आईस एज : मैत्र जीवांचे - २

आईस एज - हिमयुग ही भौगोलिक अवस्था आहे, ज्यामध्ये पृथ्वीच्या तापमानात लक्षणीय रित्या घट होऊन हिमनद्या आणि धृवीय बर्फाचा विस्तार वाढतो. सिद्धांतानुसार पृथ्वीमाईच्या आतापर्यंतच्या आयुष्यात अशी अनेक हिमयुगे होऊन गेलीयेत. ही तापमानाची घट मनुष्याच्या आयुष्यात जाणवेल एवढ्या वेगाने होत नाही. आणि जर झाली, अगदी २-३ दिवसात झाली, तर काय होईल हे पाहायचे असेल तर "डे आफ्टर टूमॉरो" सारखा सिनेमा बघा.

"आईस एज" या सिनेमानेही ही 'तापमानाची त्वरित होणारी घट' संकल्पना त्याच्या पटकथेत वापरलेली आहे. कथा घडते ती हजारो वर्षांपूर्वी. मॅनी हा थोडासा एकलकोंडा आणि विरक्त मॅमथ प्राण्यांच्या लोंढ्यातून वाट काढत चाललेला आहे. हे प्राणी आहेत हिमयुग येणार म्हणून भीतीपोटी स्थलांतर करणारे प्रागैतिहासिक काळातले. एका कड्याजवळ उभा असताना, त्याच्या पायाला सिद येवून धडकतो. हा सिद आहे एक स्लॉथ, ज्याला सोडून त्याच्या कुटुंबाने पलायन केलंय. का? ते आपल्याला लगेच कळतं. सिदला माकडचाळे करून संकटात पडून घ्यायची खोड असते. अस्सं हे अतिशहाणं बाळ आपल्याला त्रास करू नये म्हणून त्याच्या आईवडील, भावंडं, काका, आजी त्याला दरवर्षी स्थलांतर करताना मागे सोडून जात असतात हे त्याच्या बोलण्यावरून कळतं. आताही तो जेव्हा मॅनीच्या पायाला धडकतो तेव्हा दोन गेंड्यांच्या जेवणाचे तीन तेरा करून त्यांचा पाठलाग चुकवण्यासाठी.
मॅनी त्याला गेंड्यापासून वाचवतो पण लवकरच त्याच्या खोडकर आणि बोलघेवड्या स्वभावाला ओळखून त्याला त्याच्यापासून दूर जायला सांगतो. पण ऐकेल तो सिद कसला. त्याच्या मागोमाग स्वारी निघते.

इकडे एक सेबरटूथ (नष्ट झालेली मार्जारकुळातली जात) कळप मनुष्यांच्या मुलाला उचलून आणण्याचा बेत तयार करतो आणि त्यांच्या तांड्यावर हल्ला करतो. त्यात त्या छोट्या लहान बाळाची आई स्वतः जीवाचा त्याग करून बाळाला वाचवते आणि हे बाळ आता सिद-मॅनीला सोपवते. जवळपास मनुष्यांची वस्ती असेल आणि हे बाळ आपण तिथे देवू अशा समजुतीने सिद आणि नंतर नाखुशीने मॅनी तो तांडा शोधायला निघतात.
तिकडे दिएगो नावाचा सेबरटूथ त्या बाळाच्या मागावर असतो. तो या दोघांना भेटतो आणि त्या बाळाला मनुष्यांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन देतो. पण त्याच्या वाणीवर अजिबात विश्वास नसल्यामुळे सिद आणि मॅनी त्याला नकार देतात. पण माणसांचा माग काढायला उपयोग होईल म्हणून हे दोघे दिएगोला त्यांच्या या टीम मध्ये सामील करतात. दिएगो जरी त्यांना मदत करायला तयार झाला, तरी अंतरीचा हेतू मात्र मॅनीसारख्या अजस्र देहाच्या प्राण्याला मारायला चांगली जागा शोधणे हाच असतो.

त्यांच्या या प्रवासात सिदमुळे अनेक गमतीजमती घडतात. त्यात सिद बाळाचा उपयोग माद्यांना पटवायला करतो, बाळाला भूक लागल्यावर डोडो पक्षांच्या थव्याकडून कलिंगड हिसकावणे, ज्वालामुखी फुटत असताना तिघांची त्रेधातिरपीट, भूमिगत हिमनदीच्या गुहेमधून भरकटणे हे प्रसंग खूप हसवतात. गुहेच्या प्रसंगात भित्तीचित्रातून मॅनीचा भूतकाळ समजतो. त्याच्या छोट्याशा कुटुंबाची मनुष्यांकरवी हत्या झालेली असते. त्यामुळे व्यथित होऊन तो असा एकटा जगत असतो. एका प्रसंगात तो दिएगोचे प्राण वाचवतो त्यामुळे दिएगोला या नवीन दोस्तांबद्दल जिव्हाळा निर्माण होतो. आता दिएगो त्याच्या कळपापासून मॅनीला आणि बाळाला कसे वाचवतो? हे तिघे बाळाला माणसांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होतात का? निसर्गाप्रती कृतघ्न माणसे त्यांचे काय करतात? हे सर्व तुम्ही सिनेमातच पहा. कारण हा भाग अतिशय भावपूर्ण आहे.

माझ्या एका मित्राची भावना ही होती- तो म्हणे की मी कुठलाच सिनेमा बघून एवढा भावविवश झालो नव्हतो आणि एका अॅनिमेशनपटामुळे डोळ्यात पाणी येईल असे कधी वाटलेही नव्हते.

या सिनेमामध्ये सिद-मॅनी-दिएगो यांच्याशिवाय आणखी एक पात्र आहे. ते म्हणजे स्क्रॅट. हा खार आणि उंदीर याच्यासारखा प्राणी सिनेमाभर त्याच्या अेकॉर्न[१] मागे धावत असतो. त्याचे त्या फळासाठीचे अतिशयोक्तीपूर्ण प्रेम पाहून हसून हसून पुरेवाट होते.

या सिनेमाबद्दल लिहिण्याचे कारण म्हणजे सिद-मॅनी-दिएगो तिकडीचा चौथा सिनेमा या आठवड्यात रीलीस झाला. काल पाहिला. त्रिमिती परिणाम उच्च असले तरी पटकथेत आणि संवादात तो पहिल्या दोन भागांच्या जवळपासही फिरकत नाही. त्याविषयी परत लिहीन.
_*_

[१] डिसेंबर २००८ मध्ये YHAI च्या बरोबर हिमाचल प्रदेशातल्या डलहौसी ला ५ दिवस ट्रेकसाठी गेलो होतो. त्यावेळी डलहौसी कडून चंबाला जाण्यासाठी पीरपंजाल रांगेमधली जंगले तुडवली. तेव्हा ओक वृक्षांचे अेकोर्न आणि पाईनकोन कसे असतात ते कळले. स्क्रॅटचा जीव असलेला हा प्रकार पाहून आईस एज चि आठवण नसती आली तर नवल.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्रायासाठी अनेक आभार!

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक