मै और मेरी तन्हाई




हा लेख मराठी Quora.Com वर खालील प्रश्नाच्या उत्तरादाखल लिहिला होता. जमून आल्यामुळे इथे ब्लॉग वर सुद्धा पोस्ट करत आहे.

तुम्हाला जेव्हा एकट एकट वाटते तेव्हा तुम्ही काय करता?


या प्रश्नावर बाकीची उत्तरे बघितली पण तितकीशी पटली नाहीत.

"एकटे असणे" आणि "एकटे वाटणे" यात गफलत झालेली दिसते. काही लोकांना एकांत आवडतो आणि काहींना माणसांची वर्दळ. पण दोन्ही प्रकारच्या लोकांना माणसांचा सहवास लागतोच.

एकटे असणे म्हणजे आजूबाजूला सहवासासाठी कोणीच नसणे. पण अगदी माणसांच्या गर्दीत देखील एकटे "वाटू" शकते. ही भावना खरेच वेदनादायी असते. आपल्यासाठी कोणाकडे वेळ नाही, आपल्याला कोणीही समजून घेत नाही अथवा घेऊ शकत नाही ही भावना कधीही निर्माण होऊ शकते.

माझ्या अनुभवाप्रमाणे अशी भावना निर्माण होते त्यावेळी दोन शक्यता असू शकतात. एक म्हणजे खरोखर तुम्ही एकटे पडला आहात. म्हणजे नातेवाईक, मित्र यांच्यापासून दुरावा निर्माण झाला आहे. दुसरी शक्यता म्हणजे ही मनाची एक तात्पुरती अवस्था आहे.

लहान असताना या तात्पुरत्या अवस्थेचा खूप त्रास व्हायचा. मित्र, भावंडं, कुटुंबीय सर्व जण असूनही मला एकटे वाटतंय याचे कारण बहुधा मीच असणार असा विचार करून आणखीनच उदास वाटायचे. आता चारदोन पावसाळे जास्त बघितल्यावर या एकटेपणाच्या भावनेचा पहिल्यासारखा त्रास होत नाही. याचे कारण म्हणजे मी स्वतःला समजावतो की जसे काही दिवस मला अकारण खुप आनंदी, सकारात्मक वाटते तसेच काही दिवस अकारण निराश देखील वाटू शकते. यात भावनांची जास्त चिरफाड करण्याची गरज नाही. ही नकारात्मक भावना कोणत्या गोष्टीमुळे तयार झाली याची दखल जरूर घेतो. याचे कारण म्हणजे या भावना का तयार होतात हे समजून घेणे महत्त्वाचे. त्यापासून शिकणे महत्वाचे.

जाणीवपूर्वक नियंत्रण


हे भावनांचे हिंदोळे जर तहहयात चालू असणारच आहेत, तर या गोष्टीकडे तटस्थपणे बघण्याची कुवत यायला हवी. हे हिंदोळे काही साध्या उपयांनीदेखील नियंत्रित करता येतात. उदाहरण म्हणजे रोज एकाच वेळी उठणे, चांगली न्याहारी करणे. अर्थात प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक स्थितीवरून काय उपाय लागू होतील हे सांगता येणे अवघड आहे. आणि म्हणूनच स्वतः स्वतःच्या शरीराचे आणि मनाचे निरीक्षण करणे महत्वाचे. कधी तज्ञांचा सल्ला देखील घ्यावा लागेल पण हा उपाय आपल्या समाजात एवढा प्रचलित नाही. पण नैराश्याच्या गर्तेत जाण्यापेक्षा आधीच तज्ज्ञांकडे दाखवल्यास फायदाच होईल. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक प्रकृती जशी वेगळी असते, तशीच मानसिक प्रकृती देखील वेगळी असते. काही लोक नकारात्मक भावनांना जास्त संवेदनशील असतात, तर काही त्या नियंत्रित पद्धतीने हाताळू शकतात. ज्यांच्यात हा गुण वरचढ आहे त्यांना कदाचित या प्रश्नाचे प्रयोजन देखील समजणार नाही.

आत्मकेंद्रितपणा सोडणे

दुसरा उपाय म्हणजे हे समजून घेणे की अशा भावना येणारा मी जगातला एकटाच व्यक्ती नाही. सर्वसाधारण पणे सर्व मानवांना सकारात्मक, नकारात्मक भावना येत असतात. मी कोणी विशेष व्यक्ती नाही की फक्त मलाच दुःख भोगण्यासाठी निवडले आहे. त्याप्रमाणेच चारचौघासारखे सुख मिळवण्यासाठी धडपड देखील करावी लागणार याचा मनापासून स्वीकार व्हायला हवा. मी कोणीही विशेष नाही की आपसूकच सुख किंवा दुःख पदरात पडेल.

