साधू संत येति घरा..




पूर्वी जसे समर्थ महाराज, साईबाबा आणि असे बरेच संत महात्मे होऊन गेले, तसे लोक आता का दिसत नाहीत? इतके सामर्थ्यवान सध्या कोणी आहेत का?

चांगला विचार करायला लावणारा प्रश्न आहे.

मला याची पुढील कारणे दिसतात :

१. साधुसंत ज्या काळात झाले त्या काळात त्यांच्या हयातीत आसपासच्या लोकांना सोडून किती जणांना हा माणूस सिध्दपुरुष आहे, संत आहे किंवा साधू आहे हे समजले असेल? या सिद्धपुरुषांनी आपले अवतारकार्य संपवल्यावरच त्यांच्या बऱ्याचशा महिमा त्यांच्या अनुयायांकडून इतर समाजाला समजल्या असतील, वास्तविकतेला कल्पनेची, गद्याला पद्याची जोड मिळून त्यांची कीर्ती सर्वदूर पोहोचली असेल. कस्तुरी मृगाला जसे स्वतःच सुगंधाचा स्रोत आहोत हे समजत नाही, तसेच वर्तमानात देखील आजूबाजूला असे सिध्दपुरुष असतीलही पण आपल्याला ते कळणार नाही किंवा उशिरा समजेल.

इतिहासात बरेचदा हेच पाहायला मिळते कि महापुरुषांना खांद्यावर घेऊन नाचणाऱ्यांपेक्षा त्यांच्या मार्गात धोंडे घालणारेच जास्त असतात. किंबहुना अशा धोंडे घालणाऱ्या परिस्थितींवर ते मात करतात म्हणूनच भविष्यकाळात त्यांना महापुरुष म्हणून ओळखले जाते. वर्तमानात असे 'In Progress' महापुरुष/स्त्री/व्यक्ती असेच त्यांचे त्यांचे काम करत असतील आणि त्यांना खांद्यावर घेऊन नाचणारे नसतील तर आपल्याला कसे समजणार ना.

२.
पूर्वीच्या काळी लोकांच्या चमत्काराच्या व्याख्या वेगळ्या होत्या. आजच्या सारख्या व्हॉट्सअँप व्हिडीओ कॉल कुणी १०० वर्षांपूर्वी तळहातावर ठेवलेल्या फरशीच्या तुकड्यात दाखवला असता तर त्या व्यक्तीला समाजाने सिध्दपुरुष म्हणून डोक्यावर घेतले असते. आज तंत्रज्ञानामुळे अशा कितीतरी चमत्कार वाटणाऱ्या गोष्टी अंगवळणी पडल्या आहेत. उदा. मोबाईल, विमानप्रवास, टीवी, आधुनिक वाहने. त्यामुळे लोक चमत्कार बघून इंप्रेस व्हायला चमत्कार पण त्याच लेव्हल चे पाहिजेत. सिध्दपुरुष हे सिद्धपुरुष चमत्कार दाखवून झाले असे म्हणायचे नाही, पण त्यांची बरीचशी फॅनफॉलोवर मंडळी हे चमत्कार पाहूनच गोळा झाली हे तर मान्य करावेच लागेल.

३. एखाद्या रत्नाला पारखण्यासाठी एक जाणकार जवाहिऱ्याच लागतो. बाकी लोकांना काचेचा खडा आणि मौल्यवान रत्न यातला फरक समजणे मुश्किल. तसेच एखादा गुणसंपन्न मनुष्य देखील दुसऱ्या जाणकार व्यक्तीच्या सानिध्यात येईल तेव्हाच त्या महापुरुषाचे खरे माहात्म्य समजेल ना. रामानुजन यांचे उदाहरण घ्या. जी.एच. हार्डी यांच्यासारखा गणितीय गुणांची पारख असेलेला मार्गदर्शक भेटला नसता तर रामानुजन यांचे आयुष्य हिशोबाच्या वह्या भरण्यात निघून गेले असते आणि आज कोणाला असा अलौकिक प्रतिभा असलेला माणूस होऊन गेला हे समजले देखील नसते. मला वाटते की अशी किमान शंभर एक प्रतिभावान माणसे दर शतकात या जवाहिर्यांच्या संपर्काअभावी अशीच मालवून जात असतील. आता रामानुजन ग्रेट माणूस होता हे मला कसे माहिती? कारण बाकीचे लोक म्हणतात म्हणून. मला त्यांचे ९०% गणित समजणार देखील नाही. अशा वेळी हा माणूस माझ्या आजूबाजूला असता तर मी त्याला कदाचित "पोटापाण्याचे बघा" हाच सल्ला दिला असता. सांगण्याचा मुद्दा असा की तुम्हाला आजकाल महापुरुष दिसत नाहीत हा तुमच्या दृष्टीची मर्यादा असू शकते.

४. मागे अतुल कहाते यांचे "It happens only in IT" हे पुस्तक वाचण्यात आले. भारतातल्या आयटी उद्योग क्रांतीबद्दल असेलेल्या या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी म्हंटले आहे की भारताच्या आयटी उद्योगतले धुरंधर अजूनही काही गोष्टी बाहेर काढत नाहीत. इन्फोसिस विप्रो सारख्या कंपन्यांबद्दल नेहमीच आपण काहीतरी प्रेरणादायी ऐकतो. पण या कंपन्यांनी लावलेले डावपेच, त्यांचे अपयश, शोधलेल्या पळवाटा याचे वर्णन येत नाही. याचे कारण म्हणजे या क्रांतीतील बरेच धुरंधर अजूनही त्या व्यवसायामध्ये आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी कदाचित हे लोक हा अनुभवांचा सर्व ऐवज बाहेर काढतील. अमेरिकेची CIA त्याचे पाच पन्नास वर्षापूर्वीचे गुप्त अवहाल पब्लिक करते ना तसेच. कारण त्या वेळी या गोष्टींचा वर्तमानावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता बऱ्यापैकी मावळते. तसेच, कदाचित आताचे महापुरुष त्यांनी घडवलेल्या लीला तुम्हा आम्हा सारख्या समकालीन व्यक्तींसमोर उघड करणे टाळत असावेत.

तर, शेवटी असे म्हणेल की, वर्तमानात देखील भूतकाळात होते तेवढेच किंवा जास्त महापुरुष आपल्यामध्ये असतील असे मला वाटते पण पश्चातदृष्टी (Retrospective) च्या मर्यादेमुळे आपल्याला ते समजणे अवघड आहे.

_*_


टिप्पण्या

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक