला म्हातारबा तिकडं पडून गेला, माझी नणंद, भावजय अमकी तमकी तिथे राहायची, ते मळाबाईचे देऊळ, तो चारणबाबा-त्याच्यापुढे प्रसाद म्हणून तंबाकू ठेवतात" असले किस्से सांगत प्रवास घडतो. यावेळी सोबतीला रिमझिम पाऊसही होता.
टिंग्याचे शूटिंग याच परिसरात झालंय.

असा होता माझा फुल पॅक्ड जून. मजा केली एकंदर!

Wednesday, July 11, 2012

संस्मरणीय जून - १

हा महिना खूप प्रवास झाला. जवळ जवळ प्रत्येक विकांताला फिरत होतो. ताडोबा,
माथेरान, मावशीचे गाव बदगी आणि हेमचन्द्रांच्या लग्नासाठी भुसावळ.

ताडोबा
महिन्याची सुरुवातच धडाक्यात झाली.
जूनच्या १ तारखेला सकाळी आमची रेल्वे वर्धा स्टेशन ला लागली. ज्या जंगलाचा उल्लेख अगदी पहिली दुसरीपासून ऐकतोय, तिथे आम्ही आता ३ दिवस घालवणार याची जाम उत्सुकता होती. वाघ बघायचा हे तर मनात होतेच. पण कुठेतरी अपेक्षाभंगाची भीती होती. म्हणून मनाची तयारी केली की वाघ बघण्यासाठी नाही तर एक परिकथेतले वृक्षराजींनी भरलेले जंगल बघायला चाललोय.

मी, मुस्तफा आणि ऋषिकेश चा युवाशक्ती बरोबरचा पहिला प्रवास. आमच्या चोवीस जणांच्या ग्रुप होता. वयोगट अंदाजे १५ ते ७५. आमच्या बरोबर दोन अनुभवी लीडर्सही होते.
पहिला दिवस वर्धा ते ताडोबा हा प्रवास करण्यात आणि ताडोबाच्या बफर झोन मध्ये फिरण्यात गेला. ताडोबा हे आता 'ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प' म्हणून ओळखले जाते. आम्ही अंधारीत एका रिसोर्टमध्ये उतरलो होतो.
रात्री एकमेकांच्या ओळखी झाल्यावर आम्हाला लवकर उठायचे म्हणून लीडर्स ने सूचना दिल्या. विदर्भात मी पहिल्यांदाच आलो होतो, जाम गरम होत होते. त्यात आम्हा सर्व १४ मुलांना एकच छोटे डॉर्म दिले होते. (हा एवढा भाग सोडला तर बाकी सर्व व्यवस्था चोख होती). त्या रात्री नीट झोप नाही आली, पण सकाळी लवकर उठून जंगलामध्ये जाण्याच्या उत्सुकतेपोटी की उकाड्यामुळे माहीत नाही.

सकाळी ४ वाजता उठून, अंघोळ सोडून बाकीचे कार्यक्रम उरकल्यावर आमचे ६-६ जनांचे ग्रुप केले आणि जिप्सी मध्ये बसून प्रवास चालू झाला. कोअर झोन मध्ये शिरल्यावर साधारण २ किलोमीटर अंतरावर गव्यांचा कळप दिसला. अगदी राजबिंड जनावर! पण वाघापेक्षा आक्रमक.
यार या स्पीडने लिहीत राह्यलो तर हा पोस्ट काय छापून होणार नाही.. बास.. डीटेल्स नंतर.
रानगवा
१. ताडोबा अंधारी ६२५ स्क्वे.कि.मी. चा परिसर. आतली काही गावे आता पुनर्वसन करून इतरत्र हलवलीयेत.
२. व्याघ्र प्रकल्पात २ मोठी तळी आहेत.
३. वाघ, रानडुक्कर, हरीण, भेकर, बिबटे, रान कुत्रे, गवे, अस्वले, मगर इ. प्राणी आहेत. पैकी बिबटे सोडून सर्व प्राण्यांचे बऱ्याच जणांना दर्शन झाले. बरेच वाघ आहेत.
४. कधी न पाहिलेले पक्षी आहेत.
वाघाच्या पाउलखुणा. वाघाला एकदा खुल्या जंगलात फिरताना पाहाच. अन्नसाखळीत सर्वात वरच्या स्थानावर असल्यामुळे की देवदत्त सामर्थ्यामुळे आलेली ती बेफिकरी, तो माज, त्याची सम्राटाला लाजवेल अशी चाल.वाघ एवढा आयकॉनिक का, याचे उत्तर त्यात आहे. तो येतो म्हणून आसपासचा इतर कुठलाही प्राणी, पक्षी, माकडापासून हरणापर्यंत चीत्कार करतो. त्याची तास तास वाट पहावी, पशुपक्षांच्या मुजर्याने त्याच्या येण्याची नांदी व्हावी, समोरच्या झुडुपातून त्याची सोनेरी कांती झळकावी, आणि तो बाहेर आला की श्वास रोखून डोळ्यात ते ध्यान टिपावे. स्वर्ग स्वर्ग तो आणखी काय बाप्पा? Tadoba (Chandrapur MH) 1st-4th June.

आम्ही ३ तासांची एक अशा २ दिवसात सकाळ संध्याकाळ ४ फेऱ्या केल्या कोअर झोन मध्ये. आणि एक अनियोजित ट्रीप बफर झोन मध्ये निघायच्या दिवशी. उन चिक्कार होते आणि जंगलाचे रस्ते धुळीने माखलेले.
प्रत्येक फेरीत जंगलाच्या वेगवेगळ्या भागात जवळ जवळ ३० किलोमीटर ची रपेट होई आणि वाघ व इतर प्राणी यांचे विलोभनीय दर्शन झाले.
ताडोबाचा मुगुटमणी - शिवाजी. त्याची डरकाळी याची देही याची डोळा पाहिली/ ऐकली

येडाअण्णा च्या वाटेवर डोळे.

Two of the 18 months old quadruple. These 4 siblings haven't defined their area of dominance yet. They wander all over the forest as a unit. Sometimes enter into territories of "Yeda Anna" and "Shivaji". Once old enough they will part ways with each other and have to fight the survival battles. Tadoba (Chandrapur MH) 1st-4th June

ही ट्रीप म्हणजे माझ्या संस्मरणीय सहलीपैकी एक झाली यात शंका नाही कारण शीर्षासन निघाले. अरुणाचल-आसाम मध्ये काझीरंगा आणि तवांग ला फिरल्यावर मनी निश्चित केले कि मला आवडलेल्या ठिकाणी मी शीर्षासन करून फोटो काढून घेणार. तसे माझा अल्बम ने बाळसे धरायला सुरुवात केलीये. तवांग जवळ से ला पास, हम्पी आणि ताडोबा असे तीन शीर्षासन आलेले आहेत.

Saturday, June 30, 2012

काच फुटताना..


पोस्टचं टायटल बघून पब्लिकचा काहीतरी सेंटीमेंटी, अॅबस्ट्रॅक्ट वगैरे टाकणार असा समज होऊ शकतो. यार पण अॅबस्ट्रॅक्ट विचार करून करून डोकं बधीर झालं आता, त्यामुळे कधीकधी साधं सरळ सोपं लिहिलं तर फाउल थोडी होणारे?
खरच काच फुटताना पाहिली मी. तसे प्रत्येकाच्या आयुष्यात कधीना कधी तरी हा प्रसंग येतोच. पण बऱ्याचदा ग्लास, आरसा, कपाटाचे प्यानल, घड्याळ, मोबाईल ची स्क्रीन, फ्रीज चा रॅक असे फुटकळ फुटण्याचे प्रकार पहिले असतील लोकांनी.
लहानपणी एकदा जिंकून आणलेल्या गोट्या अशाच थंडीच्या दिवसात चुलीत तापवून
पाण्यात टाकायच्या आणि तडकवयाच्या असले उद्योग पण केले त्या मोहापायी.
कधी ती पिक्चर स्टाईल[१] ने फुटलेली काच बघितलीये? क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी, भयाण अशी?

मागे एकदा सांगितले होते न, की विकेंडला ऑफिस ला जाऊन बसतो मी. मला कामापेक्षा त्या एकांताचं अप्रूप जास्त. पूर्ण मजला रिकामा. फक्त माझ्या क्युबिकल वर उजेड. खोल खोल शांतता. आमचे ऑफिस आहे तिथे मागच्या बाजूला डोंगर रांग आहे. तिथून खूप वेगाने वारा वाहतो. त्या वाऱ्याचा आवाज बाथरूमच्या प्यानेल्स मधून घोंगावतो मधून मधून. अशा वातावरणात दुपार होऊन किर्र रात्र कधी होते समजत नाही.

बऱ्याचदा मी रविवारी दुपारी जातो. पिझ्झा मागवायचा, तो येईपर्यंत तंद्री लावायचा प्रयत्न करायचा. तो आला पोटभर ताव मारला की खुर्चीवर मागे डोके टाकून पडी मारायची. एकदा मी अशीच तीन साडेतीन वाजता पडी मारली. बाहेर दुपारचा लख्ख उजेड असल्यामुळे आतमध्येही थोडाफार उजेड होता. कधी दीड-दोन तास गेले समजलेच नाही, आणि जाग आली तेव्हा आजूबाजूला पूर्ण अंधार. मजामिश्रीत भीती वाटली सेकंदभर.

कधीकधी अशा एकांतात खूप एकाग्रता येते. काहीच्या काही सुचते, कोडमध्ये उतरते,आधी अवघड वाटणाऱ्या गोष्टी चालायला लागतात, कुठल्याही इनपुटला दाद देतात, सुंदर दिसतात. ७० किलोमीटर्स चा प्रवास मग सुसह्य वाटतो नवीन बळ देतो. कधी कधी उलटही घडते, सारे व्यर्थ वाटायला लागते. तुका म्हणे..चालायचेच.
त्या दिवशी मात्र हे नेहमीचे खेळ बाजूला पडले आणि दुसऱ्याच कारणासाठी पैसे वसूल अड्रेनलीन रश मिळाला, नसानसा मोकळ्या.

काच.
मागच्या रविवारी असाच बसलो होतो. च्यायला तो प्रिंटिंग चा प्रॉब्लेम यार लय डोकं खातोय. काहीतरी चुकतंय, काहीतरी राहतंय. रात्रीचे साडेनऊ वगैरे वाजले असतील. हे झाले तर लगेच घरी निघू, पण करतोय त्यात धार नाही, मला रिझल्ट्स दिसत नाही. आर्घ..!
धप्पकन काहीतरी जोरात पडल्याचा आवाज झाला. इकडे तिकडे गोंधळून बघितले. बघतोय तर उजवीकडच्या केबिनची काच तडकत होती. हळूहळू.. टन्..क्लक्..टन्, टन्,.

इथून पुढचे १० सेकंद.
०-२.
गोट्या कपाळात. रामसे बंधूपासून राज़, रिंग, एवील डेड ची सगळी भूतं आठवली. खरेतर अशावेळी देव आठवायला हवेत, पण मन पण एक लोचा आहे. कुठे सावली वगैरे दिस्तीयेका याचापण शोध घेतला नकळत.

३-७.
वरून काहीतरी पडले असणार. पण आज कोण कडमडतय एवढं? मेंटेनंस वाले असतील. चायला, हे माझ्यावर तर नाहीना शेकणार? म्हणतील डोकं फिरलं आणि काच फोडली. XXX गेले सगळे, घाबरतो की काय कुणाच्या बापाला?
ते ठीकेये हो, पण कुठे समारा[२] तर दिसत नाहीयेना? बोंबला..

८-१०.
hey.. wait a minute. हो, हे नक्कीच विन्ग्रजीतच म्हटलो असेल मी.
बाहेर नुकताच पाउस सुरु झालाय. लाकडे, फॉल्स सिलिंग च्या टाईल्स फुगल्या असतील. जी काच फुटतीये तिच्या शेजारी लाकडी चौकट आहे. तिचा दबाव ह्या काचेवर पडला. लाकूड फुगवून तर हम्पीचे कारागीर मोठमोठे दगड फोडायचे [३] मग हि चिम्पाट काच का नाही फुटणार?
ते ठीकेये हो.. मागे समारा तर उभी नाहीयेना? राम, राम.

लागलीच सिक्युरीटीला फोन केला. तो आला, कधी माझ्याकडे कधी काचेकडे बघतोय. मग दुसरा आला. मग तिसरा. मनात म्हटलो, अरे कोई कुछ बोलेगाभी? मग त्यातला एक बोलला.
"सर, घाबरला असाल ना तुम्ही? पहिला पाउस पडल्यापासून ही तिसरी काच फुटलीये ऑफिसमध्ये !"
"अच्छाSSS!" इति मी.
त्या अच्छा ला किती गहिऱ्या छटा होत्या त्या मला, आणि आता तुम्हाला माहिती.
पुढे पाच मिनिटे ती काच अशीच तडकत होती. टन्..क्लक्..टन्, टन्,.

-*-

[१] ही उत्कंठा वाढवणारी काच, बऱ्याचदा हॉलीवूड च्या सिनेमांमध्ये असते. आठवतंय तसे पहिल्यांदा The Lost World: Jurassic Park मध्ये पाहिली होती.

[२]"द रिंग" हा मा माझा सर्वात आवडता भयपट. त्यातलं समारा हे भूत. आयच्या गावात, लई डेंजर आहे ती.
हे चित्र चवीपुरते, जास्त काही अपलोड केले तर झोप येणार नाही..
.
.
मला.

[३] मागच्या वर्षी जून मध्ये हम्पीला २ दिवस होतो. अ ति श य सुंदर ठिकाण आहे हे. उत्खननात सापडलेली मोठाली दगडी मदिरं, भव्य प्रासादांचे अवशेष, धडकी भरवणारे पाषाण, आणि मधून शांत वाहणारी तुंगभद्रा.
हे पाषाण फोडले ते असे. लिहीन विस्ताराने परत. फिलहाल करा रिसर्च वेळ मिळाला तर.

[4] १६ डिसेम्बर २०१५. काप्फेनबर्ग, ऑस्ट्रिया
SmarterEveryDay या युट्युब चॅनेलवर टेंपर्ड काच अशी का फुटते याचा विडीओ सापडला.


Sunday, May 27, 2012

दिलमे मत रख यार, बोल डाल!


या विषयाला गंभीर करू की इनोदी करू हे सुचत नाहीये. त्यामुळे दोन्ही प्रकार एकमेकात घुसळून हा पोस्ट स्ट्रॉबेरी फ्लेवरच्या आईसक्रीमवर लिंबाच्या लोणच्याचा खार टाकला तर जी चव येईल तसा झाला तर क्षमा.

परवा पेट्रोल चे भाव पुन्हा चढवले या हरामखोरांनी. मला कार घेतल्यावर जेवढा आनंद झाला नाही तेवढा आनंद लोकांना मला "तुझी कार किती मायलेज देते?" हा प्रश्न विचारून होतोय. त्यांच्या चेहऱ्यावरचे छद्मी हास्य सहन करणे असह्य होते. कधीकधी बोलून जातो कि "बरे झाले दीड वर्षापूर्वी घेतली, नाहीतर आता घेण्याची हिम्मत आहे का कुणाची?" मग त्यांच्या आनंदात थोडे विरजण पडले कि कसे गार गार वाटते.

काल शनिवारी रात्री उशिरा ऑफिस वरून घरी निघालो. (ही शनिवार, ऑफिस, आणि उशीर ही वेगळी कहाणी.. फुटेज खाईल.. तेच ते). रविवारी सकाळीच आजीला घेवून गावाला जायचे होते म्हणून म्हटले लगेहात पेट्रोल भरून घेवू.
आमच्या कंपनीजवळच्या पेट्रोल पम्पावर घेतली आणि २००० चे टाकायला सांगितले. सवयीप्रमाणे की लोक करतात म्हणून, बाहेर येवून टँक पाशी उभा राहिलो. "झीरो बघा" इति पंप कामगार.( त्याला पेट्रोल वाढपी म्हटले तर कसे वाटेल?)
बघितला. पेट्रोल चे नोझल टाकीत आणि मी लक्षपूर्वक मीटर कडे पाहतोय. तोच मागून दुसरा आला आणि कार्ड घेवून गेला.
आता जसे मीटर १२०० ला लागले, दुसरा कार्ड घेवून हजर. त्याच्या पावतीवर सही करतोय तर तिकडे २००० झाले.
आता थोडे लवकर झाल्यासारखे वाटले, पण मीटर कशाला खोटे बोलेल अशा समजुतीवर कार्ड पाकिटात ठेवून निघालो पुढे. बघतोय तर गाडीचा फ्यूल गेज टाकी ३/४ भरलेली दाखवत होता. चायला गेम पडली.. हा पहिला विचार.
दर वेळी २००० चे भरले तर टाकी पूर्ण भरते, आणि आज ५०० चे पेट्रोल आधी असूनही टाकी ३/४?
दरवाढीने एवढा फरक?
तसाच पुढे आलो.. नाही यार मला झोप नाही येणार. मीटर मध्ये मारले कि काय? पण मी तर झीरो आणि २००० बघितले होते. मग लोचा झाला कसा? आणि झाला तर केला कसा? मागे जावून त्यांना विचारू? विसरून जाऊ?

अॅक्टीवा किंवा स्कूटी वाल्या पोरींना हे वाढपी गंडवतात हे माहितीये.
एकीकडे ती अवजड गाडी कोवळ्या हातांनी सांभाळायची दुसऱ्या हाताने सीट उघडून टाकीचे झाकण काढायचे. अशात समोर मीटर पहायचा. आणि वाढपी पट्टीचे असतील आणि अॅडीटीव घ्या म्हणून मागे लागेले वगैरे तर नको म्हणत कसेबसे देतील तेवढे पेट्रोल पदरात पाडायचे. असे दृश्य पहिले की "स्त्रीजन्मा तुझी कहाणी" वगैरे वगैरे डोळ्यासमोर येते.
एकदा दोनदा मला स्वताला असा अनुभव आला तेव्हा मला मीटर वरून डोळे न हलवण्याची सवय लागली. बहिणीला आणि मैत्रिणींना तर लय वेळा सांगितले कि, पेट्रोल भरताना गाडी स्टँड वर लावून निवांत होवून मीटर कडे पाहिल्याशिवाय भरू देवू नका. मागच्या लोकांनी हॉर्न मारला तर 'हाड' म्हणून स्थितप्रज्ञ राहा.
शेवटी आता या पोरींची दया त्या स्कूटर बनवणाऱ्यांना आली आणि त्यांनी त्या नवीन डिझाईन वाल्या गाड्या काढल्या. ज्याच्यात काही गाड्यांना पुढून पेट्रोल भरता येते तर काहींना सीट उचकण्याची गरज नाही.

हा तर, मनी निश्चय केला कि जावून जाब विचारायचा. केस काय मांडणार? मीटर तर मी स्वत: बघितला होता.. पण म्हटले गेले सगळे xxx. मी जाणार. मग गाडी वळवली आणि एकदम अँग्री यंग म्यान थाटात सरळ पंपावर घालून उतरलो आणि त्या वाढप्याला म्हणालो..
इथे शिवी वगैरे अपेक्षित आहे, माहितीये मला.. पण नाही, निघाली नाही.
त्याला म्हटलो.. "तुम्ही २००० चे पेट्रोल टाकले पण माझा गाडीचा फ्यूलगेज दाखवत नाहीये."
मग तो निमूटपणे माझ्या मागे आला. आणि फ्युल्गेज पाहिला.
वाढपी - "आहो पण सर् तुम्ही मीटर पहिला होता ना. मग कसे होईल असे?"
सर्? अच्छा माणूस जरा मवाळ दिसतोय.. च्यायला एक शिवी तर खपलीच असती.
मी- "ते मला माहीत नाही, माझा गेज काय चुकीचे रीडिंग दाखवतोय का? कुणी म्यानेजर आहे का?"
आता रात्री दहा साडेदहाला कसला म्यानेजर आन कसले काय? असा विचार करतोय तोच तो म्हटला कि तिकडे केबिन मध्ये आहेत.
म्यानेजर - "सर्, आमच्याकडे सगळे कम्प्युटराईस्ड आहे, कळेल आपल्याला"
हा दुसरा माणसातला माणूस?नशीब जोरात.

त्याने मला प्रत्येक नोझल मधून वाढलेले पेट्रोल, वेळ, किती लिटर, किती पैसे याचा हिशोब असलेली प्रणाली दाखवली. माझ्या क्रेडीट कार्ड च्या पावती वर असलेली वेळ आणि सिस्टम मधली वेळ पडताळून आम्ही पाहिले.
ज्या नोझल मधून मला पेट्रोल दिले होते तिथून २००० चे पेट्रोल पडलेच नव्हते. ते १७०० चे होते. मग त्या वाढप्याला जरा झापून मला ३०० चे पेट्रोल भरून दिले.

आता यात खालील शक्यता आहेत -
१. वाढप्याने पेट्रोल मारले.
२. पंप मशीन मध्ये दोष होता.
३. वाढपी आणि म्यानेजर ची मिलीभगत आहे. आणि जो ग्राहक राडा करील त्याला ते गप् परत भरून देतात.
४. माझ्या गाडीच्या गेज मध्ये दोष आहे.
५. दोष ना कुणाचा.. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.

आता ज्या प्रकारे त्या दोघांनी मला प्रामाणिकपणे सिस्टम दाखवली त्या अर्थी मला ५ वा पर्याय सोयीस्कर वाटतोय. काहीका होईना, माझे ३०० चे पेट्रोल वाचले.

काही धडे-
१. पेट्रोल पंपावर बिनधास्त भिडा.
२. आयला, पंपाच्या सिस्टम्स लैच भारी झाल्यात राव. त्यामुळे, शंका असेल तर जाणून घ्या.
३. पावती घ्या.
४. शिवी हासडण्यापूर्वी तपासा -
‍अ. तुमची शरीरयष्टी.
ब. तुमची बाजू.
क. समोरच्याची शरीरयष्टी.
ड. त्याची बाजू.
तपासणी क्रम चवीनुसार ठेवा.

आज रविवार, अंग आखड्लाय दिवसभर गाडी चालवून. पण कदाचित उद्या या गोष्टीचे इतके गांभीर्य नाही राहणार म्हणून मरमर करत आजच पोस्ट टाकतोय.
खूप मोकळं वाटतंय. मी जर मागे फिरून गेलो नसतो तर हा पोस्ट फक्त एक कडू कडू तक्रार राहिला असता. मनात उगाच घर करून राहिला असता. येत जाता त्या पेट्रोल पम्पाकडे बघून शिव्या घातल्या असत्या. पण अब सब ठीक है.
म्हणतात ना- दिलमे मत रख यार, बोल डाल!
-*-

Tuesday, April 24, 2012

इंटेलिजंट स्पर्म!

बॉस, काहीतरी भयानक जादू झालीये. हा एप्रिल चालुये आणि आतापर्यंत या वर्षात मी तीन हिंदी सिनेमे पाहिले. ते तीनही प्रस्थापित हिंदी सिनेमाच्या समजुतींच्या पार गेले आणि एक नवीनच शाळा (school of thought) भरवलीये. पानसिंग तोमर, कहाणी आणि विकी डोनर हे नितांत सुंदर पिच्चर पाहिले. हिंदी पिच्चर बेचव आणि बिनडोक अशा समजुती घेवून वर तोंड करून हिंडणाऱ्या लोकांना (म्हणजे आम्हालाच) भयानक धक्का होता हा. नशीब आमचे की हाउसफुल सारखे सिनेमे मधेमधे येवून तो समज अगदीच खोटा नाहीये अशी सांत्वना देतात.

वर नमूद केलेल्या तीनही सिनेमांचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यांच्यात कोणीही 'तुर्रम'खान नव्हता. तरीही पानसिंग आणि कहाणी तुफान चालले. आणि विकी डोनर मला एवढा आवडलाय की ज्या अर्थाने हे दोन चालले तो पण बॉक्स ऑफिस गाजवणार यात शंका वाटत नाही. पानसिंग ला काही मोठे बजेट नव्हते पण तरीही ४०-५० वर्षांचा काळ २-२.३० तासात दाखवण्यात लैच कमाल केली. कोलकात्याला ज्या प्रकारे कहाणी मधले एक महत्वाचे पात्र बनवलय त्याला तोड नाही. हे सिनेमे कुणी लिहिले, कुणी दिग्दर्शित केले हे इथे कशाला लिहू? विकी आहेच. पण या लोकांचे कौतुक करावे तेवढे थोडे.

विकी डोनर मी मागल्या रविवारी पाहिला. खरेतर 'मिरर मिरर' पाहायला जाणार होतो. पण सिनेमाला येणारं पब्लिक चेंज झालं आणि त्यांना हे परीकथांचं ज़ॉनरं कितपत आवडेल या शंकेमुळे मी दुसरा कुठला पाहायचा या शोधाला लागलो. जेम्स क्यामेरून त्याचे पिक्चर परत बळच रीलीस करून पैसे कमावतो, त्यामुळे टायटनिक ३डी चा गल्ला भरायचा नव्हता. हाउसफुल२ हा टूकार सिनेमा मी कुणी मला पैसे दिले तरी पाहणार नाही असे बरेच आधी ठरवले होते. त्यामुळे राहिला विकी डोनर. रेडीफ वर सुकन्या वर्मा[१] चा रिव्यू वाचला आणि चला म्हटले. बुक माय शो वाले साला २० रुपये जास्त घेतात तिकिटामागे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ई-स्क्वेयर ला लवकर जावून तिथेच बुक केली तिकिटे. आणि कधी कुठे यायचे हे पार्टीला एसएमसएस करून रानडेला गेलो. तिथे ६-७ रशियन चे विद्यार्थी आले होते. वयोगट २२ ते ५५. पेशा- आर्टिस्ट, डेवेलपर्डे, डॉक्टर ते शास्त्रज्ञ. आमच्यात एक समान दुवा आहे. सगळे ड्रॉपआउट्स. कुणी सर्टीफिकेटचा, कुणी डिप्लोमाची, अडवान्स डिप्लोमाचा असे. आपली ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय करायला हवे हे सोडून सगळ्या विषयांवर चर्चा झाली. जशी माझी वेळ झाली तसा ई-स्क्वेयर ला पोहोचलो. पार्टी आधीच हजर होती.

हा पिच्चर का पाहावा -
१. यातला एकही जोक ओढूनताधून आणलेला नाही.
२. वन्ध्यत्व आणि शुक्राणू दान[२] हे विषय सिनेमाभर असूनही एकदाही पातळी सोडलेला विनोद नाही. आता तोल जाईल मग जाईल असे करता करता सिनेमा संपतो आणि उरतं फक्त कौतुक.
३. आयुष्मान - याचा पहिला पिच्चर आहे हा. प्रस्थापितांनी क्लास लावा याच्याकडे.
४. अन्नू कपूर - एक सुपीक आणि कसदार जीन मिळवण्यासाठी अगतिक झालेला डॉक्टर यांनी इतका अप्रतिम साकारलाय. याच्या डॉक्टर चढ्ढा आणि त्यांच्या तथास्तु ला पैकीच्या पैकी.
५. पिच्चर मधल्या विकीच्या आई आणि आजी. हा निव्वळ धिंगाणा प्रकार आहे.
६. दोन पोरी आहेत खतरनाक दिसणाऱ्या. (आता उड्या पडतील :) )

२०१२ हे बहुदा हिंदी सिमेमाला नवीन अर्थ देणारं वर्ष ठरावं. पुढील सिनेमांसाठी शुभेच्छा!
-*-

[१] - सुकन्या वर्मा आणि राजा सेन हे रेडीफ चे दोन समीक्षक. यांच्या सामिक्षांचा एक खास वाचक वर्ग आहे. लेख वाचायचा आणि खाली कमेंट्स मध्ये यांचा उद्धार करायचा हा बऱ्याच लोकांचा टाईमपास आहे.
यांचे रिव्यू म्हणजे वोकॅब्लरी चे दुकान असते. वाक्य भयानक शब्द वापरून किती दुर्बोध करता येतील याची स्पर्धा असते दोघांमध्ये. आपले इंग्लिश लय भारी हा माज ज्याला उतरवयाचा असेल तर त्याने यांचा लेख वाचावा. आणि काम फत्ते झाले कि खाली त्यांना शिव्या घालाव्यात.
त्यांच्या लेखाचा हा नमुना.. खालच्या टिपिकल कमेंट पहा.

[२] - माय मराठीची सेवा..:) infertility & sperm donation असे वाचावे.

Sunday, April 1, 2012

भांडवलवादाच्या आयचा घो? -१


इंजिनियरिंग च्या दुसऱ्या वर्षाला असताना मी यु./एम.पी.एस.सी. च्या साप्ताहिक क्लासला जायचो. अगदीच ठरवून नव्हता लावलेला क्लास. आमच्या एस.आर्.पी.एफ. चे तत्कालीन सहृदय आणि कर्तव्यदक्ष समादेशक व्ही. लक्ष्मीनारायण[१] यांनी राबवलेल्या अनेक समाजोपयोगी योजनांपैकी हा एक उपक्रम होता. इतिहास, समाजशास्त्र, भूगोल असल्या कुचकामी[२] विषयांची आवड भागवून घेत होतो. लक्ष्मीनारायण सरांनी कॅप्टन कोल्हटकर (यांची पुण्यात अकॅडमी आहे) त्यांची मनधरणी करून त्यांची आणि त्यांच्या शिष्यांची दर सप्ताहांताला येण्याजाण्याची व्यवस्था केली होती. ते आम्हाला स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन करायचे, अभ्यास घ्यायचे, मॉक टेस्ट असायच्या. वेळ अगदी मजेत जात असे. आमचा ७-८ जणांचा नियमित उपस्थिती असलेला ग्रुप होता. बऱ्याचदा कोल्हटकर सरांचे शिष्यच यायचे शिकवायला. पण स्वत: कोल्हटकर सर् आले की आणखी मजा. सत्तरीतले सर त्यांच्या तरूणपणाच्या गोष्टी उत्साहाने सांगायचे. शाळेत ते अभ्यासात मागे होते आणि वडलांनी अपमानित केल्यावर कसे पेटले आणि कुत्र्यासारखा अभ्यास करून एम.ए. झाले आणि आर्मीत जॉईन झाले, वगैरे वगैरे. (कुत्र्यासारखा अभ्यास कसा करतात देव जाणे, त्यांच्या तोंडून हे वाक्य किमान दहा वेळा ऐकले असेल, पण ती अभ्यासाची इंटेन्सिटी जाणवायची बाकी :))

कोल्हटकर सर मुद्दाम कधीतरी आम्हाला ऑफिसर्स मेस मध्ये घेवून गेले. ती ऑफिसर्स मेस आम्ही रोजच पहायचो पण आत काय असेल याची कुणालाच कल्पना नव्हती. एक दिवाणखाना, भिंतीला चितळाची शिंगे, चकाचक फर्निचर, ऑर्डरली इकडून तिकडे फिरतायेत आणि सर् त्यांना सगळ्यांसाठी चहा आणायला सांगतायेत. आम्ही जरा भेदरूनच बसलो होतो. त्यांना आम्हाला ऑफिसर्स चा थाट दाखवायचा होता. आर्मी मध्ये कसे ऑफिसर्स ची ठेप ठेवली जाते, दिमतीला ऑर्डरली असतात हे सांगायचे होते. ते म्हणाले कि तुम्ही खिशाला चाट पडली तरी महाग हॉटेल्स मध्ये जावून बघा. तिथलं वातावरण अनुभवा. तिथे गेल्यावर तुम्हाला ते आवडले तर तुम्ही ते मिळवण्यासठी प्रामाणिक प्रयत्न कराल. तिथले सोफिस्टीकेशन तुम्हाला हवेहवेसे वाटेल ते तुम्ही अंगी बाणवण्याची कास धराल. मला माहीत नाही त्यांच्या पध्दती किती बरोबर होत्या, पण मला ते खूप भावले.

एकदा समाजवाद विषयावर सरांची एक शिष्या अभ्यास घेत होती. त्यावेळी मी तिला विचारले कि समाजवाद(Socialism)आणि साम्यवाद (Communism) यात फरक आहे का? खरेतर त्यात फरक आहे हे मला थोडेफार माहिती होते, पण इम्प्रेस करायचा चान्स का सोडवा, म्हणून लगेहात विचारले तिला. मला या शब्दांचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. भांडवलवादाचे (Capitalism) जगात निर्विवाद प्राबल्य का? समाजवाद एवढा चांगला असताना घोड्यानं कुठं पेंड खाल्ली? सोविएट युनियन चे तुकडे का झाले? चीन खरच साम्यवादी आहे का? विचारवंताना अपेक्षित असलेला आदर्श समाज तिथे खरेच निर्माण झालाय का?

आज जगाची परिस्थिती पाहता, आपण नक्कीच आदर्श स्थितीत आहोत असे कुणाला वाटेल याची शंका वाटते. पण मनुष्यजातीने इतिहासात आदर्श समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी खरोखर महान प्रयत्न केले ही एक समाधानाची बाब म्हणता येईल. समाजवाद आणि साम्यवाद ही एक कृत्रिम व्यवस्था आहे. प्राण्यांची मूळ वृत्ती पाहता, आजचा भांडवलवाद हाच खरेतर नैसर्गिक वाटतो. स्पर्धा करणे, एकमेकांवर मात करण्यासाठी डावपेच लावणे, सत्ता गाजवणे, दुबळ्यांना गुलाम बनवणे हि मनुष्यप्राण्याची मूळ प्रवृत्ती. इतिहासात ती ठाई ठाई दिसते. पण विसावे शतक या मूळ प्रवृत्तीला मुसक्या बांधून माणसाने एक नवीन व्यवस्था निर्माण केली आणि जवळ जवळ शतक भर चालवली यासाठी नेहमीच वेगळे गणले जाईल.
-*-

१. व्ही. लक्ष्मीनारायण हे हिंदी सिनेमातल्या काल्पनिक नायकांपेक्षा हिरॉईक आणि तरीही वास्तविक पात्र आहे. सध्या कर्नाटक, आंध्रातल्या खाणमाफियांचे-राजकारण्यांचे नेटवर्क उद्धवस्त करतायेत.
मागच्या महिन्यात मध्य प्रदेशमध्ये एका आय.पी.एस. चा खाण माफियांनी घेतलेला बळी पाहून त्यांचे कार्य किती जोखमीचे आहे हे दिसते. त्यांच्याविषयी काही दिवसांपूर्वी सकाळ मध्ये आलेला हा लेख-
http://www.esakal.com/esakal/20120212/5409910696013669020.htm
आणि खाली माझी प्रतिक्रिया.
२. इंजिनियरिंग च्या सोडा, इतर कुणीही हे विषय अभ्यासणे म्हणजे वेळेचा अपव्यय. यु./एम.पी.एस.सी. ला हे विषय लागतात एवढेच यांचे शालेय जीवनात महत्व.

चित्र सकाळ मधून.