हेही दिवस जातील

दुःख आहे म्हणून सुखाला अर्थ आहे. एकाकीपण काय हे समजल्याशिवाय आपल्या आयुष्यातील आपली काळजी घेणाऱ्या, मनापासून मायेनं चौकशी करणाऱ्या, वेळी अवेळी मदतीला धावून येणाऱ्या आप्तेष्टांचे महत्व समजणार नाही. त्यामुळे या एकटेपणाचा देखील उपयोग आहे. ह्या गोष्टी तुम्हाला कणखर बनवतील हे समजून घ्यावे. तग धरावा. काही गोष्टी कालानुरूप उमजतात. त्यासाठी वादळात पुढे नाही जाता आले तरी होडी उलटणार नाही इतपत तयारी ठेवावी. असे काही करू नये ज्याचा पुढे जाऊन पश्चात्ताप होऊ शकतो. आपल्या प्रियजनांना तटस्थपणे आपल्या वागणुकीचे विश्लेषण नम्रपणे मागावे. त्यानुसार वागणूक नियंत्रित करावी.

पुस्तके

पुस्तकांना आपले सोबती बनवावे. त्यातल्या त्यात सकारात्मक पुस्तके वाचावीत. आजकाल सेल्फ हेल्प पुस्तकांना टोमणे मारायची रीत आली आहे. पण सुरुवात म्हणून ही पुस्तके चांगली असतात. उत्तमोत्तम भाषांतरीत तसेच मराठीतली पुस्तके वाचावीत.

तंत्रज्ञानामुळे आज चांगल्या व्यक्ती आणि त्यांच्या विचारांचा सहवास मिळणे अगदी शक्य झाले आहे. युट्युब, पॉडकास्ट, ऑडिओबुक्स या माध्यमातून या व्यक्ती रोज भेटू शकतात. अशा लोकांचा संग करावा.

कौशल्य

आपल्या पिढीतलेच प्रसिध्द मानसशास्त्रज्ञ ऍडम ग्रांट यांच्यानुसार 'आत्मविश्वासामुळे अधिक यश मिळते' यापेक्षा 'यशामुळे आत्मविश्वास मिळतो आणि तो आणखी यशाचा पाया बनतो' हे जास्त योग्य आहे. त्यामुळे फुकाचा आत्मविश्वास वाढवण्याच्या नादाऐवजी एखादया कौशल्यावर काम करून त्यावर प्रभुत्व मिळवणे हे आत्मविश्वास निर्माण करण्याचे साधन आहे. त्यामुळे जास्त वेळ न दवडता कोणत्याही कौशल्यावर काम सुरू करावे. त्याने दिलेला आत्मविश्वास तुम्हाला बाकीची ध्येये गाठण्यासाठी मदत करणार आहे.

अपेक्षाभंग

माणूस म्हंटले की माणसांचा संग आला आणि संग आला तर माणसांचे बरेवाईट अनुभव येतात. आपण एखाद्यावर अत्याधिक विश्वास करतो, भावनिकरित्या अवलंबून राहतो आणि अशा माणसाने पाठ फिरवली तर अतीव दुःख होते. अशावेळी आपण स्वतः फार मोठे सद्गुणांचे पुतळे आहोत आणि दुसर्याने आपला फायदा घेतला, वापर केला, जग किती वाईट असे विचार पिंगा घालायला लागतात. बघायला गेलं तर त्या उपरोक्त व्यक्तीने या अपेक्षाभंगापूर्वी वेळोवेळी त्यांच्या हेतुबद्दल खाणाखुणा दिलेल्या असतात. आपण त्याच्याकडे कधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो किंवा सत्य पाहण्याचे टाळतो. अशावेळी अचानक झालेल्या या आघाताने दुःख होते. हे दुःख खरेतर मरणाचे असते. आपले समज, आपला जगाप्रति दृष्टिकोन हे आपले अंगच असतात. या आघाताने तो जुना मी मरतो. मग वेदना तर होणारच. पण यातून जो नवा मी जन्म घेतो तो आधीपेक्षा अधिक मुरलेला आणि कमी भोळा असतो. अशा मरण जन्माच्या शृंखलेतूनच अधिकाधिक प्रगल्भता येत असते. त्या दुसर्या व्यक्तीने दिलगिरी व्यक्त केली तर क्षमा करून किंवा नाही केली तर स्वतःला क्षमा करून, आलेल्या वेदनेचा स्वीकार करून परत असा नादानपणा होणार नाही याची दक्षता घेऊन मार्गक्रमण करायचे आहे हे ठरवावे. ती दुसरी व्यक्ती देखील या जगरहाटीचाच भाग आहे त्यामुळे कदाचित तेदेखील अशा अनुभवातून गेले असतील वा जातील. त्यामुळे अगदीच राक्षस नसतील तर त्यांच्याकडेदेखील सहानुभूतीपूर्वक पाहावे. मैत्री टिकवता आली नाहि तरी कटुता धरू नये.

तुलना कोणासोबत?

स्वतःची तुलना दुसऱ्याकडे आज काय आहे याच्याबरोबर न करता आपल्या स्वतःकडे काल काय होते याबरोबर केलेली उचित. दुसर्याला यश मिळण्यासाठी त्याने काय काय यत्न केले, किंवा त्याला काय संधी मिळाल्या हे व्यक्तिपरत्वे पराकोटीचे बदलत असते. अशावेळी त्याचा आज बघून तुमची रणनीती ठरवणे कितपत बरोबर आहे. यापेक्षा स्वतःचा आज बघून तुम्हाला कुठे जाता येईल हे पडताळणे जास्त उचित नाही का? आणखी आपल्याकडे देखील अशा गोष्टी असू शकतात ज्या आपण गृहीत धरतो आणि निव्वळ आपल्याकडे काय नाही याच्यावर लक्ष केंद्रित करतो. आपल्याकडे असणाऱ्या गोष्टी जसे - कुटुंब, स्वास्थ्य, आप्तेष्टांचे स्वास्थ्य, स्थिर उत्पन्नाचा स्रोत अशा गोष्टींची किंमत ते नसल्यावरच कळते. त्यामुळे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगून काही मिळवण्यासाठी प्रामाणिक, शिस्तबद्ध प्रयत्न करणे हे तुलना केल्याने होणाऱ्या दुःखाला योग्य दिशा देण्याचे साधन आहे हे समजून घ्यावे.

मन काही सांगू पाहते आहे का?

एकटे वाटते अशा वेळी चिंतन करावे की काही अंत:प्रेरणा तुम्हाला काही तरी सांगत आहे का? काही कडू आठवणी, काही महत्त्वाचे पण कठोर निर्णय जे तुम्ही टाळत आहात ते बाकी आहेत का? या गोष्टी लिहून काढाव्यात. होते काय की अशा निराश अवस्थेत आपण तात्पुरते उपाय म्हणजे पिच्चर बघणे, ओली पार्टी करणे, गेम खेळणे असे थातुरमातुर उपचार करतो. पण अशाने फक्त आजचे विचार उद्यावर ढकलून त्या बेचैनीत आणखी भर घालत असतो. अशावेळी शांतपणे आणि तटस्थपणे भावनांच्या मूळ स्रोताचे निरीक्षण केले तर बरीच चांगली उत्तरे मिळू शकतात. वरवरची मलमपट्टी करून चांगली संधी घालवू नये. मिळालेल्या उत्तरांवर काम सुरू करून कार्य तडीस न्यावे.

एकांताविषयी -

मला एकटे वाटले असेल बऱ्याचदा. पण एकांत सर्वात जास्त अनुभवला ऑस्ट्रिया मध्ये असताना. काफ्फेनबर्ग नावाच्या आल्प्सच्या कुशीत वसलेल्या या टुमदार गावामध्ये मला राहण्याचा योग आला. ख्रिसमस निमित्त बरेच विद्यार्थी आपापल्या घरी गेले होते. होस्टेल वर तुरळक राहिले होते. अशा वेळी वाटले की वा.. इतकी शांतता.. पण हे औत्सुक्य फार फार तर 2–3 दिवस टिकले. माझ्या खोलीच्या दुसऱ्या टोकाला ठेवलेले मनगटी घड्याळाचे ठोके जेव्हा भर दिवसा ठळक ऐकू यायचे तेव्हा मला स्वतःला समजत होतो तेवढा मी अंतर्मुख व्यक्ती नाही हे समजले.

या प्रश्नावर माझ्या कुवतीप्रमाने, अनुभवाप्रमाणे उत्तर दिले आहे. या विषयावर माझा सखोल अभ्यास नाही. कदाचित प्रश्नकर्त्याला हे उत्तर अपेक्षित नसावे. तरीही मी प्रश्नाचा रोख समजून उत्तर दिले आहे. अंदाज चुकल्यास माफ करावे. उत्तरावर ज्या विचारांचा प्रभाव आहे अशा व्यक्तींबद्दल लिंक उत्तराखाली देत आहे. जगरहाटीचा अभ्यास चालू आहे.

१. मार्क मॅनसन चे "द सटल आर्ट ऑफ नॉट गिविंग फक"

२. मनोवैज्ञानिक  जॉर्डन पिटर्सन यांची व्याख्याने



३. डॉ. जॉर्डन पिटर्सन यांचे ट्वेल्व्ह रूल्स फॉर लाईफ

४. मनशक्ती लोणावळा इथली व्याख्याने

४. स्वानुभव

_*_



टिप्पण्या

  1. धन्यवाद, काही लोकांना एकटेपणा आवडतो, मी त्यातील एक, अश्या वेळी आत्मचिंतन केल्यास खूप समाधान मिळते
    माणूस एक वेगळ्याच zone मध्ये जातो. असा अनुभव देण्यासाठी एकदा इगतपुरीच्या विपश्यना केंद्रा ला जरूर भेट द्या

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्रायासाठी अनेक आभार!

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक