समूर्त रामकीर्ति मी, ज्ञात हें सुरासुरां
सध्या गीतरामायणाने पार येडं केलंय. माझ्या लॅपटॉप मध्ये खूप दिवासांपासून पडून होते, पण ऑफिसला जाताना बसमध्ये ऐकायला सुरुवात केली. अत्युच्च प्रतिभेचे साकार रूप ऐकून कधीकधी डोळ्यात पार पाणी येते. सर्व गाणी, चाल, अर्थ, शब्द अप्रतीम. त्यात कदाचित माझ्या सध्याच्या मूडला वीररसपूर्ण गाणी लैच आवडतायेत.
त्यात हे टायटल चे सीतेने रावणाला ठणकावणे-
नको करुंस वल्गना
रामाला वनवासाला धाडतायेत हे समजल्यावर लक्ष्मणाचा क्रोध डोळ्यासमोर आणणारे-
रामावीण राज्य पदी कोण बैसतो
विश्वामित्रांनी यज्ञरक्षणार्थ रामरायाला दशरथाकडे मागणे आणि त्राटिका वध-
ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा
मार ही त्राटिका रामचंद्रा
ही गाणी सारखी गुणगुणावीशी वाटतात.
तसेच मधुर चालींची आणि नीती सांगणारी ही पण,
रामाचे वालीला सांगणे-
वालीवध ना, खलनिर्दालन
युद्धाच्या पूर्वसंध्येला रावणाबरोबर द्वंद्व करण्याचे नसते साहस केलेल्या सुग्रीवाला रामाचे खडे बोल-
सुग्रीवा हे साहस असले
कुंभकर्णाने रावणाची केलेली निर्भत्सना आणि तरीही कर्तव्यपूर्तीसाठी तयार होणे-
लंकेवर काळ कठीण आज पातला
बाबुजी काय चीज आहे हे आता कुठे समजतंय. गीतरामायणातील सर्व ५६ गाणी त्यांनीच गायालीयेत.
कधी सीता, कधी लक्ष्मण, कधी भरत, कौसल्या, राम, कुंभकर्ण ही सर्व पात्र निव्वळ आवाजाच्या छटांवर अगदी डोळ्यासमोर येतात.
गदिमांच्या शब्दांविषयी काय बोलावे..
गीतरामायण म्हणजे माय मराठीतील अजरामर कलाकृती आहे. या २ प्रतिभावंतांनी आईचे पांग फेडले.
- चित्र विकिवरून.
गदिमांचे घर अजुनही वाकडेवाडी, पुणे येथे पाहायला मिळते. कधी जमले तर चक्कर टाकुन या.
उत्तर द्याहटवाबाकी गीतरामायणाबद्द्ल तुम्ही खरं म्हणालात, आईचे पांग फेडले.
- केपलरवासी
केपलरवासी,
उत्तर द्याहटवाप्रतिक्रियेबद्दल आणि माहितीसाठी खुप आभार!