Quora वरील लेखी स्वरूपातील भांडणे वाचताना तुम्हाला काय वाटते?
जर मुद्देसूद, तर्काला धरून आणि अभ्यासयुक्त टिप्पणी असेल तर वाचायला मजा येते. काहीतरी नवीन समजते. शेवटी संवादाचा हेतू एकमेकांना समजून घेणे आणि एकमेकांच्या मुद्द्यातील कमकुवत जागांना (blindspots) भरून आणखी चांगला विचार तयार करणे हाच असतो ना? नाही म्हणजे आदर्शवत संभाषणात तर हाच हेतू असावा.
तसे नसेल आणि टिप्पणी हेकेखोर, एकांगी होत असेल तर मग अशी भांडणे न करणे चांगले. शेवटी लिखित स्वरूपातील भांडणे दोन किंवा अधिक व्यक्तींच्या सहभागाशिवाय पुढे जाऊच शकणार नाहीत. अशावेळी प्रतिक्रिया न देता काहीच केले नाही तर कदाचित ते थोडे उद्धट वाटू शकते. त्याला इलाज मलाही माहीत नव्हता.
डेस्टीन हा "SmarterEveryDay" या युट्युब चॅनेल चा सर्वेसर्वा. स्वतः एक व्यावसायिक शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ असूनही त्याला त्याच्या व्हिडीओ वर अशा बऱ्याच टिप्पण्या यायच्या ज्यामुळे तो आधी पार वैतागून जायचा. त्याने विचारांती याच्यावर उपाय काढला. तो म्हणतो की अशा न संपणाऱ्या वादावर स्वतःचा तोल न ढळू देता नम्रता ठेवावी. जर वाद ताणत चालला तर तुम्हाला वाटेल तेव्हा हा प्रश्न विचारावा - "मी कुठला पुरावा दिला तर तुम्ही तुमचे मत बदलाल?" आणि याचे उत्तर जर तर्काला धरून असेल आणि त्यावर तुमच्याकडे चांगले उत्तर असेल तर तुम्ही वाद चालू ठेवा. या प्रश्नाचे उत्तर तर्काला धरून नसले तर कितीही वाद घातला तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही असे समजून तिथून बाहेर पडा.
हा उपाय वापरण्याची मला गरज पडली नाही. कारण बऱ्याचदा मी जेव्हा स्वतःच हा प्रश्न मनात विचारला तेव्हा लक्षात आले की जर या प्रश्नाचे समोरून तार्किक उत्तर आले तर माझा स्वतःचा अभ्यास तेवढा नाही आणि माझ्या मुद्द्यात कदाचित वास्तविकता कमी आणि भावना जास्त आहेत. आता भावना असलेल्या मुद्यांना कसे सिद्ध करणार ना? मग नम्रपणे सोडून द्यायचे. अवघड आहे, पण एकदा आपला इगो बाजूला केला तर शक्य आहे.
तर, अशी भांडणे वाचताना मला राहून राहून वाटते की हा वरचा उपाय वापरून हा वाद लवकर नम्रपणे संपवता आला असता नै?
_*_
1. https://qr.ae/pG3Pbh - My original Quora answer
2. Image source - https://pixabay.com/vectors/argument-loud-discussion-conflict-6080057/
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्रायासाठी अनेक आभार!