माणूस मोठा मानावा की पैसा?





माणूस मोठा मानावा की पैसा मोठा म्हणावा?

पैसा वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी केलेली एक योजना, एक अवजार, एक साधन आहे.

माणूस मोठा कि हातोडा मोठा? हा प्रश्न का नाही विचारला जात बरे? जिथे खिळे ठोकण्याचे काम आहे तिथे हातोडा मोठा. तिथे माणूस कितीही चांगला असला तरी काय उपयोग?


आता, माणूस मोठा कि त्याच्याकडे असलेला पैसे मोठा? हा चांगला प्रश्न आहे.

तर, ज्या माणसाकडे हा पैसा आहे त्या माणसाकडे तो पैसा मिळवण्याची, त्याचे राखण करण्याची आणि वर्धन करण्याची, आणि उत्तम विनियोग करण्याची क्षमता असेल तर निश्चितच तो माणूस मोठा असे मानावे लागेल. काही कंपन्यांचे कार्यशील सीईओ जेव्हा त्या कंपन्या सोडून जातात त्यावेळी शेयर मार्केट मध्ये या कंपन्यांचे भाव पडतात, ही तो माणूस मोठा असण्याची लक्षणे.


दुर्योधन आणि अर्जुन महाभारताच्या अंतिम युद्धाआधी श्रीहरी श्रीकृष्णाचे पाठबळ मिळवण्यासाठी द्वारकेला येतात ती गोष्ट माहितीच असेल. हे दोघे श्रीकृष्णाकडे येतात तेव्हा श्रीकृष्ण झोपलेले असतात. लगबगीने हे दोघे त्यांच्या शयनकक्षात जाऊन बसतात. दुर्योधन मस्तकाजवळ बसतो आणि अर्जुन श्रीहरीच्या पायाजवळ. त्यांना जेव्हा जाग येते त्यावेळी पहिली दृष्टी अर्जुनावर पडते. त्यामुळे अर्जुन त्यांना युद्धात पांडवांच्या बाजूने लढायची विनंती करतो. त्याच वेळी दुर्योधन तो तिथे पहिला आला होता त्यामुळे श्रीकृष्णांनी त्याची विनंती स्वीकारून कौरवांच्या बाजूने लढावे असे दुर्योधन म्हणतो. आता या पेचातून सुटका कशी करणार या विवंचनेतून श्रीहरी प्रस्ताव मांडतात की द्वारकेच्या साम्राज्याची अजेय चतुरंग सेना आणि सर्व बळ आणि फक्त निःशस्त्र श्रीकृष्ण यामध्ये या दोघांनी निवड करावी. त्यावेळी अर्जुन श्रीकृष्णाची निवड करतो आणि दुर्योधन द्वारकेची सेना निवडतो. अशा पद्धतीने पांडव एका व्यक्तीला त्याच्या संपूर्ण साम्राज्यापेक्षा मोठा मानतात कारण त्यांच्या लेखी "जिथे हरी तिथे विजय" ही धारणा पक्की असते. दुर्योधन श्रीहरीची चतुरंग सेना मिळवली याचा आनंद मानतो.




आपल्याच पिढीतले यशस्वी अमेरिकन गुंतवणूकदार नवल रविकांत म्हणतात की त्यांची करोडोंची संपत्ती कुणी काढून घेतली आणि एखाद्या इंग्लिश मातृभाषा असलेल्या संपन्न देशात त्यांना कफल्लक सोडून दिले तरी हीच संपत्ती ते काही वर्षात परत मिळवतील. इथे त्यांनी त्या संपत्तीपेक्षा ती मिळवण्यासाठी त्यांच्यात असलेल्या कौशल्याला जास्त महत्व दिले आहे.




तर आता मूळ प्रश्नाकडे परत येऊ. माणूस मोठा कि पैसा?

हे हा प्रश्न कोणाच्या संदर्भात विचारला जातोय त्याच्या क्षमतेवर, हा प्रश्न विचारणाऱ्याच्या क्षमतेवर आणि हा प्रश्न कोणत्या परिस्थितीत विचारला जात आहे त्या परिस्थितीवर अवलंबून आहे. आणि खरेतर हा प्रश्न होलसेल सारखा दुसऱ्यांना चिटकवण्यापेक्षा मी मोठा का माझा पैसा मोठा असा नवल रवीकांतजींसारखा विचारला तर त्याला जास्त महत्व आहे असे मला वाटते.



हातोडा आणि माणसाचे चित्र DALL-E हे AI आधारित टूल वापरून तयार केले आहे.
महाभारतातील प्रसंगाचे चित्र ISKCON Desire Tree | IDT वरून साभार.
नवल रविकांत यांचे छायाचित्र इंटरनेट वरून साभार.

टिप्पण्या

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक