अभियांत्रिकीचे असामान्य

 

मी २००६ साली यांत्रिकी विषयामध्ये पदवी घेतली.

आज त्या वर्गामधील बहुतेक सर्व विद्यार्थी कंपन्यांमध्ये अभियंते, माहिती तंत्रज्ञ आहेत, काही व्यवस्थापक आहेत, काही उच्च शिक्षण घेऊन परदेशात स्थायिक झाले तर काही उद्योजक झाले आहेत. एक वैमानिक झाला, एक RTO पोलीस अधिकारी, एक खोडद च्या रेडिओ दुर्बीण प्रकल्पावर अभियंता म्हणून आहे, तर एक जण सैन्यामध्ये अधिकारी आहे.

स्कूटर आणि मोटरसायकल रिपेयरिंग

बारावीमध्ये मी पुण्याच्या सर परशुराम महाविद्यालयात व्होकेशनल च्या वर्गात होतो. स्कूटर आणि मोटरसायकल रिपेयरिंग या वर्गाला शैक्षणिक प्रगती यथातथाच असणारी मुले प्रवेश घेणार याची तुम्ही कल्पना करू शकता. पण तुमची कल्पना साफ चुकीची आहे. इथे प्रवेश घेणारी मुले दहावीला ८५-९० टक्केच्या वर गुण मिळवणारी, बहुतेक बोर्डात आलेली होती. केवळ बारावीनंतर अभियांत्रिकी ला जाण्याचे पक्के असल्याने जीवशास्त्र विषयाला पर्याय म्हणून या विद्यार्थ्यांनी या वर्गात प्रवेश घेतला होता. वर्ग व्यावसायिक प्रशिक्षणासाठी तयार केलेला होता पण विसंगती बघा की या वर्गाला येणारे कोणीही गॅरेज मध्ये काम करण्याच्या अथवा स्वतः गॅरेज काढण्याच्या इच्छेने तिथे आले नव्हते.

तरीही एक गोष्ट चांगली झाली. या वर्गातून हात काळे करून, इंजिन च्या कार्यपध्दती बद्दल घेतलेले ज्ञान नंतर अभियांत्रिकीच्या चार वर्षात परत मिळाले नाही.

या स्कूटर आणि मोटरसायकल रिपेयरिंग वर्गातल्या विद्यार्थ्यांनी मात्र भरभरून यश मिळवले. काही शास्त्रज्ञ झाले, काही भारतीय प्रद्योगिकी संस्थेतून (IIT) मधून पदवीधर होऊन जगभर पसरले.
या विद्यार्थ्यांकडून कदाचित हे अपेक्षितच होते.

अशा दैदिप्यमान बुद्धिमत्तेला कधीकधी काळी किनार देखील असते. याच वर्गातला आमचा एक मित्र अभियांत्रिकी च्या दुसऱ्या वर्षात असताना स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) या मानसिक आजाराला बळी पडला आणि त्यातून बाहेर यायला त्याला पुढची कितीतरी वर्षे लागली. आज तो ही तंत्रज्ञ म्हणून काम करत आहे.
----

या सर्वांतून वेगळे नाव म्हणजे प्रियदर्शन सहस्रबुद्धे. तो सध्या काय करतो हे फारच इंटरेस्टिंग वाटले म्हणून इथे विस्ताराने लिहितोय.

स.प. महाविद्यालयाच्या बारावीच्या या व्होकेशनल च्या वर्गातल्या अव्वल विद्यार्थ्यांपैकी एक. बारावीनंतर आयआयटी पोवई मधून पदवी घेतली. मनात आणले असते तर कोणत्याही मोठया अमेरिकन कंपनीमध्ये जाऊन सहज कोट्यवधींचा जॉब मिळवला असता. पण या सर्वांवर पाणी सोडून आदिवासी भागात सेवा करायला गेला.

या आठवड्यात चक्क १८ वर्षांनी भेटला. कुटुंबाचा वाहनांचा सुटे भाग बनवण्याचा उद्योग असूनही त्याच्या जोडीला याने "चक्राकर लाइफस्टाइल सोल्युशन्स" ही सामाजिक उद्योजक संस्था उभी केली आहे. कचऱ्यातून ऊर्जा निर्माण करण्याच्या ध्येयाने वाटचाल करणाऱ्या या संस्थेने नुसतेच बोलाची कधी बोलाचा भात ही आजच्या ट्विटर वाल्या कार्यकर्त्यांच्या व्याख्येला छेदून एक नफ्यात असलेला उद्योग चालवला आहे. प्रियदर्शन च्या शब्दांत 'चळवळ' सुरु केली आहे.

त्याच्या संस्थेने वायू ही बायोगॅस बनवणारी सहज हातळण्याजोगी व्यवस्था बनवली आहे. मोडुयलर असणाऱ्या या व्यवस्थेत बायोगॅस बनवण्यासाठी कुठलेही बांधकाम करावे लागत नाही. सर्व सिस्टिम पोर्टेबल आहे. गरजेनुसार कमी अधिक युनिट जोडण्याची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे अगदी वाजवी दरामध्ये उपलब्ध असलेल्या या सिस्टिम ला वीज लागत नाही. प्रियदर्शन आणि त्याच्या मेहनती टीम ने आतापर्यंत अशी २०० युनिट्स बसवली आहेत. अगदी एका घरापासून ते मोठ्या हॉटेल पर्यंत त्यांनी हे युनिट्स विकले आहेत. दिवसेंदिवस घरगुती कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कडक होणाऱ्या निर्बंधामुळे लहान मोठ्या सोसायट्यांना अशा पोर्टेबल युनिट्स चा फायदाच होणार आहे.

या प्रकल्पाला भेट दिल्यावर प्रियदर्शन ला इतक्या वर्षांनी भेटल्याचा आनंद तर होताच पण बायोगॅस बद्दल अतिशय उपयुक्त माहिती देखील मिळाली. त्याचे स्वतःचे घर आणि या प्रकल्पातील कार्यकर्त्यांची घरे देखील याच बायोगॅस युनिट वर स्वैपाक बनवत आहेत.




चक्राकार लाईफस्टाईल

कंपनीचा विस्तार वाढला तसा बायोगॅस युनिट्स साठी लागणारे कल्चर देखील मोठ्या प्रमाणात बनवणे आले. त्यासाठी त्यांना उष्टे अन्न, पालापाचोळा लागतो आणि या कल्चरमधील जीव त्यातून बायोगॅस तयार करतात. या बायोगॅस चे करायचे काय म्हणून त्यांनी प्रकल्पावर झुणका भाकर केंद्र चालू केले आहे. त्यातून त्यांना अधिक कमाई होत आहे. या केंद्रात बायोगॅस हे इंधन वापरले जाते आणि उष्टे अन्न परत या जिवांना दिले जाते. अशाप्रकारे प्रियदर्शन ने त्याच्या कचरामुक्त विश्वाचे लहानसे मॉडेलच प्रकल्पात तयार केले आहे. विशेष म्हणजे या जागी तब्बल २ तास फिरत असताना मला थोडादेखील खराब वास जाणवला नाही. 




कॅफे क्लायमेट

प्रियदर्शन या केंद्राला कॅफे क्लायमेट म्हणतो. मोह, चिंच, आवळा, चिक्कू, आंबा आणि कितीतरी वनातील झाडांनी सजलेल्या या त्याच्या रानात एका बाजूला या प्रकल्पाची युनिट्स बनवण्याचे काम चालते आणि दुसरीकडे येणाऱ्या जाणाऱ्या पांथस्थ खवय्यांची चौकशी करणारा प्रियदर्शन. जगभर असे कॅफे क्लायमेट निर्माण करून तिथल्या स्थानिक वन्य विविधतेला आणि संस्कृतीला पुढे आणण्याचे त्याचे स्वप्न आहे. त्याची प्रगती बघता स्वप्न सत्यात उतरणे सुरू झाले आहे.

आज आपल्या देशात कोण किती पिचलेला आहे आणि अन्यायाने पीडित आहे हे दाखवण्याची स्पर्धा सुरू आहे. अशामध्ये निसर्गाने मला भरभरून दिले आहे आहे आणि सगळ्यांना पुरेल इतके संसाधन तयार करता येईल हा दुर्दम्य आशावाद बाळगणारी प्रियदर्शन आणि त्याच्या कार्यकर्त्यांची ही फळी हाच आपल्या देशाचा आणि मानवतेचा आधार आहेत.

प्रियदर्शन च्या या प्रकल्पाला नक्की भेट द्या. त्याच्या या बायोगॅस सिस्टिम्स पहा. कॅफे क्लायमेट मध्ये निसर्गाच्या सानिध्यात रिसायकलिंग म्हणजे काय हे प्रत्यक्ष अनुभवा. त्याच्या या चळवळीचा भाग व्हा.



वायुमित्र चे संकेतस्थळ - https://vaayu-mitra.com/
कॅफे क्लायमेट आणि वायुमित्र प्रकल्प - गूगल मॅप्स 
वायुमित्र बद्दल प्रसिद्ध झालेला लेख - https://www.thebetterindia.com/170461/pune-engineer-innovation-green-garbage-fuel-lpg-replacement/

स्वयंसेवकांसाठी आवाहन : https://vaayu-mitra.com/first-volunteer-meet-2020-feb-01-marathi/

_*_






टिप्पण्या

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक