पुण्याला शाप-PMPML

पुणे शहराची वाट लागली आहे हे सांगण्यासाठी आता अगदी मकेंझी लावण्याची गरज नाही. जमिनीच्या किमती अवाच्या सवा वाढायला लागल्यावर पुणे मागे पडायला सुरुवात झाली. मागे यासाठी की ज्या पद्धतीने पुण्याचा विस्तार होतोय आणि पायाभूत सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष झालंय ते पाहता पुणे आता आपली गमावलेली पत मिळवणार नाही. मला हा साक्षात्कार एकदम का झाला असा प्रश्न पडू शकतो. नाही, मी सिंगापूर, शांघाय किंवा कुठल्याही पाश्चात्य देशात जावून आलो नाही. मी जवळ जवळ गेले वर्षभर बँगलोर ला होतो. असे म्हणतात की बँगलोर बरेच पुण्यासारखे आहे. मलापण हे साम्य जाणवले. त्याच शासकीय संस्था, कॅन्टोनमेंट चे प्रभाग, मोठ्या शिक्षण संस्था, नवी जन्मलेली आयटी पिढी. पण बँगलोर वाढले. नुसतेच वाढले नाहीये, तर सजग पणे वाढले.
तिथे आजिबात ट्राफिक जाम नाही? आहे. पण लवकरच ते सुरळीत होईल. तिथे मोठाले शंभर फुटी रोड आहेत. जागोजागी फ्लायओवर बांधले जातायेत. मेट्रो पूर्णपणे कार्यान्वित होईल तेव्हा बंगलोरची वाहतूक ही भारतातल्या इतर शहरांना आदर्श ठरणार यात मला मुळीच शंका नाही.
कुठल्याही शहराची वाहतूक व्यवस्था हा त्या शहराचा कणा असतो. माझे बँगलोचे याविषयी निरीक्षण हे आहे.

१. बस व्यवस्था.

बँगलोर मध्ये महापालिकेच्या बसेस शिवाय खाजगी बसही चालू असतात. महापालिकेच्या BMTC बसेसच्या दर्जा नुसार भाडेआकारणी केलेली आहे. वोल्वो बसेस ढीगाने आहेत. त्यांचे तिकीट इतर बसच्या मानाने दुपटीहून जास्त आहे.
त्यामुळे साहजिकच या बसेसला गर्दी कमी असते. आणि ज्याला थोडे पैसे जास्त खर्च करून आरामदायक प्रवास हवा त्याने या बसची वारी करावी. बसेस आतून बाहेरून स्वच्छ आहेत. ए.सी. काम करतात. सुरक्षा कॅमेर्यांचा उपयोग होतो. वोल्वोच्या कंडक्टर-ड्रायवर चा पांढरा शुभ्र युनिफॉर्म असतो आणि आणि त्यांना थोडेफार इंग्रजी येते. एयरपोर्ट शटल च्या वोल्वोचे कंडक्टर-ड्रायवर चक्क 'सर' वगैरे म्हणून उगीच अवघडून टाकतात. प्रत्येक बसचे बोर्ड कन्नड मध्ये असले तरी आकडे इंग्रजीमध्ये असतात आणि कुणालाही व्यवस्थित दिसावेत असे लावलेले असतात.


मॅजेस्टिक किंवा केम्पेगौडा हे BMTC चे मध्यवर्ती स्थानक. इथे बसेस आपापल्या रेल्वेसारख्या प्लॅटफॉर्म वरच येतात. सगळ्या बसेस चे प्लॅटफॉर्म ठरवून दिलेले आहेत. प्रवाशांना रस्त्यावरून इकडे तिकडे जाऊ लागू नये आणि त्यामुळे बसेस च्या आवागमनात खंड पडू नये म्हणून स्थानकावरून चालण्यासाठी स्कायवॉक बांधलेले आहेत. एक उपयोगी माहिती कक्ष आहे. (हो मी स्वतः उपयोग करून पाहिला होता, अगदी तिकिटाच्या मागे बस नंबर वगैरे लिहून दिला होता)
बरीचशी स्थानके मोठाल्या कॉम्प्लेक्स च्या खाली आहेत.


त्याने जागाही वाचली आहे आणि महापालिकेला उत्पन्नाचा स्रोत पण मिळालाय असे वाटते. सर्व स्थानके स्वच्छ आहेत आणि जागोजागी कचऱ्याच्या पेट्यांची सोय केलीये.

२. एयरपोर्ट
मागील २.५-३ वर्षापूर्वी बँगलोरच्या मधोमध असलेला विमानतळ नागरी उड्डाणांसाठी बंद करून तिथून जवळपास ४० किलोमीटर उत्तरेकडे हलवण्यात आला. पुण्याप्रमाणे बँगलोरही एयरफोर्स/HAL चे विमानतळ उधारीने वापरत होते. पण त्यांचा आता स्वतःचा मोठा आंतराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ शहरापासून दूर असला तरी तो तयार होतानाच शहराला व्यवस्थित जोडण्यासाठी ६ लेनचा अद्ययावत मार्ग बांधण्यात आलाय.

३. एयरपोर्ट शटल सर्विस.
मला याचे अतिशय कौतुक वाटते. शहराच्या प्रत्येक भागातून अर्ध्या अर्ध्या तासाला वोल्वो बसेस उपलब्ध आहेत. सामानासाठी मोठा रॅक, स्वच्छ बसेस, नम्र स्टाफ, बसमध्ये वर्तमानपत्र अश्या सोयी असतात. भाडे साधारण रु.१५० ते २००. थोडे जास्त वाटत असले तरी रिक्षावाल्यांच्या जाचापुढे काहीच नाही. तसेही ४० ते ६० कि.मी. च्या प्रवासासाठी योग्यच आहे. पुणे ते बँगलोर विमानाने साधारण १.३० तास लागतो. आणि विमानतळ ते मुख्य शहरापर्यंत जाण्यासाठी मला २ तास लागायचे. पण बरीचशी ट्राफिक शहरात आल्यावर असायची.

४. शहरांतर्गत प्रवास - मेरू टॅक्सी सर्विस.
ही खाजगी सेवा उत्कृष्ट आहे. तुम्ही ऑनलाईन बुकिंग केली किंवा फोन केला कि तुमच्या दारात अर्ध्या तासात येते. भाडे आधीच ठरलेले असते. आणि रीतसर पावती दिली जाते. कॅब पुरेपूर मोठ्या आहेत.

५. मेट्रो.

मी ऑक्टोबर २०११ मध्ये परत पुण्याला येईपर्यंत नम्मा मेट्रो (आपली मेट्रो) चा एक टप्पा सुरु झाला होता. आणि लवकरच तिचे बाकीचे मार्ग सुरु होतील. मेट्रो प्रोजेक्ट हा वाटतो त्यापेक्षाही भयानक कठीण आहे.
आपल्यासारख्या "लोकशाही" देशामध्ये असले प्रकल्प चालू होतीलही पण कधी संपतील याचा नेम नाही. तरीही बँगलोकरांनी सहनशक्ती दाखवून ही आपल्या पदरात पाडून घेतली आणि आता तिची मधुर फळे त्यांना चाखता येतीलच.

आता पुण्याची गत.

पुणेकर असलो तरीही मला जर कोणी या ठिकाणाहून तिकडे जायचे कसे विचारले तरीपण अमकी तमकी बस घ्या हे सांगताना काटा येतो. रिक्षावाले पाहुण्याला फाडून तर खाणार नाहीत ना अशी भीती. बरं चार पैसे ज्यादा गेले तरी ठीक, पण टॅक्सीच नाही. अशा वेळी पाहुण्याला घरी आणायचे म्हणजे आपण स्वत: आपल्या वाहनाने आणणे हा एकाच पर्याय.
१. बस व्यवस्था.
दोन शब्द- तीन तेरा. पुण्याच्या बस म्हणजे बाहेरून गलिच्छ आणि आतून भरलेल्या. बी आर टी या गोंडस नावाखाली ५-६ वर्षापूर्वी पुणेकरांचे विशेषतः हडपसर-स्वारगेट-कात्रज च्या रहिवाशांचे जे काही हाल झालेत ते अक्षम्य आहेत. कंडक्टर-ड्रायवर इतके उर्मट की त्यांच्यासाठी प्रवासी म्हणजे महापालीकेनी पकडलेली कुत्री. बस स्थानके म्हणजे निव्वळ कचराकुंड्या. प्रवाशांची सोय ही दुय्यम गोष्ट. वोल्वो बसेस बारा महिने चिखलाने माखलेल्या. काचा फुटलेल्या. त्याच्यावर एखाद्या रोग्याने लावावेत तसे चिकटपट्ट्या लावलेल्या. मागे हडपसर ते स्वारगेट एका वोल्वोत बसलो होतो. सीट इतके मळकट होते की बसायला लाज वाटावी. अरे किमान त्या बसच्या (वोल्वो) नावासाठी तरी तिचे एवढी दुरवस्था करू नका असे म्हणावे वाटत होते.
पुणे महानगरपालिका वाल्यांना समाजवादाचा खूप पुळका आहे वाटते कारण बँगलोर सारखे बसचा वेगवेगळे दर्जा आणि त्यानुसार भाडेआकारणी त्यांना मान्य नाहीत. मग नगरसेवक फोर्चुनर मधून, आणि अधिकारी अलिशान कॅम्री मधून फिरतात पण बिचाऱ्या मध्यमवर्गाने गरीबासारखे सर्वसमावेशक बस मध्येच गेले पाहिजे. असला दुटप्पीपणा जमतो कसा आणि जनता सहन तरी का करते हा प्रश्न सुटत नाही.
पुणे वाढले तरी त्याप्रमाणात रस्त्याची रुंदी काही वाढली नाही. रस्त्याचे खड्डे म्हणजे पुण्याला झालेला कुष्ठरोग.

२. एयरपोर्ट.

पुण्याचा एयरपोर्ट म्हणजे एक विनोद आहे. हवाईदलाने उस दिला तर मुळापासून खाणार का? एका शहरात जिथे आंतराष्ट्रीय कंपन्याची ऑफिसेस, प्लांट्स आहेत त्या शहरला स्वतःचा स्वतंत्र विमानतळ नसावा?
हवाई दलाने सरळ ही भीक देणे बंद केले पाहिजे. नव्या विमानतळाचे घोंगडे कितीतरी दिवस भिजत पडलय. मैसूरचा स्टेट ट्रान्सपोर्ट बस स्टँडला पाहून माझी पाहिली प्रतिक्रिया होती की "अरे हा तर पुण्याच्या विमानतळापेक्षा स्वच्छ आहे".

३. एयरपोर्ट शटल सर्विस.
कुठाय? बाहेर आल्याआल्या रिक्षावाले धावून येतात. पण सामान असेल तर त्यांचे मागेल त्या भाड्यात जाणे भाग पडते. किंवा आपापले नातेवाईक त्यांची गाडी घेवून हजर हवेत.

४. शहरांतर्गत प्रवास - मेरू टॅक्सी सर्विस.
कुठाय? काही ऑनलाईन कॅब सर्विस चालू झाल्यात पण हातावर मोजण्याइतपत पण नसतील. स्वत:चे वाहन नसेल तर पुण्यात प्रवास म्हणजे एकतर तुमचा आत्मसम्मान घरी ठेवून या किंवा मग दिसेल त्या उर्मट कंडक्टर-रिक्षावाल्याशी दोन हात करायची तयारी ठेवा. पण त्यांच्यासारख्या प्रवाशांच्या संघटना नाही ना. मुंबईमध्ये कॅब्स असताना पुण्यामध्ये का नाहीत?

५. मेट्रो.
कुठाय? पुण्याचा प्रस्थावित मेट्रो प्रकल्प अजूनही संमत होत नाही. यात कुणाचा हात आहे? काहींच्या मते पुण्याला दुचाकी पुरवरणाऱ्या कंपन्या यामागे आहेत.
काहीका असेना, जरी मेट्रो आता तयार करायला घेतली तर पुणेकरांनो लक्षात घ्या आपले हाल कुत्रे खाणार नाही. बी. आर. टी. सारख्या पुचाट प्रकल्पासाठी जिथे ३-४ वर्षे लावली आणि ट्राफिकचे अशक्य हाल केले, तिथे मेट्रो म्हणजे पुढची १० वर्षे धरा. आणि या मुर्ख लोकांना बाजूला सारून अगदी आंतराष्ट्रीय कंपनीने जरी प्रकल्प चालू केला तरी कमीत कमी ६ वर्षे.

ही पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यवस्थेएवढी तर पुण्यात कुठली वाईट गोष्ट नसेल. कचऱ्याची समस्या गंभीर आहे, पण आम्ही हडपसरला राहत असल्याने आणि हडपसरला पुण्याची कचराकुंडी केल्यामुळे तसे वाटत असावे.
जेव्हा आपण पुणे म्हणतो तेव्हा बऱ्याचदा त्यात पिंपरी-चिंचवड पण येते. त्यातल्या त्यात त्यांनी पद्धतशीर वाढ घडवून थोडीफार आशा ठेवलीये.

राग या गोष्टीचा येतो की पुणे-बँगलोर दोन्ही भारतातली शहरे, ज्या अडथळ्यांचा पुण्यात बाऊ केला जातो ते अडथळे बँगलोरने कसे पार केले याचा सारासार विचार का होत नाही? सरसकट राजकारण्याच्या नावे खडे फोडण्यापेक्षा याला खरे जबाबदार हे शासकीय अधिकारी, पुण्याचे आयुक्त, पी.एम.टी. चे कार्यकारी अधिकारी ही मंडळी आहेत. हातात पॉवर असताना हे काय झोपा काढतायेत का?
मागे एका पोस्ट मध्ये लक्ष्मीनारायण सरांचा उल्लेख केलाय. तो माणूस मूर्तिमंत उदाहरण आहे की जेव्हा एक प्रशासकीय अधिकारी मनावर घेतो तेव्हा त्याच्या हातातून काय घडू शकते.
मेट्रो, विमानतळ हे मोठे प्रकल्प मान्य करवून घेणे हे राजकारण्यांचे काम आहे हे मान्य केले तरी शहराची बस व्यवस्था सुधारणे हे नक्कीच प्रशासनाचे काम आहे. हे सगळे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो आणि याच्यावर झापडे लावल्यासारखे आपापले दुचाकी घेउन उन्हापावासाचे मरमर करत हिंडतो.
या पळवाटा सोडून आता या प्रश्नावर रान उठवण्याची वेळ आलीच आहे.
_*_

चित्रे आंतरजालावरून साभार.

टिप्पण्या

  1. सहमत आहे. बेंगलोरला एवढ्यात जाणे झाले नाही. वर्णन वाचून सुखद आश्चर्य वाटले. पुणेकरांना बाईक सोडवेल असे वाटत नाही. पीएमपीएल बद्दल काय बोलायचे? मी पुणेकर असूनही आता पुणे गलिच्छ वाटते. पुण्याचा उबग येतो आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. राज,
    प्रतिक्रियेबद्दल आभार. मला बँगलोर आणि पुण्याची तुलना करून एवढी चीडचीड झाली, लोक फारीन वरून आल्यावर त्यांना किती त्रास होत असेल नाही?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सकाळ ने या प्रश्नावर चर्चेला तरी सुरुवात करून दिलीये
      http://www.esakal.com/esakal/20120913/4860157831115625381.htm

      हटवा
    2. १ नोवेंबर- सकाळच्या बस डे ला अगदी कंपनीची बस मध्येच थांबवून पी एम टी नं प्रवास केला. उपक्रम खरच स्तुत्य होता. एस.टी. बसेस आणि खाजगी बस पण लावल्या होत्या. पण हडपसर च्या गाडीतळावर व्हायची ती फरफट झालीच. अर्ध्या तासाने हिंजवडीची बस मिळाली. तोपर्यंत मैत्रीण आणि मी इकडे तिकडे विचारून विचारून हैराण. सकाळचे स्वयंसेवक होते, पण लहान मुले होती ती आणि संभ्रमात दिसत होती. इकडे मुले राबतायेत आणि तिकडे काही नगरसेवक आणि माननीय कोपर्यात आपापली फोर्चूनर पार्क करून बससमोर ग्रुपने फोटो काढून घेत होते.
      बसचा प्रश्न एका रात्रीत सोडवायचा असेल तर खाजगी बस ला वाहतूक करण्याची परवानगी दिली पाहिजे. नाहीतरी या ट्रॅवल्स च्या बसेस सप्ताहांत सोडून बेकार उभ्या असतात. ते लोक आनंदाने ही खाजगी सेवा चालवतील.

      हटवा
  3. http://www.esakal.com/esakal/20110709/4785003603927804401.htm
    पुण्याच्या दुर्दशेला "बाबू'ही जबाबदार
    Exactly my point.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्रायासाठी अनेक आभार!

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक