नेत्रसुखद ग्रॅविटी




ग्रॅविटी पाहिला मागल्या आठवड्यात. त्याबद्दल लिहायचे अगदीच ठरवले नव्हते.याचे कारण म्हणजे या पिक्चरमध्ये फारसे लिहिण्यासारखे आहे असे मला वाटले नाही, त्यात अजून लडाख चा पोस्ट चाराण्याएवढा पण लिहून झाला नाहीये, आणि महत्त्वाचे म्हणजे गुगल ट्रांसलिटरेट वापरून ग्रॅविटी लिहायला इतर शब्दांपेक्षा थोडे जास्त कष्ट पडतात. तसे एकदा लिहिले की कॉपीपेस्ट करत सुटायचे.. पण आळसाला काहीही कारण पुरते.

मला ग्रॅविटी देखणा वाटला. पण तर्क लावायला फारशी संधी नसल्यानं जरा माठ टाईप चा वाटला. नंतर विकीशी बोलताना तिने सांगितले की अगदी बझ ऑल्ड्रीन (नील आर्मस्ट्रॉन्ग बरोबर चंद्रावर उतरलेला अंतराळवीर) पासून जेम्स क्यामेरून पर्यंत सगळ्यांनी या पिच्चर ची तोंडभरून स्तुती केलीये. त्यामुळे अचनाक मला ग्रॅविटी च्या थोरवीचा साक्षात्कार झाला. म्हणजे मी कुठे माठ वगैरे म्हटलो पिच्चरला? छे काहीतरीच राव, एवढा भारी पिच्चर.. वगैरे वगैरे. (You have never seen a hypocrite before? लेनर्ड TBBT S02E11.)

पिच्चर तसा एकपात्रीच. नाही एक मिनिट.. सँड्रा बुलक १, जॉर्ज क्लूनी २, तो एक भारतीय अंतराळवीर ३, आणि ह्युस्टन वरचा आवाज ४. अशी ४ पात्रं. पण सँड्रा बुलकच पूर्ण चित्रपटभर आहे. त्यामुळे तीच एकटी कथेचा गाभा आहे.

ग्रॅविटी एक अपघात, त्यानंतरच्या घटना आणि नायिकेचे त्यातून वाचणे म्हणजे थोडक्यात ज्याला आपण सर्वायवल मूवी म्हणतो तसा आहे.फक्त दीड तासाचा हा पिक्चर "चुकवू नये" या प्रकारात का जातो हे खाली वाचल्यावर ठरवा.

चित्रपटाची कथा: (Spoiler)

बऱ्याचशा सर्वायवल मूवीला जशी फार गुंतागुंतीची नसते, तशीच. चित्रपट सुरू होतो तेव्हा पडद्यावर अर्धा भाग अंतराळातून दिसणारी पृथ्वी असते. बाकीचा अर्धा भाग अनंत अवकाश. त्यातून हळूहळू आपल्याकडे येते 'एक्सप्लोरर'. नासाच्या स्पेस शटल प्रोग्राम मधलं एक यान. डॉ.रायन स्टोन (सँड्रा बुलक) ही मिशन स्पेशालिस्ट यानाबाहेर येवून हबल स्पेस टेलिस्कोप ची दुरुस्ती करतीये. तिच्याबरोबर बाहेर आहेत फ्लाईट स्पेशालिस्ट बशीर आणि मिशन कमांडर मॅट कोवाल्स्की (जॉर्ज क्लूनी).त्यांच्या संवादातून समजते की हबल च्या नेहमीच्याच सर्विस मिशन्स[१] पैकी ही एक मिशन आहे. बशीर त्याचा पहिलाच स्पेसवॉक[२] म्हणून जणू हर्षवायू झाल्यासारखा वागतोय आणि कोवाल्स्की आपल्या थ्रस्टर्स पॅकचा[३] वापर करून विनासायास
हबल ची सर्विसिंग
यानाभोवती घिरट्या घालतोय. त्या सर्वामध्ये आणि ह्युस्टन च्या मिशन कंट्रोल रूम मध्ये दुरुस्तीसंदर्भात रेडीयोवर बोलणी चाललीयेत. कोवाल्स्की ज्याप्रमाणे हास्यविनोद करतोय त्यावरून हे काम त्याने खुपदा केलंय आणि त्यात कुठल्याही प्रकारचा धोका किंवा येणाऱ्या संकटांची कुठलीही चाहूल त्याला असेल असे वाटत नाही.

असे हे चालले असताना ह्युस्टन कंट्रोल त्यांना काम अर्ध्यावरच सोडून यानात परत यायला सांगतात. ह्या अचानक आलेल्या सूचनेने गडबडलेले तिघे अंतराळवीर परत आत यायची तयारी करत असतानाच, तोफेच्या गोळ्यासारखे असंख्य तुकडे शटलवर येवून धडकतात. त्यात डॉ.रायनची यानाला बांधलेली दोरी तुटते आणि ती अवकाशात फेकली जाते. बशीरच्या हेल्मेटवर तुकडे आदळून तो मारला जातो तर कोवाल्स्की रायन ला वाचवताना यानापासून लांब जातो.

हे प्रलयंकारी तुकडे असतात एका रशियन उपग्रहाचे. रशियाने क्षेपणास्त्राने स्वत:चा उपग्रह त्याच्या कक्षेत अंतराळातच उडवलेला असतो आणि त्याची परिणीती म्हणून उपग्रहाच्या चिंधड्या उडून तो कचरा दुसऱ्या उपग्रहांना धडकून साखळी पद्धतीने फार विध्वंसक असा स्पेस डीब्री[४] त्या कक्षेत तयार झालाय. आणि तो बाकीच्या अंतराळयानांवर अस्त्रासारखा येवून आदळतोय. या स्पेस डीब्रीच्या मार्गात हबल आणि त्यामुळे स्पेस शटल एक्सप्लोरर आलय आणि दर नव्वद मिनिटांनी ते त्याची चाळण होईपर्यंत धडकत राहणार आहे.

महत्प्रयासाने अंतराळात भरकटलेल्या डॉ.रायनला कोवाल्स्की शटलपाशी आणतो. आता तिचा ऑक्सिजन चा साठापण संपत आलाय आणि शटल विदीर्ण झाल्यामुळे तिथे त्या दोघांना आसरा घेण्याजोगे काही नाही. आतला मिशन क्रू डीकम्प्रेषण मुळे मारला गेलाय आणि ह्युस्टन कंट्रोलशी संपर्क देखील होत नाहीये. अशा अवस्थेत १०० मैल लांब असलेल्या ISS - आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे जाण्याशिवाय दोघांकडे पर्याय नाहीये. कोवाल्स्कीच्या थ्रस्टर्स पॅक मध्ये उरलेले प्रोपेलंट वापरून दोघे ISS कडे निघतात खरे पण तिथे पोहोचता पोहोचता कोवाल्स्कीचे प्रोपेलंट संपते आणि रायन ला वाचवण्यासाठी तो स्वत: ISS पासून दूर जातो. मृत्यूच्या कवेत जातानाही सर्वात जास्त वेळेचे स्पेसवॉक चे रेकॉर्ड आपण तोडू असे म्हणत तो रायनला सांत्वना देतो आणि बेशुद्ध होण्याच्या जवळ गेलेल्या तिला यानात जाण्यासाठी रेडियोवरून सूचना देतो.

सोयुझ
ISS मध्ये पोहोचल्यावर देखील रायन चे दुर्दैव तिचा पिच्छा सोडत नाही. यानाच्या एका मोड्युल ला आग लागते आणि तिला सोयुझ[५] मध्ये आसरा घ्यावा लागतो. सोयुझ हे रशियन बनावटीचे यान अंतराळवीरांच्या पृथ्वी - ISS - पृथ्वी अशा आवागमनासाठी वापरतात. शटल ला धडकलेले उपग्रहांचे तुकडे इकडे ISS लाही धडकलेले असतातच. त्यामुळे परतीसाठी वापरायला असलेले हे सोयुझ त्याचे पॅराशूट आधीच उघडल्यामुळे निकामी झालेले असते. त्यामुळे रायन ला आता चीनच्या तियानगोंग या स्टेशन कडे प्रयाण करावे लागते. ती ISS मधून निघताना थोडक्यात वाचते कारण त्यानंतर लगेचच फुटलेल्या उपग्रहांचे तुकडे ISS ला धडकून त्याच्या चिंध्या उडवतात.

इकडे रायन कशीबशी आपल्या कक्षेतून ढळलेल्या तियानगोंग मध्ये पोहोचते. त्याच्या सोयुझ सदृश (इथे चीनच्या कॉपीकॅट पणाची उडवलीय) शेंझू या रीएन्ट्री मोड्युलमध्ये बसते. ती पृथ्वीवर पोहोचते का? मला नाही माहिती बाबा.

आता हा पिक्चर मला का आवडला?
१. विज्ञानपट खूप पाहिलेत. पण त्यातले बरेच भविष्यातले आहेत. सध्याच्या तंत्रज्ञानाला प्रमाण मानून बनवलेल्यापैकी हा सर्वोत्तम म्हणता येईल. नासाच्या शटल्स, त्याच्या कार्यपद्धती, स्पेसवॉक, ISS, सोयुझ एक नंबर आहेत. त्यांना दाखवताना ते डॉक्युमेंटरी दाखवतायेत एवढ्या डीटेल्स मध्ये दाखवलाय. इतर अवकाश पटांमध्ये कृत्रिम गुरुत्वाकर्षण कथेची आणि बजेटची गरज म्हणून निर्माण केलेले असते. या कृत्रिम गुरुत्वाकर्षणाला सोडून ISS मधले प्रसंग काय भन्नाट जमलेत ते बघाच.

२. उपग्रहांच्या तुकड्यांमुळे शटल आणि ISS च्या चिंध्या उडताना बॅकग्राउंडला अनंत निळी पृथ्वी आणि अवकाशात आवाज येत नाही म्हणून तो पूर्ण प्रसंग अगदी शांततेत दाखवलाय. ध्वनीशिवाय तो विनाश पाहताना नकळत आपल्याला मोठ्या कर्कश आवाजाची तीव्र गरज वाटायला लागते पण थियेटरमधून थोडासुद्धा आवाज होत नाही. अंतराळ म्हणजे काय याची ही झलक.

३. बऱ्याचशा संकल्पना प्रत्यक्षात पाहायला मिळाल्या आणि बऱ्याच नवीन कळल्या. त्यात थ्रस्टर्स पॅक चा वापर, स्पेसवॉक, यानात परत येण्यासाठीची पद्धत या गोष्टींचा उल्लेख करता येईल. लहान मुलांना हा पिच्चर दाखवला तर त्यांच्या डोक्यात एवढे प्रश्न तयार होतील की त्यांची उत्तरे शोधली तर अर्धेआधिक भौतिकशास्त्र शिकून होईल. निर्वातासाठी डीझाईन केलेली याने आणि गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ वापरले जाणारे सोयुझ ची कार्यपद्धती बघून धन्य धन्य होते.

४. सँड्रा बुलकचा अप्रतिम अभिनय. सोयुझमध्ये जगण्याची आशा सोडलेली आणि त्याही परिस्थितीवर मात करून धडपडणारी रायन तिने मस्त साकारलिये. या वयातपण काय खतरनाक फिट आहे ती.

५. विझ्युअल इफेक्टस् ढीन्कचाक जमलेत. अरे अंतराळ अंतराळ काय असते ते बघा म्हणाव सगळ्यांना.
ISS मध्ये एन्ट्री मारल्यावर नायिका आईच्या गर्भात जणू पहुडलीये अशा तऱ्हेने चित्रण केलंय. जाम भारी कल्पना आहे.

असा हा माहितीपूर्ण आणि उत्कंठा वाढवणारा पण तर्क चालवण्यासाठी कमी वाव असलेला (तर्क नसणारा नाही.) पिक्चर पैसे वसूल थ्रीडी मध्ये आहे. पुण्यात असाल तर पी.वी.आर. लाच पहा. त्यांचे थ्रीडी पुण्याततरी सर्वोत्तम आहे असे ऐकून आहे.
_*_

[१] हबल स्पेस टेलिस्कोप १९९० साली नासाने अंतराळात पाठवला. या टेलिस्कोपच्या भिंगांमध्ये असलेल्या दोषांमुळे सुरुवातीची छायाचित्रे पुसट यायची. त्यामुळे नासावर फसलेल्या प्रकल्पावर कोट्यावधी डॉलर्स उधळल्याची टीका झाली होती. हे दोष काढण्यासाठी नासाने सर्विसिंग मिशन्स राबवल्या. ज्यात अंतराळवीरांनी अवकाशातच हबलमध्ये नवीन भिंग बसवले. ही मोहीम यशस्वी झाल्यावर हबल चे वेळोवेळी आधुनिकीकरण करण्यासाठी आतापर्यंत अशा ५ (शेवटची २००९ ला) मिशन्स धाडण्यात आल्यात.

[२] प्रेशर सुटस घालून अंतराळयानाच्या बाहेर येवून दुरुस्ती, संशोधन यासारखी कामे करणे म्हणजे स्पेसवॉक. च्यामायला ते प्रेशर सुटस चे सील्स कसे असतील देव जाणे. एकतर मनगटात, कोपरात, गुडघ्यात त्यांना फिरता येण्याजोगे करायचे असते आणि बाहेर जवळ जवळ निर्वात.

[३] फक्त १९८५ साली थ्रस्टर्स पॅक चा वापर झाला होता. हे वापरले तर यानाला दोरी न बांधता अंतराळवीर यानापासून काही अंतरावर जावू शकतात.

[४] Space Debris. याचा उच्चार डीब्री असा करतात हे पिच्चर पाहताना कळले.
निकामी झालेले उपग्रह, अयशस्वी झालेल्या मिशन्स चे भाग, यानापासून चुकून वेगळे झालेले पार्टस अशांचे मिळून तयार झालेला अवकाशीय कचरा. पिच्चर मध्ये दाखवल्याप्रमाणे तो धोकादायक आहे. पण बऱ्याच उपग्रहांच्या कक्षा एकाच प्रतलात असतील याची शक्यता कमीच. तीच गोष्ट ISS, हबल, तियानगोंग हे एकाच दिवसात एकाच Space Debris ने उडवले जाण्याची.

[५] सोयुझ -१९६० सालापासून नासाचा शटल प्रोग्राम रिटायर्ड झाला तरी वापरात असलेले रशियाचे भरवशाचे अंतराळ यान. नासाच्या चॅलेंजर, डिस्कवरी, एंडेवर, कोलंबिया, अॅटलांटीस् या स्पेस् शटल्स प्रमाणे याचा पुनर्वापर होत नाही. स्पेस शटल्स प्रोग्राम थांबल्यानंतर ISS च्या मिशन्स साठी अंतराळवीरांचे बरेच आवागमन याच यानांतून होत आहे. चीनचे शेंझू याच यानासारखे आहे. पिच्चर मध्ये सोयुझ आणि शेंझू चे लँन्डींग प्रोटोकोल्स सारखे असल्याचे दाखवलय. चीनचा काय आपला पण स्पेस प्रोग्राम रशियाच्या डिझाइंस वरून 'इन्स्पायर्ड' आहे असा पाश्चात्यांचा समज आहे. असेलही.

चित्रे आंतरजालावरून साभार.
माहितीचा स्रोत : वाचन, तर्क आणि प्रिय विकी.

टिप्पण्या

  1. Aayla, bhari aahe re movie. Mla pan pahavasa wattoy. Pan ithe available nahiye. :-(
    But you described it well. Almost felt like watching it on screen. :-) Great ! :-)

    उत्तर द्याहटवा
  2. आशिष, मस्त लिहिलंयस चित्रपटाचं समीक्षण !! अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर चित्रपट नक्कीच चांगला आहे, पण अगदी थक्क वगैरे करणारा वाटला नाही! (त्याचं मुख्य कारण म्हणजे you tube वर फार आधीच पाहिलेले space shuttle चे videos: उदाहरणार्थ : http://youtu.be/hyn1We0wOT8 हा एक मला आवडलेला video आहे) अर्थात त्यामुळे चित्रपटाचं महत्व कुठेच कमी होत नाही... उत्तम चित्रीकरण केलंय ! काल आम्ही हा चित्रपट पाहिला (3D अर्थात!) आणि आज तुझं समीक्षण वाचलं ! एक नंबर! खरंच मला प्रकर्षाने जाणवलं कि तू खूप गांभीर्याने चित्रपट बघून अभ्यासपूर्वक बारकावे गोळा करतोस... नाहीतर <[अ] रशियाने क्षेपणास्त्राने स्वत:चा उपग्रह त्याच्या कक्षेत अंतराळातच उडवलेला असतो आणि त्याची परिणीती म्हणून उपग्रहाच्या चिंधड्या उडून तो कचरा दुसऱ्या उपग्रहांना धडकून साखळी पद्धतीने फार विध्वंसक असा स्पेस डीब्री[४] त्या कक्षेत तयार झालाय, किंवा [ब] आतला मिशन क्रू डीकम्प्रेषण मुळे मारला गेलाय > इतके बारकावे चित्रपट पाहतांना नक्कीच गळून जातात (निदान माझ्यासारख्या प्रेक्षकाकडून तरी!) आणखिन खाली १, ३, ५ मधे दिलेले संदर्भ अप्रतिम ! लई भारी ! बाकी कोणी विचारलं कि हा सिनेमा पाहण्यासारखा आहे का? तर उत्तर आहे कि हो नक्कीच तो चांगला सिनेमा जरूर पहावा असाच आहे!! :-)

    उत्तर द्याहटवा
  3. अमोल, निखिल,
    थँक्स रे मित्रांनो.

    निखिल,
    इंसेप्षन सारख्या पिक्चरनी वाईट खोड लावलीये बारकावे तपासत बसायची. त्यामुळे एखाद्या पिक्चरमध्ये डोके चालवायला वाव नसेल तर वेळ फुकट गेल्याची भावना होते.
    काल-परवा 'थॉर-द डार्क वर्ल्ड' पाहून पण तसेच वाटले. असून असून कॉमिक्सपटच तो, त्यात लॉजिक ते किती.. पण आधीच्या मार्वल कॉमिक्स मूवीस ने अपेक्षा उंचावून ठेवल्यामुळे हा फिका पडतो.
    बाकी मी जे काय लिहितो त्याला समीक्षण म्हणणे आता समज वाढल्यामुळे जीवावर येते. खरेतर पिक्चर मध्ये मला काय समजले हे लिहिणे आणि त्याच्यावर "माझी लाल, दॅटस् ऑल" अशी फिलिंग करून घेणे हा मुख्य उद्देश.

    आणखी टाईमस्टँम्प महत्वाचा. आता मला काय वाटत आहे, हे या लेखांतून फोटो काढल्यासारखे संग्रहित होते. बाकी जनहित वगैरे अशा गोष्टी अपेक्षित नाहीत. त्यामुळे केलेल्या इज्जतअफजाईका शुक्रिया. :)

    उत्तर द्याहटवा
  4. आशिष "मेरा जुता है जपानी .." ह्या गाण्याचा उल्लेख देखील केला नाहीस तू. बाकी मस्तच

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. खरेतर हे बशीरचे गुणगुणणे मी मिस केले. नंतर मित्राने सांगितले.
      हेमचंद्र, मालिकांची वाट पाहतोय. नेहमीप्रमाणे तुम्ही डाऊनलोड केलीच असतील अशी अपेक्षा.:)

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्रायासाठी अनेक आभार!

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक