खनिज तेलाचे ऋण



हो. अमेरिकन तेल वायदे बाजारात तेलाची किंमत एका पिंपामागे उणे ३७.६३ डॉलर झाली. पण याचा अर्थ लगेच असा होत नाही कि सामान्य अमेरिकन लोकांना पेट्रोल फुकट मिळेल. ही बातमी वाचताना चांगलाच आश्चर्याचा धक्का बसला. नंतर याबद्दल आणखी जाणून घेताना माझा मित्र मुस्तफा, जो कमोडिटी मार्केट मध्ये ट्रेडिंग करायचा त्याचे बोल आठवले.. "जर करार संपण्याच्या आधी लॉट विकले नाहीत तर घरी आणून देतील बरका."*

हे उणे तेलाच्या किमतीचे काय प्रकरण आहे हे समजून घेण्यासाठी वायदे बाजार काय असतो हे पाहावे लागेल.
----

समजा सागर एक पोल्ट्रीवाला आहे. त्याच्याकडे २०२० मार्च महिन्याच्या सुरवातीला १००० पिल्ले आहेत. मे महिन्याच्या शेवटी कोंबड्यांची पूर्ण वाढ होऊन तो कोंबड्या बाजारात विकणार आहे. साधारण १०० रुपये कोंबडीमागे सुटतील अशी त्याला अपेक्षा आहे. कोंबड्या संगोपनाचा खर्च ५० रुपये प्रति कोंबडी येणार आहे. पण सागरला थोडी धाकधूक वाटते आहे कि ५० हजारांची गुंतवणूक करून जर अपेक्षित किंमत आली नाही तर?


अशा वेळी तो एक आयडिया करतो. वैभव या कोंबडीच्या व्यापाऱ्याला तो भेटतो.

५०० कोंबड्या मे महिन्यात विकायच्या आहेत असे तो सांगतो. वैभवशेट म्हणतात मग मे महिन्यातच ये. पण सागरला तर मे महिन्यात भाव पडतील का काय याची चिंता आहे. त्यामुळे तो वैभवशेट ला सांगतो कि तुम्ही जर मे महिन्यात ५०० कोंबड्या ८० रुपये भावाने घेणार याची खात्री देत असाल तर मी त्या भावाने विकायला तयार आहे. आता मात्र वैभव शेट विचार करतात. ५०० कोंबड्या त्यावेळी १०० रुपयाने खुल्या बाजारातून घेतल्या तर ५० हजार रुपये द्यावे लागतील आणि आता जर सागरशी वायदा केला तर ४० हजारामध्येच काम होईल. म्हणजे १० हजार वाचतील. आणि जर कोंबडीचे भाव वाढून १२० रुपये झाले तर २० हजार रुपये वाचतील.
आता सागरचा विचार केला तर कोंबडीचे भाव मे महिन्यात १०० रुपये च राहिले तर त्याला १० हजाराचा तोटा आहे. पण तेच जर भाव खाली येऊन ६० रुपये झाले, तर त्याला वैभव शेट कडून कराराप्रमाणे ४० हजार मिळतीलच. राहिलेल्या कोंबड्या मात्र खुल्या बाजारात ६० रुपयाने विकायला लागल्यामुळे त्या ५०० कोंबड्यांचे ३० हजारच मिळतील. म्हणजे एकूण १ लाख उत्पन्न मिळायचे तिथे ७० हजारच मिळतील. पण जर वायदा केला नसता तर ६० च हजार मिळाले असते. जर अगदी मार्केट गडगडले आणि शून्य बाजारभाव झाला तरी वैभवशेट कडून ४० हजार तर नक्कीच मिळतील.

आता समजा मे महिन्यात भाव वधारून १२० रुपये झाला तर? वैभवशेट बरोबरच्या करारामुळे त्याला ४० हजाराला पाचशे कोंबड्या द्याव्याच लागतील. पण बाकीच्या कोंबड्या बाजारभावाप्रमाणे विकून त्याला तिथे ६० हजार मिळतील. म्हणजे १ लाख तर निघतीलच. वायदा नसता तर १ लाख वीस हजार मिळाले असते. पण त्यासाठी खुल्या बाजारातल्या किमतीची जोखीम घ्यावी लागली असती.

तर अशा प्रकारे सागरने आपल्या पोल्ट्रीफार्मला किमान नुकसान होऊ नये म्हणून या वायदा कराराची व्यवस्था केली.

आला करोना वायरस.

एप्रिलच्या मध्यापर्यंतच हे स्वच्छ समजले कि मे महिन्याच्या अखेरीपर्यंत लोक चिकन खाणार नाहीत. झालिका पंचाईत. आता सागरला आपल्या पोल्ट्रीवरच्या गुंतवणुकीचा परतावा सोडा नुकसान होणार हे स्पष्ट आहे. कोंबड्यांना मागणी नाही म्हणून त्याला दोन पर्याय आहेत. एकतर सगळ्या कोंबड्या मारून टाका नाहीतर मे पर्यंत वाट बघा. पण एक गोष्ट त्यातल्या त्यात चांगली आहे कि वैभवशेट वायद्यानुसार ५०० कोंबड्यांचे ४० हजार देणार. आता वैभवशेट चे धाबे दणाणले.

मे पर्यंत त्यांच्याकडे ५०० कोंबड्या येणार. करार म्हणजे करार. त्यामुळे सागरला ४० हजार देऊ. अहो पण एवढ्या कोंबड्यांचं आता करायचे काय? त्यांच्याकडे कोंबड्या ठेवायला जागापण नाही. मग वैभवशेट आपल्या आसपास च्या व्यापाऱ्यांना सांगतात कि त्यांनी ४० हजाराला ५०० कोंबड्यांचा वायदा केला होता पण आता तोच वायदा (करार) ते २० हजाराला विकायला तयार आहेत.

आता कोरोना वायरस च्या काळात कोणाला वेड लागलाय का कोंबड्या घ्यायला? त्यामुळे साहजिकच सगळे नकार देतात. हो नाही करता करता ५ हजार तरी द्या, फुकट घेऊन जा इतपर्यंत प्रकरण येते. तरीही कोणी तयार होत नाही.
सरतेशेवटी जयंत पोल्ट्रीवाला तयार होतो, या अटीवर कि वैभवशेट ने त्याला त्या कोंबड्या घेऊन जाण्यासाठी पैसे द्यावेत. कारण त्या कोंबड्यांची विल्हेवाट लावायला त्यालाच स्वतःलाच पैसे पडणार आहेत. अशा प्रकारे वैभवशेट ने सागरकडून ४० हजाराच्या कोंबड्या घेतल्या आणि लगोलग जयंताला त्या घेऊन जाण्यासाठी वर ३० हजार दिले. म्हणजे एका कोंबडीची किंमत जयंतासाठी उणे ६० रुपये झाली. (वैभवशेटचा एकूण तोटा ७० हजार, १४० रुपये प्रति कोंबडी)

तिकडे पोल्ट्रीवाले कोंबड्या मारतायेत पण मला मात्र चिकन नेहमीच्याच दराने मिळत आहे.


ही वैभवशेट सारखीच गत काही तेल वायदेबाजारातील व्यापाऱ्यांची झाली. मार्च मध्ये कच्च्या तेलाचे वायदे करार झाले होते. लॉकडाऊन मुळे आधीच तेलाला मागणी नसल्यामुळे स्टोरेज उपलब्ध नाहीत, आणि त्यात हे करार संपताना दुसऱ्याच्या माथी मारले नाहीत तर जास्तीचे तेल घ्यावे लागणार त्यामुळे.. पैसे घे.. पण आणून देऊ नको.. कोंबड्या मारू तरी शकतो हे तेल ठेवायचे कुठे? अशा परिस्थितीमुळे तेलाच्या हिशोबाच्या दृष्टीने किमती शून्याच्या खाली गेल्या. तरीही सामान्य नागरिकांना पेट्रोल डिझेल अगदी पाण्यासारखे स्वस्त होईल असे होणार नाही. कारण तेलाच्या वाहतूक, शुद्धीकरणाचा जो खर्च आहे तो तर असणारच आहे. हा उणे किमतीचा खेळ वायदे बाजारापुरताच मर्यादित आहे.
_*_


माझे मूळ कोरा वरचे उत्तर.

टिप्पण्या

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक

Dandeli To Goa Via Doodhsagar