Thursday, July 26, 2012

डार्क नाईट राईजेस


मागच्या शानिवारी 'डार्क नाईट राईजेस' बघितला. नोलन च्या सिनेमांकडून जी अपेक्षा असते ती खचितच पूर्ण झाली.
आपलासिनेमास्कोप वर याचे गणेश मतकरींचे सुंदर परीक्षण आहे.
त्यावर ही माझी प्रतिक्रिया इथे परत टाकतोय..
------------------------------------------

सही परीक्षण.

>>"सुपरहिरोपट हे पहिल्या चित्रपटात हिरोच्या ओरिजिन विषयी सांगतात पण त्यानंतरचा भाग केवळ एकामागून एक येणा-या साहसांना दिलेला असतो."

उलट मला वाटते की पहिला भाग रोचक करणे दुसऱ्या व तिसऱ्या भागाच्या मानाने सोपे असते. हिरोचे इवोल्युषण दाखवण्याचे ठराविक पॅटर्न दिसतात. या पॅटर्नशी प्रामाणिक राहिले तर हमखास यश.
दुसरा, तिसरा भाग म्हणजे खूप विचार करून बनवलेली कथा असते. दुसरा भाग सरस असतो याच्याशी पूर्ण सहमत.

नोलन चा बॅटमॅन पण त्यातलाच. त्याला वेगळे करतात ते त्याचे विलन आणि त्याचे मर्त्य असणे, त्याच्या मानवी चुका आणि त्यातून घडत जाणे. सुपरहिरोंचे सिनेमे पाहून 'मलाही अशा पॉवर्स असत्या तर' हा फील नोलन चा बॅटमॅनला पाहून कधी येत नाही. आणि या सिनेमात तर चक्क अंगावर काटा येण्याइतपत मारलंय हिरोला.

नोलन चे आणखी एका बाबतीत कौतुक वाटते की कथा वास्तववादी असूनही, मूळ बॅटमॅन कॉमिक्स मधल्या पात्रांशी त्याने इमान ठेवलय. बेन, तालीया, रा'झ अल घुल[१] यांचे संदर्भ जुळवलेत.

>>"आणि जोधपूरमधली विहीर गॉथमजवळ नक्की कुठे असावी हा दुय्यम प्रश्न, ज्याचं उत्तर मी काही देऊ शकणार नाही"

ही विहीर गॉथमजवळ नसून मध्यपूर्वेत अपेक्षित आहे. रा'झ अल घुल हा स्वतः एक भाडोत्री सैनिक (mercenary) म्हणून तिथल्या देशात असतो असा उल्लेख आहे.[१]
कॉमिक्स मध्ये बेन कॅरीबियंस मध्ये कारावासात असतो.[१] त्यामुळे मध्यपूर्व किंवा कॅरीबियंस असा निष्कर्ष काढू शकतो.
या चित्रपटाची सर्वात बळकट बाजू म्हणजे हा विहीरवजा कारावास. त्याबद्दल थोडे लिहायला हवे होते. कदाचित त्याबद्दल लिहिले तर तो स्वतःच एक मोठा पोस्ट होईल.

आणखी एक निरीक्षण-
निम्म्याच्या वर इंसेप्षण - डार्क नाईट कास्ट कॉमन आहे.
टॉम हार्डी - इम्स - बेन.
जोसेफ गॉर्डन लेवीट - आर्थर - जॉन ब्लेक (रॉबिन).
मावियोन कोटीया - माल - मिरांडा टेट (तालीया झ अल घुल)
मायकेल केन - स्टीफन माईल्स - आल्फ्रेड पेनीवर्थ
सिलीयन मर्फी - रॉबर्ट फिशर - जोनाथन क्रेन (स्केअरक्रो)

कॅटवूमन - अॅन हॅथवे नसती तरी चालले असते. कदाचित कॉमिक्समधली जास्तीत जास्त पात्र यावीत असा विचार असावा.
तिचे आणि ब्रूस वेनचे संवाद वीट आणतात.

[१]संदर्भ-विकी.

Saturday, July 14, 2012

संस्मरणीय जून - २

संस्मरणीय जून - १ वरून पुढे.
माथेरान

अगदी अवचीत जूनच्या दुसऱ्या आठवड्यात गेलो इथे शनिवारी. सोबत ३ उझबेक, एक इरिट्रिया (पूर्व आफ्रिका, इथिओपिया च्या जवळ) ची मुलगी, आणि प्रवीण.
आम्हाला वासरात लंगडी गाय रशियन माहित असल्याने त्यांच्या सोबत एका कार्यक्रमाचे आमंत्रण होते तिथल्या एका शाळेत. यांचे अनुभव ऐकणे, हास्यविनोद, घोड्यावरची रपेट, माथेरानचा धो धो पाउस यात हा प्रवास मस्त झाला.

भुसावळ
हेमचंद्रांचे लग्न होते इथे जूनच्या तिसऱ्या आठवड्यात. पुणे भुसावळ हा जवळपास ५०० किमी चा प्रवास आम्ही (सुमित, निखिल, मुस्तफा, कुणाल) स्लीपर बसने केला. येता-जाता दोन्ही वेळी रात्रीचा प्रवास, मोठी बेड आणि बसही आरामदायक असल्याने गप्पाष्टकांना उधान. बेन्डीचे लग्न पण सुंदर झाले. लग्नावारून येवून लगेच माझ्या क्यामेर्यातल्या फोटो आणि विडीओचे संकलन करून मी एक छानशी क्लिप बनवून सगळ्या मित्रांना शेयर केली.
लग्नात बेन्डीला नाव घ्यायला सांगितले तर गडी लगेच तयार झाला. म्हंजे नक्कीच तयारी करून आला असेल या समजुतीने आम्ही कान टवकारले तर बेंडीने हे नाव घेतले-

"वाटीत वाटी स्टील ची वाटी
वाटीत वाटी स्टील ची वाटी,
अर्चनाचे नाव घेतो धरून तिची अंगठी"

जमलं नाही जमलं नाही म्हणून लगेच लोकांनी वहिनीकडे मोर्चा वळवला.

वहिनी-
"हळद लावते किंचित, कुंकू लावते ठसठशीत,
हेमंतराव माझे पूर्वसंचित"

"याला म्हणतात नाव, नाहीतर आपले बघा भांड्यांचे दुकान! म्हणे स्टीलची वाटी." - इति सुमित.
सगळीकडे हशा पिकला.

बदगी
आजीला परत घ्यायला गेलो (मागच्या पेट्रोलच्या पोस्ट मध्ये दुसऱ्या दिवशी सोडायला गेलो होतो). जूनचा चवथा आठवडा. बदगी हे पिंपरी पेंढार पासून साधारण १५ कि.मी. वर आळेफाटापासून २५ कि.मी. वर असलेले दुर्गम खेडे. तिथे पाळीव कुत्र्यांच्या गळ्यात काटेदार लोखंडी पट्टा घालतात. कारण-वाघाने धरू नये म्हणून.
माझी मावशी राहते तिथे. आणि आजीचे माहेरही हेच. तिथे मुक्कामी एस. टी. जाते. १-२ वर्षापूर्वी एकपदरी डांबरी मार्ग बांधला तिकडे जाणारा.मस्तच जागा आहे.. गावाला शहराची अवकळा नाही आली अजून.

मला इथे गाडी चालवायला लय म्हंजे लय आवडते. वळणावळणाचे रस्ते आणि सभोवताली शेते आणि डोंगर. सोबत आजी असली तर "ते आम्ही तिथे घळीत पाणी प्यायला जायचो, तिथे मला वाघ दिसला होता, कोण कुठला म्हातारबा तिकडं पडून गेला, माझी नणंद, भावजय अमकी तमकी तिथे राहायची, ते मळाबाईचे देऊळ, तो चारणबाबा-त्याच्यापुढे प्रसाद म्हणून तंबाकू ठेवतात" असले किस्से सांगत प्रवास घडतो. यावेळी सोबतीला रिमझिम पाऊसही होता.
टिंग्याचे शूटिंग याच परिसरात झालंय.

असा होता माझा फुल पॅक्ड जून. मजा केली एकंदर!

Wednesday, July 11, 2012

संस्मरणीय जून - १

हा महिना खूप प्रवास झाला. जवळ जवळ प्रत्येक विकांताला फिरत होतो. ताडोबा,
माथेरान, मावशीचे गाव बदगी आणि हेमचन्द्रांच्या लग्नासाठी भुसावळ.

ताडोबा
महिन्याची सुरुवातच धडाक्यात झाली.
जूनच्या १ तारखेला सकाळी आमची रेल्वे वर्धा स्टेशन ला लागली. ज्या जंगलाचा उल्लेख अगदी पहिली दुसरीपासून ऐकतोय, तिथे आम्ही आता ३ दिवस घालवणार याची जाम उत्सुकता होती. वाघ बघायचा हे तर मनात होतेच. पण कुठेतरी अपेक्षाभंगाची भीती होती. म्हणून मनाची तयारी केली की वाघ बघण्यासाठी नाही तर एक परिकथेतले वृक्षराजींनी भरलेले जंगल बघायला चाललोय.

मी, मुस्तफा आणि ऋषिकेश चा युवाशक्ती बरोबरचा पहिला प्रवास. आमच्या चोवीस जणांच्या ग्रुप होता. वयोगट अंदाजे १५ ते ७५. आमच्या बरोबर दोन अनुभवी लीडर्सही होते.
पहिला दिवस वर्धा ते ताडोबा हा प्रवास करण्यात आणि ताडोबाच्या बफर झोन मध्ये फिरण्यात गेला. ताडोबा हे आता 'ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प' म्हणून ओळखले जाते. आम्ही अंधारीत एका रिसोर्टमध्ये उतरलो होतो.
रात्री एकमेकांच्या ओळखी झाल्यावर आम्हाला लवकर उठायचे म्हणून लीडर्स ने सूचना दिल्या. विदर्भात मी पहिल्यांदाच आलो होतो, जाम गरम होत होते. त्यात आम्हा सर्व १४ मुलांना एकच छोटे डॉर्म दिले होते. (हा एवढा भाग सोडला तर बाकी सर्व व्यवस्था चोख होती). त्या रात्री नीट झोप नाही आली, पण सकाळी लवकर उठून जंगलामध्ये जाण्याच्या उत्सुकतेपोटी की उकाड्यामुळे माहीत नाही.

सकाळी ४ वाजता उठून, अंघोळ सोडून बाकीचे कार्यक्रम उरकल्यावर आमचे ६-६ जनांचे ग्रुप केले आणि जिप्सी मध्ये बसून प्रवास चालू झाला. कोअर झोन मध्ये शिरल्यावर साधारण २ किलोमीटर अंतरावर गव्यांचा कळप दिसला. अगदी राजबिंड जनावर! पण वाघापेक्षा आक्रमक.
यार या स्पीडने लिहीत राह्यलो तर हा पोस्ट काय छापून होणार नाही.. बास.. डीटेल्स नंतर.
रानगवा
१. ताडोबा अंधारी ६२५ स्क्वे.कि.मी. चा परिसर. आतली काही गावे आता पुनर्वसन करून इतरत्र हलवलीयेत.
२. व्याघ्र प्रकल्पात २ मोठी तळी आहेत.
३. वाघ, रानडुक्कर, हरीण, भेकर, बिबटे, रान कुत्रे, गवे, अस्वले, मगर इ. प्राणी आहेत. पैकी बिबटे सोडून सर्व प्राण्यांचे बऱ्याच जणांना दर्शन झाले. बरेच वाघ आहेत.
४. कधी न पाहिलेले पक्षी आहेत.
वाघाच्या पाउलखुणा. वाघाला एकदा खुल्या जंगलात फिरताना पाहाच. अन्नसाखळीत सर्वात वरच्या स्थानावर असल्यामुळे की देवदत्त सामर्थ्यामुळे आलेली ती बेफिकरी, तो माज, त्याची सम्राटाला लाजवेल अशी चाल.वाघ एवढा आयकॉनिक का, याचे उत्तर त्यात आहे. तो येतो म्हणून आसपासचा इतर कुठलाही प्राणी, पक्षी, माकडापासून हरणापर्यंत चीत्कार करतो. त्याची तास तास वाट पहावी, पशुपक्षांच्या मुजर्याने त्याच्या येण्याची नांदी व्हावी, समोरच्या झुडुपातून त्याची सोनेरी कांती झळकावी, आणि तो बाहेर आला की श्वास रोखून डोळ्यात ते ध्यान टिपावे. स्वर्ग स्वर्ग तो आणखी काय बाप्पा? Tadoba (Chandrapur MH) 1st-4th June.

आम्ही ३ तासांची एक अशा २ दिवसात सकाळ संध्याकाळ ४ फेऱ्या केल्या कोअर झोन मध्ये. आणि एक अनियोजित ट्रीप बफर झोन मध्ये निघायच्या दिवशी. उन चिक्कार होते आणि जंगलाचे रस्ते धुळीने माखलेले.
प्रत्येक फेरीत जंगलाच्या वेगवेगळ्या भागात जवळ जवळ ३० किलोमीटर ची रपेट होई आणि वाघ व इतर प्राणी यांचे विलोभनीय दर्शन झाले.
ताडोबाचा मुगुटमणी - शिवाजी. त्याची डरकाळी याची देही याची डोळा पाहिली/ ऐकली

येडाअण्णा च्या वाटेवर डोळे.

Two of the 18 months old quadruple. These 4 siblings haven't defined their area of dominance yet. They wander all over the forest as a unit. Sometimes enter into territories of "Yeda Anna" and "Shivaji". Once old enough they will part ways with each other and have to fight the survival battles. Tadoba (Chandrapur MH) 1st-4th June

ही ट्रीप म्हणजे माझ्या संस्मरणीय सहलीपैकी एक झाली यात शंका नाही कारण शीर्षासन निघाले. अरुणाचल-आसाम मध्ये काझीरंगा आणि तवांग ला फिरल्यावर मनी निश्चित केले कि मला आवडलेल्या ठिकाणी मी शीर्षासन करून फोटो काढून घेणार. तसे माझा अल्बम ने बाळसे धरायला सुरुवात केलीये. तवांग जवळ से ला पास, हम्पी आणि ताडोबा असे तीन शीर्षासन आलेले आहेत.