केल्याने भाषांतर - २



केल्याने भाषांतर - १ च्या पुढे -

हनुमानाची श्रीरामावर अतूट श्रद्धा असण्यामागे काय कारण होते?

हनुमान वानरांमध्ये अतिशय बुद्धिमान, प्रामाणिक आणि बलशाली होता. त्यामुळे त्याच्या एवढा किंबहुना जास्त योग्य असा गुरु वा आदर्श त्याला त्याच्या बालपणी मिळाला नाही. रामायणात हनुमांचे दत्तक पिता केसरी यांचा क्वचित उल्लेख आढळतो. यावरून मारुतीला वडिलांचे फार मार्गदर्शन लाभले असे दिसत नाही. त्यामुळे आपल्या खर्या शक्तीची प्रचीती त्याला लहानपणी आली नसावी.

युवा मारुतीला आधी वाली आणि नंतर सुग्रीवाचे मार्गदर्शन मिळाले असावे. पण या दोघांपैकी कुणीही अतिशय प्रामाणिक आणि नैतिक अशा मारुतीवर प्रभाव पाडू शकला असावा असे वाटत नाही.

जेव्हा मारुती श्रीरामाला भेटला, त्याला आपण आयुष्यामध्ये काय शोधत होतो याची तत्क्षणी प्रचीती झाली. वानर जमातीला अयोध्येच्या साम्राज्याची कल्पना होती, पण या साम्राज्याचा सर्वेसर्वा इतका विनयशील असावा अशी त्यांनी कधी कल्पना केली नव्हती. श्रीरामामध्ये असलेली  दया, मृदुता, प्रामाणिकता आणि शौर्य मारुतीला आधी कोणातही दिसले नव्हते.

अशा जगामध्ये जिथे भाऊ भाऊ एकमेकांच्या जीवावर उठले होते आणि एक भाऊ दुसर्याच्या भार्येला बळजबरीने घेवून गेला होता (वाली-सुग्रीव), मारुतीला श्रीराम अचंबित करून गेला. ज्याने स्वखुशीने साम्राज्याचा त्याग केला, ज्याचे भाऊ त्याच्यावर अतिशय प्रेम करत होते अशा श्रीरामावर तो भाळला नसता तर नवल.
बहुपत्नीत्व समाजमान्य असताना आणि भावाची पत्नी (रोमा) देखील पळवून नेणाऱ्या वालीसारख्या राजा समोर असताना सीतेप्रती रामाची निष्ठा त्याच्यासाठी अगम्य होती.

अशा श्रीरामासाठी अशा रामराज्यासाठी मारुती त्याचे आयुष्य अर्पण करायला तयार झाला. राम हा मारुतीसाठी तोच महापुरुष होता ज्याचे मार्गदर्शन मिळण्याची जणू त्याने जीवनभर वाट पाहिली होती. श्रीरामाच्या रुपात त्याला ध्येय आणि प्रेरणा मिळाली.

जो कोणी भेटेल त्याची भक्ती आणि असीम निष्ठा मिळवेल असे गुण श्रीरामामध्ये होते. त्याच्या अशा गुणांमुळेच त्याचे तिन्ही भाऊ रामावर अतिशय प्रेम करायचे. रामाबरोबर येण्यासाठी लक्ष्मणाने सर्वस्वाचा त्याग केला. सीतेने रामासाठी वनवास भोगला आणि समाजाचे अन्याय सहन केले. भरतही रामाबरोबर वनात आला पण रामाचे शब्द शीरोधार्य मानून अयोध्येचे प्रशासन सांभाळले तेही राम परत येईपर्यंत अयोध्येत न येता. रामाची प्रजा देखील रामामागे वनात निघाली होती व रामाने समजूत काढली तेव्हाच परत गेली. एवढेच काय तर इतर वेळी उग्र असे विश्वामित्र पण रामासाठी मृदू व्हायचे.

थोडक्यात, राम हा असा महामानव होता जो प्रत्येक मनुष्यातले उत्तमोत्तम बाहेर आणायचा. यात आश्चर्य नाही की मारुतीला अशा मानवाबद्दल नैसर्गिक ओढ वाटली. हनुमानाची नम्रता आणि शुचिता रामाबरोबर एकरूप झाली. हनुमानाची निष्ठा रामच्या विनयात आणि श्रीरामाची निष्ठा मारुतीच्या विनम्रतेमध्ये विलीन झाली. दोन विनयशील, प्रामाणिक आणि कुशाग्र, पित्यास पारखे जीव एकमेकांना भेटले आणि अतूट झाले.
-
मूळ इंग्रजी लेखाचे मराठी स्वैर भाषांतर.
मूळ लेख - बालाजी विश्वनाथन, Quora.Com
https://www.quora.com/What-is-the-reason-behind-Hanumans-unwavering-affection-towards-Lord-Ram

_*_

टिप्पण्या

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक