Saturday, November 16, 2013

राम-लीला : नाय पाह्यला तर ताप आन बघून पश्चात्ताप.


जास्त गाजावाजा केलेले पिच्चर पहिल्याच दिवशी पाहायचे म्हणजे मोठी रिस्क असते. मी सहसा त्यांच्या वाट्याला जात नाही. पण लडिवाळ आग्रह मोडू नये असा एक नियम असल्याने.. (म्हणजे असे कितीसे प्रसंग येतात हो.. नाहीका?) मी घेतली रिस्क. आणि पाहिला "गोलीयोंकी रासलीला: राम-लीला" असे अवघडलेले नाव झालेला सिनेमा.

आता सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर-
रामलीला असे साधे सुंदर नाव बदलायला लागण्याएवढे काही या पिक्चर मध्ये काही वाईट आहेका? की हा उगीच आपल्या उपटसुंभ संस्कृतीरक्षकांचा निव्वळ उथळपणा?
काल हापिसात जेव्हा याच्यावर खलबत चालू झाले तेव्हा मी उसळून म्हणालो होतो की "कलाकृती कशी असावी आणि त्यात काय टाकावे याचे लायसेन्स देण्याएवढा हिंदू धर्म तालिबानी झालाय का?" (टाळ्या.. शिट्ट्या.. धन्यवाद!)

मी माफी मागतो त्या उपटसुंभ संस्कृतीरक्षकांची. बिचारे, त्यांनी हा पिच्चर रीलीस होऊ दिला यात उलट आपल्या हिंदूधर्मीयांची अफाट क्षमाशीलता दिसून येते. फक्त नावावर भागवले? वाह.. वाह..

पिच्चर च्या पहिल्या पंधरा मिनिटात हनुमान आणि कृष्णाच्या वेशभूषेतले एक्स्ट्राज् साउथ इंडियन स्टाईल राडा डांस हिरोच्या मागे करताना पाहूनच मला या गोष्टीचा उलगडा झाला. बरं हा रामाचा उल्लेख आणि त्याच्या प्रतिमेचा चित्रपटभर वापर, कथेची, कलाकृतीच्या सौंदर्याची गरज आहे का? मुळीच नाही. मग 'आ बैल मुझे मार' पद्धतीने आमच्या भावनेला दुखावण्याचे संजय लीला भन्साळी सारख्या तरल दिग्दर्शकाच्या मनात का आले असावे हे रामच जाणे. हाच तो "हम दिल दे चुके सनम" चा भन्साळी? हा प्रश्न आत्ता जसा हाच तो "सत्या"चा राम गोपाल वर्मा? अशा तीव्रतेने पडतो.

मी रोमीओ ज्युलिएट वाचले नाही, बघितले नाही, ऐकले नाही, त्याच्यावरून इन्स्पायर्ड झालेले पिक्चर ही पहिले नाहीत. त्यामुळे कथानकाची नाही म्हटले तरी उत्सुकता होती. पण चित्रपटाचे गणित एवढे चुकलय की फक्त पिक्चर कधी संपतो एवढीच उत्सुकता लागून राहिली होती मला थेटरात.

कथा: (spoiler)
गुजरातच्या कच्छ च्या रण मधल्या एका गावात शस्त्रास्त्र, मिरच्या, मीठ, आणखी काहीबाही किडूक मिडूक विकून धंदा करणारी दोन कुळे आहेत. इथे पुरुषांच्या काय मिरच्या निवडणाऱ्या बायका आणि लहान मुलांच्या कमरेला पिस्तूल. त्यांच्यात गेल्या पाचशे वर्षांची पुरानी दुश्मनी. एका कुळाचा दीपक 'राम' (रणवीर सिंग) आणि दुसऱ्या कुळाची कुलदीपिका पादुकोण - 'लीला'. असे असल्यावर दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडणार आणि चोरी छीपके मिलके एकमेकांच्या घरच्यांना वाकुल्या दाखवत निषिद्ध प्रेमाचा आस्वाद घेणार हे ओघाने आलेच.

असे सुरळीत असताना राम च्या भावाचा लीला च्या भावाकडून चुकून खून होतो. [1]
राम याचा बदला म्हणून लीलाच्या भावाला तिथेच मारतो. आता राम आणि लीला एकमेकांचे भाऊ चितेवर पोहोचतायेत तोवर "तुझ्या भावाने माझ्या भावाला मारले, अन मी तुझ्या भावाला मारले.. फिट्टमफाट!" म्हणून एकमेकांसोबत पळून जातात. लॉज वर राहतात, लग्न काय करतात..

इकडे लीला ची आई (सुप्रिया पाठक) आपल्या गुंडांना पाठवून लीलाला परत गावात आणते. राम ला त्याचे मित्र समजूत काढून गावात आणतात. आणि त्याचे आख्खे कूळ भावाचा बदला घेतल्याबद्दल (दुसऱ्या कुळाचा त्यांची अशा प्रकारे बदनामी करून) वरात काढतात. त्याचे वडील त्याला स्वताच्या जागी कुळाचा मुखिया बनवतात. पहिल्यापासूनच नाच गाणे, प्रेम, मित्र, पॉर्न (हो) अशा गोष्टीत असलेल्या रामाला [2] ही नसती आफत नकोच असते.
मग या राम-लीलेचा आकांत आणि घरच्यांचे डावपेच, एकमेकांच्या कुळातल्या माणसांची हत्या, त्यांच्यातल्या राजकारणाला प्रेमात घुसडणे, सत्ता मिळवण्यासाठी धडपडणारा एक खलनायक अशा नेहमीच्या मार्गाने पिक्चर प्रवास करतो.

आता हा पिक्चर का नाही आवडला -
१. संकलन.. काहीतरी गंडल्यासारखे वाटते. दोन कुळांची दुश्मनी विनोदी पद्धतीने दाखवायला सुरुवात केलीये. त्यानंतर त्यात गंभीरता घालायला दिग्दर्शकाला नाही नाही ती कसरत करावी लागते. अरे का? मग आधी
सुप्रिया पाठक
कशाला झक मारली विनोद करून?
हेच सुप्रिया पाठकच्या बाबतीत. 'खिचडी'च्या हंसाच्या बाजाने बोलणाऱ्या लीलाच्या आईला, सिरीयसली घेताच येत नाही. एका अनपेक्षित खतरनाक कृत्यामुळे (इंटरवल नंतरचा लीलाचे लग्न ठरवतानाचा सीन) कुठे आपल्याला तिच्यातल्या डॉनची थोडी भीती वाटायला लागते. पण तोपर्यंत तिचा अभिनय संकलनामुळे व्यर्थ गेला ना भौ.
सूडाग्नीत उध्वस्त झालेली कुटुंबे, कुळे आणि हा अनर्थ वेळीच रोखण्यासाठी मोठ्या लोकांच्या तडजोडीची आवश्यकता हा कथेचा पैलू फार उशिरा घुसल्यामुळे काहीच परिणाम करत नाही.

२. दीपिका पादुकोण
अरे ही भारी दिसते पण अशा इन्टेन्स कथेसाठी लागणारा सशक्त अभिनय नाहीये तिच्याकडे. पण त्यात तिचा काय दोष.. एकीकडे एखाद्या चित्रकाराला प्रेरणा देईल असं सौंदर्य दाखवायचंय आणि दुसरीकडे अल्लड, उतावीळ मुलगी ते कुटुंबाच्या भाईगिरीच्या धंद्यात डॉन.. असे अवघड प्रसंग दाखवायचे, यात दमछाक होत असेल बिचारीची. असूदे असूदे हो डीप्स.. तू छान दिसतेस हेच फार आहे. त्यामुळेच तर पिच्चर सुसह्य होतो. उगी अभिनय वगैरे च्या भानगडीत पडायची गरज नाही.

३. संजय लीला भन्साळीचा उडालेला गोंधळ.
पिच्चर बोल्ड करावा का साधा हा प्रश्न त्याला पिक्चर रीलीस झाला तरी सुटला नाहीये. काही डायलॉगस् भयानक बोल्ड आहेत..रणवीर ते आरामात म्हणतो आणि करतो पण. आपली डीप्स बिचारी गडबडते. कथेत दाखवलाय म्हणून बोल्ड झालेली लीला, म्हणू का नको, करू का नको, हात लावू का नको.. अशी वावरलिये पूर्ण सिनेमात. त्यापेक्षा तिची वाहिनी झालेली फुकरे मधली रिचा चढ्ढा या रोल ला जास्त अनुरूप होती. पण मग डीप्स् चे सोंदर्य कसे दाखवणार.. गोची इथे आहे.
फुकरे मधली रिचा चढ्ढा

४. कैच्या कै गाणी. 
कुठेपण. एक दोन गाणी दीपिका आणि रणवीर मुळे देखणी झालीयेत. सुश्राव्य वगैरे लांबच हं. ते प्रियांका चोप्राचे गाणे म्हणजे कहर आहे. भन्साळीला प्रियांकाचे फ्री कुपन्स मिळाले होते आणि त्याने ते बळच रिडीम केलेत अस्सं झालंय ते गाणं.

आता बघितला तरी चालेल.. असे का?
१. दीपिका पादुकोण
दीपिका चे निस्सीम भक्त असाल तर.
मस्त दिसलीये. भन्साळीच्या सेट्स वर संथ प्रकाशात क्यामेरा फक्त तिच्यासाठीच.

२. रणवीर सिंग.
मला लुटेरा मध्येही याचे काम आवडले होते. पठ्ठ्या प्रॉमिसिंग आहे. फसलेल्या पटकथेला सावरण्यासाठी कष्ट करतो बिचारा.

3. सिनेमटोग्राफी चांगलीये.
कच्छ मधले गाव, त्यातल्या गल्ल्या, नदीवरचे घाट चागले चित्रित केलंय. वेशभूषापण जमून आलीये. धोतरात कोणी भारी दिसू शकतो याच्यावर विश्वास बसतो.

४. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्युलिएट ची सज्जा (बाल्कनी). ज्याच्या खाली बसून रोमीओ तिच्यासाठी गातो. इकडे आपला रोमीओ गाण्याच्या भानगडीत न पडता डायरेक्ट बाल्कनीत. तर ही बाल्कनी दीपिका सारखीच फुरसतमे बनाई है. त्या बाल्कनी साठी बघावा च्यायला.[3]

असा हा पिक्चर नाही पहिला, तर दीपिकाचे नुसते पोस्टर बघून ताप येईल; आणि पाहिला तर कथेचा बोजवार्या बघून पश्चात्ताप होईल.

_*_

[1] हा खून एकदम हास्यास्पद आहे. मूळ रोमीओ ज्युलिएट मध्ये काहीतरी "duel" टाईप चे असावे. भारतात ही duel ची प्रथा नसल्याने दिग्दर्शकाने उगीच आपले बीयर च्या बाटल्या उडवताना हिरोच्या भावाला मारलाय.

[2] दुखावल्या का नाही भावना?.. मग..म्हणे उपटसुंभ.

[3]पूर्वीची थियेटर असती तर 'बाल्कनीसाठी बाल्कनीत जाऊन बघा' वगैरे असा पांचट जोक मारला असता. पण इथे आम्ही नवीनच चालू झालेल्या मगरपट्ट्याच्या सिनेपोलीस ला गेलो होतो. या मॉल ला १५ स्क्रीन आहेत. रस्ता ओलांडला की अमनोराच्या आयनॉक्स मध्ये ८ स्क्रीन. काय मस्तीये अंगात लोकांच्या! मगरपट्ट्याचा अभिमान नक्कीच आहे.. पण, १०० मीटरच्या परिघात २३ स्क्रीन्स? २३ सार्वजनिक टॉयलेट्स पण नसतील अख्ख्या हडपसर मध्ये.

Sunday, October 20, 2013

नेत्रसुखद ग्रॅविटी


ग्रॅविटी पाहिला मागल्या आठवड्यात. त्याबद्दल लिहायचे अगदीच ठरवले नव्हते.याचे कारण म्हणजे या पिक्चरमध्ये फारसे लिहिण्यासारखे आहे असे मला वाटले नाही, त्यात अजून लडाख चा पोस्ट चाराण्याएवढा पण लिहून झाला नाहीये, आणि महत्त्वाचे म्हणजे गुगल ट्रांसलिटरेट वापरून ग्रॅविटी लिहायला इतर शब्दांपेक्षा थोडे जास्त कष्ट पडतात. तसे एकदा लिहिले की कॉपीपेस्ट करत सुटायचे.. पण आळसाला काहीही कारण पुरते.

मला ग्रॅविटी देखणा वाटला. पण तर्क लावायला फारशी संधी नसल्यानं जरा माठ टाईप चा वाटला. नंतर विकीशी बोलताना तिने सांगितले की अगदी बझ ऑल्ड्रीन (नील आर्मस्ट्रॉन्ग बरोबर चंद्रावर उतरलेला अंतराळवीर) पासून जेम्स क्यामेरून पर्यंत सगळ्यांनी या पिच्चर ची तोंडभरून स्तुती केलीये. त्यामुळे अचनाक मला ग्रॅविटी च्या थोरवीचा साक्षात्कार झाला. म्हणजे मी कुठे माठ वगैरे म्हटलो पिच्चरला? छे काहीतरीच राव, एवढा भारी पिच्चर.. वगैरे वगैरे. (You have never seen a hypocrite before? लेनर्ड TBBT S02E11.)

पिच्चर तसा एकपात्रीच. नाही एक मिनिट.. सँड्रा बुलक १, जॉर्ज क्लूनी २, तो एक भारतीय अंतराळवीर ३, आणि ह्युस्टन वरचा आवाज ४. अशी ४ पात्रं. पण सँड्रा बुलकच पूर्ण चित्रपटभर आहे. त्यामुळे तीच एकटी कथेचा गाभा आहे.

ग्रॅविटी एक अपघात, त्यानंतरच्या घटना आणि नायिकेचे त्यातून वाचणे म्हणजे थोडक्यात ज्याला आपण सर्वायवल मूवी म्हणतो तसा आहे.फक्त दीड तासाचा हा पिक्चर "चुकवू नये" या प्रकारात का जातो हे खाली वाचल्यावर ठरवा.

चित्रपटाची कथा: (Spoiler)

बऱ्याचशा सर्वायवल मूवीला जशी फार गुंतागुंतीची नसते, तशीच. चित्रपट सुरू होतो तेव्हा पडद्यावर अर्धा भाग अंतराळातून दिसणारी पृथ्वी असते. बाकीचा अर्धा भाग अनंत अवकाश. त्यातून हळूहळू आपल्याकडे येते 'एक्सप्लोरर'. नासाच्या स्पेस शटल प्रोग्राम मधलं एक यान. डॉ.रायन स्टोन (सँड्रा बुलक) ही मिशन स्पेशालिस्ट यानाबाहेर येवून हबल स्पेस टेलिस्कोप ची दुरुस्ती करतीये. तिच्याबरोबर बाहेर आहेत फ्लाईट स्पेशालिस्ट बशीर आणि मिशन कमांडर मॅट कोवाल्स्की (जॉर्ज क्लूनी).त्यांच्या संवादातून समजते की हबल च्या नेहमीच्याच सर्विस मिशन्स[१] पैकी ही एक मिशन आहे. बशीर त्याचा पहिलाच स्पेसवॉक[२] म्हणून जणू हर्षवायू झाल्यासारखा वागतोय आणि कोवाल्स्की आपल्या थ्रस्टर्स पॅकचा[३] वापर करून विनासायास
हबल ची सर्विसिंग
यानाभोवती घिरट्या घालतोय. त्या सर्वामध्ये आणि ह्युस्टन च्या मिशन कंट्रोल रूम मध्ये दुरुस्तीसंदर्भात रेडीयोवर बोलणी चाललीयेत. कोवाल्स्की ज्याप्रमाणे हास्यविनोद करतोय त्यावरून हे काम त्याने खुपदा केलंय आणि त्यात कुठल्याही प्रकारचा धोका किंवा येणाऱ्या संकटांची कुठलीही चाहूल त्याला असेल असे वाटत नाही.

असे हे चालले असताना ह्युस्टन कंट्रोल त्यांना काम अर्ध्यावरच सोडून यानात परत यायला सांगतात. ह्या अचानक आलेल्या सूचनेने गडबडलेले तिघे अंतराळवीर परत आत यायची तयारी करत असतानाच, तोफेच्या गोळ्यासारखे असंख्य तुकडे शटलवर येवून धडकतात. त्यात डॉ.रायनची यानाला बांधलेली दोरी तुटते आणि ती अवकाशात फेकली जाते. बशीरच्या हेल्मेटवर तुकडे आदळून तो मारला जातो तर कोवाल्स्की रायन ला वाचवताना यानापासून लांब जातो.

हे प्रलयंकारी तुकडे असतात एका रशियन उपग्रहाचे. रशियाने क्षेपणास्त्राने स्वत:चा उपग्रह त्याच्या कक्षेत अंतराळातच उडवलेला असतो आणि त्याची परिणीती म्हणून उपग्रहाच्या चिंधड्या उडून तो कचरा दुसऱ्या उपग्रहांना धडकून साखळी पद्धतीने फार विध्वंसक असा स्पेस डीब्री[४] त्या कक्षेत तयार झालाय. आणि तो बाकीच्या अंतराळयानांवर अस्त्रासारखा येवून आदळतोय. या स्पेस डीब्रीच्या मार्गात हबल आणि त्यामुळे स्पेस शटल एक्सप्लोरर आलय आणि दर नव्वद मिनिटांनी ते त्याची चाळण होईपर्यंत धडकत राहणार आहे.

महत्प्रयासाने अंतराळात भरकटलेल्या डॉ.रायनला कोवाल्स्की शटलपाशी आणतो. आता तिचा ऑक्सिजन चा साठापण संपत आलाय आणि शटल विदीर्ण झाल्यामुळे तिथे त्या दोघांना आसरा घेण्याजोगे काही नाही. आतला मिशन क्रू डीकम्प्रेषण मुळे मारला गेलाय आणि ह्युस्टन कंट्रोलशी संपर्क देखील होत नाहीये. अशा अवस्थेत १०० मैल लांब असलेल्या ISS - आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे जाण्याशिवाय दोघांकडे पर्याय नाहीये. कोवाल्स्कीच्या थ्रस्टर्स पॅक मध्ये उरलेले प्रोपेलंट वापरून दोघे ISS कडे निघतात खरे पण तिथे पोहोचता पोहोचता कोवाल्स्कीचे प्रोपेलंट संपते आणि रायन ला वाचवण्यासाठी तो स्वत: ISS पासून दूर जातो. मृत्यूच्या कवेत जातानाही सर्वात जास्त वेळेचे स्पेसवॉक चे रेकॉर्ड आपण तोडू असे म्हणत तो रायनला सांत्वना देतो आणि बेशुद्ध होण्याच्या जवळ गेलेल्या तिला यानात जाण्यासाठी रेडियोवरून सूचना देतो.

सोयुझ
ISS मध्ये पोहोचल्यावर देखील रायन चे दुर्दैव तिचा पिच्छा सोडत नाही. यानाच्या एका मोड्युल ला आग लागते आणि तिला सोयुझ[५] मध्ये आसरा घ्यावा लागतो. सोयुझ हे रशियन बनावटीचे यान अंतराळवीरांच्या पृथ्वी - ISS - पृथ्वी अशा आवागमनासाठी वापरतात. शटल ला धडकलेले उपग्रहांचे तुकडे इकडे ISS लाही धडकलेले असतातच. त्यामुळे परतीसाठी वापरायला असलेले हे सोयुझ त्याचे पॅराशूट आधीच उघडल्यामुळे निकामी झालेले असते. त्यामुळे रायन ला आता चीनच्या तियानगोंग या स्टेशन कडे प्रयाण करावे लागते. ती ISS मधून निघताना थोडक्यात वाचते कारण त्यानंतर लगेचच फुटलेल्या उपग्रहांचे तुकडे ISS ला धडकून त्याच्या चिंध्या उडवतात.

इकडे रायन कशीबशी आपल्या कक्षेतून ढळलेल्या तियानगोंग मध्ये पोहोचते. त्याच्या सोयुझ सदृश (इथे चीनच्या कॉपीकॅट पणाची उडवलीय) शेंझू या रीएन्ट्री मोड्युलमध्ये बसते. ती पृथ्वीवर पोहोचते का? मला नाही माहिती बाबा.

आता हा पिक्चर मला का आवडला?
१. विज्ञानपट खूप पाहिलेत. पण त्यातले बरेच भविष्यातले आहेत. सध्याच्या तंत्रज्ञानाला प्रमाण मानून बनवलेल्यापैकी हा सर्वोत्तम म्हणता येईल. नासाच्या शटल्स, त्याच्या कार्यपद्धती, स्पेसवॉक, ISS, सोयुझ एक नंबर आहेत. त्यांना दाखवताना ते डॉक्युमेंटरी दाखवतायेत एवढ्या डीटेल्स मध्ये दाखवलाय. इतर अवकाश पटांमध्ये कृत्रिम गुरुत्वाकर्षण कथेची आणि बजेटची गरज म्हणून निर्माण केलेले असते. या कृत्रिम गुरुत्वाकर्षणाला सोडून ISS मधले प्रसंग काय भन्नाट जमलेत ते बघाच.

२. उपग्रहांच्या तुकड्यांमुळे शटल आणि ISS च्या चिंध्या उडताना बॅकग्राउंडला अनंत निळी पृथ्वी आणि अवकाशात आवाज येत नाही म्हणून तो पूर्ण प्रसंग अगदी शांततेत दाखवलाय. ध्वनीशिवाय तो विनाश पाहताना नकळत आपल्याला मोठ्या कर्कश आवाजाची तीव्र गरज वाटायला लागते पण थियेटरमधून थोडासुद्धा आवाज होत नाही. अंतराळ म्हणजे काय याची ही झलक.

३. बऱ्याचशा संकल्पना प्रत्यक्षात पाहायला मिळाल्या आणि बऱ्याच नवीन कळल्या. त्यात थ्रस्टर्स पॅक चा वापर, स्पेसवॉक, यानात परत येण्यासाठीची पद्धत या गोष्टींचा उल्लेख करता येईल. लहान मुलांना हा पिच्चर दाखवला तर त्यांच्या डोक्यात एवढे प्रश्न तयार होतील की त्यांची उत्तरे शोधली तर अर्धेआधिक भौतिकशास्त्र शिकून होईल. निर्वातासाठी डीझाईन केलेली याने आणि गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ वापरले जाणारे सोयुझ ची कार्यपद्धती बघून धन्य धन्य होते.

४. सँड्रा बुलकचा अप्रतिम अभिनय. सोयुझमध्ये जगण्याची आशा सोडलेली आणि त्याही परिस्थितीवर मात करून धडपडणारी रायन तिने मस्त साकारलिये. या वयातपण काय खतरनाक फिट आहे ती.

५. विझ्युअल इफेक्टस् ढीन्कचाक जमलेत. अरे अंतराळ अंतराळ काय असते ते बघा म्हणाव सगळ्यांना.
ISS मध्ये एन्ट्री मारल्यावर नायिका आईच्या गर्भात जणू पहुडलीये अशा तऱ्हेने चित्रण केलंय. जाम भारी कल्पना आहे.

असा हा माहितीपूर्ण आणि उत्कंठा वाढवणारा पण तर्क चालवण्यासाठी कमी वाव असलेला (तर्क नसणारा नाही.) पिक्चर पैसे वसूल थ्रीडी मध्ये आहे. पुण्यात असाल तर पी.वी.आर. लाच पहा. त्यांचे थ्रीडी पुण्याततरी सर्वोत्तम आहे असे ऐकून आहे.
_*_

[१] हबल स्पेस टेलिस्कोप १९९० साली नासाने अंतराळात पाठवला. या टेलिस्कोपच्या भिंगांमध्ये असलेल्या दोषांमुळे सुरुवातीची छायाचित्रे पुसट यायची. त्यामुळे नासावर फसलेल्या प्रकल्पावर कोट्यावधी डॉलर्स उधळल्याची टीका झाली होती. हे दोष काढण्यासाठी नासाने सर्विसिंग मिशन्स राबवल्या. ज्यात अंतराळवीरांनी अवकाशातच हबलमध्ये नवीन भिंग बसवले. ही मोहीम यशस्वी झाल्यावर हबल चे वेळोवेळी आधुनिकीकरण करण्यासाठी आतापर्यंत अशा ५ (शेवटची २००९ ला) मिशन्स धाडण्यात आल्यात.

[२] प्रेशर सुटस घालून अंतराळयानाच्या बाहेर येवून दुरुस्ती, संशोधन यासारखी कामे करणे म्हणजे स्पेसवॉक. च्यामायला ते प्रेशर सुटस चे सील्स कसे असतील देव जाणे. एकतर मनगटात, कोपरात, गुडघ्यात त्यांना फिरता येण्याजोगे करायचे असते आणि बाहेर जवळ जवळ निर्वात.

[३] फक्त १९८५ साली थ्रस्टर्स पॅक चा वापर झाला होता. हे वापरले तर यानाला दोरी न बांधता अंतराळवीर यानापासून काही अंतरावर जावू शकतात.

[४] Space Debris. याचा उच्चार डीब्री असा करतात हे पिच्चर पाहताना कळले.
निकामी झालेले उपग्रह, अयशस्वी झालेल्या मिशन्स चे भाग, यानापासून चुकून वेगळे झालेले पार्टस अशांचे मिळून तयार झालेला अवकाशीय कचरा. पिच्चर मध्ये दाखवल्याप्रमाणे तो धोकादायक आहे. पण बऱ्याच उपग्रहांच्या कक्षा एकाच प्रतलात असतील याची शक्यता कमीच. तीच गोष्ट ISS, हबल, तियानगोंग हे एकाच दिवसात एकाच Space Debris ने उडवले जाण्याची.

[५] सोयुझ -१९६० सालापासून नासाचा शटल प्रोग्राम रिटायर्ड झाला तरी वापरात असलेले रशियाचे भरवशाचे अंतराळ यान. नासाच्या चॅलेंजर, डिस्कवरी, एंडेवर, कोलंबिया, अॅटलांटीस् या स्पेस् शटल्स प्रमाणे याचा पुनर्वापर होत नाही. स्पेस शटल्स प्रोग्राम थांबल्यानंतर ISS च्या मिशन्स साठी अंतराळवीरांचे बरेच आवागमन याच यानांतून होत आहे. चीनचे शेंझू याच यानासारखे आहे. पिच्चर मध्ये सोयुझ आणि शेंझू चे लँन्डींग प्रोटोकोल्स सारखे असल्याचे दाखवलय. चीनचा काय आपला पण स्पेस प्रोग्राम रशियाच्या डिझाइंस वरून 'इन्स्पायर्ड' आहे असा पाश्चात्यांचा समज आहे. असेलही.

चित्रे आंतरजालावरून साभार.
माहितीचा स्रोत : वाचन, तर्क आणि प्रिय विकी.

Saturday, September 7, 2013

देअर गोज माय फॉर्चूनर


युरेका! युरेका!
माझा देश ऑलिम्पिक मध्ये पदकं का मिळवत नाही, गेल्या शतकभरात आपल्याला हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच नोबेल का मिळाले? याचे उत्तर मला समजले. म्हणजे माहीत होते, पण आता अनुभवामुळे समजले.
आज एकदम पिच्चर सोडून हा विषय का? का? मी काय फक्त ताडोबा, दांडेली, हम्पी अशा उनाडक्याच करत हिंडतो का? म्हणजे घरात काही लक्षच नाही माझे? मी काय जबाबदारी घेतच नाही का? म्हणजे असेलही खरे.. पण म्हणून सुरुवातच करायची नाही हे कुणी सांगितलंय. तर अशाच माझ्या उडाणटप्पू स्वातंत्र्यावर टपलेल्या कुटुंबियांच्या दबावापुढे झुकून मी म्हटले की आता आपण फमिली म्याटर्स मध्ये लक्ष घालायला हवे. आणि वॉर्म अप म्हणून डायरेक्ट कोर्ट कचेऱ्यांचा मार्ग निवडला.
झाले असे की इतर तमाम मराठ्यांच्या घरामध्ये असतो तसा आमच्याकडे पण एक जमिनीचा वाद चालू आहे. त्यातल्या त्यात एक गोष्ट चांगली की माझे काका, वडील एकत्रपणे या गोष्टी बघत होते आणि वंशपरंपरेने तो आता आमच्या पिढीकडे सोपवण्यात आलाय. हा वाद कुठला, कोणाचा, त्यात चूक कोणाची हे सर्व सांगणे हे या पोस्टच्या आणि माझ्या कुवतीबाहेरचे काम आहे.

तर, माझा मोठा चुलत भावाने जेव्हापासून या वादाची धुरा सांभाळली तेव्हापासून दोन्ही बाजून समेट घडवून आणायच्या प्रयत्नांना गती मिळाली. आणि एक दिवस तडजोड होऊन ठरल्याप्रमाणे आमच्या आणि प्रतिवादी कुटुंबाला वकिलांनी घोडेगावच्या दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात बोलावले. खरेतर तिथे आमच्या पिढीचे काम नव्हते. पण आता तिथे मागल्या पिढ्यांमध्ये शाब्दिक चकमकी उडून सगळे मुसळ केरात जाऊ नयेत म्हणून मी आणि आणि माझा भाऊ पण गेलो. वार बुधवार. त्यामुळे दोघांच्या ऑफिस ला दांडी. वडील आणि एक काका निवृत्त असल्यामुळे त्यांना सुट्टीच. पण सर्वात लहान काकांनाही रजा घ्यावी लागली. सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे आमचे आजोबा. ते आता थकलेत. या सगळ्या प्रकारात आता त्यांना काय चालले आहे ते पण समजते की नाही देव जाणे. त्यांना पुण्याहून घोडेगाव ला नेणे म्हणजे जास्त त्रासदायक. पण ह्या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावायचाच या इरेने आम्ही सर्व जण पुण्याहून सकाळी लवकर निघून निबंधाकांचे ऑफिस उघडण्याच्या आत १०-१०.१५ ला तिथे पोहोचलो.

सुरळीतपणे दस्तांचे वाचन झाल्यानंतर नोंदणीसाठी आमच्या पाळीची वाट पाहत बसलो. आमच्यासारखे तिथे बरेच जण होते. त्या सर्वांनाही आमच्याप्रमाणेच आधी वेळ ठरवून दिली होती.
बाबांना (म्हणजे आजोबांना) कचेरीच्या दत्तमंदिराच्या कठड्यावर बसवले. हे तिघे बंधू ओळीने त्यांच्या शेजारच्या चौथऱ्यावर. भाऊ ऑफिसमधून येणाऱ्या फोनवर आणि मी निबंधकाच्या ऑफिसच्या उंबऱ्यात 'गोंद्या आला रे' आरोळी मारायच्या प्रतीक्षेत. प्रतिवादी कुटुंब पण तिथेच होते. एकेकाळी सख्खे सोयरे आता एकमेकांकडे नुसतेच डोळे वटारून आणि कुत्सित भावनेने पाहत होते.
मनात धाकधूक होतीच की इतक्या वर्षांच्या या हमरीतुमरीनंतर आज सगळे व्यवस्थित तर होईल ना?

घात झालाच..लाईट गेल्याची वार्ता पसरली. लाईट गेली? सगळे संगणक तर चालूच होते. मग कळले की इंटरनेट कनेक्शन गेले. सरकारने मागील काही महिन्यापासून ई-गवर्नंस खाली सगळे दस्त, करार नोंदणी ई-सरिता या प्रणालीने सरळ सेंट्रल डेटाबेसमध्ये टाकायची सोय केलीये. इतर सगळ्या सरकारी योजनांप्रमाणे उत्कृष्ठ विचार आहे. पण अंमलबजावणीचा बोजवार्या उडवण्याची परंपरा इथे कशी सोडता येईल? तालुकास्तरावरच्या गावांना त्या प्रकारचे इंटरनेट कनेक्शन अजून मिळालेय का याची पडताळणी नीट झाली नसावी. याचा प्रत्यय येणं आमच्याच नशिबी होतं.

"१५ मिनिटात होईल सुरळीत" इति तिथला कारकून. ठीके म्हटलं, पाहूया वाट. अर्धा तास झाला. आतून परत नवीन बातमी. कुठलातरी टॉवर ला काहीतरी प्रॉब्लेम आलाय. दुपारी २ वाजेपर्यंत ठीक होईल. सगळीकडे निराशा. लांब लांब वरून जमिनीचे दस्त करायला आलेलं पब्लिक, वाट पाहण्याशिवाय पर्यायही नव्हता.

भाऊ आणि मी जवळच्या मिसळपावावर ताव मारून आलो. एक नम्बर मिसळ हो.. काय सांगू.. जाउदे. या पोस्टचा विषय नाही तो. तिन्ही बंधू काही खाण्याच्या मूड मध्ये नव्हते. तरी वाटले काही तरी असावे चघळायला म्हणून त्यांच्यासाठी आणि बाबांसाठी वडे आणि भेळ आणून दिली. मी बाबांशेजारी जाऊन बसलो. बाबा कातर आवाजात विचारायला लागले किती वेळ आहे. त्यांना कल्पना दिली की अजून बराच वेळ आहे. मग ते गुडघे चेपत बसले. बाबांना नातवांपैकी कुणीतरी कधीतरीच भेटते असे निवांत. मग त्यांच्या भूतकाळात गेले. येताना ज्या रस्त्याने आलो त्याच्याविषयी सांगायला लागले. मध्येच तो आमदाराचा बंगला आठवला त्यांना. मग त्याच्याकडे आधी काहीच कसे नव्हते आणि मग आमदारकी मिळाल्यावर कसा माजला आणि गावासाठी काहीच केलं नाही. वगैरे वगैरे. मग आजकाल राजकारण्यांनी देशाची कशी वाट लावली याच्यावर कीर्तन चालू झाले. आमचे बाबा तसे सोज्व्वळ. पण एकदा पारा चढला की शिव्यांचा असा धबधबा चालू होतो की त्राही माम! जसे राजकारणावर घसरले तसे मग त्या आमदाराच्या घराण्याचा उद्धार चालू झाला. "अहो बाबा हळू.." मी मधेच आवरायचं. मग करता करता आमदाराच्या कुठे कुठे आणि कशा कशात काठ्या आणि तत्सम गोष्टींचे आवागमन मोठमोठ्यांदा करायला लागले तेव्हा मी न राहवून म्हंटले की बाबा आपण देवळाच्या दारात बसलोय. तर बाबा म्हणे "की मग काय खोटं कुठं बोलतोय".

अशात २ वाजले. मग तीन वाजले. आता मात्र लोकांचा संयम सुटत चालला होता. ५.३० - ६ ला हे ऑफिस बंद करणार आणि आमचा फेरा वाया जाणार या कल्पनेने आम्ही पण बेचैन झालो होतो. कचेरीतली लोकं "आम्ही काय करणार याला?" अशा अविर्भावात मस्त पहुडलेली होती आपापल्या खुर्च्यांमध्ये. कचेरी बाहेरच्या भिंतींवर तक्रारीसाठी पुण्याच्या अधिकाऱ्यांचे नंबर दिले होते. तू कर मी कर याच्यात मी त्यातला एक नंबर लावला. तो अपेक्षेप्रमाणे कोणी उचलला नाही. मग दुसरा लावला. तो चक्क उचलला! मी त्यांना कुठून व कशासाठी फोन केलाय याची माहिती दिली. त्यांनी पण सांगितले की संबंधित इंटरनेट कंपनीने तिकडे तंत्रज्ञ पाठवलेत आणि ते काम चालू आहे. आणि फोन ठेवला. म्हणजे एवढे तरी नक्की झाले की निबंधकाच्या कचेरीतले कारकून खरेच सांगतायेत.

तिथे एक मुंबईवरून आलेल्या बाई होत्या. सई परांजपे स्टाईल केशभूषा. त्यांची तर फारच चीडचीड झाली.
मुंबईवरून हेलपाटा? त्यांनी एव्हाना मंचरच्या कुणा पत्रकाराला फोन लावला होता. पत्रकार महाशय आले. त्यांना पाहून निबंधक बाई खुर्चीतून उठल्या एवढाच काय तो फरक पडला परिस्थितीत. मग याला उपाय काय? तिथेच खलबत चालू झाले. लोकांनी आपापले अनुभव आणि मागे कसे एकदा असेच झाले होते हे सांगितले. कोण कोण कुठून कुठू आलंय याचे पाढेवाचन झाले.
पत्रकारांनी मग तहसीलदार कार्यालयाकडे मोर्चा वळवला. तहसीलदार तिथे नव्हते. 'इ-सरिता जोपर्यंत व्यवस्थित रित्या बसवली जात नाही तोपर्यंत पर्यायी व्यवस्थेने आधीसारखे दस्त नोंदवून घ्यावेत' अशी सूचना करणारा अर्ज तयार झाला. अर्थात त्याच्यावर त्या दिवशी कुणी अंमलबजावणी करेल याची सुतराम शक्यता नव्हतीच. तरीपण आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर स्वाक्षऱ्या मारल्या. निबंधकाच्या कार्यालयाबाहेर पत्रकारांनी सगळ्यांचे ग्रुप फोटो काढले. त्यात आमच्या बाबांना(आजोबांना) पुढे घेवून फोटो जास्तीत जास्त परिणामकारक होईल याची काळजी घेतली. परांजपे स्टाईल बाई एव्हाना शांत झाल्या होत्या. त्यांच्या या करामतीचे सगळ्यांना कौतुक होतेच.

आता मात्र निबंधकाच्या कर्मचाऱ्यांचा पण बांध फुटला. त्यांना पण कसे नंतर एक्स्ट्रा काम करून हा आजचा लॉट संपवावा लागेल हे सांगायला लागले.

यात माझी आणि भावाची धाकधूक वाढली. येन केन प्रकारेण हे वर्षानुवर्षाचे भिजत घोंगडे प्रकरण आणखी परत किती दिवस चालणार कोणाला माहिती. मनात विचारचक्र चालू झाले. आमची सहा माणसे आणि प्रतिवादी ४ ते ५. अशीच बाकीची कुटुंबे. प्रत्येकाचा दिवस वाया गेला. देशाच्या प्रत्येक कचेरीत मिळून या राष्ट्राचे कोट्यावधी मनुष्य-तास अक्षरश: वाया जातायेत. अन्नाची, पेट्रोलची नासाडी डोळ्यावर येते. पण वेळेचे काय? सरकारच्या अशा पिचक्या कारभारामुळे आज भारतातला नोकरदार, कामगार, शिक्षक, व्यवस्थापक, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, कलाकार सगळे त्यांच्या core competency ला लागणारा वेळेचा त्याग करून कुठे आधार कार्ड काढ, कुठे पासपोर्टच्या कार्यालयात खेटे घाल, कुठे विजेचे, फोनचे अवाच्या सवा आलेले बिल कमी कर, जन्म मृत्यूच्या दाखल्यासाठी, मॅरेज सर्टिफिकेट, जातपडताळणी, डोमिसाईल असल्या दाखल्यांच्या रांगेत लागलेले आहे. अशा समाजात काय निर्माण होणार जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि खेळाडू?

जयंत नारळीकरांच्या "चार नागरांतले माझे विश्व" मध्ये त्यांनी केम्ब्रिजवरून भारतात स्तलांतर केल्यानंतरचे वर्णन आहे. वाचता वाचता सगळा समा बदलतो. कुठे ते केम्ब्रिज मधल्या शास्त्रीय चर्चा, व्याख्याने, हायकिंग, सुखावणारी निवांत युरोपमधली भटकंती आणि कुठे भारतातली प्रत्येक जीवनावश्यक गोष्टीसाठी चाललेली धडपड. एका प्रसंगात तर त्यांनी TIFR मधल्या शास्त्रज्ञांना सरकारने दर दिवसाचा दुधाचा कोटा वाढवून द्यावा म्हणून मंत्रालयात अर्ज घेवून गेल्याची आठवण सांगितलीये. कधीकधी जयंताला फोन करून सांगावेसे वाटते की अरे तू स्टेडी स्टेट विश्वाच्या मागे लागून नाही तर स्वदेशात परतून नोबेल गमावलेस. असो, जोक्स अपार्ट.. ही झाली ७०-८० च्या दशकातली गोष्ट. पण आताही परिस्थिती अगदी अलबेल नाही.

मागे एकदा म्हटल्या प्रमाणे या परिस्थितीला राजकारण्यांबरोबर शासकीय अधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत. एक दिवस स्वत:च्या कार्यालयात सामान्य नागरिक म्हणून गेले तरी यांना सगळ्या व्यथा कळतील. पण कुठे जमिनी घे, कुठे फ्ल्याट घे, वीक, परत घे.. अशा भानगडीत गुंतल्यावर त्यांना तरी कुठे दिसतील या व्यथा.

भारतात गरीबी हटवायची असेल तर परिणामकारक गवर्नंस हे पुरेसे आहे. सरकारी कार्यालयात वाया जाणारा वेळ माणूस आपली क्षमता वाढवण्यात खर्च करेल. त्याची चीडचीड न होता आनंदी होईल. मग याचा परिणाम सगळीकडेच दिसेल. अगदी सिनेमे जास्त पाहण्यापासून पर्यटनापर्यंत सगळ्यांचाच फायदा होईल यात. बॉलीवूडचे सिनेमे हॉलीवूडपेक्षा जास्त व्यवसाय करतील.

हे झाले स्वप्नरंजन. जमीनीवर येवूया. हे चित्र एका रात्रीत बदलण्याची क्षमता जरी असली तरी सद्यपरिस्थिती पाहता त्याची शक्यता कमीच आहे. याच्यावर उपाय काय?

१. सरकारी कार्यालयात आनंदी राहणे. गोड बोलून कामे उरकून घेणे. लायकी नसलेल्या लोकांना सर्/म्याडम म्हणावे. डोके थंड ठेवावे. कधीकधी चूक आपल्या कागदपत्रांत पण असू शकते. अशा वेळी त्रागा करण्याने काहीही होत नाही.
२. विलंब होत असेल तर पर्यायी मार्ग तपासणे. चिंधी कामासाठी उगाच अमूल्य वेळ आणि मनशांती वाया न घालवता चिरीमिरी देवून ते उरकणे.
३. सहसा सरकारी कार्यालयात एकाचे काम असेल तर दोघांनी जावे. त्याने टाईमपास चांगला होतो.
आणि कधी कधी एकाची नाही तर दुसऱ्याची तरी ट्यूब पेटते.[1] एखादे कागदपत्र घरीच राहिले किंवा इकडच्या टेबल वरून तिकडे जाण्यासाठी नंबर लावणे, ओळखी काढणे इत्यादी कामासाठी चागला उपयोग होतो.
४. परवडत असल्यास सरळ एजंट पकडणे. पण हे करण्याआधी सरकारी कार्यालयांचा अनुभव अवश्य घ्या नाहीतर आपले इतर गरीब देशबांधव रोज कुठल्या दिव्याला सामोरे जातायेत हे कधीच समजणार नाही.
५. अगदीच मुजोर कारकून असतील तर क्रांती करायची तयारी ठेवावी आणि सीनियर्स ला भेटावे.
६. कुणी प्रामाणिकपणे आणि उत्तम काम करत असेल तर त्याची पावती म्हणून हसून त्याला थँक यु जरूर म्हणावे.

तर कुठे होतो आपण.. हां घोडेगाव दुय्यम निबंधक.
तर तिथल्या कारकुनांनी ४-४.३० नंतर लोकांच्या तक्रारींना वैतागून नामी शक्कल काढली. आपण इंटरनेट कंपनीच्या अधिकाऱ्यांनाच या त्रासासंदर्भात का कळवू नये? शेवटी झाला प्रकार त्यांचा टॉवर बंद पडला म्हणूनच झाला होता. मग दोन तीन टाळकी पळाली आणि शेजारच्या कोर्टातून त्यातल्या त्यात चांगला इंग्रजी येणारा वकील पकडून आणला. काकांनी त्याला लांबून पाहिला आणि "हां ढवळ्या होय.. ग्यानगेलेला आहे हा" अशी आम्हाला त्याची ओळख सांगितली.
तर ढवळे वकील आला. "the failure of your tower has caused us great trouble today" अशा आशयाचा कच्चा मसुदा तयार झाला. पण पाठवायचे कुणाला? सगळ्यांनी सीनियर कारकुनाकडे पाहिले. "आणखी कुणाला?" इति सिनियर कारकून. आणि ढवळे टाइप करायला लागला..
"Dear Anil Ambani,.."

हा सगळा प्रकार पाहून आम्ही परतलो. पुन्हा एकदा शनिवारची डेट मिळाली. आमचा लवाजमा बाबांना सावरत तिथे हजर. इंटरनेट सुरळीत होते. बहुधा सर्वज्ञानी श्री श्री अनिल अम्बानीने पुअर नेटीवांची आर्त हाक ऐकली असावी. आमचा नंबर आला. दस्त पाहतोय तर आधीच्या करारनाम्यात फेरफार होते. प्रतीवाद्यांना तिथेच जाब विचारला. मग एकमेकांच्या (म्हंजे खरेतर एकाच) कुळाचा उद्धार करण्यात आला आणि आम्ही महत्प्रयासाने जुळवलेली नात्यांची शिवण डोळ्यादेखत टराटरा उसवली.
_*_

[1] एकदा माझ्या मित्राला असेच MSEB च्या कार्यालयात जावे लागले. त्याला एका महिन्यात ४५०० च्या वर बिल लावले होते. तिथे मुद्दा सोडून तावातावाने बोलल्यावर आणखी काय होणार? आला बाहेर असाच. मग आम्ही दोघे असेच कार्यालयाबाहेर डोके खाजवत बसलो. आमच्या एका मित्राच्या मित्राला फोन लावला. तो MSEB तच मुंबईला होता. तो म्हंटला की शांतपणे आताचे आणि आधीचे रीडिंग आणून दाखवा. मग दोन तीनदा त्याची बिल्स बघितली तेव्हा लक्षात आले की ज्या महिन्याचे बिल जास्त लावले होते त्या महिन्यापेक्षा नंतरच्या महिन्याचे रीडिंग कमी होते. मीटर उलटा तर पळू शकत नाही. मग अशा प्रकारे तर्क लावल्यावर तिथल्या सायबाने ऐकून घेतले आणि त्या महिन्याचे बिल सरासरीएवढे करून दिले. च्यायला त्या वेळी खतरनाक भारी वाटले होते. त्यावर माझा मित्र म्हटला होता की 'ज्याचे काम अडलेले असते त्याचे डोके कधीकधी बधीर होते. म्हणून एकसे भले दो'.

चित्रे आंतरजालावरून साभार.

Sunday, August 4, 2013

पाश्चात्य मालिकांचे अनोखे विश्व

माझी ५०० जीबी पोर्टेबल हार्डडिस्क भरून गेली. ६०-७० पिक्चर, ढीगाने काढलेले फोटो, कधीतरी अभ्यास करू म्हणून टाकलेले ऑनलाईन ट्युटोरीयल्स, विडीयो लेक्चर्स, ई-बुक्स, मित्रांकडून जमवलेलं किडूकमिडूक, आणि माझ्या आवडत्या मालिकांचे ऋतू यांनी सगळी जागा सामावली. नवीन काही टाकायचे तर काय उडवू असा प्रश्न पडतो बऱ्याचदा. एकाच विषयावरची सतराशेसाठ ई-बुक्स ठेवून खरेतर मला कधीच उपयोग झाला नाही. सरळ सरळ कुणीतरी एक पुस्तक सुचवावे आणि आपण ते वाचावे हे तसे पाहता फार व्यवहार्य आहे. नाहीतर एकही वाचून होत नाही. पण ठरवून देखील आता डीलीट करत नाहीये. एखाद्या जुन्या घरात जसे मागल्या पिढ्यांचे कधीही न वापरात येणारे सामान उगीच पडून असते, तशी झालीये माझी हार्डडिस्क.

तर अशी ही हार्डडिस्क मी बिनधास्त मित्रांना मागातील तशी देतो. ते बापुडे ४जीबी चा पेन ड्राईव्ह पुढे करून एखादी मालिका मागतात. एक-एक ऋतू ६-७ जीबी चा असताना ती त्यांची कसरत पाहून मला कीव येते. आणि मग मी त्यांना हार्डडिस्क देण्याचे कबूल केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपून बरे वाटते. मग काही जण खूश होऊन स्वत:हून नवीन मालिकांचे काही एपिसोड्स त्यांच्या पेन ड्राईव्ह मध्ये आणतात. काही वेळेला मला ते भन्नाट आवडतात आणि मग पूर्ण ऋतूंचा फडशा पाडला जातो. हे असे गेली २-३ वर्षे अविरत चालू आहे. नव्यानव्या मालिकांची भर पडली. त्यातून मग ही जमा झालेल्या मालिकांची जातकुळी-जॉनर वेगवेगळं. अशात प्रत्येकाला कुठली काय मालिका आणि त्याला/तिला का आवडेल हे सांगत बसावे लागते. मला ते आवडते पण. म्हटले चला, याचे वर्गीकरण करून टाकू एकदाचे.

सुरुवात - अलीकडे पाहिलेल्या मालिकांपासून.

गेम ऑफ थ्रोन्स

२०११ मध्ये सुरु झालेली HBO वरची ही प्रत्येक ऋतूत १० एपिसोड असलेली मालिका. प्रत्येक भाग १ तासाचा. सध्या तिचा तिसरा ऋतू संपला. जॉर्ज आर आर मार्टीन यांच्या "सॉन्ग्स ऑफ आईस अॅन्ड फायर" या दीर्घ कादंबरीवर आधारलेली ही मालिका आहे.
ज्यांना लॉर्ड ऑफ द रिंग्स सिनेमे आवडले त्यांना ही नक्की आवडणार.
'लॉर्ड ऑफ द रिंग्स' ही जर ८०% फ्यांटसी आणि २०% काल्पनिक-ऐतिहासिक मानली, तर 'गेम ऑफ थ्रोन्स' ही ६०% काल्पनिक-ऐतिहासिक आणि ४०% फ्यांटसी असेल.


प्रागैतिहासिक काळात एका युरोप सदृश काल्पनिक खंडात 'वेस्टेरॉस ची ७ राज्ये' (Seven Kingdoms Of Westeros) आहेत. त्यातले "किंग्स लॅन्डिंग" हे प्रमुख ठिकाण. जिथला राजा हा या सात राज्यांचा राजा आणि बाकी राज्ये ही त्याचे सार्वभौमत्व मान्य केलेली. या बाकीच्या ७ राज्यांचे स्वामी म्हणजे मुख्य राजाचे सरदारच.

त्यातल्या उत्तरेकडील 'विंटरफेल" इथला सरदार नेड श्टार्क आणि त्याचे कुटुंब हे पहिल्या तीन ऋतूत तरी मध्यवर्ती आहे. नेड श्टार्क ला "किंग्स लॅन्डिंग" मध्ये रॉबर्ट बरॅथीयन आपला प्रधान करतो आणि तिथल्या राजकारणात त्याचा बळी जातो. तिथून 'विंटरफेल" मधल्या त्याच्या कुटुंबाची फरफट चालू होते. "कासेर्ली रॉक" मध्ये असलेले लॅनीस्टर्स कुटुंब आणि त्यांची सिंहासनावर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी चाललेली अविरत धडपड, त्यातून उद्भवणारी कट-कारस्थानं, हेवेदावे, खून, वध, तह, फितुरी, भागीदारी अशांचे रोचक मिश्रण असलेली ही मालिका आहे. त्यात सिंहासनावर हक्क सांगणारी 'ड्रॅगन्स ची आई' डेनेरीस टार्ग्यारियन तिचा मंगोल टोळ्याप्रमाणे धाड टाकणाऱ्या डोथ्रोकी टोळीचा प्रमुख द्रोगो याच्याशी विवाह, त्याच्या मृत्युनंतर स्वत:चे सैन्य जमवण्यासाठी सुरु असलेली कसरत हा पण या मालिकेचा मुख्य धागा आहे.

महाभारताप्रमाणे हे एक महाकाव्यच आहे. हा कथेचा पसारा झेपण्यासाठी पहिले ५ एपिसोड्स मन लावून पहावे लागतात. जर तुमच्याकडे अनसेन्सर्ड वर्जन असेल तर "मन लावून पाहणे" फार अवघड नाहीये. एकतर सर्व कलाकारांचा अभिनय म्हणजे पर्वणी आहे. त्यात मध्ययुगासारखा कालखंड जिवंत उभा केलाय. छायाचित्रण अतिशय सुंदर आहे. आणि लोकांनी तेवढा संयम ठेवून ते सारे विश्व पहावे म्हणून कथेची गरज म्हणून वेळोवेळी पराकोटीची नग्नता, हिंसा, रक्तपात आहे. त्यात उत्तरेकडील बर्फाळ प्रदेशातले रहस्यमय 'व्हाईटवॉकर्स' ही झाँबी सदृश भुते आहेत.

बी आर चोप्राचे महाभारत म्हणजे एखाद्या नाटकाचा सेट असावा असे वाटायचे. स्त्रिया काय राजपुरुष देखील सोन्याने मढवलेले. युद्ध म्हणजे तर हसूच यायचे. 'गेम ऑफ थ्रोन्स' मध्ये अगदी राजापण चामड्याची वस्त्रे घालतो. अगदी उच्च वर्गाकडेच रेशमी वस्त्रे, धातूचा वापर त्या काळाला साजेसा, कमीत कमी मेकअप, अभिनेत्यांच्या हालचाली नैसर्गिक (बी आर चोप्राचे महाभारतासारख्या अवघडलेल्या नाहीत) अशा गोष्टीमुळे ही एक सुंदर मालिका झालीये.

या मालिकेतली हिंसा आणि नग्नता पाहून भारतीय सेन्सॉर बोर्डाच्या बरेचशा सदस्यांना झीट येइन. त्यामुळे भारतात टी.वी. वर ती पाहिली तर २०-३० टक्के भाग गाळलेला असेल त्यामुळे कथासूत्राचा बोजवारा उडून डोके मात्र दुखेल. त्यामुळे टी.वी. वर पाहण्याच्या भानगडीत न पडलेले बरे.

डेक्स्टर

या मालीकेचा मी फक्त एकच ऋतू पाहिलाय. ही मालिका आठव्या ऋतूपर्यंत आलीये.
डेक्स्टर मॉर्गन या पेशाने न्यायवैद्यक विश्लेषक (forensic expert) असलेल्या पात्राभोवती या मालिकेची कथा फिरते.

डेक्स्टर दोन आयुष्य जगतोय. तो एक सिरीयल किलर पण आहे. वाहत्या रक्ताला बघायची, त्याच्या सावजांना तडफडवून मारायची प्रवृत्ती त्याच्या ठायी आहे. त्याची ही प्रवृत्ती त्याला दत्तक घेतलेले वडील त्याच्या लहानपणीच ओळखतात. हे आपले मानसिक आजाराने ग्रस्त पिल्लू समाजात मिसळणार नाही आणि लवकरच त्याच्या या प्रवृत्तीपायी त्याला मारून टाकण्यात येईल हे ओळखून त्याला ते संयम शिकवतात. माणसांमध्ये कसे मिसळावे आणि आपल्या मनाचा थांगपत्ता ण लागू देता आपले उद्योग कसे करावेत याचे शिक्षण देतात. त्याच्या हा विकृतीला जाणीवपूर्वक बंध घालून देतात. त्याच्या वडलांच्या शिकवणुकीप्रमाणे डेक्स्टर निष्पाप लोकांना सोडून फक्त गुन्हेगारांची शिकार अमानुष रित्या करतोय. त्याच्या पेशामुळे तो कुठलाही पुरावा मागे न ठेवण्यात हुशार आहे. आणि डेब्रा या त्याच्या स्वत:च्या पोलीस बहिणीलाही त्याच्या या कृत्यांचा गंध नाहीये.

आपल्या बापाच्या शिकवणुकीप्रमाणे एखादे सावज नक्की करण्यासाठी आणि त्याचा गुन्हा पडताळण्यासाठी डेक्स्टरला बऱ्याचदा सखोल अभ्यास आणि तपास करावा लागतो. त्यातून त्याचे शत्रूपण आहेत. आपल्या लाडक्या बहिणीला जपणे, स्वताच्या अक्कल हुशारीचा वापर करून तिला तिच्या केसेस मध्ये मदत करणे आणि तिचे संकटापासून रक्षण करणे हेपण कथेचे रोचक भाग आहेत. अतीव हिंसा आणि रक्तपात इथेही आहे. पण ती 'गेम ऑफ थ्रोंस' सारखी भयानक ग्राफिक नाहीये. यातला विनोद बहुतांश डार्क प्रकारचा आहे. डेब्रा बरोबरचे संवाद, फ्लॅशबॅक मध्ये दिसणारी त्याच्या वडीलांची शिकवण, त्याला कृत्रिमरित्या समाजामध्ये मिसळण्यासाठी करावी लागणारी धडपड यातून ही विनोदनिर्मिती होते. ही मालिका जगात सर्वात जास्त बघितल्या जाणाऱ्या मालिकांपैकी आहे.

थ्रू द वर्महोल

डिस्कवरी चॅनेल साठी तयार केलेल्या या मालिकेचा पहिला ऋतू पाहिलाय. दर एपिसोड एक तासाचा आणि असे १० भागांचा एक ऋतू अशी रचना आहे.

विश्वरचनाशास्त्र हा बोजड विषय मालिकेचा गाभा असला तरी तो सर्वसामान्य भाषेत समजावण्याचा प्रयत्न केलाय. अतिशय रोचक असे ग्राफिक्स, मॉर्गन फ्रीमन चे सुत्रसंचालन, प्रसिद्ध शास्त्रज्ञांची उपस्थिती, मत मतांतरे, विनोदी कार्टून्सव्दारे विषय समजावण्याचे प्रयत्न यामुळे ही मालिका अतिशय प्रेक्षणीय झालीये. त्यातला हिग्स बोसॉन, सेती प्रकल्प, डार्क म्याटर, केपलर प्रकल्प, लार्ज हेड्रोन कोलायडर विषयीचा भाग खुपच अप्रतीम जमलाय. विश्वातले सर्वात मुलभूत कण - क़्वार्क हे वजनरहित का?आणि या कणांना वजन देणारे कोण असे क्वांटम फिसिक्स चे प्रश्न पाहिले की मती गुंग होते. अशा आणि अनेक प्रश्नांची मजेदार सफर घडवून आणणारी ही मालिका आहे.

सध्या तिचे ४ ऋतू झालेत.

बँड ऑफ ब्रदर्स

HBO वरची ही १० एपिसोड असलेली मालिका. "सेविंग प्रायवेट रायन" ज्यांनी पाहिलाय त्यांनी चुकवू नये अशी. या पिच्चर मध्ये कॅप्टन जॉन एच मिलर ची अविस्मरणीय भूमिका केलेल्या टॉम हँक्स ने याच पिच्चरचा डायरेक्टर स्टीवन स्पीलबर्ग बरोबर या मालिकेची निर्मिती २००१ मध्ये केली. "सेविंग प्रायवेट रायन" ही दुसऱ्या महायुद्धात झालेल्या घटनांवर आधारित एक काल्पनिक कथा होती. त्यातली पात्रेही काल्पनिक होती. पण 'बँड ऑफ ब्रदर्स' ही खऱ्याखुऱ्या सैनिकांची खरी कथा आहे. हा, नाट्यनिर्मिती साठी कुठे कुठे कलात्मक स्वातंत्र्य घेतले असेल. ऐतिहासिक महत्व असलेल्या १०१ एयरबोर्न डिविजन च्या ५०६ पराशूट रेजिमेंट च्या ई कंपनीची कथा सुरु होते १९४३ साली.


युरोपमध्ये युद्ध शिगेला पोहोचलेले असताना अमेरिकेच्या टकोआ, जॉर्जिया येथे कुराही टेकड्यांच्या परिसरात ई-इझी-कंपनी चे नवे रिक्रूट जोरदार ट्रेनिंग करत असतात. त्यांचा ट्रेनर कॅप्टन सोबल (फ्रेंड्स मधला रॉस - डेविड श्विमर) या नवीन पोरांचा जीव काढत असतो. त्याचा त्यामागचा उद्देश जरी त्यांना कुठल्याही परिस्थितीला सामोरे जायला तयार करणे हा असला तरी या नवीन सैनिकांना मात्र तो भलताच कडक वाटतोय. बरेचसे शिपाई पगार भत्ता इतरांपेक्षा चांगला म्हणून एयरबोर्न डिविजनला जॉईन झालेत. सेकंड लेफ्टनंट रिचर्ड विंटर्स याला या सैनिकाबद्दल सहानुभूतीही आहे आणि अनेक सैनिक सोबेल पेक्षा त्याला वरचढ मानतात. पहिले १-२ एपिसोड या ट्रेनिंग मधल्या गमती जमती आणि सोबेल - विंटर्स मधल्या कुरबुरी तसेच युद्धाची परिस्थिती पात्रपरिचय, डी डे ची तयारी दाखवतात.

फ्रान्सच्या नॉर्मंडी मध्ये सेकंड लेफ्टनंट रिचर्ड(डिक) विंटर्स च्या नेतृत्वाखाली ६ जून १९४४ ला इझी कंपनीच्या सैनिकांना एयरड्रॉप केले जाते. वेगवेगळया ठिकाणी पडलेल्या या सैनिकांना एकत्र करून वाटेत जर्मन ठाणी काबीज करत या कंपनीची वाटचाल दाखवण्यात आलीये. त्यात अनेक सैनिकांच्या स्वभावाचे कंगोरे, त्यांना येणारे चांगले वाईट अनुभव, होणाऱ्या चुका, विंटर्स चे नेतृत्वगुण, त्याच्या बढत्या, वाढलेली कामे, त्याचे पेपरवर्क पेक्षा युद्धात उतरून लढण्याला प्राधान्य, विंटर्स चा सोबती कॅप्टन लुई निक्सन बरोबरची त्याची मैत्री, आघाड्यांवर होणारे डावपेच, अतिशय कठीण परिस्थितीत लढाया, फ्रांस ते हॉलंड, ते बर्लिन आणि ऑस्ट्रिया, युद्धसमाप्ती पर्यंत इझी कंपनीची वाटचाल हे सर्व या मालिकेचे कथासूत्र. मालिकेला सर्वत्र 'सेविंग प्रायवेट रायन' सारखा लूक आहे. खर्च अफाट केलेला आहे. आणि अभिनय लाजवाब. कुराही, बॅस्टोन, इगल्स नेस्ट हे एपिसोड्स अप्रतिम जमलेत.

दुसऱ्या महायुद्धाच्या रणभूमीचा अनुभव पहायचा असेल तर ही मालिका बेस्टच.
या मालिकेचा पुढचा भाग जपान फ्रंट वरचा "द पसिफिक" अजून पहिला नाही. तो पण मिळवायचा आहे.

द आयटी क्राउड

मी पाहिलेल्या इतर तमाम सिटकॉम्स पेक्षा ही वेगळी. कारण ही ब्रिटीश मालिका आहे. बहुतांश सिटकॉम्स सारखी २५-३० मिनिटांची. २००६ साली चालू झालेल्या या मालिकेचे एव्हाना ४ ऋतू झालेत. बऱ्याचशा ब्रिटीश मालीकांसारखे एक ऋतू ६-७ एपिसोड्स चा आहे.

कुठल्याशा एका मोठ्या कंपनीमध्ये बेसमेंट ला आय.टी. डीपार्टमेंट आहे. त्यात रॉय आणि मॉस हे दोघेच जण काम करतात. दिवसभर गेम खेळणे, इंटरनेट वर टाईमपास करणे याशिवाय कधीतरी एखाद्या कर्मचाऱ्याचा कम्प्युटर चालत नाही असा फोन आला की "रिस्टार्ट करून पहा" किंवा "इलेक्ट्रिक कनेक्शन तपासा" ही ठरलेली उत्तरे देणे हा त्यांचा उद्योग. त्यांच्या संवादावरून "७ व्या मजल्यावर भारी पोरी आहेत" हे समजते. तिथून फोन आला रे आला कि रॉय लगबगीनं तिकडे जाणार. पण सोशल स्किल्स नसल्यानं त्याला तिथं कुणी विचारत नाही. मॉस तर त्याच्यापेक्षा भयानक केस. झुबकेदार वेशभूषा, शाळेत असल्यासारखे कपडे, विसरभोळेपणा, तंतोतंत् बोलणे असा मॉस.

तर अशा या दोघांना मॅनेजर म्हणून नेमली जाते जेन. जेन ला या कंपनीचा मालक बहुदा तिचा चेहरा पाहून घेतो. जेन ला आय.टी. चा फुलफॉर्मपण माहीत नाही. तिचा कम्प्युटर्स मधल्या अज्ञानाचा अवाका लक्षात आल्यावर रॉय आणि मॉस तिला यथेच्छ त्रास देतात. पण तिच्या बोलक्या स्वभावामुळे ती "७ व्या" मजल्यावर कनेक्शन करायला उपयोगी पडेल म्हणून हळूहळू मॉस आणि रॉय तिला स्वीकारतात.

या तिघांची कथा असलेले हे आय.टी. क्राउड. मॉस हे या मालिकेतले सर्वात मिश्कील पात्र आहे.

माईंड युअर लँग्वेज

सत्तरच्या दशकातले 'माईंड युअर लँग्वेज' ही पण ब्रिटीश सिटकॉम. कथासूत्र अतिशय साधे आहे. मिस कोर्टनी या बाईसाहेब एका भाषेच्या शाळेत हेडमास्तर असतात. तिथे जेरेमी ब्राऊन हा तरूण नोकरी मागायला येतो आणि त्याला तिथे इंग्लिश शिकवण्याची नोकरी विनासायास मिळतेपण. कारणही तसेच असते. त्या इंग्रजी वर्गातले विद्यार्थी मास्तरला पार वेडं करून टाकत असतात. इंग्रजी शिकतानाच काही वाक्प्रचारांचे शब्दश: अर्थ लावणे, अजाणतेपणे किंवा मुद्दामहून मास्तरच्या फिरक्या घेण असे उद्योग चालू असतात. ब्राऊन सर् या विद्यार्थ्यांना शिकवण्याचे आव्हान स्वीकारतात पण त्यांचीही तारांबळ उडतेच.

या विद्यार्थ्यांत पाकिस्तानचा अली, भारताचे रणजीत आणि जमीला, जपानचा तोरो, जर्मनीची अॅना, स्पेनचा जुआन ही पात्रे खुपच विनोदी आहेत.

अलीचे "स्क्वीझ मी प्लीज" (म्हणजे एक्सक्युज मी प्लीज), जिथे तिथे "ओह ब्लायमी", रणजीत चे "थाउसंड अपोलोजीस", तोरोचे "आर्सो", जुआनचे "पर्फावोर" हे टिपिकल शब्द मजा आणतात.

या विद्यार्थ्यांचे खाजगी आयुष्य, त्यांचे एकमेकांचे वैर किंवा मैत्री, चुकीचे इंग्रजी बोलल्यामुळे होणारे घोळ आणि मी.ब्राऊनचे त्यांना नेहमी वाचवणे हे प्रेक्षणीय. ही मालिका सध्या कॉमेडी सेंट्रल वर पुन:प्रक्षेपित केली जातीये.

आय ड्रीम ऑफ जिनी

साठच्या दशकातले आय ड्रीम ऑफ जिनी हे बऱ्याच जणांनी पाहिलेले असेल. दूरदर्शन वर म्हणे ते ९० ते ९५ दरम्यान कधीतरी प्रक्षेपित होत होते. प्रसिध्द लेखक सिडनी शेल्डन हा या मालिकेचा निर्माता. याचा प्रत्येक एपिसोड २३-२५ मिनिटांचा आणि एका सीझन मध्ये २२-२३ भाग असे ५ ऋतू पाहिले मी.
मेजर अॅन्थनी नेल्सन हा अमेरिकन एयरफोर्स मध्ये असलेला टेस्ट पायलट. तो नासा च्या मिशन्स, नवीन विमाने आणि याने यांच्यावर काम करतोय. त्याचा बोलघेवडा पण वेन्धळा मित्र मेजर हिली हा पण एक टेस्ट पायलट. एका मिशन दरम्यान अॅन्थनीला एका बेटावर एक रिकामी बाटली सापडते. हाताळल्यावर त्यातून एक सुंदर जिनी प्रकट होते आणि लगेचच अॅन्थनीच्या प्रेमात पडते. अॅन्थनी तिला घेवून कोकोआ बीच या आपल्या शहरात आणतो. पण जिनी त्याच्यासाठी जगातली सर्व सुखं आणू शकते हे माहित असूनही स्वबळावर स्वत:चे नॉर्मल आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे जिनी मात्र आपल्या मालकाला जगातली सगळी दौलत, ऐशोआराम द्यायला बघत असते. पण अॅन्थनी च्या अशा आदर्शवादापुढे तिचे काही चालत नाही. पण मनातूनमात्र तिला या नवीन मालकाचे कौतुकाच असते. एकतर अॅन्थनीने तिला शेकडो वर्षांतून मुक्त केलेले असते. आणि तिच्या २००० वर्षाच्या आयष्यात त्याच्यासारखा मालक तिला कधीच मिळालेला नाही हे नेहमी नेहमी तीच सांगत असते.

अॅन्थनीचेही तिच्यावर प्रेम जडते. पण तिला जगापासून लपवताना त्या दोघांची जाम तारांबळ उडते. त्यात जीनीला मेजर हिली पाहतो, नंतर त्यांचा सिनियर कर्नल डॉ. आल्फ्रेड बेलोज आणि त्याची बायको अमांडा पण पाहते. पण नानाविध क्लुप्या लढवून ते दोघे जीनीच्या अमानवी शक्तिंविषयी कुणालाही कळू देत नाहीत. यथावकाश मेजर हिलीला जिनी खरी कोण हे कळते मग तो पण मित्रापायी ते रहस्य लपवण्याच्या कसरतीत सामील होतो.

जीनीच्या आपल्या लाडक्या मालकाला मदत करण्याच्या सवयीपायी ती बऱ्याचदा अॅन्थनीला गोत्यात आणते. कधी कधी तर तिच्या पॉवर वापरण्याशिवाय त्याला गत्यंतरच नसते. चौथ्या ऋतूपर्यंत हे दाम्पत्य लग्न करायचा निर्णय घेतं तेव्हा तर जीनीच्या माहेरचे एकाहून एक चमत्कारिक पब्लिक अॅन्थनीच्या आयुष्यात अधिकाधिक गमतीशीर प्रसंग निर्माण करतात. या सर्वाचा सर्वात जास्त परिणाम डॉ.बेलोज दांपत्यावर होतो. जिनी खरी कोण हे माहित नसल्यामुळे अनेकदा काहीतरी चमत्कारिक पाहूनही त्यांना त्याचे आकलन न झाल्यामुळे गप्प बसावे लागते.

या मालिकेच्या काळाच्या दृष्टीने, त्यांनी दाखवले स्पेशल इफेक्ट परिपूर्ण आहेत. त्या वेळच्या टेक्निकल गोष्टी जसे विमाने, याने, अवकाश प्रवास, त्या वेळेचे भलेमोठे कम्प्युटर्स हे सर्व बघताना मजा येते. जिनी झालेली बार्बरा इडन मस्त दिसते, लॅरी हँगमन या देखण्या अभिनेत्याने अॅन्थनी साकारलाय, मेजर हिली आणि डॉ.बेलोज ही पात्रं खरच गंमतशीर आहेत.

हाऊ आय मेट युअर मदर

"लेजेन.. वेट फॉर इट.. डरी.. लेजेंडरी" बार्नी स्टीन्सन ची ही आरोळी म्हणजे या मालिकेचा युएसपी म्हटला पाहिजे.
२००५ साली सुरु झालेल्या या मालिकेचे आतापर्यंत ८ ऋतू झालेत. पैकी मी ५-६ पहिले असतील.

२०३० मध्ये एक बाप आपल्या दोन पोरांना तो त्यांच्या आईला कसा भेटला हे सांगतोय असे हे कथासूत्र. त्यामुळे नरेशन हे सगळे भूतकाळात म्हणजे आताच्या वर्तमानात आहे.
हा बाप आहे टेड मोस्बी. पेशाने वास्तुरचनाकार असलेला टेड आपल्या मार्शल या जिवलग दोस्तासोबत न्यू-योर्क मध्ये राहतोय. त्याच्यात आपल्या भावी जोडीदाराबद्दल मुळातच एक रोमॅन्टिसिझम भरलाय. ती अशी असावी, तशी असावी, अमुक यावं, तमुक सिनेमा, पुस्तक तिला आवडावंच वगैरे वगैरे. त्यामुळे त्याचा शोध हा अनंत कालपर्यंत असाच चालू राहणार का असा प्रश्न न पडावा म्हणून ही फ्लॅशबॅक टाईप व्यवस्था केलीये.

त्याचा मित्र मार्शल मात्र कॉलेज पासून लिलीच्या प्रेमात आकंठ बुडालेला. लिली ही व्यावसायिक चित्रकार बनू पाहणारी मुलगी. नंतर बरेसचे जण करतात तशी स्वप्नांना बाजूला ठेवून लहान मुलांची शिक्षिका बनते. मार्शल आणि लिली एखाद्याला बघून वीट येईन इथपर्यंत एकमेकांत गुंतलेले. आणि टेड मात्र सदैव इकडे तिकडे प्रेमाचा शोध घेणारा. अशा तिघांना एक दिवस बार्नी भेटतो. कुठल्याशा बँकेत कुठलेसे काम करून बक्कळ पैंसा मिळवणे, पोरींना पटवणे आणि लगेच सोडून देणे, निर-निराळे फंडे टेड ला पाजणे, विचित्र पैजा लावणे, महागडे सुटस शिवणे हे बार्नीचे छंद. कधीतरी प्रेमभंग झालेला बार्नी सगळ्या स्त्री-जातीवरच जणू सूड उगवतोय. तसा तो सहृदयी आहे हे त्याचा बऱ्याचशा लीलांवरून समजत जाते. त्याचे संवाद म्हणजे हसून हसून पुरेवाट.

याच ग्रुपमध्ये रॉबिन आहे. मुळची कॅनडाची रॉबिन, अमेरीकेत मोठी रिपोर्टर बनण्यासाठी आलीये. पण एका फारशा महत्वाच्या नसलेल्या न्यूज चॅनेल मध्ये तिला काम करावे लागतेय. टेड चे तिच्यावर प्रेम बसते आणि ती या गटाची सदस्य होते. सुरुवातीला सुंदर नाजूक वाटणारी रॉबिन नंतर नंतर खऱ्या रांगड्या स्वभावात दिसते. हा ग्रुप चर्चा आणि मस्ती करण्यासाठी बार मध्ये बसतो. (फ्रेंड्स मध्ये जसे कॉफीशॉप मध्ये बसायचे तसे).

टेड, रॉबिन, लिली, मार्शल यांची त्यांचे आयुष्य मार्गावर नेण्यासाठी सततची धडपड चालू आहे. त्यात त्यांना मस्ती पण करायचीये, आवडत्या क्षेत्रात करीयर पण करायचंय, आणि मिडीयोकर नोकरीतनं येणार शाश्वत उत्पन्न ही सोडवत नाहीये, आपले मित्र पण सांभाळायचेत आणि जसे जसे मोठे होतायेत तसे कुटुंब पण बनवायचंय. थोड्याफार फरकाने मेट्रोमध्ये राहणाऱ्या तरुणांची तारांबळ गंमतशीर पद्धतीने दाखवण्यात आलीये.

वेगळा आहे बार्नी. त्याचे विचार क्लीयर आहेत. मजा, मजा आणि फक्त मजा. एका एपिसोडमध्ये टेड त्याला सांगतो की म्हातारपण आल्यावर त्याला हे सगळं थांबवावंच लागेल. त्यावेळी बार्नी पैज लावतो आणि ८० वर्षाच्या म्हाताऱ्याचा मेकअप करून त्याही अवस्थेत पोरगी पटवतो. पण ती ३२ वर्षाची आहे समजल्यावर आणखी कोवळी मिळवण्यासाठी पठ्ठ्याची परत धडपड सुरु होते. असे आणि अनेक धिंगाणे बार्नी घालतो. नील पॅट्रीक हॅरीस या गुणी अभिनेत्याने हा बार्नी साकारलाय.

५-६ सीझन नंतर मला मालिकेत तोच तोच पणा जाणवायला लागला. शिवाय फ्रेंड्स मध्ये जसे कुणीही कुणाशी लग्न करते, परत हि त्याच्याबरोबर तो पाहिलीबरोबर असे प्रकार चालू झाले आणि माझा इंटरेस्ट संपला.

टू अॅन्ड हाफ मेन

चार्ली शीन हा त्याच्या हॉटशॉटस् या विडंबन चित्रपटांच्या मालिकेमुळे बऱ्याच जणांना माहिती असेल. त्याला मध्यवर्ती पात्राच्या भूमिकेत घेऊन ही मालिका तयार करण्यात आली. २००३ साली सुरु झालेली ही मालिका अजूनही चालू आहे.

चार्ली हार्पर (शीन) हा जाहिरांतीचा जिंगल लिहिणारा तसा यशस्वी माणूस. मलिबु या उच्चभ्रूंच्या वस्तीत त्याचे स्वत:चे बीच हाऊस आहे. एक थोडी फटकळ मोलकरीण आहे. लग्नाला आणि बंधनाला घाबरणारा चार्ली या घरात एकटाच राहतो. नव-नवीन मुलींशी सख्य जोडायचे आणि नंतर हळूच अंग काढून घायचे अशात त्याचे व्यवस्थित चालू आहे.

अशा त्याच्या सुखासुखी घरात त्याचा भाऊ अॅलन राहायला येतो. अॅलनचा घटस्फोट झालेला असतो आणि बायकोने जवळजवळ पूर्ण संपत्ती हडप केल्याने तो वाऱ्यावर येतो.

चार्ली त्याला तात्पुरता निवारा देतो खरा, पण स्वारी नंतर वर्षानुवर्षे तिथून हलत नाही. त्यात अॅलनचा मुलगा जेक तिथे राहायला असतो. आणि मग या तिघांचे आयुष्य एकमेकांशी गुंतत जाते. म्हणून हे दोघे मोठे आणि तो लहानगा असे 'टू अॅन्ड हाफ मेन'.

या दोघांची आई एवलीन हार्पर ही तशी स्वतंत्र आणि कर्तृत्ववान बाई. पण अॅलन आणि चार्ली चा पक्का समज आहे की आज त्यांच्या स्वभावातले दोष हे त्यांच्या आईच्या वर्चस्व गाजवणाऱ्या स्वभावामुळे निर्माण झालेत. फरक हाच की चार्ली लग्न न करून सुखी आहे पण अॅलनला मात्र भावाकडे बांडगुळासारखे राहावे लागते. त्याच्या या अवलम्बत्वाची यथेच्छ खिल्ली उडवण्यात आलीये. या दोन भावांमधले संबध, चार्लीचे खुमासदार संवाद, छोट्या जेकचे निरागस प्रश्न आणि चार्लीचे त्याच्यावर भलते संस्कार हे विनोद निर्मिती करतात.

काही वर्षे ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर होती आणि निर्माता चक लॉर हा त्याच्या आणखी एक यशस्वी मालिकेमुळे (बिग बँग थियरी) चर्चेत आले. चार्ली शीन ला तर एका २२ मिनिटाच्या एपिसोड साठी १.८ मिलिअन डॉलर्स (जवळपास ९ कोटी रुपये) मिळत होते. याची हवा त्याच्या डोक्यात गेली नसती तरच नवल. त्याचे आणि चाक लॉर चे वाजले आणि चार्ली शीन नवव्या ऋतूतून बाहेर पडला. त्यामुळे नवव्या सीझन मध्ये चक्क कथाबदल करून अॅष्टन कुचर या देखण्या हॉलीवूड हिरोला नवीन रोलमध्ये 'वॉल्डन श्मिट' म्हणून आणले गेले.

वॉल्डन हा कम्प्युटर इंजिनियर त्याच्या इन्फोटेक कंपनीमुळे अब्जाधीश झालाय पण व्यवहारी नसल्यामुळे बायकोने सोडले म्हणून जीव द्यायाला निघतो आणि अॅलन त्याला वाचवतो. आपल्या मृत भावाची (चार्लीची) इस्टेट त्याच्यावरच्या कर्जासहित वॉल्डन ला विकून परत त्याच घरात वॉल्डन बरोबर राहायला लागतो. वॉल्डनही त्याला त्याचा जीव वाचवण्याच्या बदल्यात तात्पुरता आश्रय देतो. पण त्या घरातली नोकर बर्टा जसे म्हणते तसे, "तो एकदा घुसला की निघत नाही" याच्याकडे वॉल्डन दुर्लक्ष करतो. आता या दोघांची परत जुगलबंदी चालुये. आणि विशेष म्हणजे मालिकेत एवढा मोठा बदल करूनही त्यांचे नंबर एक चे स्थान घसरले नाही.

खरेतर मला पहिलाच सीझन जास्त आवडला. नंतर प्रमाण कमी झाले आणि शेवटी तर मधले ६-७ सीझन गाळून मी डायरेक्ट नवव्याचे (अॅष्टन कुचर आल्यावर) काही भाग पाहिले. या मालिकेतही नीतीमत्ता औषधाला सापडत नाही. स्वैराचार ३-४ सीझन नंतर अतीच झाला. त्यामुळे इंटरेस्ट आपोआप कमी झाला.
आतातर म्हणे जेकचे पात्र साकारणाऱ्या अँगस टी जोन्स नेच या मालिकेची "घाण (filth)" म्हणून संभावना केलीये.

द बिग बँग थियरी

ही माझी सर्वात आवडती सीटकॉम. ४ शास्त्रज्ञ मित्र शेल्डन, लेनर्ड, राज,हॉवर्ड आणि त्यांची मैत्रीण पेनी याच्याभोवती गुंफलेली कथा विज्ञान आणि विनोद याचे सुरेख मिश्रण आहे. याच्याबद्दल स्वतंत्र पोस्ट याआधीच टाकलाय.

या सर्व मालिका आदर्श आहेत असे मी मानत नाही. तसेच काही यांच्यापेक्षाही लोकप्रिय मालिकांचे उल्लेख केले नसतील. कारण - मी त्या पाहिलेल्या नाहीत. फ्रेंड्स चा उल्लेख केला नाही. ती सुपरिचित आहे. या मालिका बघण्यामागची कारणे आणि काही आणखी मालिकांचा उल्लेख या पोस्टवर आधीच केलाय. द बिग बँग थियरी: शास्त्रज्ञांतल्या माणसांचे जग-१.

सर्व चित्रे आंतरजालावरून साभार.

Sunday, June 30, 2013

सुपरमॅन ला नोलन टच : मॅन ऑफ स्टील


        सुपरमॅन च्या मला सगळ्या लीला आवडायच्या. स्वत: तर तो फिसिक्स चे सगळे नियम मोडायचाच पण त्याने मर्त्य मानवांबरोबर पण असे प्रकार केले की माझी चीडचीड व्हायची. उ. दा. लॉईस लेन ला त्याने कितीतरी वेळेला वादळी वेगाने येउन हवेतल्या हवेत उचलले होते. अशा वेगाने येवून एखाद्याला उचलून नेले तर विमानाला पक्षी धडकल्यावर पक्षाची जी अवस्था होते तशी लॉईस होणार नाही का?[१]  एखादी गाडी उचलण्यापासून आक्क्खेचे आख्खे बेट उचलतानापण सुपरमॅन च्या चेहऱ्यावर सारख्याच वेदना आणि बाहुंमध्ये तेवढाच ताण. हा असेल पोलादी शरीराचा, पण याचे कपडे आग, वर्षा, चिखल, स्फोट अशा कुठल्याही आपत्तीनंतरही परीटघडीचे. हे सर्व पण ठीक. सर्वांवर कळस म्हणजे याने फक्त चष्मा लावला की लॉईस लेन सारखी पुलित्झर जिंकलेली पत्रकार माठ व्हायची आणि हाच तो आपल्याला वाचवणारा महापुरुष हे ओळखू शकत नव्हती. कैच्या कै. सुपरमॅन च्या या जगात त्याचे नियम मान्य करण्यावाचून पर्यायपण नसायचा.

पण सुपरमॅन समोर हार मानेल तो नोलन कसला. त्याची निर्मिती, कथा असलेला आणि झॅक स्नायडर दिग्दर्शित मॅन ऑफ स्टील पाहिला. मूळ कॉमिक्स ला धक्का न लावता त्यांनी सुपरमॅन च्या कमतरता दूर करण्याचा एक चांगला प्रयत्न केला आहे.

साधारण ४-५ वर्षापूर्वी येवून गेलेला सुपरमॅन रिटर्न्स या चित्रपटाला तिलांजली देवून सुपरमॅन फ्रॅन्चायझीचा  पुनश्च हरीओम योजनेअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे अतिमानवीय सुपरहीरोचे इवोल्युषण नोलन स्टाईल ने बघण्याची पर्वणी लाभते.

        कथा सुरु होते क्रिप्टॉन या सूर्यमालेपासून कैक प्रकाशवर्षे दूर असलेल्या ग्रहावर. मानवसदृश (humanoid) पण मानवांपेक्षा कितीतरी प्रगत अशी जमात या ग्रहावर राज्य करतीये. त्यांच्यापैकी जॉर-एल (रसेल क्रो) आणि त्याची पत्नी लारा (आयलेट झुरर) एका बाळाला जन्म देतात. बाहेर तुंबळ युद्ध चालुये. युद्ध का? ते आपल्याला जॉर-एल आणि ग्रहाचे प्रतिनिधी (त्यांची संसद म्हणा हवेतर) यांच्या संवादावरून कळते. जॉर-एल हा ग्रहाचा प्रमुख शास्त्रज्ञ असतो. आणि संसदेसमोर कळकळीने विनंती करत असतो की ग्रहाच्या गाभ्याचा उर्जानिर्मिती साठी वापर केल्यामुळे तो कोसळत आहे आणि लवकरच क्रिप्टॉन नष्ट होइल. हा अटळ संहारातून क्रिप्टॉन चे बीज वाचवण्यासाठी ग्रहाच्या जीवांच्या निर्मितीची कोडेक्स दूर अंतराळात पाठवून द्यावी. त्याच्या या प्रयत्नांना दाद मिळत नाहीये आणि तेवढ्यात संसदेविरुद्ध बंड पुकारलेला ग्रहाचा लष्करप्रमुख जनरल झॉड (मायकेल शेनोन) तिथे येतो आणि परिस्थितीचा ताबा घेतो. बंड याच कारणासाठी की मुर्ख संसदेने अविचारी निर्णयांनी ग्रहाची वाट लावलीये. (प्रगत झाले म्हणून काय झाले? लोकप्रतिनिधी सगळीकडे सारखेच) पण ग्रहाच्या समूळ नाशाची समीप आलेली वेळ त्यालाही मान्य नसते. अशात जॉर-एल कडे कोडेक्स चोरून नेण्याशिवाय पर्याय नसतो.

        क्रिप्टॉन च्या इतिहासात कितीतरी वर्षांनी नैसर्गिकरीत्या जन्मलेल्या आपल्या बाळाच्या शरीरात हे कोडेक्स सामावून देवून त्याला जॉर-एल आणि लारा दूर पृथ्वीकडे पाठवतात. आपल्या बाळाला पृथ्वीवासी बहिष्कृत करतील किंवा मारून टाकतील या आईच्या भीतीला जॉर-एल असे सांगून शमवतो की पृथ्वीवर हे बाळ देवाप्रमाणे वागवले जाईल. त्यांनी जड अंतकरणाने यानाला निरोप दिल्या दिल्या झॉड तिथे पोहोचतो. आपल्या एके काळाच्या मित्राला जॉर-एलला क्रिप्टॉनची सर्वात महत्वाची वस्तू गमावल्याबद्दल देहदंड देतो. तेवढ्यात संसद बंडखोरांना पकडते आणि झॉडसहित त्यांना अंतराळातल्या तुरुंगात (फ्यान्टम सेल) मध्ये पाठवतात. अतिथंड करून दिर्घनिद्रेत (Cryogenic freeze hibernation)[२] गेलेले हे योद्धे जॉर-एल च्या भाकिताप्रमाणे क्रिप्टॉन चा सर्वनाश होतो त्यावेळी अंतराळात कैद असल्यामुळे वाचतात आणि मुक्त होतात.

        इकडे हे गुणी बाळ पृथ्वीवर आदळते आणि मार्था व जोनाथन केंट यांच्या शेतात त्यांना सापडते. स्वत: निपुत्रिक असलेले हे जोडपे या बाळाचे क्लार्क हे नामकरण करून आपल्या मुलाप्रमाणे वाढवते. इथे क्लार्क ते सुपरमॅन हा प्रवास सलग न दाखवता तरूण झालेल्या आणि स्वत:चे अस्तित्व शोधणाऱ्या ३३ वर्षाच्या क्लार्कच्या विचारांमधून उलगडण्यात आलाय. क्लार्क ओळख बदलून अलास्का मध्ये भटकतोय. लोकांना आपल्या असीम शक्तीचे दर्शन चुकून घडले की तिथून पळ काढायचा हा त्याच्या नित्य उद्योग. आपल्या पृथ्वीवरच्या बापाला वचन दिल्याप्रमाणे तो उपरा आहे हे त्याला कोणालाही कळून द्यायचे नाही. त्याच्या या शोधादरम्यान त्याला आर्क्टिक प्रदेशात अमेरिकन सेनेची मोहीम सापडते. नासाला तिथे एक पाणबुडीसदृश वस्तू बर्फाच्या थराखाली सापडलीये. ही घटना टिपायला पुलित्झर विजेती पत्रकार लॉईस लेन (एमी अॅडम्स) आली आहे. ही बर्फातली वस्तू एखादी शीतयुद्धादरम्यान वाट चुकलेली सोविएट पाणबुडी असावी अशी सुरवातीला शास्त्रज्ञांना शंका असते. अधिक विश्लेषणानंतर असे लक्षात येते की तिच्याभोवातालाचा बर्फ २० हजार वर्षांपेक्षा जुना आहे. तिथेच या वस्तूचे गूढ वाढते. क्लार्क रात्री या वस्तूकडे निघतो. डोळ्यातले लेसर वापरून हा आदिम बर्फ फोडून तो तिच्यापर्यंत पोहोचतो.

        ही वस्तू खरेतर क्रिप्टॉन कडून आलेले एक यान आहे. हजारो वर्षापूर्वी त्यांच्यासारखी सजीव सृष्टी शोधार्थ पाठवलेल्या मोहिमांपैकी एक. आत प्रवेश केल्यावर क्लार्क आपल्या वडिलांनी त्याच्या यानात ठेवलेली वस्तू वापरून यानात चेतना निर्माण करतो. इथे त्याला आपल्या खऱ्या पित्याचे - जॉर-एल चे प्रतिबिंब दिसते. मरताना जॉर-एलने आपले विचार, चेतना या यांनांमध्ये अपलोड केलेल्या असतात. तो क्लार्कला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. क्रिप्टॉन चा हजारो वर्षांचा इतिहास त्याच्यासमोर उलगडतो. क्रिप्टॉनचे बीज वाचवण्यासाठी क्लार्कचीच निवड का केली या त्याच्या प्रश्नावर जॉर-एल सांगतो की क्रिप्टॉन वर जीवांचा जन्म हा विधिलिखित नसून कृत्रिम केला गेला होता. कोण डॉक्टर कोण इंजिनियर, कोण पुढारी आणि कोण सैनिक हे आधीच ठरवले जात होते. त्यामुळे त्यांच्या संस्कृतीत दैवाचा भाग न उरून प्रगतीही ठराविक पद्धतीने होत गेली. जीवांची विचारप्रक्रिया पण बांधली गेली. जॉर-एल आणि लारा चा मुलगा काल-एल/क्लार्क हा शतकानुशतके चाललेल्या प्रथेला न जुमानता नैसर्गिक पद्धतीने जन्मला होता. स्वतंत्र विचार आणि तर्क अधिक भावनाधारीत सारासार बुद्धी हे त्याच्याच ठायी असणार होते. या विधानाची प्रचीती आपल्याला नंतर झॉड आणि क्लार्क च्या संवादातून येते. झॉड हा हाडाचा सैनिक असतो क्रिप्टॉन चे रक्षण आणि निर्माण करण्यासाठी बनवलेल्या त्याला, त्याच्या कर्तव्यापुढे कुठलीही गोष्ट नसते. मग ती मानवांचा संपूर्ण संहार का असेना.

        क्लार्क यानात जाताना त्याच्यामागोमाग आलेली लॉईस यानाच्या यांत्रिक रक्षकाकडून जखमी होते. क्लार्क तिला वाचवतो, सुरक्षित ठिकाणी पोहचोवतो आणि यान तिथून अज्ञात ठिकाणी नेवून पार्क करतो. आपली ही नवीन ओळख घेवून तो कान्सास मधल्या घरी- आई मार्था कडे परत येतो. इकडे आर्क्टिक मधल्या घटनेवर पेंटॅगॉन नेहमीप्रमाणे पांघरून घालते. पण लॉईस या अनुभवला विसरायला तयार नसते. आणि तिच्या वृत्तपत्राचा संपादक तिच्या या परग्रहजीवाच्या कथेला छापायला तयार नसतो. ती स्वत: क्लार्क चा माग काढत काढत त्याच्या आई पर्यंत पोहोचते जिथे तिला क्लार्कविषयी सत्य कळते. क्लार्क ने आपली ओळख जगापासून लपवावी म्हणून त्याच्या मानव वडीलांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिलेली असते. हे समजल्यावर लॉईस क्लार्कविषयी संपूर्ण मौन बाळगण्याचे ठरवते. आणि आपल्या मित्राकरवी इंटरनेट वर मुद्दामहून प्रसिद्ध केलेल्या परग्रहजीवांच्या बातमीला नाकारते.

        या घटनेनंतर काही काळातच झॉड आणि त्याचे सैनिक पृथ्वीकडे प्रयाण करतात. क्लार्क ने सुरु केलेल्या यानातून त्यांच्याकडे सिग्नल्स गेलेले असतात. क्लार्कच्या शरीरातले कोडेक्स वापरून पृथ्वीवर क्रिप्टॉन चे निर्माण करायचे आणि मानवजातीला साफ करून फक्त क्रिप्टॉनियंस पैदा करायचे हा त्याचा हेतू असतो. पृथ्वीच्या सूर्याच्या किरणांनी क्लार्क एवढंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त बळ आलेले झॉड चे सैनिक, पृथ्वीची आर्मी (म्हणजे अमेरिकेची आर्मी) आणि सुपरमॅन यांच्यात संघर्ष होतो. पृथ्वीमाईचा विध्वंस टाळण्यासाठी क्लार्कला आपल्या उरल्यासुरल्या बांधवांची आहुती द्यावी लागते. आपल्या पित्याला अपेक्षित असलेली निर्णयक्षमता तो तिथे दाखवतो.
एखाद्या साय-फाय पहिल्यांदा पाहणाऱ्या पोर्यालाच या भागातला विध्वंस आवडेल. आम्ही तर बाबा गाड्यांचे पिचकणे, गगनचुंबी इमारतींचे पडणे, A10, C17, F35, ड्रोन्स चे कोसळणे हे लई वेळा बघितले असल्यामुळे त्यात काही नाविन्य नाही.

        जनरल झॉड चे संवाद, लॉईस चे बोलणे आहाहा.. मस्त. क्लार्क ची क्रिप्टॉनियन आई झालेली आयलेट झुरर ही इस्रायली अभिनेत्री भन्नाट दिसलीये. सुपरमॅन/ क्लार्क झालेला हेन्री कॅवील ची शरीरयष्टी खतरनाक जमून आलीये. अवघ्या जगातल्या मुलींचा सुस्कारा निघेल आणि सगळ्या पोरांना जेल्युसील घ्यावी लागेल अशी. पण मागल्या सुपरमॅन सारखाच तो अभिनेत्यापेक्षा मॉडेल म्हणून चांगला असे वाटते. (जेल्युसील इफेक्ट). या सर्व अभिनेत्यांना चांगले दाखवण्यात वेशभूषाकारांचे कसब. विझ्युअल इफेक्ट्स बरोबर वेशभूषेचे पण नॉमिनेशन तरी फ़िक्स आहे. हांस झिमर चे पार्श्वसंगीत अनुरूप. पण इंसेप्शन, डार्क नाईट सारखी मजा नाही. छायाचित्रण अप्रतिम आहे. 3D जमून आलंय. पण 3D नसता तरी काही फरक पडला नसता. लॉईस च्या डेली प्लॅनेट या पेपर मध्ये क्लार्क चित्रपटाच्या अगदी शेवटच्या मिनिटात जॉईन होतो. त्याला चश्म्यामध्येही लॉईस ओळखते हे पाहून माझ्या खांद्यावरचे एक ओझे उतरले.

        चित्रपट चालू होण्यापूर्वी ग्रॅविटी आणि पॅसिफिक रिम या हॉलीवूडच्या आगामी पिक्चर चे ट्रेलर पाहिले. पैकी जॉर्ज क्लूनी आणि सँड्रा बुलक चा ग्रॅविटी नक्की पाहावा असा आहे. पैसे वसूल थ्रीडी तर तिथेच होते.

        मॅन ऑफ स्टील ची विशेष गोष्ट म्हणजे पूर्ण पिक्चर मध्ये हिरोचा उल्लेख सुपरमॅन म्हणून फक्त दोनदा आणि मॅन ऑफ स्टील म्हणून तर एकदाही येत नाही. नोलनच तो..तुका म्हणे.
त्याच्या चाहत्यांसाठी न चुकवावा असा हा सिनेमा आहे.

_*_

[१] 
इथे शेल्डन चे विश्लेषण वाचाच.
Leonard: Uhmm..  If you don’t have any other plans, do you want to join us for Thai food and a Superman movie marathon?
Penny: A marathon?  Wow.  How many Superman movies are there?
Sheldon: You’re kidding, right?
Penny:Well.  I do like the one where Lois Lane falls from the helicopter and Superman swooshes down and catches her.  Which one was that?
Sheldon, Leonard and Howard:One.
Sheldon:You realize that scene was rife with scientific inaccuracy.
Penny:Yes.  I know.  Men can’t fly.
Sheldon:No, no.  Let’s assume that they can.  Lois Lane is falling, accelerating at an initial rate of 32 feet per second per second.  Superman swoops down to save her by reaching out two arms of steel.  Miss Lane, who is now traveling at approximately 120 miles per hour, hits them, and is immediately sliced into three equal pieces.
Leonard:Unless, Superman matches her speed and decelerates.
Sheldon: In what space sir?  In what space?  She’s two feet above the ground.  Frankly, if he really loved her, he’d let her hit the pavement.  It would be a more merciful death.

[२] 
च्यायला, मराठीमध्ये प्रतिशब्द काढणे किती अवघड आहे. खरेतर ज्या भाषेत ज्या शब्दांचे संशोधन झाले आहे, ते तसेच्या तसे वापरायला पाहिजेत. पण मग हा पोस्ट इंग्रजीतच टाकावा लागेल. मी माझ्या माहितीप्रमाणे प्रयत्न केला आहे. जाणकारांनी (ही पोस्ट वाचली तर) सुधारणा करावी.

Monday, April 29, 2013

Ladies And Gentlemen, For Your Consideration..One of my friend called on Sunday morning, said he wanted me to go along with him for a matrimonial get-together arranged by a social organization.

Usually, the idea of being at social gathering doesn't really stimulate me. But it was my friend and not I who was going to face the crowd there. Situations can be exciting when they are not actually happening to you or cannot affect you remotely. I warned him that he should call me only if he was absolutely sure that he didn't have anyone else to come along with him for I couldn't be put to any use when it comes to meeting people. He said it was okay and also tried to appease me by saying that he could use me as a decoy duck.

You can imagine the extent of my sacrifice when I say that I was dwelling under the breeze of full speed fan in chaddi-banyan, then I chose to leave the comfort zone of my home and went outside in burning 40+ degrees just to "help" my friend in distress. 

I went there at the event location. I became his "surrogate brother" for the 3 hours we spent in a not so cozy but well-ventilated hall.
There were at least 120 girls-boys (along with their parents/family) from all parts of Maharashtra who were currently stationed in Pune for a job.

The organizers were calling 4 girls and 2 boys at a time on stage and each of them had to loudly pronounce their name, education, job details, horoscope details, expectations of partner, registration number and contact number etc to the huge crowd of around 400 people.
Those who found the content suitable, would note down the registration ids/contact numbers to carry out a one on one later.

As a trusted ally, I played my part by taking careful notes on behalf of my friend who seemed bit nervous about the notion of going on the stage in front of this crowd and the subsequent likelihood of fainting there.

The whole idea of this business seemed ridiculous and quite offending at first (must be the effect of recently watched Django Unchained).But as I spent more time there, I realized that it is thousand times better than the traditional kande-pohe system.

1. In a day, one can go through at least 50 options. This would have otherwise taken so many weekends as well as blood and sweat of their parents.
2. Apart from the biodata, there are other things to see in one's potential partner e.g. the way they look, talk, their mannerisms etc. which are otherwise impossible to experience just from the things written on a biodata.
3. It's far more economical than individual visits at home which includes tolls like travelling costs, man hours of each family member, emotional debt, and also the kande-pohe-tea for the entire visiting team.
4. My friend separated out 5 profiles and met the girls and their family members there itself. Skeptical as he was initially, he later mentioned that it was a good decision to be a part of the event.

Kudos to the organizers of such events. Some things were not appropriate, like the on stage introductions in front of the huge crowd. But then, there is no perfect way to carry out these
matters. Apparently things are not as bad as they seem when you stop criticizing them and analyse them more rationally.

picture courtesy - the internet. Nothing personal. :)

Thursday, April 11, 2013

जॅन्गो अनचेन्ड - गुलामगिरीवरचा रागक्वेन्टीन टेरांटीनो चा मी अगदी निस्सीम चाहता आहे. त्याचे पिक्चर पहिल्या फ्रेम पासून गारूड करतात, त्याची कथा, समरसून काम करणारे नट मनावर अनंत अशी छाप टाकतात. त्याची पहिली ओळख अगदी ३-४ वर्षापूर्वीच झाली असली, तरी त्यातही दु:ख नाही. काही सिनेमांचा ठराविक समज गाठल्यावरच पूर्णपणे आस्वाद घेता येतो.[१] त्याचा २००९ सालचा इनग्लोरीयस बास्टर्डस बघितला, त्यानंतर पल्प फिक्शन आणि त्यानंतर रिझरवॉयर डॉग्स. किल बिल मी आधीही पहिला होता, पण तो टेरांटीनो आहे हे मला माहीत नव्हते. आणि आता त्याचा आहे म्हणून परत एकदा व्यवस्थित पहायचाय.

इनग्लोरीयस बास्टर्डस ने मला वेड लावले. या पिक्चर च्या पहिल्या २० मिनिटात ख्रिस्तोफ वॉल्टझ नावाच्या
ख्रिस्तोफ वॉल्टझ
विभूतीची अशी काही नशा आली की हा पिक्चर मी दोनदा थियेटर मध्ये आणि नंतर ख्रिस्तोफ वॉल्टझ च्या डायलॉग्स साठी कितीदा पाहिला असेल माहीत नाही. ख्रिस्तोफ वॉल्टझचा नंतर मी ग्रीन हॉर्नेट, वॉटर फॉर एलीफंटस याच कारणासाठी परत परत पाहिला.

यावेळेचे ऑस्कर्स जाहीर झाले तेव्हा ख्रिस्तोफ वॉल्टझ आणि टेरांटीनो जोडगोळीच्या जॅन्गो अनचेनड ला 2 विभागांमध्ये बाहुली मिळाली. या जॅन्गोची उत्सुकता तेव्हापासूनच लागून राहिली होती. मागच्या वीकांतात तिकिटे मिळवण्याचा असफल प्रयत्न झाला. त्या प्रयत्नापायी जी.आय.जो - रिटॅलीयेशन हा अतिशय भुक्कड पिच्चर पाहावा लागला. जी.आय.जो फ्रान्चायझी ची पूर्ण वाट लावायाची अस ठरवूनच हे असे पिक्चर काढतायेत.
शेवटी या सप्ताहात जेव्हा आमचे रिलीज दृष्टीपाथात आले तेव्हा आमच्या ऑफिसमध्ये मी आणि आणखी ५ दर्दी लोकांनी लवकर निघून ८.३० ला इ-स्केयर गाठले.

जॅन्गोची कथा घडते १८५८ साली. अमेरिकन सिविल वॉर सुरु होण्याअगोदर २ वर्षे. ५-६ काळ्या गुलामांना अमेरीकेचा दक्षिण प्रांत - टेक्सस मधून नेण्यात येतंय. वाळवंटातून, जंगलातून, दिवसाच्या कडक उन्हातून ते रात्रीच्या बोचऱ्या थंडीतून. पायात, हातात बेड्या असल्याने आणि त्या एकमेकांना जोडून असल्यामुळे पायाला मोठ्या जखमा झाल्यात. चाल विचित्र झालीये. तरीही त्यांच्या मागे पुढे घोड्यावरून येणाऱ्या बंदूकधारी गोऱ्यांच्या धाकामुळे यांची ही अनंत वाटचाल चालूच आहे.

या जथ्याला रात्री भेटतो डॉ.शुल्झ (ख्रिस्तोफ वॉल्टझ). त्याला त्या गुलामांमधून जॅन्गो (जेमी फॉक्स) हवाये. बंदूकधारी गोऱ्यांना न जुमानता जॅन्गोची चौकशी केल्यामुळे चिडलेला गोरा त्याच्यावर बंदूक रोखतो. इथे अगदी काऊबॉय स्टाईलने शुल्झ स्वत:च्या बंदुकीने गोर्याचे मस्तक उडवतो आणि त्याच्या भावाने हालचाल करेपर्यंत त्यालाही जखमी करतो. अशा अवचित झालेल्या प्रकारामुळे बिथरलेले काळे गुलाम हा प्रकार नुसताच बघत बसतात. शुल्झ जॅन्गोला त्याच्याबरोबर घेतो आणि बाकीच्या गुलामांना मुक्त करून सुधारणावादी उत्तरेकडे जायचा सल्ला देतो.

हा शुल्झ आहे कोण? आतापर्यंत हा कोणी गुलामांबद्दल सहानुभूती असलेला अवलिया आहे हे आपल्याला समजलेले असते. हा आहे एक बाउंटी हंटर. कायद्याला हवे असलेले पण पळून लपून बसलेले खुनी, दरोडेखोर मारायचे आणि त्यांच्या शीरावरचे बक्षीस मिळवायचे हा त्याचा धंदा. अशाच एका कामासाठी त्याला जॅन्गोची मदत हवी असते. जॅन्गोचे आधीचे मालक ही शुल्झ ची शिकार असते आणि त्यांना जॅन्गोने पाहिले असल्यामुळे तो त्याला याकामी सोबत घेतो.

शुल्झ मुळात एक जर्मन आहे. त्याच्या या शोधादरम्यान त्याला कळते की जॅन्गोची बायको त्याच्यापासून हिसकावून नेली गेलीये. तिचे नाव ब्रुमहिल्डा. हे जर्मन परीकथेतले नाव ऐकून आणि ब्रुमहिल्डाला जर्मन येते हे कळल्यावर शुल्झला जॅन्गोबद्दल सहानुभूती निर्माण होते. जॅन्गोही त्याला त्याच्या शिकारी पर्यंत घेवून जातो आणि त्याच्या आधीच्या मालकांना मारायला शुल्झची मदत करतो. का ते आपल्याला ब्रुमहिल्डा आणि जॅन्गोच्या भूतकाळात काय झालं त्यावरून कळते. हा भाग सलग नसून तुकड्या तुकड्यात फ्लॅशबॅक मध्ये दाखवलाय. अंगावर शहारे आणणारा अत्याचार गोर्यांकडून या दाम्पत्यावर झालाय. ही कमी अधिक प्रमाणात सर्वच काळ्या गुलामांची कहाणी आहे. पण जॅन्गो वेगळा कारण त्याने हा जुलूम स्वीकारलेला नाहीये. तो एक बंडखोर आहे. आणि शुल्झ सारखा साथीदार मिळाल्यावर त्याची आतली धग वणव्यासारखी पेटते.

शुल्झ त्याला आणखी मोहिमांमध्ये सहभागी करतो आणि त्याबदल्यात ब्रुमहिल्डाला शोधण्यात मदत करायचे आश्वासन देतो. आता ही जमलेली जोडी महापालिकेची गाडी मोकाट कुत्र्यांना जसे पकडते त्या स्टाईलने बऱ्याच पळपुट्या दरोडेखोरांना मारते.

त्या मोसमात बक्कळ कमाई केल्यावर दोघेजण मिसिसिपी प्रांतात ब्रुमहिल्डेला शोधायला येतात. त्यांना तिथे समजते की ब्रुमहिल्डा कुणा एका कॅल्विन कॅन्डी नावाच्या जमीनदाराला विकण्यात आलीये. आता तिला परत मिळवायचे म्हणजे एकतर विकत घ्यायचे वा युद्ध करून. बर विकत घ्यायचे झाले तर कॅन्डीला तिला विकत द्यायचे असेल तर. आणि नसेल तर सगळाच बट्ट्याबोळ. म्हणून शुल्झ एक शक्कल काढतो. कॅन्डी कडून ब्रुमहिल्डा सरळसरळ विकत घेण्याऐवजी त्याच्याकडून इतर गुलाम चढ्या भावाने घेवून त्याचा विश्वास मिळवला की मग ब्रुमहिल्डा सुमडीत मागायची. जॅन्गोला हा प्लॅन पटतो.

कॅन्डी (लिओनार्डो दकाप्रियो) हा धनाढ्य जमीनदार त्याच्याकडच्या धडधाकट गुलामांना ग्लॅडीएटर सारखे लढायला लावून त्यांच्यावर जुगार लावत असतो. अशाच एका लढतीदरम्यान शुल्झ, जॅन्गो त्याला भेटतात. त्याच्यासमोर भयानक पद्धतीने गुलामाची कत्तल केली जाते. कॅन्डीच्या कोठीकडे जाताना एका गुलामाला कॅन्डी आणि त्याचे गोरे नोकर शिकारी कुत्र्याच्या तावडीत देतात. जॅन्गो हे सगळे जड अंत:करणाने सहन करतो.

कॅन्डी च्या कोठीवर अनन्वित छळ होत  असलेल्या ब्रुमहिल्डेची आणि जेन्गोची भेट शुल्झ करवतो. हा भाग अतिशय सुंदर झालाय.
रात्री जेवताना शुल्झ, जॅन्गो एका गुलामाला १२ हजार डॉलर्स मध्ये विकत घेतात. खुश झालेला कॅन्डी ब्रुमहिल्डेला पण द्यायला तयार होईल असे वाटत असतानाच त्याचा धूर्त काळा गुलाम नोकर - स्टीफन (सॅम्यूएल जॅक्सन) त्याला सावध करतो आणि कॅन्डीला ब्रुमहिल्डा जॅन्गोची बायको आहे याची कुणकुण लागते. त्याच्या रागाचा पारा चढतो. राग या गोष्टीचा की एक जॅन्गोसारखा काळा गुलाम त्याच्या बायकोची मुक्तता करायला त्याच्यासारख्या जमीनदारापर्यंत पोचला. त्याने वर्षानुवर्षे चाललेली गुलामांची मर्यादा ओलांडली. त्याचे अंगरक्षक जॅन्गोला आणि शुल्झला लागलीच घेरतात आणि कॅन्डी शुल्झला काळ्यांपेक्षा गोरे श्रेष्ठ का, याबद्दल मोठी समज देतो. पण शेवटी धंदाच तो या न्यायाने, ब्रुमहिल्डेची मुक्तता शुल्झ कडून १२००० डॉलर्स घेवून करतो.

या सगळ्या घटनाक्रमात शुल्झला कॅन्डीची इतकी घृणा येते की तो त्याच्यावर गोळी झाडतो, शुल्झ लगेचच कॅन्डीच्या अंगरक्षकाकडून मारला जातो. आणि मग जॅन्गो कॅन्डीच्या अंगरक्षकांना कंठस्नान घालतो. पण शेवटी स्टीफन ब्रुमहिल्डेला पकडतो आणि जॅन्गोला शरण यावे लागते.

जॅन्गोला यातना देउन मारायचे म्हणून त्याला दगड खाणीत पाठवतात आणि ब्रुमहिल्डेला परत डांबण्यात येते. खाणीकडे जाताना जॅन्गो गोऱ्या रक्षकांना त्याच्याकडचे बाउंटी चे पत्रक दाखवून फसवतो आणि त्यांना मारून टाकतो. त्यांच्यापैकी एकाचा घोडा त्याची खोगीर आणि लगाम काढून टाकून स्वत:प्रमाणेच मुक्त करतो आणि कॅन्डीच्या कोठीकडे परत येतो. आपला मित्र - शुल्झ चे कलेवर शेवटचे बघून ब्रुमहिल्डेचे मुक्तीपत्र मिळवतो. तिथले उरलेले कॅन्डीचे अंगरक्षक, आणि त्याच्या कुटुंबाला संपवतो. डायनामाईटने कोठी उडवल्यावर ब्रुमहिल्डा आणि जॅन्गो स्वतंत्र आयुष्याची सुरुवात करायला उत्तरेकडे प्रयाण करतात आणि सिनेमा संपतो.

वर वर पाहिले तर जॅन्गो हा भरपूर रक्त मासाने बरबटलेला सिनेमा आहे. पण रक्त आणि अतिरंजित हिंसा हे टेरांटीनोच्या सिनेमाचे नेहमीचेच भाग. त्यात तो त्याला सांगायचीये ती कथा टाकतो. शुल्झ आणि जॅन्गो गोऱ्यांना टीपतानाची, गुलामांच्या छळाची दृश्ये अशीच आहेत. पण ती दाखवली नाहीत तर त्याची तीव्रताही लक्षात येणार नाही. स्वातंत्र्याची टिमकी मिरवणाऱ्या अमेरिकेत अशी अमानविय प्रथा जोपासली गेली होती हे आजच्या पिढीला सांगून खरे वाटणार नाही. मला आफ्रिकन अमेरिकन लोकांचा इतिहास जास्त माहिती नाही. पण हा सिनेमा त्याची ओळख करून देतो. अब्राहम लिंकन यांनी ती प्रथा मोडीस आणेपर्यंत कितीतरी गुलाम कुत्र्याची मौत मेले असतील.

एक प्रश्न मला पडला की शुल्झ हा जर्मन का?
१. ख्रिस्तोफ वॉल्टझ ला लक्षात घेवून टेरांटीनोने हे पात्र बनवले होते.
आणि त्याच्या जर्मन उच्चाराच्या पद्धतीला (accent) ला झाकण्यासाठी?
२. महायुद्धात जर्मनांनी केलेल्या ज्यूंच्या शिरकाणासारखी किंवा त्याहीपेक्षा भयंकर आणि एका जर्मनालाही त्याची घृणा वाटावी अशी पद्धत अमेरिकेत युद्धाच्या अगदी २०-३० वर्षे आधी अस्तित्वात होती, याच्यावर भर देण्यासाठी?

ख्रिस्तोफ वॉल्टझ ने नेहमी सारखीच कमाल केलीये. त्याचे संवाद म्हणजे एक पर्वणीच असते. टेरांटीनोने निव्वळ संवादांवर एक एक प्रसंग किती उत्कंठावर्धक करता येवू शकतो हे पुन्हा सिद्ध केलंय. लिओनार्डो, सॅम्यूएल जॅक्सन आणि वॉल्टझ च्या संवादात ती जादू आहे.
पिच्चर बघताना सतत जाणवते की टेरांटीनोला गुलामगिरीच्या घृणास्पद इतिहासाचा किती राग आलाय. वीडियो गेम सारखी दाखवलेली गोऱ्यांची कत्तल, KKK ची यथेच्छ केलेली थट्टा आणि त्यांना डायनामाईट ने उडवणे, अगदी गोऱ्या स्त्रीयांनाही बंदुकीने उडवणे, इतकच काय एका प्रसंगात टेरांटीनोने स्वताला डायनामाईट ने उडवलय. स्वत:वरचा राग दाखवण्यासाठी आणखी काय करणार?

माझ्या आजवरच्या माहिती प्रमाणे अमेरिकन सिविल वॉर चे एक कारण उत्तरेकडील गुलामगिरीविरोधी वारे दक्षिणेला मान्य नव्हते हे होते. त्याबद्दल आणखी माहिती वाचायला हवी.

पिक्चर पाहतानाच वाटत होते की त्यात दाखवलेले काही संदर्भ कालक्रमानुसार नाहीत. उ.दा. डायनामाईट चा वापर. डायनामाईटचा शोध एकोणिसाव्या शतकात साठच्या दशकात लागला. पिच्चर मधल्या काही बंदुका १८५८ ला अस्तित्वात नव्हत्या. टेरांटीनो सारख्या हुशार दिग्दर्शकाला हे लक्षात आले नसेल असे नाही, पण या गोष्टी पिक्चरबद्दल आणखी कुतूहल निर्माण करतात हे त्याला पक्के माहित असावे. असा हा नितांत सुंदर सिनेमा 'चुकवू नये असे काही' या प्रकारातला आहे.
-*-


1. Too much knowledge before your time does not make you wise,
    and some questions have answers that you may not like.
    - Russian Folklore.